आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या स्त्रिया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण आपल्याच देशात स्त्रियांच्या राहणीमानाचा विचार केला तर कितीतरी वेगवेगळ्या प्रथा, परंपरा, पद्धती यांचे चित्र समोर दिसू लागते. धर्म, जात, पंथ यांचबरोबर शहरी, ग्रामीण, शिक्षित, गरीब, श्रीमंत, याचाही दृश्य परिणाम स्त्रियांच्या आयुष्यावर दिसतो. पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे आधीच दुय्यम स्थान वाट्यास आलेले, त्यात उंबरठ्याची सीमारेषा सतत समोर. अशा स्थितीत मुलींचा जन्म, त्यांचे शिक्षण, हे सर्व चार भिंतीच्या आतच आहे. आज शहरी भागात शिक्षण आणि पुरुषांच्या बदलणा-या मानसिकतेमुळे स्त्रियांना बरोबरीचे स्थान मिळत आहे. हा चांगला संकेत आहेच; पण तरीही आपल्याकडे मुलींचे भातुकली, घरकाम, स्वयंपाक, विणकाम, शिवणकाम हेच बालपणातले शिक्षण आहे, तर शाळेत पुस्तकी अभ्यास आणि चाकोरीतले संदर्भ हेच त्यांना माहीत असतात.
परदेशातली स्त्री मात्र भारतीय स्त्रियांच्या तुलनेत शिक्षित, श्रीमंत, स्वावलंबी, आधुनिक विचारप्रणाली असलेली आहे. तिला तेथे एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून मान आहे. पहिल्यापासूनच तेथील मुला-मुलींना स्वतंत्र राहण्याचे धडे दिले जातात. परंतु पालक आपल्या कर्तव्यात कसूर करत नाहीत. आपण वाळूचा किल्ला पायावर वाळू घेऊन ठोकून ठोकून कसा तरी आपल्याच मनाने करतो. तेथे असे किल्ले करण्यासाठी मुलांना मुद्दाम त्या आकाराचे आणि गरजेचे साहित्य घेऊन देतात. वीकएंडला समुद्रकिनारी नेऊन त्यांना मनसोक्त किल्ले करण्याचा, पोहण्याचा आनंद पालक देतात. शाळेत शिस्तीचे, स्वच्छतेचे शिक्षण सक्तीचे असते. घरी आई मुलींना वॉशिंग मशीन, ड्रायर, ओव्हन, मायक्रोओव्हन कसे वापरायचे, कपड्यांना इस्त्री कशी करायची, व्ह्यॅक्युम क्लीनर कसे वापरायचे-ते स्वच्छ कसे करायचे, टोस्टर, ग्रिलर, बार्बेक्यूमध्ये जेवण बनवणे, गरम करणे, यांचे शिक्षण देते. त्याचबरोबर शाळेत आणि घरीही त्यांना आधुनिक इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरणे, इंटरनेटचा वापर, गाडी चालवणे, पोहणे, आदी अगदी लहानपणापासून शिकवले जाते. स्वच्छता, शिस्त आणि औपचारिकता ही त्यांच्या नसानसात भिनलेली राहील, याची काळजी घरी पालक आणि शाळेत शिक्षक काटेकोरपणे घेतात.
स्वावलंबी जीवनाचेही त्यांना महत्त्व आहे. म्हणूनच तेथील मुले-मुली 12/13 वर्षांचे होत नाहीत तोच फूड मॉल, पेट्रोल पंप, लायब्ररी, जेथे कुठे अर्धवेळ काम मिळेल तेथे करतात आणि स्वत:च्या खर्चाची तरतूद करतात. शिक्षणाकरिता वयाची सीमारेषा ते मानतच नाहीत. म्हणून कोणत्याही वयात कोणतेही शिक्षण ते आत्मसात करतात. हेच तत्त्व लक्षात घेऊन अध्यक्ष बराक ओबामांनी ज्या मुलींचे शिक्षण अर्धवट राहिले आहे आणि त्यांना ते पूर्ण करायचे असल्यास शासनाच्या विविध योजना सुरू केल्या. त्यामुळे स्त्रियांच्या शिक्षणाचा स्तर उंचावला.
महत्त्वाचे म्हणजे, तेथे लहानपणापासूनच आपले काम आपणच करायचे, हा मूलमंत्र अंगी भिनलेला असतो. प्रत्येकाकडे गाडी असतेच. बाजारहाट, खरेदी, बँक, बिले भरणे हे सर्व ज्याचे तोच करतो. स्त्रिया-मुलीही याला अपवाद नाहीत. सुटीच्या दिवशी घराची स्वच्छता, कपडे धुणे-इस्त्री करणे, केरकच-याची विल्हेवाट लावणे, पुढील आठवड्याची खरेदी करणे, मुलांना पिकनिकला नेणे, हे घरातील सर्वच जण मिळून करतात. षोडशवर्षा तरुणीपासून वृद्ध स्त्रियाही तेथे स्वत: ड्रायव्हिंग करत मुलांना सोबत घेऊन त्यांना बाबागाडीतून फिरवत सर्व कामे करतात. कधी-कधी तर त्यांच्यासोबत जुळी मुलेही असतात. आपल्याकडे आपण कधीतरी बाहेर जाऊन बिल भरायचे असेल तर अडचणींचा पाढा वाचतो. कामवाली वेळेवर येईल का, मला बाळाला सोबत घेऊन जायचे, रिक्षा मिळेल का, टूव्हीलरवर जायचे तर मुलाला कसे घेऊन जाता येईल, तेथे किती रांग असेल, स्वयंपाक होईल का करून तोवर... अशी प्रश्नांची मालिकाच संपत नाही. आणि त्यांना हे प्रश्नच पडत नाहीत. त्या मुलाला कारमधून उचलून, डिकीतून बाबागाडी काढून त्यात बसवतात. मॉलमध्ये बाळाला घेऊन जातात, खरेदी करतात, ते सर्व सामान स्वत:च ट्रॉलीमधून कारपर्यंत आणतात. डिकीत ठेवतात, बाळाला पुन्हा सीटवर बसवतात, बाबागाडी पुन्हा डिकीत, रिकामी ट्रॉली ठरलेल्या जागेवर नेऊन ठेवतात आणि पुढच्या कामाला हसत निघतात.
तेथे ड्राइव्ह थ्रू एटीएम, कॉफी, औषधे, पिझ्झा इत्यादी घेता येते. त्यासाठी फक्त कार त्या खिडकीजवळ न्यायची. कारमधूनच सर्व काम करता येते. (जसे पैसे काढणे, वस्तू घेणे) तेथे पेट्रोल पंपावर आपण स्वत:च खाली उतरून कार्डने पेमेंट करून पेट्रोल भरून घ्यावे लागते. स्वयंचलित पद्धतीने कारवॉश करण्याची सुविधा आहे. तेथेही मुली काम करतात. काम कोणते हे महत्त्वाचे नसून स्वावलंबी असणे महत्त्वाचे, असे तेथील मुली मानतात. कंपन्या, शिक्षण, संशोधन, शास्त्र, औषध, राजकारण, अंतराळ या मान्यवर क्षेत्रात स्त्रियांची संख्या मोठी आहेच; त्याचबरोबर ट्रक चालवणे, पाणबुडी, सैन्यदल, जंगली तसेच अजस्र प्राणी जसे मगर, अजगर पकडणे, या पुरुषी मक्तेदारी असलेल्या क्षेत्रातही स्त्रियांचा सहज वावर आहे. आपण फक्त त्यांची आधुनिक राहणी पाहतो आणि लगेच आपले मत बनवतो. परंतु पाश्चिमात्य स्त्रियांकडून स्वावलंबन, शिस्त, औपचारिकता आणि मुलांचे आदर्श संगोपन शिकण्यासारखे आहे.