आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळसण \'मोठा\' असे आनंदाला \'तोटा\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गावोगावची दिवाळीसुद्धा इतर सणावारांप्रमाणे वर्षानुवर्षे आर्थिक स्तर, वर्ग, वर्ण आणि जातींनुसार साजरी होते. दिवाळीचा सण हा प्रकाशाचा सण असला; तरी तो कुणाच्या घरी स्वयंभू असायचा; तर कुणाच्या घरी तो कुणी तरी दिल्यावर आलेला असायचा, पणतीसारखा तेवढ्यापुरता मिणमिणून विझणारा...

खरं तर गुजरातमधील दिवाळीचा पाडवा, हे त्यांचं नववर्षारंभ. महाराष्ट्र हा एकमेव भूभाग असावा, जिथं चैत्र पाडवा हा नववर्षारंभ साजरा करून परत दिवाळीचा पाडवा साजरा केला जातो.

दिवाळी म्हणजे तुडुंब आनंद, गोड-धोड खाऊची धम्माल, नातेवाईक, स्नेह्यांच्या भेटी, फटाकेच फटाके; एकूण सगळा आनंदीआनंद! दिवाळीची अशी वर्णनं आपण वर्षानुवर्षे ऐकतोय, वाचतोय. हल्ली माध्यमांमधून तर दिवाळी ऊतू जात असते. ही दिवाळीची वर्णनं असतात, ती सर्वकालिक त्या-त्या काळातील अभिजन वर्गाची. त्यात श्रमिकांची, आश्रितांची, तथाकथित खालच्या वर्ण-जातीतील जनाची दिवाळीची वर्णनं, परंपरा कुठेच दिसत नाहीत. गावोगावची दिवाळीसुद्धा इतर सणावारांप्रमाणे वर्षानुवर्षे आर्थिक स्तर, वर्ग, वर्ण आणि जातींनुसार साजरी होते. दिवाळीचा सण हा प्रकाशाचा सण असला; तरी तो कुणाच्या घरी स्वयंभू असायचा; तर कुणाच्या घरी तो कुणी तरी दिल्यावर आलेला असायचा, पणतीसारखा तेवढ्यापुरता मिणमिणून विझणारा. परत तेच; जगण्यासाठी श्रमाच्या वाटा शोधणं असायचं!

दसऱ्यातील घरगुती धुणी धुऊन झाली की; पाऊस परतीच्या वाटेला लागायचा. खरीपातल्या पिकांनी शिवारं टच्च भरलेली असायची. वातावरणात पोट भरल्याचं समाधान दरवळत असायचं. हवेतील किंचितशा गारठ्याच्या झुळकी थंडीची चाहुल घेऊन यायच्या. दिवसा उन्हं तापलेली असायची. वातावरणातील अचानक झालेल्या बदलामुळे पाणी पिऊन डंबारलेल्या भिंती उलायला लागायच्या. मुंडारण्यांवर वाढलेलं गवत तुरे येऊन मरण्याची वाट बघत असायचं. या भिंती सारविण्यासाठीचे, सांगवे खालच्या वाड्यांमध्ये पोहोचायचे. आणि वाड्यांमध्ये ‘आता दिवाळी येणार’ याची चाहुल लागायची. तसेच, पुरुषांनाही लाकडं फोडून देण्याचे ‘आदेश’ मिळायचे. भेड्यांच्या भिंती सारविल्याने सोलवटलेले हाताचे तळवे आणि लाकडांच्या ढलप्या काढून हाताला फोड येऊन निबर झालेले घट्टे दिवाळीत मिळणाऱ्या वाढणाची वाट बघायचे. ऐन दिवाळीत तिकडून काहीही येत नसल्याने; लेकरंबाळं सणासुदीत कुणाच्या तोंडाकडं बघणार, यासाठी आणि जगरहाटी म्हणून सगळीच घरं आपापल्या परीनं दिवाळी ‘साजरी’ करण्याची तयारी करीत. दिवाळी हा उधार-उसणवाऱ्या आणि कर्जबाजारी करणारा सण असायचा. तर सटकर पोरांसाठी ‘खुलवर’ जमा करून फटाकड्या विकत घेण्याचा!
दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने इथल्या मूळ संस्कृतीमधील आणि बाहेरून आलेल्यांच्या प्रथा, रूढी, परंपरांची, आचार आणि आहारांसह अनेक गोष्टींची सरमिसळ झालेली दिसेल. त्यातील काही परंपरा या स्थानिक समूहांच्या, पण कृषी संस्कृतीतील, काही नंतरच्या गोपालक समूहांच्या आणि काही व्यापार-उदीम करणाऱ्या समूहांच्या असाव्यात. आज ज्या परंपरा ठळकपणे दिसतात; त्या नंतर आलेल्यांच्या असाव्यात; ज्यांखाली मूळ परंपरा अस्पष्ट होत गेल्याचे दिसेल. या प्रदेशात नंतर स्थिरस्थावर झालेल्या मानवी समूहांनी आपापल्या प्रथांची जोड दिली असावी. यातील एक समानसूत्र म्हणजे, नवधान्याची उपलब्धता. त्यातही अनेक कडधान्य, तांदूळ, तीळ, भुईमुग, कारळे, कापूस यांसारखी धान्य आलेली असत. या धान्यांपासून मिष्ठान्न, तेलमिश्रित स्निग्ध पदार्थ केले जात. अशा अनेक मानवी समूहांच्या सरमिसळीमुळे हा सण नेमका कोणत्या एका समाजघटकाचा आहे, हे नीटसं स्पष्ट होत नाही. त्यामुळे त्यांची कारणमीमांसा न करता दिवाळी साजरी केली जाते.

एतद्देशीयांची दिवाळी पूर्वी पाच दिवस चालत नसावी. गाय-वासरांच्या बारसेपासून पुढचे पाच दिवस दररोज अंगणात ताज्या शेणाच्या गवळणी घातल्या जात. गवळणींचे फेरे वाढत गेले, तरी; कृष्ण पेद्या अर्थात पेंद्या त्यात कायम राहात. शेणांच्या गवळणी, पेंद्या यांना शेणाच्याच कलाकुसरीने नटवले जात असे. गाय-वासरांच्या बारसेला अर्थात वसू बारसेला गवळणींचा एक फेरा घालीत आणि सायंकाळी दुसऱ्या दिवसाच्या अंघोळींसाठी पाणी भरण्याचा उत्साह असे. धनत्रयोदशी हा शब्द धन ज्यांच्याकडे असेल त्यांच्यात रूढ झालेला आहे. या दिवशीची पहाटेची अंघोळ म्हणजे ‘पहिली अंघोळ.’ ज्यास कुणी अभ्यंगस्नान म्हणतात! पाणी भरण्याच्या सायंकाळीच फराळ तयार केला जात असे. पहिल्या अंघोळीच्या पहाटे समस्त पुरुषांना उठवून ज्वारीचं पीठ कालवून ‘उटणं’ लावण्याचं कार्य स्त्रीवर्ग करे. बहिणी भावांना अंघोळी घालीत. बहिणी नसतील तर अन्य स्त्रिया. ज्याला अंघोळ घातली असेल त्याच्या डाव्या-उजव्या अंगावरून दोन्ही बाजूला मुटकं, फळं आणि दिवं उतरून टाकून ओवाळीत. (ज्वारीचं पीठं घट्ट कालवून त्याचे मुटके, फळं अर्थात दामट्या आणि छोटे-छोटे दिवे बनवित. ते उकडीत किंवा भाजत नसत.) घेतले असतील तर नवे कपडे नेसवून फराळ खायला देत.
नंतर थोडेसे फटाके देऊन पोरं घराबाहेर सोडली जायची. बायकांच्या अंघोळी नंतर व्हायच्या. कुणी-कुणी दिवाळीसाठी बांबूच्या कामट्या आणि बेगडाचा ‘आकाशीदिवा’ बनवायचे. त्यात चिमणी किंवा पणती ठेवून उंच लाकडाच्या आधाराने रात्रीच्या वेळी लटकवायचे. हे आकाशीदिवे प्रकाशाऐवजी झिरमिळ्यांच्या आवाजाने रात्रभर जागे राहायचे.
कधी काळी ‘सामान्यजनांना’ उपद्रव देणाऱ्या नरकासुराचा स्मृतिदिन आजही पाळला जातो. ती ‘नरकचतुर्दशी’. तो इतका वाईट होता तरी त्याच्या स्मृती आजही जपल्या जातात. या दिवशीपण अंघोळीचा उपचार पार पाडला जात असे. पण आजचा अंघोळीचा मान हा स्त्रियांचा असे. या दिवशी गवळणींचे दोन फेरे घालीत. तिसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन. यांची ‘लक्ष्मी’ म्हणजे ‘केरसुणी’! ज्यास मांग लोक ‘फडा’ म्हणत, तर इतर लोक केरसुणी किंवा झाडू. मांगांच्या अनेक कामांपैकी शिंदीच्या झावळ्यांपासून ‘फडे’ तयार करण्याचं पण एक काम होतं. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुणीरूपी लक्ष्मीची पूजा केली जायची. ज्यांच्या उत्पन्नाचं साधन, अवजार, हत्यार जे असेल, तीच त्याची ‘लक्ष्मी’ समजली जात असावी. या दिवशी गवळणींचे फेरे नसत. तर या दिवशी ‘गोवर्धन’ घालीत असत. अर्थात, शेणाला ‘पर्वताचा’ आभास! दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशीच ‘बळी प्रतिपदा’ या दिवशी गवळणीचे चार फेरे घालून पूजा करीत. मग तिथेच दूध आणि बोटव्याचा भात शिजवित आणि दूध ऊतू जाऊ देत असत. या दिवशी बळीचे पडले मागं आणि पाडवा आला पुढं. शेतकऱ्याचे महत्त्व अर्थात शेतीचे महत्त्व कमी होऊन व्यापाराचे महत्त्व वाढले असावे. खरं तर गुजरातमधील दिवाळीचा पाडवा, हे त्यांचं नववर्षारंभ. महाराष्ट्र हा एकमेव भूभाग असावा, जिथं चैत्र पाडवा हा नववर्षारंभ साजरा करून परत दिवाळीचा पाडवा साजरा केला जातो. याच दिवशी महाराष्ट्रातील व्यापारीपण ‘चोपड्या’ पूजतात! का? या दिवशी पुरणपोळीचे जेवण बनविले जाते.
दिवाळीचा पाचवा आणि शेवटचा दिवस हा ‘भाऊबीजेचा’. खरं तर ही आद्य ‘यमद्वितीया’. या दिवशी बहिणी भावांना ओवाळतात. या दिवशी बहिणी भावांना करदोडे अर्थात करगोटे, पान-सुपारी देत आणि भाऊ ओळवाणी टाकीत.
इकडे खालच्या वाड्यातील जन, काही बलुतेदार भाऊबीजेसाठी आत्तारा-तांबोळ्यांकडून करदोडे आणि पान-सुपाऱ्या आणून ठेवीत. भाऊबीजेच्या सायंकाळी वरच्या वाड्यांवर दिवाळी मागायला जात असत. तिथं ‘मोठ्या भावांना (वय कितीही असो, ते मोठेच!) (लांबूनच) करदोडे, पान-सुपारी देत. ओवाळणी म्हणून तिकडून फराळाचे पदार्थ दिले जात. तिथं नियमितपणे काम करणारांना फराळाचं जास्त आणि बरं दिलं जात असे. अणि जे नुसतेच ओवाळायला आणि दिवाळी मागायला आले असतील; तर कमी वाढलं जात असे. या वाढणात प्रामुख्याने; बुंदी, बुंदीचे गोळे अर्थात लाडू, बहुतेक वास येणारे अनारसे, घट्ट झालेले गऱ्याचे अर्थात रव्याचे लाडू, गऱ्याच्या करंज्या, शेव, काटी कोंडबळी अर्थात चकल्या आणि चुरमुऱ्याचा सादळलेला चिवडा असे. बऱ्याचदा वाड्यावर फराळाला येणारे (त्यांचे) सुहृद फराळ संपवित नसत. असा ताटात सोडलेला फराळ फेकून न देता एखादी ‘कनवाळू मालकीण’ तो एखाद्या डालग्यात जमा करून, तो इकडे देऊन पुण्य पदरात पाडून घेत असे.
ऐन दिवाळीत कुणाच्या दाराला जायला नको, म्हणून इकडेपण फराळ बनवित. ज्यात बुंदीच्या गोळ्याच्या नावे शेवेचे लाडू बनत. बुंदी खूप तेल खाते, म्हणून हा शॉर्टकट असावा. कुणाकडून तरी शेवगा (शेव पाडायचे उपकरण तो शेवगा?) मागून आणीत. हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाची जाड शेव पाडून घेत. शेव हाताने बारीक कुस्करून घेत. मग साखरेचा पाक करून त्यात ही शेव घालून लाडू वळीत. शक्य असेल, तर पाकात इलायची टाकीत. कुणी घरीच काढलेल्या गऱ्याच्या बाकराच्या करंज्या करीत. कुणी याच गऱ्याचे गोळे बनवित. तिळाच्या करंज्या हमखास बनत. शेव (ही तिखटच असे), काटीकोंडळी, कोंडबळी (ताजी), धपाटी असे फराळाचे पदार्थ असत. क्वचित चुरमुऱ्याचा चिवडा. पाडव्याच्या दिवशी पुरणपोळ्या असत. तर कुणी गडी दोन दिवसात गोडाला वैतागून हमखास मटण आणायचा आणि त्यावरून घरात हमखास आदळआपट व्हायची.
दिवाळीच्या निमित्ताने मुलाबाळांना अगदी मोजकेच फटाके आणले जात. त्यातही फुलबाजे, टिकल्या, लवंगी फटाकड्या, फटाकड्या, भुंगे, चिंचुद्य्रा, कावळे आणि तोटे असायचे. तेसुद्धा अगदी मोजून दिलं जायचं. मग काही सटकर पोरं खुलवरीतून आपापलं वाजवायचं घ्यायची. बऱ्याचदा तोटे-फटाकड्या फुसक्या निघायच्या. त्यांची दारू काढून दगडावर ठेवून ‘स्फोट’ घडवून आणले जात. आणलेल्या तुटपुंज्या फटाक्यांमधून काही फटाके ‘तुळशीच्या लग्नासाठी’ ठेवले जात. ज्या शेणाचे गवळणींचे फेरे घातले जात त्या गवळणी फेकून दिल्या जात नसत. तर पत्र्यावर, छतावर वाळण्यासाठी ठेवल्या जात. सटीला अर्थात चंपाषष्ठीला जे नागदिवे उकडले जात असत; ते उकडण्यासाठी या गवळणींचा इंधन म्हणून वापर केला जात असे.
दिवाळी संपून गेली; तरी न खाल्ले गेलेले वाळून खट झालेल्या पदार्थांचे (कुबट) वाढण येत राही. त्यात दिवाळीचा गोडवा नसे आणि त्या प्रत्येक घासागणिक दिवाळीसाठी केलेल्या उधारीच्या आठवणी येत राही. कित्येक वर्षांपासून दिवाळी येते आणि जाते. कित्येक स्थित्यंतर झाली; पण दरवर्षी नरकासुराची आणि बळीची आठवण आवर्जून काढली जाते. आजही बळीचं राज्य येईल आणि जग सुखी-समाधानी होईल, या आशेवर सगळे जगतात.
बातम्या आणखी आहेत...