Home | Magazine | Pratima | senior artist uma bhende

सोज्वळ अभिनयाचा गौरव

जयश्री बोकील | Update - Jul 06, 2012, 09:57 PM IST

जो तो वंदन करी उगवत्या, जो तो पाठ फिरवी मावळत्या.....हा नियम रुपेरी पडद्यावर अत्यंत कठोरतेने पाळला जातो, याची असंख्य उदाहरणे आहेत. काही चेहरे आपली सात्त्विकता टिकवून असतात. ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे हे असेच एक सात्त्विक आणि सोज्वळ व्यक्तिमत्त्व.

 • senior artist uma bhende

  कलेचा वारसा असलेल्या कुटुंबात माझा जन्म झाला, ही माझ्या दृष्टीने भाग्याची गोष्ट होती. माझी आई रमादेवी कोल्हापूरला प्रभात कंपनीत काम करत असे, तर माझे वडील श्रीकृष्ण साक्रीकर अत्रे यांच्या कंपनीत होते. त्यामुळे मला अगदी लहानपणापासूनच कलेविषयी प्रेम होते. कोल्हापूरला त्या काळात अनेक मेळे होत. त्यातून मी हमखास भाग घेत असे आणि चांदीची पदके मिळवत असे.
  या काळात मी मिरजकर यांच्याकडे कथ्थक आणि भरतनाट्यमचे शिक्षणही घेत होते. गांधर्व महाविद्यालयाच्या नृत्याच्या परीक्षाही मी दिल्या. मेळ्यांच्या जोडीने मी नृत्याचे कार्यक्रमही करत होते. काही नाटकांमधूनही कामे केली. एकदा माझी आई मला चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांकडे घेऊन गेली. त्यांनी मला ‘आकाशगंगा’ या चित्रपटातील छोट्या सीतेच्या भूमिकेसाठी निवडले आणि तेव्हाचे शंभर रुपये दिले होते.
  भालजींच्या आशीर्वादाने माझा रुपेरी पडद्यावरचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर लगेच ‘अंतरीचा दिवा’ या चित्रपटात मला नायकाच्या बहिणीची भूमिका मिळाली. नायिकेची भूमिकाही माझ्या वाट्याला अनपेक्षितपणे आली. माधवराव शिंदे ‘थोरातांची कमळा’ हा चित्रपट करत होते आणि वंदना त्याची नायिका होती, पण ऐन वेळी ती न आल्याने मला कमळा साकारण्यास सांगण्यात आले आणि मी नायिका म्हणून पडद्यावर सुमारे पंधरा वर्षे वावरले. मधुचंद्र, आम्ही जातो आमुच्या गावा, अंगाई, काका मला वाचवा, शेवटचा मालुसरा, मल्हारी मार्तंड, भालू, स्वयंवर झाले सीतेचे असे अनेक यशस्वी चित्रपट आले. ‘अशी ही साताºयाची तºहा’ या चित्रपटातील भूमिकेसाठी मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. अनेक चित्रपटांनी रौप्यमहोत्सव साजरे केले.
  ‘नाते जडले दोन जिवांचे’ चित्रपटाच्या निमित्ताने प्रकाश भेंडे यांच्याशी माझे नाते प्रत्यक्षातही जुळले आणि सुखाचा संसार सुरू झाला. लग्नानंतरही मी अनेक चित्रपट केले. आम्ही स्वत:ची श्री प्रसाद चित्र ही संस्था सुरू करून चित्रनिर्मिती केली. तीही यशस्वी ठरली. भालू, चटकचांदणी, आपण यांना पाहिलंत का, प्रेमासाठी वाट्टेल ते, आई थोर तुझे उपकार हे चित्रपट चालले. मला सुरुवातीपासून उत्तम दिग्दर्शक भेटले. भालजी, वसंत जोगळेकर, राजदत्त, माधवराव शिंदे, कमलाकर तोरणे, मुरलीधर कापडी, हिंदीत सत्येन बोस (दोस्ती ), एक दिल और सौ अफसाने (राज कपूर, वहिदा रहेमान), छत्तीसगढी आणि तेलुगू चित्रपटही केले.
  आज निवृत्त होऊनही अनेक वर्षे उलटली आहेत. मनात रुपेरी पडद्याविषयी कृतज्ञता आहे . कारण त्यानेच मला नाव, सन्मान, आर्थिक लाभ, स्वतंत्र ओळख दिली. कृष्णधवल चित्रपट आणि रंगीत चित्रपटांच्या युगात वावरले. कलाकार घरात जन्म, स्वत: कलाकार म्हणून कारकीर्द आणि आता मुलेही कलाकार आहेत. पतीही उत्तम कलाकार आहेत. कलेची ही संगत आयुष्यभर मिळाली आणि जगणे कलामय होऊन गेले. चित्रपट महामंडळाने हा सन्मान जाहीर करून या कलामान्यतेवर जणू राजमान्यतेची मोहोर उमटवली आहे.

Trending