आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खिळगाः खान कोण 'राजे' लागून गेलेत!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तरकालीन मुघल काळात रेवड्या वाटाव्यात तशा ‘खान’ या पदव्या बहाल केल्या गेल्या. ज्यांना मिळाल्या त्यांच्या वंशजांना त्या नाकाराव्या किंवा सोडाव्या वाटल्या नाहीत. एखाद्या महान शब्दाची किती अवनती होऊ शकते, याचे हे ऐतिहासिक उदाहरण ठरावे.
पूर्वजांच्या मर्दुमकीचा अहंगंड बाळगून स्मार्टफोनशी चाळा करीत मध्ययुगीन मानसिकतेत वावरणाऱ्या ‘सायकिकांची’ आपल्याकडे कमतरता नाही. आपल्या मूळ उपनामाला

‘हायफन’ देऊन कधीही नसलेलं ‘ग्रामवतन’ चिकटवून ते काय दर्शवितात कुणास ठाऊक? तसं तर सगळ्याच जाती-वर्ण आणि धर्मातील बरेच जण आपल्या पूर्वजांच्या वतनांची किंवा चाकरीतील पदांची कालबाह्य झालेली ‘नामे’ आजही ‘आंत्रपुच्छासारखी’ बाळगताहेत. काहींना तर त्याचे अर्थसुद्धा माहीत नाहीत. ‘काप गेले, पण भोकं उरली!’ या वाक्यार्थास उलटे करून नसलेल्या कापांसाठी भोकं पाडून घेण्याचे नसते उद्योग केले जाताहेत. त्याला इथले मुसलमान तरी कसे अपवाद असतील! तेही याच मातीतले. त्यांनी नावापुढे प्रामुख्याने ‘खान’की मिरवणे हे तरी दुसरं काय आहे?

‘खान’ आणि मुसलमान हे समीकरण आता जगभरात एकजीव झालेले आहे. खरं तर ‘मंगोलियात’ त्यांच्या भाषेतील ‘क्षी-हान’ (असा कांहीसा उच्चार) म्हणजे भारतीय उपखंडातील ‘खान’. खान म्हणजे, ‘राजा’ किंवा एखाद्या प्रदेशाचा प्रमुख या अर्थाने वापरला जाणारा शब्द. ‘बाबर’ म्हणजे बब्बर शेर अर्थात सिंह. जहिरूद्दीन महंमद हे त्याचे नाव. तो वडलांकडून तुर्क होता आणि आईकडून मंगोल. त्याच्या मातृकुलाकडून बहुतेक सगळेच ‘खान’ लावायचे. मध्य आशियातून आलेल्या ‘बाबरा’सोबत ‘खान’ हा शब्द भारतात अवतरला. त्याची आई ‘चेंग-क्षी-हान’ अर्थात ‘चेंगिझ खानाच्या’ वंशातली होती. या चेंगिझ खानाचे मूळ नाव ‘तेमुजिन’ होते. तत्कालीन राज्याचा प्रमुख म्हणून, तो ‘क्षी-हान’ लावू लागला. भारतात येताना ‘क्षी-हान’चे ‘खान’ झाले, जसे ‘मंगोल’चे मुगल-मुघल किंवा मोगल झाले. मुघल या शब्दाचा बाबर तिरस्कार करायचा, पण शेवटी त्याच्या घराण्याला तोच शब्द कायमचा चिकटला.

भारतात आलेल्या ‘चेंगीज खानाचा’ धर्म मुस्लिम होता; याबद्दल आजही कुणी निर्वाळा दिलेला नाही. पण, भारतात मध्य आशियातून आलेल्या लोकांनी आणि नंतर झालेल्या शासकांनी आपल्या मर्जीतील अधिकारी, प्रशासक, भाषा, लिपी, संस्कृती, सोपस्कार आणले. त्यामुळे भारतात जास्तकरून बाबरोत्तर तुर्की, मंगोल, अरब, इस्लामपूर्व ऑटोमन साम्राज्य, दुराणी, इराणी आल्याने अशा पद्धतीची पदव्यांची-किताबांची आणि पदांची सरमिसळ आढळून येते. बरीच शतके सत्ताधारी राहिल्याने म्लेंछांच्या (विदेशी लोक, ज्यात सर्वच येतात) या बाबींचा परिणाम एतद्देशीय सर्वच घटकांवर, वर्गांवर पडणे नैसर्गिक होते. युद्धात कुणी पराक्रम गाजविला, शौर्य गाजविले, तर त्यास राज्यप्रमुख किताब बहाल करायचे, पदव्या द्यायचे. त्यात अकबराच्या नंतरच्या काळात ‘खान’ हा किताब मोठ्या प्रमाणावर वाटला गेला. त्यात त्या ‘शिपायाचे’ किंवा सरदाराचे मूळ नाव मागे पडून ‘खान’ या शब्दासोबत जोडलेले भूषणपद रूढ व्हायचे. ‘खान’ पदवी एकटी दिली जायची नाही. ‘खान’ हा किताब बहाल करण्याचा अधिकार फक्त ‘बादशहाला’ होता. आणि ज्याला हा किताब बहाल केलाय, त्याच्या निधनानंतर हा किताब त्याच्यापाशीच संपून जायचा. पण मुघलांच्या उतरतीच्या काळात अशांची कुटुंबच्या कुटुंबं ‘खान’ झाली. भारतात मात्र ‘खान’ म्हणजे ‘राजा’ या अर्थाने हा किताब रूढ झाला नाही; तर तो आपण समाजात कुणीतरी विशेष आहोत, हे दाखविण्याचे ‘साधन’ म्हणून वापरला गेला. प्रत्येक काळात तत्कालीन शासकांच्या आणि शासकांच्या निकटच्या अभिजनांच्या भाषेचा, आहाराचा, पेहरावाचा पगडा नागरजनांवर असतो. मुगलपूर्व समाजातसुद्धा पदव्या, किताब, सरकारी वतने आणि पदे होतीच की! त्याचप्रमाणे तेव्हाच्या राज्यकर्त्यांच्या भाषेत तुर्की आणि फारसी या भाषेतील शब्दांची जास्त चलती होती. जसे ‘मिर्झा’ म्हणजे राजपुत्र. तो तख्तावर आला की ‘सुलतान’, बादशाहा, बादशहा, (धाडसी असेल तर) बहादूरशहा व्हायचा. ‘खानखानान’ म्हणजे ‘राजांचा राजा’, तर शहा म्हणजे मूळ राजापासून विभक्त होऊन स्वतंत्र सत्ताधारी होणारा. तर पुरुषांना कितीतरी प्रकारच्या ‘खान’क्या होत्या. त्यातील कित्येकांची मूळ नावं विसरून गेली आणि त्यांच्या पदव्या किंवा किताब इतिहासात टिकून राहिले. खानमिर्झा (ही पदवी मिर्झाराजे जससिंग यांना पण होती.), खानजिहान (जगत्प्रभु), खानजहान, बहादूरखान, आझमखान, करतलबखान, खवासखान (एका निंबाळकरांना पण खवासखान हा किताब होता), सिपाहदारखान, लष्करखान, मुखालिसखान, सुहराबखान, खानेसामन (राजाच्या भटारखान्याचा प्रमुख), शाइस्तेखान (शाइस्ता म्हणजे सुसंस्कृत), खानदौरान किंवा खानेदौरान व खानजमान (युगांचा सरदार), शहानवाजखान (बादशहाची कृपा असलेला), शहाकुलीखान (बादशहाचा दास), नसिरूद्दीनखान, जाफरखान, खाजेखान (हा किताब महंमद गवानला दिला होता), असदखान (ख्वाजा अब्दुल मजिदला दिलेला किताब), दौलतखान, बहलोलखान, सिपहदारखान, मुखालिसखान, अलफखान, सहराबखान (मूळ नाव नियामतुल्ला), शेरखान (फरीदने एका घावात वाघ मारला होता, म्हणून), राजवंशाशी संबंधित महिलांनासुद्धा अशा पदव्या दिल्या जात असत. पण त्या संख्येने खूप कमी आहेत. जसे निगारखानम, कुतलमखानम खातुन, मलका-ए-जहान, नुरजहान, मुमताजमहल, मलिकाजमानी, मेहरुन्निसा, मलिका जमानी वगैरे.

या खान पदवीच्या अगोदर जे गौरवपूर्ण शब्द जोडले आहेत, ते तुर्की किंवा फारसी आहेत. आणि त्या-त्या शब्दांना स्वत:चा असा अर्थ आहे. मोगलांनी दिलेल्या पदव्या वंशपरंपरागत चालत नसत. पण नंतर नंतर बापाची पदवी पोराचे नाव म्हणून ठेवण्याचा प्रघात पडला. तसेच पदव्यांबरोबर जहागिरी किंवा सरंजाम द्यावाच, असे काही नव्हते. बऱ्याच पदव्या या इस्लामपूर्व इराणच्या इतिहासातील लोकोत्तर पुरुषांच्या असत. जसे रुक्नुदौला. अकबराच्या काळात काही हिंदूंनाही ‘खान’ असा किताब बहाल केल्याचा प्रवाद आहे. ‘खान’ यापेक्षाही वेगळ्या आणि वरच्या पदव्या दिल्या जात; त्यात ‘जाह’, ‘मुल्क’, ‘दौला’, ‘जंग’ अशा असंख्य होत्या. पदरी असलेल्या हिंदू राजे वा सरदारांना, नोकरांना बादशहाच नव्हे तर अलीकडच्या काळातील निज़ाम, नवाब पद आणि पदव्या बहाल करीत असत. त्यात प्रतापराव, प्रतापराय, राजाबहादूर, सुलतानजी, राजाधिराज, राजेरायराया, दिनायतराम रायराया, अमानतवंत, राजराजेंद्र, नेमवंतवाले, सेनाखासखेल, सवाई, सवाई जयसिंह, अलिजाबहादूर, दिनायतवंत वगैरे. पण दिल्लीचा बादशहा शहा आलमकडून महादजी शिंद्यांना दिलेल्या पदव्या त्यांच्या आधी आणि त्यांच्यानंतर कुणालाच दिल्या गेल्या नाहीत. पाटिलबोवा किंवा पाटीलबुवा, ‘मुख्तारूल्मुल्क वकीले मुतलक्’ मदतुल्मराफर्जंद आलीजाह, महाराजाधिराज श्रीनाथ माधवराव सिंधीया बहादूर मन्सून जमान’. आजही आपल्या आसपास पूर्वजांच्या अशा पदांची व पदव्यांची बिरुदं मिरवणारे खूप आहेत. जसे कधी काळी ‘खान’ ही पदवी वा पद समाजातील उच्चपदावरील एखादीच भूषवित असे. उत्तरकालीन मुघल काळात रेवड्या वाटाव्यात तशा ‘खान’ या पदव्या बहाल केल्या गेल्या. ज्यांना मिळाल्या त्यांच्या वंशजांना त्या नाकाराव्या किंवा सोडाव्या वाटल्या नाहीत. एखाद्या महान शब्दाची किती अवनती होऊ शकते, याचे हे ऐतिहासिक उदाहरण ठरावे. पण हे लोक तत्कालीन काळातील खानापेक्षाही मोठमोठ्या पदव्या, किताब किंवा पदे होती, ती का लावत नसावेत? जसे : पेशवा, निज़ाम, लखबक्ष, फौझदार (कलेक्टर), अमीर-उल-उमरा, निजामिल्मुल्क, बक्षी, डबीर, कोतवाल (कामदारांचा अकाउंटंट जनरल), गाजीउद्दीन, मीर आदिल, करोड़ी, अमिल, गाझी, मलिक उत्तुजार, रझियातुद्दीन, आसद, मीरजुम्ला, जुम्दतुल्मुल्क, तहव्वुर दस्तगाह, जलादत इंतिबाह, मीरबक्शी, मुजूमदार, शेरेनवीस, मुतहसीब, दिवाण, पेष्कार (मुख्य सचिव), जलालुद्दीन, जहांगीर (जग जिंकणारा), शहाजहान (जगाधिपति), अकबर(श्रेष्ठ), आलीजाह बहादूर अशा असंख्य!

(ता. क. : भारतीय उपखंडात इस्लामला उगीचच हिरवा रंग जोडला गेलाय. इस्लामी राष्ट्रांमध्ये लाल रंग हा बलिदानाचे, काळा रंग लढायांचे, हिरवा रंग कुरणाचे (चराऊ कुरण) आणि पांढरा रंग विजयाचे प्रतीक आहे.)
संदर्भ : मुसलमानी रियासतीचे दोन खंड,
समग्र सेतु माधवराव पगडी, सम्राट अकबराच्या जीवनातील प्रसंग, बाबरची स्मृतिचित्रे
shahupatole@yahoo.com
बातम्या आणखी आहेत...