आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचपावली !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचपावली हे बहुसंख्याकवादी प्रचलन. यावर अल्पजन अभिजनांची बंदीची मागणी. पण समस्येची मुळं शोधून त्यावर उपाय शोधण्याचा धीर आणि वेळ परिवर्तनवादी साधकांकडे नाही...
भारतीय मानसिकतेला चटकन भावणारी बाब म्हणजे, सातत्याने चालत आलेली प्रथा बंद करण्याची उबळ. प्रथा बंद करण्यामागची कारणंही खूप वरवरची. दुसरी बाजू मांडणाऱ्यांना लगेच एकतर्फी समाजद्रोही ठरवलं जातं. या बंदीमुळे प्रामुख्याने समाजातील ‘बहुसंख्यजनां’च्या जीवनयापनावर दृश्यादृश्य परिणाम घडणार असतात, याची जाणीव बहुसंख्यजनांनाच नसते. शासकांच्या जवळच्यांचा किंवा अल्पजनसंख्या असलेल्या स्वधर्मीय अभिजनांचा हा बंदचा हट्ट असतो. कारण, हा जो अल्पजनसंख्य वर्ग असतो; त्याची धार्मिक कर्मकांडे हीच एकूण समाजाची असावीत, असा त्यांचा दुराग्रह हट्ट आणि आग्रह असतो.
धर्माचे यमनियम बनविणारा हा वर्ग अग्रहारी साक्षर असतो. तो जे खातो, वेषभूषा करतो, जी भाषा बोलतो, ज्या कलांमध्ये सहभागी होतो, ते सगळे समाजावर प्रभाव पाडणारे असते. त्या वर्गाच्या धडकी भरविणाऱ्या अदृश्य अशा धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रभावामुळे बहुसंख्यजनांना आपल्या सर्व चालीरीती मागासलेल्या वाटतात. बहुसंख्यजन त्यांच्या समजुतीनुसार जे धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आचरण करीत असतात, तेसुद्धा त्यांचे धर्माचरणच असते. ती अनेक वर्षांपासूनची चालत आलेली परंपरा असते. बदलत्या काळानुसार त्यातही नकळतपणे बदल होत जातात. त्याची कुठे लिखित संहिता नसते. त्या उलट साक्षर अल्पजनसंख्यकांनी आपल्या धार्मिक वर्तणुकीच्या बांधीव संहिता लिहून ठेवलेल्या असतात. काळानुसार ते आपल्या संहितेत बदल करीत नाहीत; पण त्यातून हवे तसे अर्थ लावून ते आपल्या वर्तणुकीचे पुराव्यांसह समर्थन करू शकतात. दुर्दैवाने, बहुसंख्यजनांकडे असं कुठलंच बाड नसतं. शिवाय, ते वेगवेगळ्या समूहात विभागलेले असतात. तसेच अल्पसंख्यजनांच्या धार्मिक संहितांची तर्कदुष्ट चिकित्सा करणं हे (त्यांनी स्वत:च) ‘पाप’ ठरविल्यामुळे चर्चांचा मार्गच खुंटतो आणि अस्मितांसाठी साठमारी सुरू होते.
त्याचं एक चांगलं(?) उदाहरण, उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील चिवरी या गावचं. अशा अनेक चिवऱ्या भारतभरात आहेत. चिवरीतील देवीच्या नावाने मंगळवार, शुक्रवार आणि पौर्णिमेस वर्षभर बोकडाचे बळी दिले जात. आजही ही परंपरा साधकभक्तांनी कायम ठेवलेली आहे. तिथे वर्षानुवर्षे कोंबड्याचे, बकऱ्याचे, तर कधी कारणाच्या निमित्ताने हालगटाचे पवित्र बळी देत. या सर्व प्रकारच्या बळींच्या मांसाचे साधकभक्त ‘पवित्र भोजन’ करीत. व्हायचं काय की, माघी पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी देवीची वार्षिक यात्रा भरायची. आजही भरते. या एका दिवसात नवसापोटी आणि परंपरेनुसार सुमारे दहा हजार बोकडांचा आणि वीस-बावीस हालगटांचा अर्थात रेड्यांचा बळी दिला जायचा. (ही १९९४-९५ची अधिकृत आकडेवारी आहे. कारण चिवरीची ग्रामपंचायत बोकड बळी देण्यासाठी येणाऱ्यांना पाच रुपयांचे एक याप्रमाणे कुपन द्यायची. मगच मुलाणी पुढचे सोपस्कार पार पाडायचे. यातील गंमत अशी होती की, बळी दिलेल्या रेड्याच्या कातड्याचे हक्क मात्र गावातील वाडेवाल्याला होते. त्यांचे मांस खाण्याचे अधिकार मात्र परंपरेने खाणाऱ्यांना. खाण्याबद्दल कुणाचा कसलाही आक्षेप वगैरे नव्हता. विशेष म्हणजे, कारणाचे रेडे बळी देण्यासाठीची परवानगी पोलिसांकडून घ्यावी लागत असे.)
एकाच दिवशी होणारी प्राणीहत्या खूपच क्रूर आणि वाईट असल्याचे वाटल्याने, त्या बंद करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि त्यांच्यासोबत ‘शाकाहार हेच भूषण आणि सर्वस्व’ मानणाऱ्या अत्यल्पसंख्यजनांच्या संघटनांनी पुढाकार घेतला. पहिली एक-दोन वर्षं देवीच्या ‘साधकांनी’ कार्यकर्त्यांचे ‘ताडण’ वगैरे केले. कार्यकर्त्याच्या रूपातील काही जण ताडण टाळण्यासाठी ‘प्रसाद’ घ्यायला आल्याचे सांगून सुटले वगैरे. नंतर नेहमीप्रमाणे माध्यमांनी हा प्रश्न ‘त्यांच्या पद्धतीने’ लावून धरला. माध्यमांनी ‘सामाजिक सुधारणेचं कार्य हाती घेतल्याने’ सरकारला या आंदोलनाची दखल घ्यावी लागली. मग सार्वमताचा आदर राखून या यात्रेतील पशूहत्येवर बंदी आणली. बंदीच्या समर्थकांचे ‘आपल्या आंदोलनामुळे पशूहत्या बंद झाल्याचे’ समाधान झाले. अशा रीतीने साठा उत्तराची कहाणी ‘असफळ’ झाली. अशा असंख्य असफल कहाण्या आजही सर्रास सुरू आहेत. कधी विश्वास म्हणून, कधी परंपरा, तर कधी देव असलाच तर काय घ्या! म्हणून! सध्यासुद्धा एका जागृत देवीस्थानी बोकडाचा बळी दिल्यावर मुंडी थोरल्या वाड्यावर आणि खुरे अर्थात पाय धाकल्या वाड्यावर द्यावी लागतात. ते तिकडे पोहोचविले नाही, तर पूजा पूर्ण होत नाही म्हणे! आता बोकडाच्या इतक्या मुंड्या आणि पायांचे मानकरी काय करीत असावेत? असो! कधी तिकडे दर्शनासाठी गेलात, तर त्या तीर्थक्षेत्रातील ढाब्यांवर मटणाचे कालवण आवर्जून खा. बरबटाची याद येईल.
‘हिंदू हा धर्म नसून ते एक आचरण आहे!’ असं कुणीसं म्हटल्यानुसार, भारतातील प्रत्येक जातीसमूह आपापल्या समजानुसार आणि कुवतीनुसार धर्माचे पालन करतो. ‘कायद्यातील पळवाटा ज्याला माहीत असतात, तो चांगला वकील असतो!’ तद्वतच हिंदू धर्माच्या धार्मिक परंपरांचं पण आहे. समजा कुठल्याशा कामासाठी तीन जण निघाले तर कनवटीला खडा ठेवा, पूजेला बसताना बायको नसेल तर सुपारी ठेवा वगैरे. देव हा चराचरात असल्याने त्याची पूजा कुठेही करता येऊ शकते. त्याचे पारंपरिक अनुसरण म्हणून, करून ‘पाचपावली’ हे बहुसंख्यजनवादी प्रचलन रूढ झाले असावे. जे पूर्वापार चालत आलेले आहे. चिवरीच्या आईच्या साधक भक्तांनीपण तेच तर केले. मंगळवार, शुक्रवार आणि पौर्णिमेला जे बळी दिले जायचे, त्या प्रथेला आंदोलकांचा कुठल्या प्रकारचा विरोध होता? की नव्हता? की त्यांना ही प्रथा माहीत नव्हती? काही स्पष्ट झाले नाही. त्यांचा विरोध हा एकाच दिवशी जास्त बळी देण्याला होता? तो बंद करण्यात ते यशस्वी झाले. मग देवीच्या साधकभक्तांनी माघी पौर्णिमेनंतरच्या येणाऱ्या मंगळवारीच आपापल्या गावी, घरी देवीच्यासाठी बळी देण्याची जुनी प्रथा सुरू केली. मग त्या मटणाचा नैवेद्य देवीला दाखविण्यासाठी ‘पाचपावली’ करायला सुरू केले. (आरोग्यासाठी जशी शतपावली, तसंच हे पण देवासाठी!) देवीचे मूळ ठाणे ज्या दिशेला असेल, त्या दिशेला पवित्र नैवेद्य घेऊन जायचा. थोडी मोकळी जागा साफसूफ करून घ्यायची. पाच खडे धुऊन घ्यायचे, खणाच्या पटकरावर मांडायचे, कुंकू हळद वाहायची. मनोभावे साग्रसंगीत पूजा करायची. परत येऊन अगोदर सवाष्णी आणि नंतर इतरांना जेवायला घालायचं. आणि सगळ्यांचे आत्मे तृप्त करून पुण्य पदरात पाडून घ्यायचं.
सद्य:स्थितीत लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारलीय. लोक साक्षर झालेत, अक्षरओळख झालीय, पण मतपरिवर्तन झालंय का? अर्थसाक्षरता आणि आर्थिक सक्षमीकरण झाल्याने आता एकाच्या ऐवजी दोन-दोन, तीन-तीन बोकडांचा बळी देऊन मोठेपणा मिरवला जातोय. पूर्वी वाहनांची संख्या कमी होती. तेव्हा पाचपावली करायचे. आता नैवेद्य गाडीने थेट देवळात जातो. पूजा झाली की, तिथून मोबाइलवरून नैवेद्य देवीला पोहोचल्याचा निरोप येतो, आणि इकडं ‘चांगभलं’ होतं. तांत्रिकदृष्ट्या लोक पुढं गेलेत. मानसिकदृष्ट्या कुठे आहेत? पूर्वी लोक वाहनांची उपलब्धता नव्हती म्हणून देवाला पायी जायचे. आज वाहनं आहेत. ती पुढच्या मुक्कामाला पाठवून त्यामागून पायी जाणारे साधक आहेत.
गेल्या काही दशकांत देव-देवतांची उपठाणी निर्माण होणं कमी झालंय. त्याच्या पण ‘ष्टोऱ्या’ होत्या : एखादा भक्त किंवा भक्तीण नित्यनेमाने त्यांच्या इष्ट देवी, देवाचे मुख्य ठाण्यावर खेटे घालीत. वय झाल्यावर खेट्यात खंड पडून पाप लागेल, पातक घडेल, म्हणून इष्ट देवास आवाहन करीत. त्यांचा देव भक्ती आणि ‘समर्पण’ बघून त्यांना म्हणे की, ‘मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू तुझ्या गावाकडे चालायला लाग. मी तुझ्या मागे येतो. अट एकच; मागे वळून बघायचे नाही.’ भक्त निघतो. गाव जवळ आल्यावर तो अधिरोत्सुकतेने मागे वळून बघतो. त्याने वळून बघितल्याबरोबर देवता अंतर्धान पावते वा पावतो. मग भक्त गावात येऊन हे कथानक सांगतो. मग भक्ताच्या भक्तीवर कुठलाही संशय व्यक्त न करता गावकरी भक्ताने अंतर्धानाची जी जागा दाखवली असेल; तिथे त्या देवतेची प्रतिष्ठापना करून मंदिर बांधीत. मग काही वर्षात ते ‘...प्रति अमुक देवस्थान’ म्हणून प्रसिद्धीस पावे. अशी अनेक ‘प्रति देवस्थाने’ भारतभरात आहेत. अशा प्रतिदेवता म्हणजे ‘पाचपावली’ची कायम ठिकाणं होय.
बंदी घातल्याने तात्कालिक परिस्थितीत बंदीची मागणी करणाऱ्यांना समाधान वाटत असेल, पण हा समस्येवरचा उपाय मात्र होऊ शकत नाही. समस्येची मुळं शोधून त्यावर उपाय शोधण्याचा धीर आणि वेळ परिवर्तनाच्या वाटेवरील साधकांकडे नाही. त्यांना उपाय आणि परिणाम लगेच हवे आहेत; म्हणून समस्या व प्रश्न जिथे होते तिथेच आहे. ‘चे’च्या म्हणण्यानुसार, ‘घाण कायमची हटविण्यात कुणालाच रस नाही. डुकरं धुऊन परत तिथंच सोडण्यात आहे!’
बातम्या आणखी आहेत...