आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभंगीवर्णिल्या समतेची समग्र अडगळ!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संतांच्या रचनांमधून कर्मकांडांवर जसा रोष व्यक्त होतो, त्याचबरोबर वर्णव्यवस्थेला आणि जातीव्यवस्थेला विरोध केल्याचे आढळत नाही, हे विशेष. मराठीतील संतसाहित्य असे परस्परविरोधी विचारांनी परिप्लुत आहे. संतांबद्दल आदर बाळगून म्हणता येते की, त्यांनी मांडलेले विचार तत्कालीन सामाजिक परिस्थितीत वेगळे आणि योग्य असतीलही; पण वर्तमान काळाशी सुसंगत आहेत, असं वाटत नाही.

मराठी संत साहित्यातील प्रातिनिधिक उदाहरणं घेतली; तर बहुसंख्येने सामाजिक व्यवस्था आणि विचारप्रणाली सुस्पष्ट होते. गावोगावच्या ज्या जातींचा आणि स्त्रियांचा नकारात्मक उल्लेख संत साहित्यामधून आढळतो, त्याच स्त्रिया आणि जाती संतांच्या पाठीराख्या आणि त्यांना भजणाऱ्या आहेत. हा भाबडेपणा म्हणायचा, वैचारिक गोंधळ, की अंधश्रद्धा?

धा र्मिक सरंजामदारी, देव आणि सामान्य मनुष्यांमधील मध्यस्थांचे अवडंबर नाकारून देवाशी थेट संवाद साधण्यासाठी नामसंकीर्तनाइतका सहजसोपा उपाय सांगणारी दक्षिण भारतात उगम पावलेली ‘भक्तिपरंपरा’ महाराष्ट्रात येऊन, रुजून, रुळून, स्थिर होऊन आता जवळपास ८०० वर्षे झाली. वयाने आणि बहुभाषक वाङ‌्मयाने ज्येष्ठ-श्रेष्ठ संत नामदेव ते निळोबा अशी वैष्णव संतांची परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. या परंपरेमुळे स्त्रिया आणि इतर सर्व अब्राह्मणांना संस्कृत भाषा अवगत असण्याची किंवा धार्मिक ग्रंथ वाचण्याची गरज नव्हती. या परंपरेत तत्कालीन समाजातील (त्यांच्याच वर्णातील लोकांमुळे) उपेक्षित ब्राह्मण जसे होते, तसेच सर्व सवर्णातील स्त्रिया, सवर्ण, अवर्ण आणि मुसलमान संतसुद्धा होते. गुरू करावा आणि नामस्मरण करून पुण्य पदरात पाडून घ्यावे, इतकी ही भक्तिपरंपरा सोपी होती. अशा सुलभमार्गी भक्तिपरंपरेतील जनांनाही धर्मलंडांनी छळल्याची उदाहरणे आहेत. त्यातूनही हा संप्रदाय वाढत गेला.

मूळ दक्षिणी परंपरेत गायन असल्याने ती परंपरा इकडेही आली. गाण्यासाठी शब्दांची गरज आणि त्यातून ओव्या आणि अभंग, असा विकास होत गेला. शब्दांची आणि अक्षरांची ओळख असणारे लिहिते झाले. त्यातून कुणाची ओळख संत अशी झाली. लिहिणाऱ्यांच्या आकलनानुसार, जगण्याच्या परिघानुसार, अनुभवानुसार, वाचलेल्या आणि ऐकलेल्या धार्मिक साहित्याच्या आकलनानुसार त्यांच्या लेखनात तत्कालीन समाज, ढोंगबाजी, सामाजिक व्यवस्था यांचे चित्रण होत गेले. महत्त्वाचे म्हणजे, या लेखनातून देवाच्या स्तुतीबरोबर, त्याला केलेल्या आळवणीबरोबरच हिंदू धर्मात कुठेही न आढळणारी समता, मानवता, बंधुभाव, कनवाळूपणा यांचे निदान उल्लेख येऊ लागले. संतांच्या या रचनांमधून कर्मकांडांवर जसा रोष व्यक्त होतो, त्याचबरोबर वर्णव्यवस्थेला आणि जातीव्यवस्थेला विरोध केल्याचे आढळत नाही, हे विशेष. मराठीतील संतसाहित्य असे परस्परविरोधी विचारांनी परिप्लुत आहे. संतांबद्दल आदर बाळगून म्हणता येते की, त्यांनी मांडलेले विचार तत्कालीन सामाजिक परिस्थितीत वेगळे आणि योग्य असतीलही; पण वर्तमानकाळाशी सुसंगत आहेत, असं वाटत नाही. तरीही संत सहित्याच्या ‘गाढ्या अभ्यासकांमध्ये’ संत सहित्याची भलामण करण्याची अहमहमिका लागलेली आहे. संत साहित्यातील कित्येक विचार, मतं, आचार, सोपस्कार आजच्या काळाशी सुसंगत तर नाहीतच. इतकेच नव्हे, तर त्यांचे वहन करणाऱ्या ज्या जाती आहेत त्यांच्या विरोधी आहेत, याची त्यांना जाणीव करून देण्याचे कर्तव्य संत साहित्याच्या अभ्यासकांचे आहे, असे या जाणत्यांना का गरजेचे वाटत नाही? उलट संतांनी भागवत धर्मातील कर्मठपणा सामान्य अनुयायांना सोपा करून सांगितला, म्हणून खेड्यापाड्यातील जातीयता आणि विषमता आजही टिकून आहे, असा निष्कर्ष काढणे वावगे ठरणार नाही. संतांनी सांगितलेला मानवतेचा धर्म हा फक्त अभंगांपुरता मर्यादित असून त्याचे वास्तविक जीवनाशी कसलेही देणेघेणे नसल्याने सामाजिक विषमता आजही टिकून आहे. गेल्या ८०० वर्षांपासूनच्या संतांच्या शिकवणीतून सांगितलेली मानवतेची सूत्रे रुजली असतील तर ती प्रकटपणे दिसत का नाहीत?

पाईकांकडून आणि अभ्यासकांकडून संत साहित्याचा, परंपरांचा अभिमान बाळगावा यांसारखे विचार आणि मार्गदर्शन समाजाला वारंवार केले जाते. बहुतेक संतांनी ‘मांग’ या जातीचा उल्लेख हीन रूपात केलेला आहे, तर अशा विचारांचा अभिमान मांगांनी कशासाठी बाळगावा? कुठल्या तोंडाने? हे असले ओझे त्यांनी डोक्यावर घेऊन का मिरवावे?

मराठी संत साहित्यातील प्रातिनिधिक उदाहरणं घेतली; तर बहुसंख्येने सामाजिक व्यवस्था आणि विचारप्रणाली सुस्पष्ट होते. गावोगावच्या ज्या जातींचा आणि स्त्रियांचा नकारात्मक उल्लेख संत साहित्यामधून आढळतो, त्याच स्त्रिया आणि जाती संतांच्या पाठीराख्या आणि त्यांना भजणाऱ्या आहेत. हा भाबडेपणा म्हणायचा, वैचारिक गोंधळ, की अंधश्रद्धा?

वर्ण श्रेष्ठत्वाबद्दल ज्ञानेश्वर म्हणतात : (अध्याय ९वा)
मग वर्णांमाजि छत्रचामर। स्वर्गजयांचे अग्रहार।
मंत्रविद्येसी माहेर ब्राह्मण जे॥
जे पृथ्वीतळींचे देव। जे तपोवतार सावयव।
सकळी तीर्थांसी दैव। उदयले जे॥
जेथ अखंड वसिजे यागी। जे वेदांची वज्रांगी।
जयाचिमे दिठीचिया उत्संगी। मंगल वाढे॥
किंवा
जयांचा कोप सुभटा। काळाग्नि-रूद्रांचा वसौटा।
जमांचे प्रसादी फुकटा। जोडती सिद्धी॥
ऐसे पुण्यपूज्य जे ब्राह्मण। आणि माझ्या ठायी अतिनिपुण।
आतां मातें पावती हे कवण। समर्थावें॥
आणि
हे ज्ञाननिधीचे भुजंग। हे विषय रानीचे वाद्य।
भजन मार्गीचे मातंग। मारक हे॥
आणि
साध्वी शांती नागविली। माया मांगी श्रिंधारिली।
तिथे करवि विटाळविली। इही साधु वृंदे॥
एकीकडे स्वत:ची जात नाकारणारे संत नामदेव म्हणतात
ब्रह्म ते ब्राह्मण श्रुतिचें वचन। सर्व नाराण सर्वांभूति॥
चहूं शिक्षाजनी गुरु चार्‍ही वर्ण। प्रत्यक्ष पुराणें साक्ष देती॥
ब्राह्मणाचे वीर्य मातंगीचे पोटी। त्याचि एक गोष्टी आशिर्वाद॥
धन्य गोत वित्त स्त्रिया आणि पुत्र। सर्व व्हावे हित ब्राह्मणासें॥
कुळक्षयो व्हावे ऐसे वाटे जीवा। ब्राह्मणासी दावा नको बापा॥
नामा म्हणे ऐसे धन्य ते ब्राह्मण। धरिले चरण माथां त्यांचे॥
संत एकनाथ म्हणतात की, ‘चातुर्वर्णियांनी आपापली कर्मे सोडू नयेत, नाही तर त्यांना अधर्म लागेल.’
स्वत: जातीने महार असलेले संत चोखामेळा म्हणतात -
आम्हां अधिकार उच्छिष्ट सेवन। संतांचे पूजन हेचि बरे॥
शुद्ध चोखामेळा। करी नामाचा सोहळा॥
मी यातीहीन महार। पूर्वी निळाचा अवतार॥
कृष्ण निंदा घडली होती। म्हणोनी महार जन्म प्राप्ती॥
चोखा म्हणे विटाळ। आम्हां पूर्वीचे हे फळ॥
संत तुकाराम म्हणतात-
दुधाळ गाढवी जरी जाली पाहे। पावेल ते काम धेनुसरी॥
कागाचिया गळा पुष्पाचिया माळा। ह्यांचिता काय कळी जाणे॥
मर्कटे अंघोळी लावियेते टिहे। ब्राह्मणाचे टिळे वर्तू नेणे॥
जरी तो ब्राह्मण जाला कर्मभ्रष्ट। तुका म्हणे श्रेष्ठ तिहीं लोकी॥
(अ.क्र.३०५०)
ब्राह्मणे ब्राह्मण सद्गुरू करावा। परि न करावा शूद्रादिक॥
तुका म्हणे देवे सांगितली सोय। म्हणोनि त्याचे पाय धरिले जीवें॥
(जन्माने ब्राह्मण असलेल्या संत बहिणाबाईने तुकारामांना गुरू मानले होते.)

एकूणच समग्र मराठी संत साहित्यात ज्या-ज्या जातींचे उल्लेख येतात; अर्थातच वाईट किंवा अमंगळाची प्रतीके म्हणून, त्यात उल्लेख असणाऱ्या जाती, जातीसमूह आणि कार्मिकसमूह येणेप्रमाणेे : मांग, चांडाळ, महार, चांभार आणि ढोर या जातींचे दाखले वारंवार येतात. इतर जातींचे उल्लेख प्रसंगपरत्वे येतात. त्यात कोळी, पारधी, खाटीक, कसाई, कसाब, डोंब, भिल्ल, नावाडी, तेली, पांगुळ, लोहार, माळी, वारीक, कुणबी, कुणबट, कुळवाडी, ढीवर, म्लेंच्छ, कोल्हाटी, अंत्यज, (महार जातीचे उल्लेख-तराळ, काठीकर, येसकर, पाडेवार, वेसकर), रजक, परीट, किरात, शूद्र, गणिका, कुंटिणी, जारिणी, कैकाडी, भोपी, शिंपी, हाटकर, कोष्टी, सोनार, गुरव, शुचि, जंगम, कंजार, पिंगळा, यवन, फकीर, फिरंगी, धेड, वाणी, भांड, होलार.

आजही संत साहित्याची पाठराखण करणारा आणि त्यास डोक्यावरून वाहून नेणारा समाज तोच आहे; ज्यांची वर्णनं संतसाहित्यात त्यास अनुकूल नाहीत. तो ज्याच्या भजनी लागलाय; त्याला त्याचे परीक्षण सोडा; निदान आकलन करण्याची जाणीव आजवर कुणी करून दिलेली नाही. कालबाह्य परंपरांचे आणि विचारांचे जू उतरून ठेवण्याबद्दल त्यांना सांगण्याची हीच वेळ आहे. लोकशाही आपण स्वीकारून अर्धशतक उलटून गेलंय. पण वैचारिक, धार्मिक गुलामगिरीतून मानसिक पातळीवर अडकून पडलेल्यांना वास्तवाची जाणीव करून देण्याच्या महत्त्वाच्या कामाची सुरुवात व्हायला हवी. शिस्त लष्कराला आवश्यक असते; सामान्य नागरिकांना नव्हे!
shahupatole@yahoo.com
बातम्या आणखी आहेत...