आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लाईंग गेस्ट!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पक्ष्यांच्या किलबिलाटाने अर्णवची पहाट जागली होती. हिरवीगार झाडं, विस्तीर्ण जलाशय, मुक्तपणे वावरणारी पाखरं अशा वातावरणाने तो पुरता सुखावला होता. एवढ्यात किलबिलाट करीत शेकडो पक्ष्यांचा थवा चिंचेच्या झाडावर विसावला. ‘बाबा कोणती ही पाखरं?’ असा प्रश्न अर्णवच्या ओठी आपसूक आला, अन‌् आजोबा सांगू लागले, ‘बेटा या पळस मैना, पोटाला दाणा-पाणी मिळावं म्हणून सातासमुद्रापारची सफर करून अशी शेकडो पाखरं आपल्याकडं येतात.’ सातासमुद्रापार’ या शब्दानेच अर्णवची झोप उडाली. मूठभर हाडामासाच्या जिवाला हे कसं शक्य आहे? त्याला हा प्रवास कसा पेलवत असेल? अशा अनेक प्रश्नांनी त्याच्या मनी गर्दी केली.

हे प्रश्नजंजाळ त्याच्यापुरते नाही, तर शेकडो वर्षांपासून पक्षीअभ्यासक, संशोधक अन् सामान्य नागरिकांच्या मनातही ते घोंघावत आहे. या उत्सुकतेतूनच संशोधनाला गती आली असून त्यातून माहितीचा खजिना खुला होत आहे. नुकतेच युनिव्हर्सिटी ऑफ मॅसॅच्युसेट्सच्या शास्त्रज्ञांनी जिओलोकेटर्सच्या माध्यमातून १२ ग्रॅम वजनाचा ब्लॅकपोल वार्बलर पक्षी दोन ते तीन दिवसांत तब्बल २,५४० किलोमीटरचे अंतर पार करू शकतो, हे सिद्ध केल्यामुळे पक्षी स्थलांतराचा रंजक विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

पक्षी स्थलांतर अनादी आहे. बायबल, ग्रीकांच्या प्राचीन ग्रंथात बगळे, कबुतर, पाकोळी पक्ष्यांच्या स्थलांतरांचे असंख्य संदर्भ आढळतात. भारतात साधारणपणे मध्य आशिया, सायबेरिया, मंगोलियातून दरवर्षी ३७१ प्रजातीचे लाखो पक्षी पाहुणे म्हणून येतात. मैनेहून छोट्या आकाराच्या टिलवा(लिटल स्टिंट)पासून उंचपुर्‍या शरीरयष्टीचे वरदान लाभलेल्या करकोचांचा त्यात समावेश असतो. जुलै महिन्यात विणीच्या हंगामानंतर तेथील पक्ष्यांची संख्या प्रचंड वाढते. त्यातच ऑगस्टपासून तेथे बर्फवृष्टी सुरू झाल्याने अन्नाची चणचण जाणवू लागते. ती दूर करण्यासाठी अन् कडाक्याच्या थंडीचे संकट सारण्यासाठी, ही पाखरं भारताकडे झेपावतात. एप्रिलपासून ते परतीच्या प्रवासाला निघतात. काहींचा मेपर्यंतही मुक्काम ठरलेला असतो. महाराष्ट्रातील पाणथळी, माळरानं, झाडं-झुडपं अन् गाव-शहरांचा परिसर या पाखरांनी व्यापतो. पक्षीनिरीक्षक व अभ्यासकांसाठी ही तर पर्वणीच ठरते.

महाराष्ट्रात सुमारे १०० प्रजातींचे स्थलांतरित पाहुणे येतात. पाणपक्षी, माळरानपक्षी, शिकारी पक्षी, असे त्याचे वर्गीकरण होऊ शकते. पाणपक्ष्यांत रशियातून झेपावणारा छोटा टिलवा (लिटल स्टिंट), तिबेटमधून येणारा कबुतराएवढ्या आकाराचा रेती चिलखा (लेसर सँड प्लोव्हर), टेरीक तुतारी, भक्ष्य पकडताना पाण्यावर चोच आदळणारा युरोपीय थापट्या (नॉर्दन शोवेलर), उपजत लावण्य अन‌् शेपटीला तलवारीचा बाज लाभलेले मध्य अशियातील तलवार बदक (नार्दन पिनटेल), मिशीवाला सुरय, कदंबाच्या प्रजातीतील मध्य आशियाई कादंब (बार हेडेड गिज), सायबेरियन काळा करकोचा, याशिवाय झुडपे माळरानावरील पक्ष्यांमध्ये युरोपातून येणार्‍या पळसमौना (रोझी स्टारलिंग) व शिकारी ससाण्याच्या प्रजातींचा समावेश असतो. पक्ष्यांचे हे स्थलांतर लाखो वर्षांपासून सुरू आहे. या लाखो वर्षांत या पक्ष्यांनी पृथ्वीच्या बदलत्या वातावरणाबरोबर स्वत:ला जुळवून घेतले, पण आधुनिकीकरणाचा हव्यास व मानवाचे परिसृष्टीवरील आक्रमणामुळे हे स्थलांतर धोक्यात आले आहे.

एकमेका साह्य करू
पायाची लांबी, शरीरयष्टी व खाद्यसवयीनुसार ते आपल्या अधिवासाची निवड करतात. शैवाल, शंख-शिंपले, कालव, कीटक, जलवनस्पती, मासे, बेडूक, गवताच्या बिया हे पाणपक्ष्यांचे खाद्य असते. उथळ पाण्यात अन् दलदलीच्या प्रदेशात भक्ष्याची उपलब्धता सहज होत असल्याने तेथे पक्ष्यांची गर्दी दिसून येते. लहान पायांच्या पाखरांचा तिथे अधिक वावर दिसतो. करकोचासारखे लांब पायाचे पक्षी व बदकांच्या काही प्रजाती खोलवर पाण्याचा अधिवास पसंत करतात. कुणी झेपावून, कुणी सूर मारून, कुणी समाधी लावून, तर कुणी चक्क चिखलात आपली भली मोठी चोच खुपसून आपले सावज टिपत असतात. त्यामुळे अन्नासाठी येथे भांडणे अन‌् स्पर्धा होत नाहीत.

कसे होते स्थलांतर
पक्ष्यांना स्थलांतराचे उपजत ज्ञान असते. स्थलांतर मार्गाचा नकाशा त्यांच्या मेंदूत तयार असतो. अतितीक्ष्ण नजरेचे त्यांना वरदान लाभलेले असते. उडत असताना पाऊस व धुलिकणांपासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या डो‌ळ्यावर एक विशेष पारदर्शी पडदा असतो. उडताना सूर्य-तारकांची स्थिती, पृथ्वीच्या चुंबकीय लहरींमुळे त्यांच्यात होणारे शरीरग्रंथीय बदल, भूभाग, डोंगर हे पक्ष्यांना मार्ग काढण्यासाठी मदत करतात. या ज्ञान व अनुभवाचे हस्तांतरण एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे होत असते. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (बीएनएचएस) प्रकल्प शास्त्रज्ञ सुजित नरवडे यांच्या मते, जगात पक्ष्यांच्या स्थलांतराचे सहा मार्ग आहेत. भारतात मुख्यत्वे दोन मार्गांनी पक्षी स्थलांतर करतात, त्यातला एक मध्य पूर्वेतील देशातून जातो, तर दुसरा चीन व मंगोलियातून जातो.

असे कळते स्थलांतराचे कुछ कुछ
पक्षी कुठून कुठे जातात, हे आजमावण्यासाठी पक्ष्याला पकडून त्याच्या पायात छोटेसे कडे-वाळा घालण्यात येते. त्यानंतर त्याला सोडले जाते. अन्य देशात हा पक्षी पोहोचल्यावर तेथील संशोधक त्याला पकडतात व वाळ्यावरील नाव वाचून संबधित संस्थेला त्याची माहिती देतात. वाळ्यामुळे तो पक्षी कुठून कुठे गेला, एवढीच माहिती कळत असली तरी तो कोणत्या मार्गे गेला? कुठे अन् किती वेळ थांबला? याची माहिती उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे ही उणीव दूर करण्यासाठी प्लॅटफॉर्म टर्मिनल ट्रान्समीटर (पीटीटी) हे उपकरण मदतीला आले. सुमारे २० ग्रॅम वजनाचे हे यंत्र पक्ष्याच्या शरीरावर लावले जाते. उपग्रहाच्या माध्यमातून संगणकावर पक्ष्याचे अक्षांश-रेखांश मिळतात. यातून त्या पक्ष्याचा स्थलांतर मार्ग व अंतराचा सातबारा अभ्यासकांच्या हाती लागतो. पीटीटी उपकरणामुळे केवळ मोठ्या पक्ष्यांच्या स्थलांतराचा मार्ग कळू लागला. तथापि चिमण्या-पाखरांसाठी हे उपकरण िनरुपयोगी ठरले. त्यामुळे जिओलोकेटर्स हे नवीन उपकरण विकसित करण्यात आले. ०.५ ग्रॅम वजनाचे हे उपकरण चिमणीएवढ्याही पाखराच्या शरीरावर लावता येते.

हवामान बदल, प्रकाशप्रदूषण अन‌‌‌् स्थलांतरित पक्षी
जागतिक हवामान बदलाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम सर्वांवर होत असून त्याला स्थलांतरित पक्षीही अपवाद नाहीत. महाराष्ट्राचा विचार करता, दोन वर्षांपूर्वी झालेल्या गारपीटीमुळे लाखो पक्षी मारले गेले होते. विशेष म्हणजे, यात परदेशातून आलेल्या पळसमैनांची(रोझी स्टार्लिंग) संख्या अधिक होती. याशिवाय अवकाळी पाऊस, वादळे, प्रखर उष्मा यामुळेही या पाखरांना धोका निर्माण झाला आहे.

शिकारीचा धोका वाढतोय
स्थलांतरित पक्ष्यांच्या मार्गावर अन‌् अधिवासाच्या ठिकाणी शिकारीत वाढ होत आहे. बदके, करकोचे, अमूर ससाणे हे शिकार्‍यांची लक्ष्ये आहेत. महाराष्ट्रात मोठ्या संख्येत बदके येतात. त्यांची माशाची जाळे व विशिष्ट प्रकारचे सापळे लावून पारध केली जाते. करकोचे व बगळ्यांना मारण्यासाठी गळांची माळ करून त्याला मांस लावले जाते. ते खाण्यासाठी पक्षी येतात व घात होतो. याशिवाय गुंगीचे रसायन लावलेले मांसाचे तुकडे वाळूवर टाकले जातात. ते खाताच पक्षी बेशुद्ध पडतो व शिकारी उचलतात. सोलापूर शहरातील तलावांवर शिकार्‍याने पकडलेल्या बदकांची सोडवणूक ‘बीएनएचएस’च्या टीमने केली असून तेथे त्यांनी आता स्वयंसेवकांचे गस्तीपथक नेमले आहे.

डायनासोरमधून उत्क्रांत झाले पक्षी
पक्ष्यांना डायनासोरचे वंशज मानले जाते. याच प्राण्यातून पक्षी उत्क्रांत झाल्याचे तज्ज्ञ सांगतात. पक्ष्यांच्या पायावरील खवले हे त्यांचा अन् त्यांच्या प्राचीन पूर्वजांच्या शारीरिक वैशिष्ट समानतेचा पुरावा देतात. उत्क्रांतीच्या काळात बर्‍याच प्राण्यांत बदल झाले. काही डायनासोरच्या अंगावर मोठमोठे खवले होते. शरीर गरम ठेवण्यासाठी त्याचा त्यांना उपयोग होत असे. उत्खननात सापडलेल्या जीवाश्मावरूनही पक्ष्यांच्या पूर्वजांचा अन् डायनासोरपासून उत्क्रांत झाल्याचा दाखला मिळतो. अशा पक्ष्यांच्या जीवाश्मांची संख्या जेमतेम असून सर्वात जुने जीवाश्म दीड कोटी वर्षांपूर्वीचे आहे.

आर्किओप्टेरिक्स अर्धा पक्षी व अर्धा सरीसर्प
आर्किओप्टेरिक्स हा अर्धा पक्षी व अर्धा सरीसर्प असलेला प्राणी होता. त्याच्या शरीरावर पंखच पंख होते. परंतु त्याला लांबलचक शेपटीही होती. दात असलेला निमुळता जबडा होता. पंखांना पंजे होते. झाडांवर त्याचा अधिवास होता. पंखावरील पंजाने तो झाडांच्या एका फांदीवरून दुसर्‍या फांदीवर जात असे.

भारत हे मोठे आश्रयस्थान
स्थलांतरित पक्ष्यांचे आश्रयस्थान असलेल्या जगातील ५० प्रमुख देशांत भारताचा समावेश होतो. जगात पक्षी स्थलांतराचे पॅसिफिक अमेरिका, मिसिसिपी अमेरिका, अटलांटिक अमेरिका, पूर्व अटलांटिक, काळा समुद्र, भूमध्य सागर, पश्चिम अशिया, पूर्व आफ्रिका, मध्य अशिया, पूर्व अशिया व ऑस्ट्रेलिया हे प्रमुख मार्ग आहेत. मध्यपूर्व व चीन-मंगोलिया अशा दोन मार्गाने या पक्ष्यांचे भारतात आगमन होते. २०१४मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या पाहणीत ६३८ स्थलांतरित पक्ष्यांच्या प्रजाती भारतात आढळल्या आहेत. त्या प्रजातींचे संख्यानिहाय वर्गीकरण जमिनीवरचे पक्षी ४५३, पाणपक्षी १७१, उंच उडणारे पक्षी ५८, समुद्रपक्षी ४७ असे देण्यात आले आहे.

पूरक माहिती
सुजित नरवडे - प्रकल्प शास्त्रज्ञ बीएनएचएस, मुंबई
अतुल साठे- जनसंपर्क अधिकारी तथा पक्षीअभ्यासक बीएनएचएस
परवीन शेख- प्रकल्पक अभ्यासिका बीएनएच, मुबंई
प्रतीक तांबे - एनव्हीस सेंटर

संदर्भ :
एनसायक्लोपीडीया ऑफ बर्ड‌्स
मॉर्टेलिटी ऑफ बर्ड‌्स ड्यू टू हेल स्टॉर्म, ए बीएनएचएस स्टडी रिपोर्ट