आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूक नसो पण शिदोरी असो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्ले ग्रुपमधला इवल्याशा दप्तरातला रंगीबेरंगी खाऊचा डबा, आधी कॉलेज आणि नंतर नोकरीच्या ठिकाणीही सोबतीला असतो. गप्पा आणि पदार्थांबरोबरच इतरही सर्व काही या डब्यासोबत ‘वाटून’ घेतलेलं असतं. त्या डब्याच्याच आठवणींची ही शिदोरी...
आम्ही सध्या दोघे पतीपत्नीच घरी असतो. रोज रोज एवढासा भातुकलीसारखा स्वयंपाक काय करायचा, म्हणून मी जेवणाचा एक डबाच लावला. एवढी वर्षे संसार केल्यानंतर आता असं कॉलेजमधील मुलांसारखं बरं दिसतं का, असं मनात आलं खरं; पण एखाद्या कामावर लक्ष केंद्रित करायचे असेल तर हेच बरोबर आहे, असा निर्णय घेतला. बऱ्याच नातेवाइकांनी, मित्र- मैत्रिणींनी कौतुक केलं, तर काही जणांनी नाकं मुरडली. “तुम्हाला बरं आवडतं, आमच्या ह्यांना नसतं आवडलं हं.” “या डब्याने आपल्याला आपल्या आवडीचं नाही हो मिळत खायला.” वगैरे संवाद कानावर पडू लागले. माझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून मी जिभेचे चोचले पुरविण्याकडे जरा दुर्लक्ष केले. एक मात्र नक्की सांगू शकते की, या डब्याने माझ्या कितीतरी भावना जागवल्या, कितीतरी गोष्टी आठवल्या.
माझा सुरुवातीचा अगदी पहिल्या वर्गात असताना आजीने दिलेला पोह्यांचा डबा आठवला, माझा मुलगा नर्सरीत असताना त्याला डब्यात दिलेले चोकोज, वेफर्स आठवले. डबा ही तशी निर्जीव वस्तू, पण त्यामागे किती भावना जपलेल्या असतात आपल्या! मी इंग्रजी माध्यमाच्या मुलांना शिकवते. मुलांनी जेव्हा शिदोरी या शब्दाचा अर्थ विचारला तेव्हा मला टिफिन असाच सांगावा लागला. मध्यंतरी मुंबईच्या डबेवाल्यांवर एक प्रेरणादायी प्रेझेन्टेशन बघितले. त्यामधील एकूण विचारच वेगळा आहे. डबेवाल्यांची शिस्त, त्यांचे नियोजन भल्याभल्या उद्योजकांना लाजवेल, असे असले तरी डबा तोच, डब्यातील भावना त्याच! ज्या वेळी कोणत्याही प्रकारची वाहनव्यवस्था नव्हती त्या वेळी वाटसरू वाटेत कुठेतरी आंब्याच्या किंवा वडाच्या झाडाखाली बसून कापडात बांधलेली शिदोरी सोडून खायचे. या शिदोरीत कधी बायकोचे प्रेम, बहिणीची माया, तर कधी आईचा जिव्हाळा भरलेला असायचा.
आता स्वरूप थोडं बदललं. आगगाडीत बसलेले प्रवासी आपले तऱ्हेतऱ्हेचे डबे उघडून बसतात. त्यातही २४ तासांच्या प्रवासात निरनिराळे डबे असतात. सोबत कागदी प्लेट्स, प्लास्टिकचे पेले. बाप रे, असे वाटते की, एका मोठ्या सूटकेसमध्ये पाव हिस्सा स्वयंपाकघरच सामावलेले आहे. एकटा प्रवासी जेव्हा कोपऱ्यात डबा खातो तेव्हा मला नेहमी वाटत असतं की, नेमकं त्याच्या मनात आता या क्षणाला काय बरं विचार असतील? प्रेमाचे, कृतज्ञतेचे, की केवळ पोट भरल्याचे समाधान? असो. आता विमानातल्या शिदोरीचा विचार करू. बच्चेकंपनी तर घरीच जाहीर करतात की, आमची शिदोरीबिदोरी काही नाही हं, आम्हाला हवं ते, हवं तेवढं आम्ही हवाईसेविकेकडे मागणार आहोत. पण आपल्या वयाची माणसे मात्र त्याच वेळी आगगाडीचा प्रवास आठवून कुठेतरी हरवली असतात. आगगाडीत खाल्लेल्या मामीच्या, मावशीच्या, आत्याच्या हातच्या डब्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळत असते.
आपल्या गावातील किंवा आपल्या भागातील दवाखान्यात कुणाला भरती केलं असेल तर घरातील गृहिणीला मोठं संकट पडतं ते डब्याचं! “बाप रे, आता माझी रोजची कामं, नोकरी सगळं सांभाळून आजारी माणूस अथवा बाळंतीण यांचा पथ्यपाण्याचा डबा करायचा, केवढी कसरत!” असं ती म्हणत असली तरी आजाराचा प्रकार जाणून ती प्रेमाने सगळ्यांना काय हवं नकोचा डबा पाठवणारी अन्नपूर्णाच असते. आम्ही लहान असताना मामाच्या गावी जायचो. आता मामाची गावं म्हणजे मेट्रो सिटीज असतात. तिथे करमणुकींच्या साधनांना वानवा नसते आणि मामाच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डातील संपत्तीलाही कमी नसते. मोठमोठे चकचकीत मॉल्स, मल्टीप्लेक्स, हॉटेल्स, पार्क्स आणि बरंच काही. तेव्हा हे असले चैनीचे करमणुकीचे प्रकार नव्हते. उन्हाळ्याच्या सुट्टीत उन्हाच्या वेळी घरात बसून पत्ते, चाम्पूल असे खेळ झाले की, बागेत वा मंदिरात जाण्याची तयारी व्हायची. स्वयंपाकघरातून मस्त खमंग थालीपिठांचा तर कधी बटाटेवड्यांचा सुगंध यायचा. बागेत गेल्यावर तिथे खेळायचे, दमायचे आणि मग डब्यातील खमंग पदार्थांवर ताव मारायचा. पोट भरलं की, ओलं कापड बांधलेल्या बाटलीतील थंडगार पाणी प्यायचं. मला सांगा, हे सुख कोणत्या मॉलमध्ये विकत मिळतं?
उच्च शिक्षणासाठी परगावी गेलेले चिरंजीव किंवा कन्यका मेसचा डबा खाताना अश्रू गाळतात आणि आईच्या जेवणातील प्रेम आठवत बसतात. हे मेस प्रकरण मात्र मायलेकरांना दुःख देणारेच असते. आता मला आणखी एक त्रासदायक डब्याचा प्रकार आठवला, तो म्हणजे ऑफिसनिमित्त परगावी रोज अपडाउन करणाऱ्यांचा डबा! मला तर माझ्या पतीचे रोज अपडाउनचे दिवस आठवले की, अंगावर काटा उभा राहतो. सकाळी ४-५ वाजता उठून डबा तयार करायचा, जड अंतःकरणाने डबा घेऊन जाणाऱ्या नवऱ्याला ‘बाय’ म्हणायचे. आपण गरम जेवताना अपराधी भावना ठेवायची आणि एकूण नाराजीतच दिवस घालवायचा. तेव्हा या डब्यापेक्षा स्वेच्छानिवृत्ती बरी, असे वाटून जाते.
एका डब्याच्या निमित्ताने किती भावना उचंबळून आल्या. मुलांचे शाळकरी जीवन संपते तेव्हा हुरहुर लागते. “आई झाला का गं डबा, उशीर होतोय,” असे म्हणणाऱ्या प्रत्येक मुलामध्ये काल्याच्या कीर्तनातील कान्हाच दिसतो. तो यशोदेला म्हणतो, “शिदोरी बांधून दे मज आई, गाई गेल्या वनांतरी.” मायलेकराचं नातं हा डबा अधिक घट्ट करतो. वडील शाळेत मुलांना गरम डबा पोहोचवतात, हे आपुलकीचं बंधन दुसरीकडे नसतं. डब्यातील पोहे, उपमा, शिरा अथवा नवीन लोणचं–पोळी याची जागा इडली, बर्गर, पिझ्झा यांनी घेतली असली तरी डब्यातील भावना त्याच कायम आहेत.
मी जेव्हा मेसच्या ताईने पाठविलेला डबा उघडते तेव्हा त्यांचे कष्ट मला दिसतात. माझ्याकडे पाहुणे आले तर त्या आवर्जून डब्यात जास्त पोळ्या घालतात, वेगळी चटणी, कोशिंबीर देतात. मी माझ्या डब्याला आणि त्या अन्नपूर्णेला नमस्कार करते आणि वाचनात आलेले वाक्य आठवते, “भूक नसो पण शिदोरी असो.”

सीमा बक्षी, अकोला
mybolibakshi@gmail.com
बातम्या आणखी आहेत...