आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएमचा सुरक्षित वापर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एटीएम कार्डाचा वापर ही तशी नावीन्याची गोष्ट राहिलेली नाही. ग्रामीण भागातही याचा सहजतेने वापर होताना दिसतो. अशा या एटीएम कार्डाच्या वापराचे मात्र काही नियम आहेत. ते नियम पाळले नाही तर फसवणुकीमुळे आर्थिक नुकसानाला सामोरं जावं लागू शकतं.
तुमच्या एटीएम कार्डाची वैधता संपली असून ते ब्लॉक करण्यात आलेले अाहे, त्यावर आजपासून व्यवहार करता येणार नाही. तेव्हा कार्ड पुन्हा सुरू करण्याकरिता तुमच्या एटीएम कार्डचा १६ अंकी क्रमांक व पासवर्ड ताबडतोब सांगा, असा फोन किंवा मेजेस मिळाल्यास भावनेच्या आहारी जाऊन बँक खाते क्रमांक तसेच पासवर्ड देऊ नका. अन्यथा फसले जाल. अशा प्रकारच्या घटना अनेक शहरांत घडत आहेत, तेव्हा सावध राहा.
अनेक शहरांत अनेक जणांना एटीएम वैधता संपल्याचा फोन आला. त्यानंतर संबंधितांना अकाउंटमधील पैसे काढले जाऊन फसविले गेल्याचे लक्षात आले. फोन करणाऱ्या भामट्यांनी खातेदारांच्या खात्यातील पैसे त्यांच्या ईवाॅलेटमध्ये वळवून घेतलेले असतात आणि नंतर ते निवांत त्यातून पैसे काढून पसार होतात. या पार्श्वभूमीवर बँक खातेदारांनी आणि एटीएमधारकांनी हे लक्षात ठेवावे. बँकेचे अधिकारी कधीही तुमच्या एटीएम कार्डचा १६ अंकी क्रमांक व पासवर्ड याची मागणी करीत नाहीत. तेव्हा असा फोन आल्यास प्रत्यक्ष बँकेत जाऊन खात्री करा. बँक खाते क्रमांक व तत्सम माहिती अनोळखी व्यक्तीस देऊ नका. तुमच्या रजिस्टर्ड मोबाइलवर येणारा OTP ही सुरक्षिततेची दुसरी पायरी आहे, ताेही अनोळखी व्यक्तीस देऊ नका. अनेकदा काही जण हाॅटेलच्या कर्मचाऱ्याकडेच कार्ड व पिन देतात. अशा वेळीही धोका होण्याची शक्यता मोठी असते. घरच्या व्यक्तींनाही पिन देताना काळजी घ्या. एटीएम कार्डच्या पाकिटावरच पासवर्ड लिहून ठेवू नका. त्यामुळे कार्ड चोरीला गेले तर त्याचा गैरवापर करणे सोपे होईल. गेलेले पैसे परत मिळवणे अतिशय क्लिष्ट व कठीण आहे. फसवणूक आणखी एका मार्गानेही होते. एखादी व्यक्ती तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे, ते परत चालू करायचे असेल तर एटीएमचा पिन सांगा, असे फोन करून सांगते. एटीएम बंद पडण्याच्या भीतीने अनेक जण त्या व्यक्तीस एटीएम कार्डविषयी सर्व माहिती सांगतात. माहिती सांगितल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांतच एटीएमधारकांना त्यांच्या मोबाइल क्रमांकावर खात्यावरील पैसे काढल्याचे मेसेज येतात.
बँक खातेदारांना फोन करून ‘मी बँक अधिकारी बोलतो आहे,’ अशी बतावणी केली जाते व एटीएमचा कोड विचारून परस्पर पैसे काढले जातात. ‘आॅनलाइन’ चोऱ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अशा ‘टेलिफिशिंग अटॅकर्स’ना पकडण्यात अपयश येत आहे. जो टोल फ्री क्रमांक दिलेला असतो तो अनेकदा एंगेज लागतो. एटीएम कार्ड हरवले तर सर्वप्रथम कार्ड नंबर ब्लॉक करण्यासाठी बँकेला कळवा. लेखी स्वरूपात अर्ज करा. जर तुम्ही हरवलेल्या एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डची माहिती बँकेला कळविली नाही, तर त्या कार्डचा गैरवापर होऊ शकतो. हरवलेले एटीएम कार्ड ब्लॉक झाल्याची खात्री झाल्यानंतरच दुसऱ्या एटीएम कार्डसाठी अर्ज करा. फोनवर कोणालाही एटीएम कार्ड नंबर किंवा पिन नंबर सांगू नका. स्वत:चे एटीएम कार्ड स्वत:च हाताळा. व्यवहार पूर्ण झाल्याची सूचना मिळाल्यावरच एटीएममधून बाहेर पडा. पिन नंबर विसरल्यास बँकेला लेखी स्वरूपात अर्ज करून नवीन पिन नंबर प्राप्त करून घेता येतो.
handgeyogesh@gmail.com
बातम्या आणखी आहेत...