आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिर्थनच्या तीरावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन्ही बाजूंना डोंगरांच्या रांगा, पुढे हिरव्या आणि मागे मागे निळसर, धूसर होत चाललेल्या. वर निरभ्र, निळेभोर आकाश आणि खाली दरीत फेसाळत वाहणारा, काळ्या प्रचंड शिळांवरून आवेगाने उड्या घेणारा तलम रेशमी साडीसारखा फिकट हिरवा-निळा प्रवाह. काठावर देवदार वृक्षांची दाटी पाहून कुणाच्याही तोंडून ‘वाह’ न निघतं तरच नवल...

कुल्लूचा मुक्काम संपला होता. आता आम्हाला बियास नदीचं बोट सोडून तिचीच एक उपनदी, तिर्थनच्या कुशीत शिरायचं होतं. तिर्थन नदीचं खोरं कुल्लू जिल्ह्यातच आहे, पण कुल्लू-मनालीइतकी इथे पर्यटकांची गर्दी नसते. कुल्लूला आम्ही दोन दिवस चांगलाच आराम केला होता. भोपळ्याच्या गोष्टीतल्या म्हातारीसारखे पवनच्या घरी तूप-रोटी खाऊन, थोडेसे टुणटुणीत होऊन तिर्थनला चाललो होतो. रस्ता जेमतेम दीड-दोन तासांचाच होता, त्यामुळे पवनच्याच घरी नाष्टा करून नेहमीसारखे पहाटे न निघता आरामात नऊ वाजता निघालो म्हणून मुलं खुश होती. कुल्लू-शिमला हमरस्त्यावर एके ठिकाणी बियास आणि तिर्थनचा संगम होतो, तिथे पूल पार करून आम्ही बियासला अलविदा केलं. निदान या ट्रिपमध्ये तरी आम्हाला आता बियास परत दिसणार नव्हती. आता आमचा प्रवास तिर्थनच्या काठाकाठाने सुरू झाला. बियासचं पत्र बरंच रुंद आणि तिर्थनच्या मानाने तसं संथच. तिर्थन मात्र आई मागे आहे, याची खात्री करून पार्कमध्ये पुढेपुढे पळणाऱ्या छोट्या मुलीसारखी अवखळ. नदीचं पात्र रस्त्याच्या पातळीपेक्षा बरंच खाली, दोन डोंगररांगांच्या बेचक्यातून वाहात असलेलं, आणि रस्ता वळणावळणांनी गिरक्या घेत चाललेला, अगदीच निरुंद. गाडी अगदी सावकाश, रमतगमत चालली होती. रस्त्यावर वर्दळही खूप कमी होती. दहा-बारा मिनिटांनंतर दुसरं एखादं वाहन दिसायचं.

गाडीने एक डौलदार वळण घेतलं आणि माझ्या तोंडून नकळत ‘आहा’ असे शब्द निघाले. समोरचं दृश्य होतंच तसं. दोन्ही बाजूंना डोंगरांच्या रांगा, पुढे हिरव्या आणि मागे मागे निळसर, धूसर होत चाललेल्या. वर निरभ्र, निळेभोर आकाश आणि खाली दरीत फेसाळत वाहणारा, काळ्या प्रचंड शिळांवरून आवेगाने उड्या घेणारा तिर्थनचा तलम रेशमी साडीसारखा फिकट हिरवा-निळा प्रवाह. काठावर देवदार वृक्षांची दाटी. मी पवनला गाडी थांबवायला सांगितली आणि फोटो काढायला म्हणून खाली उतरले. रस्ता अगदीच अरुंद होता आणि मी माझ्याच नादात फोटो काढत होते, तेवढ्यात मागचं वळण पार करून एक ट्रक आला. मी त्याच्या वाटेत होते म्हणून त्याने मोठ्यांदा हॉर्न वाजवला.

वर खिडकीतून डोकं बाहेर काढून ‘अंधे हो क्या मेडम? इतना बडा ट्रक दिखता नही क्या?’ अशी स्तुतिसुमनं उधळून तो ट्रक निघून गेला. हिरमुसल्या चेहऱ्यानेच गाडीत बसले. चूक माझी होती. तरीही हिमाचलमध्ये पहिल्यांदाच कुणाच्या तरी तोंडून इतकी कडवट वाक्यं मी ऐकली होती. माझा बिघडलेला मूड बघून पवनने विचारलं, ‘काय झालं?’ मी म्हटलं, ‘इतकी वर्षं मी हिमाचलला येतेय, पण पहिल्यांदाच कुणी पहाडी माणूस माझ्याशी इतक्या रागाने बोलला.’ पवन हसला आणि पुढे जात असलेल्या ट्रककडे अंगुलीनिर्देश करून म्हणाला, ‘वो ट्रक पंजाब का है, नंबरप्लेट देखो आप.’ तो ट्रक पीबी नंबरवाला होता. इथल्या माणसांचं प्रेमळ अगत्य ही माझी अगदी मर्मबंधातली ठेव असल्यामुळे त्या प्रतिमेला धक्का लागला नाही, म्हणून मी खुश झाले.
साडेअकराच्या सुमारास आम्ही तिर्थनच्या खोऱ्यात पोहोचलो. तिथे शाईरोपा नावाचं एक छोटं गाव आहे, तिथल्या वनखात्याच्या गेस्टहाउसमध्ये आमचं बुकिंग होतं. छोटंसंच चार खोल्यांचं टुमदार गेस्टहाउस होतं. आम्हाला वरची खोली मिळाली, खोली कसली, भला मोठा सूटच होता तो. एक झोपायची प्रशस्त खोली, एक बाहेरची लिविंग रूम आणि खोलीबाहेर मोठी ऐसपैस गच्ची. मुलांना तर रानच मोकळं मिळालं. मी सामान लावेपर्यंत मुलं बाहेर खेळायला पळालीसुद्धा. शाईरोपा हे गाव अगदीच ओंजळीत मावण्याइतपत छोटं आहे. एका बाजूला खळाळत वाहणारी तिर्थन आणि दोन्ही काठांवर सुंदर, लाकडी सोपे असलेली दगडी भिंतींची घरं. वर स्लेटची कौलं आणि घराबाहेर सगळे भाजीचे मळे लावलेले किंवा सफरचंदांच्या बागा. पाणी मुबलक असल्यामुळे जमीन सुपीक असावी. आम्ही चालायला निघालो तेव्हा उन्हं उतरू लागली होती. संध्याकाळच्या त्या सौम्य, सोनेरी प्रकाशात घरं एकदम झळाळून निघाली होती. वाटेत एका ठिकाणी टोमॅटोच्या मळ्यात एक तरुण मुलगा मन लावून काम करताना दिसला. चांगला सुशिक्षित वाटत होता. त्याला हिंदीत विचारलं, कसलं खत वापरता, तर अस्खलित इंग्रजीत म्हणाला, ‘वी ओन्ली यूज ऑरगॅनिक फर्टिलायझर्स.’ मग त्याच्याशी थोडा वेळ बोलले, पदव्युत्तर शिक्षण झालं होतं त्याचं, काही काळ चंडीगढमध्ये राहून नोकरीही केली होती त्याने. पण त्याच्या पहाडी मुलखाची ओढ त्याला तिथे राहू देईना म्हणून गावी परत येऊन त्याने सेंद्रिय भाजीची शेती सुरू केली होती. त्याला शुभेच्छा देऊन आम्ही पुढे निघालो.


(shefv@hotmail.com)