लैंगिकतेकडे, परस्परसंबंधांकडे आपले निर्माते कोणत्या दृष्टिकोनातून बघत होते, हा जिज्ञासेचा विषय खरा; पण जिज्ञासा टाळून त्यांच्या कामजीवनावर पांघरूण घालण्याचा दुटप्पीपणा कशासाठी?
‘पशुपतीच्या यज्ञाच्या वेळी उपस्थित स्त्रियांच्या दर्शनाने ब्रह्मदेवाचे (दुसऱ्यांदा) वीर्यस्खलन झाले. त्याच्या त्या वीर्याची अग्नीमध्ये पळीने तुपाप्रमाणे आहुती दिली आणि त्यापासून प्राणिमात्र जन्मले.’ ही पृथ्वीतलावरील मनुष्यप्राण्यासह सर्व प्राण्यांची व्युत्पत्ती ग्राह्य धरली, तर काय निष्कर्ष निघतील? देवांचा धर्म हा मनुष्यधर्माहून वेगळा असतो, या म्हणण्यास पुष्टी मिळते. हल्ली एकीकडे धर्म आणि देवांप्रती तीव्र आदर बाळगायचा आणि दुसरीकडे त्यांच्या कामजीवनावर सोयीस्कर पांघरूण घालायचे, हा दुटप्पीपणा कशासाठी? सदर लेखातील वेच्यांमधील वर्णने वाचताना वाचकांनी मागील सुमारे हजार-बाराशे वर्षांच्या कालखंडाच्या ‘अवकाशाला पीळ घालावा’. लैंगिकतेकडे आपले निर्माते कोणत्या दृष्टिकोनातून बघत होते, त्यांचे लैंगिक जीवन, अर्थातच सामाजिक जीवन आणि परस्पर संबंध कसे होते, याचा आपापल्या मगदुराप्रमाणे अंदाज बांधता येतो.
ही सामाजिक प्रगल्भता विकास पावण्याऐवजी संकुचित कधीपासून होत गेली आणि का हाेत गेली? याचे अंदाज बांधता येऊ शकतात. ज्या कालखंडापासून मंदिरांच्या स्थापत्यातून मिथुनशिल्पांचा वापर लोप पावत गेला आणि पताका खांद्यावर घेणाऱ्यांची संख्या उत्तरोत्तर वाढत गेली, तेव्हापासून.
धार्मिक ग्रंथांमधून, पुराणकथांमधून वर्णिलेले कामजीवनविषयक तपशील लैंगिक संबंधांवर, धारणांवर प्रकाश टाकणारे आहेत. स्त्रियांमध्ये अप्सरा, नागकन्या, असूरकन्या, देवस्त्रिया, वानरस्त्रिया, यक्षिणी, गंधर्वी असे प्रमुख भेद आहेत. त्यातील अप्सरांचे योजन देवाधिदेव इंद्रदेवाने आपले पद कायम राखण्यासाठी, पदासाठी पुढे चालून धोका ठरू शकतील अशा तपस्व्यांना विचलित करण्यासाठी, यज्ञात व तपश्चर्येत विघ्न निर्माण करण्यासाठी केल्याचे आढळते. त्या जेव्हा कधी कुठल्या मानवाला बघून स्खलित होत, तेव्हा त्यांना मानवी भोग भोगावे लागत. त्या मर्त्य मानवापासून संतती जन्माला घालत. तशाच त्या निर्विकारपणे स्वर्गगृही निघून जात. अप्सरा आपल्या अटींवर एकरूप होत आणि अटींचे उल्लंघन झाल्यावर (निष्ठूरपणे) मार्गस्थ होत. रावण रंभेवर बळजोरी करताना, ती विरोध करताच, रावण तिला आठवण करून देतो की, ‘मानवाचे आणि देवांचे धर्म एक नाहीत, तू अप्सरा आहेस हे विसरू नकोस.’ त्या काळी सत्तालालसा, युद्धलालसा आणि कामलालसा या महत्त्वाच्या मानल्या जात. या तिन्हींमध्ये स्त्रियांची महत्त्वाची भूमिका आढळते. त्यात त्यामुळे शोषित स्त्रिया कमी आढळतात. उलट आवडणाऱ्या पुरुषाकडे समागमाची मागणी करणाऱ्या कित्येक जणी आहेत. प्रसंगी एखाद्या पुरुषाने नकार दिल्यास त्याला षंढत्वाचा शाप दिल्याची उदाहरणे आहेत. कामवासना हा अत्यंत प्रबळ असा शरीरधर्म मानणारा हा काळ आहे. आवडत्या पुरुषासोबत समागमास्तव जाण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या जशा स्त्रिया होत्या, तसेच एखाद्याला ‘तू मला आवडत नाहीस’ असे स्पष्टपणे सांगणाऱ्याही. अप्सरांनी तपोभंग करण्यासाठी कोणत्या प्रकारची वस्त्रे परिधान करावीत, कोणती आभूषणे ल्यावीत, आणि कोणते हावभाव व कटाक्ष टाकावेत, हे वरिष्ठांच्या आदेशावरून करणाऱ्या स्त्रिया होत्या. आणि त्याच्या परिणामांची शिक्षा पण भोगणाऱ्या त्याच होत्या. जशा वंद्य पतिव्रता आणि पित्याच्या आज्ञेबाहेर न जाणाऱ्या होत्या, तसेच अपहृत स्त्रिया कमी असल्या तरी धीटपणे विवाहाची आणि वैषयिक मागणी करणाऱ्यासुद्धा होत्या. पतीसह राहात असताना संधी मिळाल्यास परपुरुषापासून सुख भोगून त्याची शिक्षा भोगणाऱ्या होत्या. काही देवांनी, राजांनी जेव्हा स्त्रीरूपात अपत्यांना जन्म दिला, तसेच सुखोपभोग घेतला, तेव्हा ‘स्त्रीरूपात असतानाच रतीसुखाचा परमोच्च अनुभव घेतला’, असे ते म्हणतात. ‘स्त्रीला एका पुरुषापेक्षा अधिकांशी संबंध मनापासून हवा असतो’, असे मानणाऱ्याही काही होत्या. तशाच काही सज्जन व्यक्ती ‘स्वेच्छेने कामाधीन झालेल्या स्त्रीची विनंती अव्हेरत नाहीत’, याची आठवण करून देतात.
परस्त्रीगमन धर्मघातक असल्याचे सुचविताना, ‘स्त्रियांना पुरुषसंसर्गाहून श्रेष्ठ असं दुसरं काही असतच नाही, हेच श्रेष्ठ फल असून कामप्रेरित स्त्री नेहमी आपल्या इच्छेप्रमाणे वागत असते’, असंही म्हटलंय. विवाह न करता आणि शारीरिक संबंध न ठेवता आई होऊ इच्छिणारी ‘सोमदा’ जशी इथे भेटते, तसेच स्त्री आणि पुरुष स्वेच्छेने जवळ येत असतील तर त्यांच्या एकांतातील एकत्र येण्यास मंत्राची आवश्यकता नसते, असे मत इथे आढळते. तर विवाहाच्या आठ प्रकारांपैकी क्षत्रियांसाठी स्वयंवर आणि अपहरण हे समाजमान्य होते. एखाद्या स्त्रीला मागणी घालून ‘शुल्क’ देण्याचे उदाहरण आहे. तसेच रतीसुखात अतिरिक्त मधुपान केल्याने स्त्रीसुलभ लज्जेचा अभाव असणाऱ्या भार्या इथे भेटतात. आहार, निद्रा, मैथुनादी शरीरधर्म आणि कामाचे सामर्थ्य स्पष्टपणे दुसऱ्या पुरुषास पतीसमक्ष सांगणारी ‘तारा’ इथे भेटते. सवतीमत्सर असला तरी सवतीला तिचे नवऱ्याकडूनचे अधिकार देणाऱ्याही भेटतात. अगोदर स्त्री असलेली व नंतर पुरुष झालेली शिखंडीणी इथे भेटते. सर्वमान्य अशा नियोगाद्वारे संतती प्राप्त करून घेणाऱ्या स्त्रिया इथे भेटतात, तशाच विवाहपूर्व ‘कानीन’ संतती जन्माला घालणाऱ्याही भेटतात. अप्सरा असलेल्या स्त्रियांना अनेकांपासून अनेक संतती झाल्या. त्यांना सेाडून जाताना त्या कधी व्यथित वा भावनोत्कट झाल्याचे आढळत नाही. त्याच काळात भोग घेऊ इच्छिणाऱ्या दासी (भुजिष्या) होत्या, तशाच तेव्हाही वेश्या होत्या. आणि व्यभिचारिणीसुद्धा (बंधकी). मात्र इथे भेटणाऱ्या स्त्रियांमध्ये अस्वस्थ करून जाते ‘माधवी’.
इथे जे सर्व लोकांमधील पुरुष भेटतात, ते बहुतेक शीघ्रस्खलनशील. स्त्रियांचा उपभोग घेण्यासाठी सदैव आसुसलेले. देव (हे ब्राह्मण नसल्याने?) ब्राह्मणाचा वेष धारण करून स्त्रियांचा जसा उपभोग घेतात, तसेच ते हाच वेष परिधान करून कोणाकडून काही हिसकावून पण घेतात. कधी प्रलोभने दाखवून ‘काम’ साधतात. स्वत: ब्राह्मण असून रावणाला ब्राह्मणाचा वेष धारण करण्याचा मोह टाळता आला नाही. इंद्राची कामलालसा बऱ्याचदा बलात्काराच्या सीमारेषेवर जाते. वायू, अग्नी, वरुण हेही यात माहीर होते. स्त्रीचा भोग घेऊन कोणी तपस्वी तिचे कौमार्य अबाधित ठेवत म्हणे! तर कुणी केवळ मानस संकल्पाने समागम करीत असत. कुणी आपल्या पत्नीच्या विरहाचे दु:ख, कामपीडा भावाजवळ व्यक्त करीत. इथे गुरुदक्षिणा देण्यासाठी स्वत:च्या पत्नीला गहाण ठेवणारा पुरुष भेटतो. वंशवृद्धीसाठी पत्नीस पुत्रप्राप्ती व्हावी, म्हणून नियोग करविणारे होते. कुणी पत्नीचे पातिव्रत्य भंग झाले म्हणून तिला शाप आणि शिक्षा देणारेही होते. तर कुणी दुसऱ्याच्या स्त्रीच्या पातिव्रत्याची परीक्षा घेणारे. अातिथ्यासाठी स्वपत्नी देणारे. कन्या, भावजय, बहीण यांसारख्या जवळच्या नात्यांतील स्त्रियांबद्दल अभिलाषा बाळगणारे. सुखोपभोगासाठी स्वत:च्या मुलाचे तारुण्य उसने घेणारे आणि पुत्रांसमोर आपल्या कामाचे वर्णन करणारेही. स्त्रियांकडून वैषयिक मागण्या धुडकावल्यावर दग्ध होऊन शाप देणारे, तर कुणी गुरुपत्नीशी संग करणारे. तसेच स्त्रिया भोगून परत केल्यावर त्यांचा नि:शंकपणे स्वीकार करणारेही भेटतात.
स्त्रिया पाहून सार्वजनिक ठिकाणी, यज्ञ चालू असताना वीर्यस्खलन होणारे तपाचार्य तर कित्येक आढळतील. ज्यांचे वीर्य जलचर, भूचर, चतुष्पाद, आणि सरपटणारे प्राणी धारण करतात, अशा धारक प्राण्यांपासून होणारी संतती मात्र अत्यंत बुद्धिवान आणि मनुष्यप्राण्यांसारखीच निपजते. गर्भाबाहेर जन्म घेणाऱ्या किंवा अनेक उदरी अवयव निर्माण करून नंतर तयार झालेल्या संतती आढळतात. तसेच अतीव समागमामुळे ‘राजयक्ष्मा’ होऊन अकाली निधन पावणारे विचित्रवीर्य आणि व्युषिताश्वानसुद्धा भेटतात. शेवटी कोणत्याही लोकांतील, श्रेणीतील पुरुष असो, काही अपवाद सोडल्यास तो पुरुषासारखाच वागतो.
पण दैत्य, दानव तेव्हा देवांसारखे वागत नव्हते, हे विशेष. देवांचे बघून ते त्यांचे अनुकरण करायला लागले होते, म्हणून लक्ष्मी दानवांचा पक्ष सोडून देवांच्या पक्षाला सामील झाली होती. लक्ष्मी दैत्य पक्षाचा स्वीकार करण्याची आणि त्याग करण्याची कारणे सांगताना म्हणते, ‘दानव कधीही परस्त्रीशी समागम करत नसत, ते आपणहून वीर्यपतन करत नसत, त्याचप्रमाणे ते पशूंच्या ठायी वीर्यपात करीत नसत. कालांतराने त्यांचे हे सर्व चांगले गुण नष्ट झाले आणि ते कोणताही विधिनिषेध न बाळगता स्वैर वागू लागले.’
कर्म आणि काम ना देवाला सुटले ना मानवाला. देवांकडून, त्या काळच्या माणसांकडून जे घडले असेल, ती तेव्हाची रीत असेल. अशा रीतीने ज्यास आपण आज वाईट म्हणतो असे अंश टिकून राहावेत, हे विशेष. जर दानवांनी देवांचे अनुकरण केले नसते तर..... !
(shahupatole@yahoo.com)
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)