आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तर वर्षांचा तरुण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तत्त्वज्ञानाचा हा धडा पन्नाभाईंनी मला नकळत शिकवला होता. तेव्हा मी पुरती तिशीदेखील गाठली नव्हती. आज पंचाहत्तराव्या वर्षीही त्यांनी दिलेला वस्तुपाठ स्मरणातून गेलेला नाही. ज्यानं कर्मेंद्रिये दिली त्याने परत मागितली तर ती परक्याची ठेव मानून विनातक्रार परत करायला हवीत आणि त्या उणिवेपोटी कोणताही कमीपणा वाटता कामा नये.
महागड्या कलपाचा वापर करून पांढरेधोप केस काळेभोर केले, मोतीबिंदू काढल्यावर लेन्स बसवून घेतलेल्या डोळ्यांवर परदेशी बनावटीच्या भपकेबजा गॉगल चढवला, अद्ययावत फॅशनची पँट आणि टी-शर्ट परिधान केला म्हणून सत्तरीचा माणूस पस्तिशीचा होत नाही. स्त्री असो वा पुरुष, काही शारीरिक मर्यादा आपोआप येतात, काही मनोभावना बदलतात. मात्र हा बदल अभिमानाने मिरवण्याऐवजी भिरकावून देण्याचा निष्फळ प्रयत्न होताना दिसतो तेव्हा निर्माण होणारं चित्र कुरूप आणि केविलवाणं भासतं.


काही वर्षांपूर्वी माझ्या एक काकू वयाच्या 93-94व्या वर्षी देवाघरी गेल्या. त्याचं शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचं स्वास्थ्य शेवटपर्यंत चांगलं होतं. दात, नव्हते, कवळी होती, दृष्टी अधू झाली होती, चष्म्यावाचून धकत नव्हतं, डोक्यावरचे केस पांढरे तर झाले होतेच पण आखूडही झाले होते. चेह-यावर सुरकुत्याही भरपूर होत्या. तरीही एकूण ठेवण अशी होती की पाहाणा-याला तत्काळ जाणवे की ऐन तारुणात या बाई कशा रुपगर्वित असतील! या काकू त्यांच्या शेवटच्या काळात एकदा हसत हसत उद्गारल्या होत्या, ‘जळ्ळा मेला आरसा! आता त्याचं तोंडही पाहावंसं वाटत नाही! पाहिलं की वाटतं, अरे देवा! काय झालाय हा अवतार! आधी कशी सुरेख दिसायची मी!’


ब-याच ज्येष्ठ नागरिकांना असं वाटत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वास्तविक वय उतरणीला लागलं की आरोग्य आणि सौंदर्य याबद्दलचा दृष्टिकोन बदलायला हवा. सहाव्या मजल्यावर जिने चढून जाता येत नाही याबद्दल हळहळ वाटू नये. पहिल्या किंवा दुस-या मजल्यावर दम न लागता सहज जाऊ शकतो. याचं समाधान वाटावं. कित्येक वृद्धांना येताजाता आरोग्याच्या तक्रारींचा पाढा वाचायची सवय असते. त्यांना उणावलेल्या आहाराबद्दल वाईट वाटत असते. आता पूर्वीसारखं खाणं राहिलं नाही, आता पूर्वीसारखी धावपळ होत नाही, जागरण सोसत नाही. या आणि अशा तक्रारी करत राहणं हे शहाणपणाचं लक्षण नव्हे, आता पूर्वीसारखं काहीच करता येणार नाही याची मनाशी खूणगाठ बांधायला हवी आणि तरीही, पूर्वीसारखं थोडंफार तरी करता येतय ना, याबद्दल समाधान मानायला हवं. ज्येष्ठ नागरिक आपल्या दैनंदिन जीवनात स्वावलंबी असेल, त्याला कुणाचीही मदत घ्यावी लागत नसेल तर त्याला निरोगी म्हणता येईल.


75-80च्या वयात दोन्ही वेळा भूक लागतेय, रोज 1।।-2 किमी पायी चालणं घडतंय, स्मृती फारसा दगा देत नाही आणि रोज 4-2 तास काहीतरी करण्यात घालवता येतायत, अशा व्यक्तीनं जर वार्धक्याबद्दल तक्रार केली तर दोष वार्धक्याचा नसून, त्या व्यक्तीचा आहे. शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचे आरोग्य राखण्यासाठी एखाद्या आवडत्या गोष्टीत रस घेणं, स्वत:ला गुंतवणं अत्यावश्यक असतं. दुर्दैवानं ज्या व्यक्ती ‘निवृत्त होणं’ याचा अर्थ ‘घरी बसणं’ असा लावतात त्यांचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य अल्प काळातच नष्ट होतं. स्वास्थ्य चांगलं राहावं, मृत्यूला कोणी रोखू शकत नाही; पण मृत्यू येईपर्यंत शरीर सगळी कामं सुरळीत बजावत राहू शकेल यासाठी वैद्यकशास्त्रातील निरनिराळ्या संशोधनेही साहाय्यकारक ठरली आहेत. मात्र, हे संशोधन शारीरिक स्तरापुरते मर्यादित आहे. मानसिक आरोग्यही टिकवण्यासाठीचे संशोधन अजून व्हायचे आहे. सध्या तरी ते आरोग्य सांभाळणे ही आपली जबाबदारी आहे. आपण तब्येतीने चांगलं असण्यापेक्षा चांगलं दिसण्यावर भर देतो आणि त्यासाठी पैसा, वेळ, शक्ती सगळ्याचाच अनाठायी व्यय करतो, असं करण्यात सर्वप्रथम आपण स्वत:ची फसवणूक करत असतो. या वयात कोणत्याही प्रकारची फसवणूक त्याज्य मानायला हवी आणि स्वत:ची फसवणूक तर तिरस्करणीयच!

क्रमश:

अनुवाद - डॉ. प्रतिभा काटीकर, सोलापूर
dinkarmjoshi@rediffmail.com