आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुर्वेदातले अभक्ष्य आणि अपेय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या आहारावर धार्मिक पगडा खरा. मात्र आयुर्वेदाने रुग्णांचा विचार करताना अभक्ष्य आणि अपेय अन्नोपचार महत्त्वाचे मानले आहेत...
चरकाच्या मतानुसार, ‘नेमक्या आहाराशिवाय औषधांचा रुग्णाच्या शरीरावर योग्य परिणाम होत नाही. योग्य अाहार नसेल तर औषधे निरुपयोगी ठरतील आणि रुग्णाला अन्न व्यवस्थित पचले, तर औषधे शरीरात पोहोचतील आणि व्याधी नष्ट होतील.’
आयुर्वेद ही जगातील सर्वात उत्तम आणि परिपूर्ण उपचार पद्धत आहे, त्यातील औषधांची मानवी शरीरावर कोणतीही प्रतिकूल प्रतिक्रिया होत नाही, आणि आयुर्वेदात फक्त शाकाहारी उपचार सांगितले आहेत, असे ठाम समज सर्वसामान्यांमध्ये आहेत. भारतीय वैद्यकपद्धत, आयुर्वेद, हिंदूंचे धर्मग्रंथ यांतून मांडण्यात येणारे भारतीय आहारशास्त्र हे वर्णनिहाय आहाराची मांडणी करते. तसेच ज्या वर्णाची माणसे ज्या प्रकारचा आहार घेतात, तशीच त्यांची मनोवृत्ती असते, अशीही मांडणी करते. आयुर्वेदानुसार रोग होण्यापेक्षा तो होऊ नये, यासाठी औषधे, काढे यांबरोबरच कोणत्या ऋतूंमध्ये कोणता आहार घ्यावा, याबद्दल सविस्तर मांडणी करण्यात आलेली आहे. मानवी शरीर हे वात, पित्त आणि कफ या त्रिदोषात विभागलेले आणि त्याची निर्मिती ही पंचतत्त्वांपासून झालेली असते, हे गृहीत धरलेले आहे. उत्तम आरोग्यासाठी आहार हा शाकाहारी आणि तोही सात्त्विक असावा, तो षड‌्रसांनी युक्त असावा, असेही म्हटले आहे. त्याशिवाय अन्न खाणे, हासुद्धा एक संस्कार असल्याने काय खावे आणि काय खाऊ नये, हेही सविस्तर सांगितलेले आहे. शिवाय अभक्ष्य आणि अभोज्य अन्न कोणते असावे, याचेही विश्लेषण केलेले आहे.

आहारांवर इतका धार्मिक पगडा असतानाही आयुर्वेदात मात्र रोग्यांचा विचार करताना म्हटलेय की, ‘धर्म काय म्हणतो यापेक्षा रोग्याचे आरोग्य सुधारण्यासाठी मांसाहारसुद्धा उपयोगी आहे; तसेच धर्मशास्त्रांनी जे अभक्ष्य आणि अपेय सांगितलेले आहे, असे अन्नोपचार घेतल्यामुळे रोग्यांनी अपराधी वाटून घेण्याची गरज नाही.’ रोग्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी अभक्ष्य आणि अपेय असे मांस, आलं, लसूण, आळंब्या, मद्य यांचे योजन आयुर्वेदात सुचविलेले आहे.
आयुर्वेदाचा मुख्य भर हा रोगांना दूर ठेवण्यावर असला, तरी रोग झाल्यावर त्यावरील उपचारांमध्ये सुमारे ७०० वनस्पतींपासून तयार केलेली विविध प्रकारची औषधे आणि उपचार सांगितलेले आहेत. तसेच काही रोगांमध्ये मांसाहारी पदार्थांचे उपचार पण सांगितलेेले आहेत. सातत्याने धाप लागणे, दमा, वारंवार खोकला येणे, सर्दी, अन्नावरची वासना उडणे, शारीरिक दौर्बल्य, तापामुळे येणारा थकवा आणि ग्लानी, हृदयाचे स्नायू दुर्बल होणे, उलट्या होणे, अामांश, भाजलेल्या त्वचेचा दाह, वीर्यवृद्धी, प्रथिनांची वृद्धी, अस्थिभंग, कृशता, स्थूलता, शल्यचिकित्सा, पोटदुखी, मूत्राशयाचे विकार, क्षय, उसण भरणे, रक्तशुद्धी, मूळव्याध, हवामान बदलामुळे होणारे रोग... अशा अनेक प्रकारच्या रुग्णांसाठी, वेगवेगळ्या रोगांसाठी, वेगवेगळ्या प्रकारचे मांसाहारी अन्नपदार्थ, अन्नघटक आयुर्वेदात सांगितलेले आहेत. हे पदार्थ कसे तयार करावेत, त्यात काय काय वापरावे, ते किती शिजवावे, याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.

चरकाच्या मतानुसार, ‘नेमक्या आहाराशिवाय औषधांचा रुग्णाच्या शरीरावर योग्य परिणाम होत नाही. योग्य अाहार नसेल तर औषधे निरुपयोगी ठरतील आणि रुग्णाला अन्न व्यवस्थित पचले, तर औषधे शरीरात पोहोचतील आणि व्याधी नष्ट होतील.’

चरकाने दवाखान्याच्या परिसरात कोंबड्या, चिमण्यांसारखे पक्षी, मोर, चितर, ल्हावरं (तित्तर, बटेर), ससे, काळवीटं इत्यादी प्रकारचे प्राणी आणि पक्षी ठेवायला सांगितले आहेत. त्याशिवाय जंगलातील विविध हरणे आणि चितरांसारखे पक्षी, यांचे मांस पचायला हलके असते, असे म्हटले आहे. तर वर्षावनातील(पाणथळ) प्राणी जसे डुकरं, म्हशी आणि गेंडे वगैरेंचे मांस पचण्यास जड असते, असे म्हटले आहे.

मांस आणि इतर अन्नघटक अति शिजविणे, अर्धे कच्चे ठेवणे, सुके करणे आणि करपवणे हे रुग्णास हितकारक नसते. या आहारात मांसाबरोबरच शाकाहारी पदार्थ, जसे विविध डाळी, फळे, मध, सातू, मसाले यांचे प्रमाण आणि ते पदार्थ करण्याच्या पद्धती सांगितलेल्या आहेत. शिवाय, कोणत्या रोगासाठी कोणता पदार्थ करावा, याचीही वर्णनं आहेत. या पदार्थांमध्ये प्राण्यांचे, पक्ष्यांचे मांस हा मुख्य घटक असला, तरी इतर घटकांचे प्रमाण निश्चित केलेले आहे. मांसासोबतचे इतर अन्नघटक पुढीलप्रमाणे- तूप, शुद्ध लोणी, काकवी, काळ्या मिऱ्या, मिरपूड, आले, डाळिंबाचा रस, आवळ्यासारखी आंबट फळे, नवा तांदूळ (पचण्यास जड असतो), जुना तांदूळ (पचण्यास हलका), शिजवलेल्या तांदळाची पेज / कांजी, भिजवलेल्या तांदळाची पेज, दूध, दही, साखर, मूग डाळ, उडीद डाळ, पडवळ, खाण्याचा कापूर, जिरे, डाळिंबाचे सुकवलेले दाणे, हिंग, विविध मसाले, मोहरीच्या आणि तिळाच्या तेलासह विविध तेले, द्राक्षे, मध, आळंब्या यांचा समावेश आहे. शिवाय प्राण्यांचे विविध अवयव, त्यांचे भाग आणि उपयोग यांचे उल्लेख आहेत. दवाखान्यात ठेवलेल्या प्राण्यांना कोणत्या वनस्पती खायला घालाव्यात, हे सांगितलेले आहे. प्राण्यांच्या मांसाचे पातळ तुकडे करून त्याचे रस्से (सूप) बनविण्याच्या कृती, ठेचून घेतलेल्या मांसाच्या कृती (आजकालचा खिमा), मांस कोळशावर भाजून घेण्याच्या कृती (आजचे कबाब) सविस्तर दिलेल्या आहेत. मटणाच्या पातळ रश्श्याचे महत्त्व अधोरेखित केलेले असून अशा रश्श्यासोबत रोग्यास मटणाचे तुकडे न देण्याबद्दल सांगितलेले आहे. तसेच आजचे खिमा पॅटिस किंवा मटण टिक्का आठवावा, असा आद्य प्रकारही सांगितलेला आहे.

आयुर्वेदामध्ये सुरा आणि आसव हे मद्याचे दोन मुख्य प्रकार सांगितलेले आहेत. भूक लागण्यासाठी, खाल्लेले अन्न पचन व्हावे, यासाठी पाचक पेये बनविण्यासाठीच्या वस्तूंची माहिती दिली आहे. यासाठी शुद्ध पाणी, मळी, कच्ची साखर, आंबट फळे, आंबट फळांचा रस, पेज, लापशी, दूध, मूग डाळ, सुवासासाठी कापूर, मांसाचा अळणी रस्सा इत्यादींचा समावेश केलेला आहे. कोणते पेयपान, सुरापान आणि आसवपान कोणत्या प्राण्याच्या व पक्ष्यांच्या मांसासोबत करावे, हेही दिलेले आहे. सुरा कोणकोणत्या वस्तूंपासून तयार केली जायची, त्यातील काही प्रमुख वस्तू अशा - आंबट फळे, त्रिफळा, हळदीची झाडे, अंजीर, अंजीराची झाडे, नारळ, खजुरी (खजुराची नीरा), अश्वगंधा, हिरडा, शिंगाडा, कमळकाकडी, डाळिंब, शिंदोळ्या, आंबवलेली तांदळाची पेज/कांजी, विविध भरडधान्ये (उदा. ज्वारी-बाजरी). तसेच मद्यासोबत लसूण आणि लसणाच्या रसाची मिश्रणे वर्णिलेली आहेत.

काही पाचक पेयांच्या प्राशनाने हृदय सशक्त होते, रक्त शुद्ध होते, भूक लागावी-वाढावी, त्यासाठी खास अशी पाचक पेये सांगितलेली आहेत; जी गाय, म्हैस, शेळी, मेंढी यांसारख्या पाळीव (माद्या) प्राण्यांच्या मूत्रांपासून तयार करीत असत. या प्राण्यांच्या मूत्रांमध्ये काही वनौषधी, मसाले मिसळून ती पिण्यायोग्य झणझणीत, उष्ण, सौम्य आणि खारट चवीची बनवित असत.
शेवटी, धर्माचरणापेक्षाही मनुष्याचे प्राण वाचविणे, हेच आयुर्वेदाचे मुख्य उद्दिष्ट राहिले आहे. आयुर्वेदात सांगितलेला मांसाहार हा व्याधी जडल्यानंतर करायचा आहे. व्याधी होण्यापूर्वीचा संपूर्ण भर हा शाकाहार आणि वनौषधी, दूध, दही, तूप, मध, विविध फळे यांच्या सेवनावर आहे. आयुर्वेदात अंड्यांबद्दल काहीशी संदिग्धता आढळते. मध्ययुगीन कालखंडानंतर हिंदू धर्मातील वरच्या वर्णाने मांसाहार धार्मिकदृष्ट्या निषिद्ध ठरविला असला तरी, आयुर्वेदातील मांसाहाराला त्याज्य ठरविलेले नाही, ही दिलासादायक बाब आहे.
shahupatole@yahoo.com