आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुतांची जात, वर्ण, धर्म, वगैरे...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनुष्यप्राण्याच्या सामाजिक कळपांनी आपल्याभोवती धर्मांच्या कुप्या करून घेतल्या. त्यानुसार त्यांची स्वत:ची विश्वं निर्माण झाली. त्यांचा ईश्वर, सुष्ट-दुष्ट शक्ती, आत्मे-परमात्मे, पाप-पुण्य यांच्या त्यांच्यापुरत्या चकाऱ्या निर्माण झाल्या. मग त्यांच्या विश्वात जे काही अनुकूल होतं, त्यातूनच प्रतिकूलसुद्धा निर्माण झालं. निर्मिकाला छेद देणाऱ्या शक्ती सातत्याने जवळपास वावरत असल्याने आभासी जग लोकमान्य झाले. त्यात शेवटचा स्तर म्हणजे, भुतं आणि पिशाच्च. भुतांची निर्मिती त्याच कुपीतली असल्याने त्या त्या समाजातील भुतं जरी मानवी सामाजिक नियमांना छेद देणारी वाटत असली, तरी ती जिवंत असलेल्यांच्या अंतर्मनातील असल्याने, त्यांचे वर्गीकरण जिवंत माणसांनी आपल्या सोयीप्रमाणे केल्याचे आढळते. मराठी मुलखासही हाच नियम लागू पडतो. कोकणात जितकं भूतवैभव आहे, तितकं ते घाटावर नाही. गाव लहान असो की मोठा, जो माणूस ज्या वर्णात जन्मतो, मरतो, तो जाळला किंवा पुरला जातो, तो त्याच्या समाजाच्या मसणवाट्यातच. त्याचप्रमाणे मरणाऱ्या माणसाचा आत्मा काही कारणाने पृथ्वीतलावरून मुक्त झाला नाही, तर त्याची वर्तणूक जिवंत माणसांना त्रास देणारी असली, तरी ती त्याच्या सामाजिक पायरीनिहाय असते.

म्हसोबा, वेताळ हे भुतांचे नियंत्रक देव असल्याने, त्यांना भूतयोनीत गृहीत धरता येत नाही. पण कुणाचे अतृप्त आत्मे कोणत्या भूतप्रकारात मोडतात, याचे विश्लेषण बघायला हवे. भुतांमध्येसुद्धा काही कल्याणकारी असतात, तर काही सातत्याने उपद्रवमूल्य बाळगणारी असतात, तर काही इच्छापूर्तीनंतर स्वर्गस्थ होणारी असतात. या भुतांच्या निवासाच्या जागा, या त्यांच्या जातींप्रमाणे तिकाटण्यावर (जिथे तीन रस्ते एकत्र येतात) आपापली स्मशाने, पडक्या विहिरी, पडके वाडे, पडकी घरे, जुने वृक्ष, देवराया, बुरूज, जंगलं, पाणवठे, धरणाच्या भिंती, गावांच्या वेशी, शिवा, घाटावर राणगा, हाडळ, चिंद, गिऱ्हा, क्वचित झोटिंग आणि नेहमीची गावाच्या आसपासची लोकल भुतं सोडली, तर जास्त भूतवैभव नाही. पण कोकणात मात्र भुतांचे अनेक प्रकार आढळतात. त्यात शूद्रातील आत्म्यांची भुते म्हणजे देवाचार, चेटक, छेडा, तलखांब, लग्न झाल्यानंतर अल्पावधीत जो शूद्र मरतो, तो ‘देवाचार’ होतो. देवाचार भूत गावकुसाबाहेर चारीदिशेला राहतं. अविवाहित महाराचे भूत म्हणजे, छेडा. छेडा मुख्यत्वे वेशीवर राहात असे. शूद्रांची अर्थात महारा-मातंगांची भुतं वर्षातून एकदा नारळ, केळी, साखर, कोंबड्यांचा किंवा बोकडाचा बळी दिल्यावर त्रास देत नसत. कधी कधी ही भुतं होळीवर, डोंगरात किंवा जंगलात वावरत असत.

कुणब्याचं एखाद-दुसरं भूत असेल, तर ते ‘दाव’ म्हणून ओळखत. खविस हे भूत दोन-तीन प्रकारचे आहे. खविस जसे महारा-मातंगांचे असते, तसेच ते अॅबिसियन लोकांचेपण असे. हबशी किंवा सिद्दी जे कोकणात स्थायिक झाले, त्यांची भुतं पण चौदाव्या-पंधराव्या शतकापासून कोकणात दिसायला लागली. ‘स्वाहिली’मध्ये कृष्णवर्णीयांच्या भुतांना काय म्हणतात, हे माहीत नसल्याने त्यांचे नामकरण ‘खविस’ असे केले असावे. तेच झोटिंग या भुताचे झाले असावे. खारवी किंवा कोळ्यांच्या भुतांना झोटिंग म्हणतात. नंतर या श्रेणीत मुसलमानांच्या भुतांची भर पडली. झोटिंगांमधील मुसलमानांचे आणि खविसातील हबश्यांचे अर्थात, अहिंदू भुतांची बाधा दूर करणे, हे हिंदू देवऋषांच्या अावाक्यात नसते, अशी धारणा आहे. अविवाहित शूद्र पुरुष मेल्यावर, त्याचा ‘तलखांब’ व्हायचा म्हणे.

गिऱ्हा हे भूत कोकणाप्रमाणे घाटावरही नाव कमावून आहे. ते पाणवठ्यावर राहात असे आणि माणसाला पाण्यात ओढून नेत असे. त्याची नाना प्रकारची चेष्टा करीत असे. ‘काय गिऱ्हा लागलाय मागे?’ हा वाक्प्रचार या गिऱ्हामुळेच रूढ झाला असावा. ‘वीर’ श्रेणीतील भुते, ही अविवाहित क्षत्रियांची असत. कधी ती अ-मराठी किंवा परप्रांतीय क्षत्रियांची असत. समंध ही दोन प्रकारची भुते असतात. पहिल्या प्रकारातील समंध हा संतती न झाल्यामुळे, आणि उत्तरक्रिया न केल्यामुळे होतो. त्याच्या नात्यातल्यांनीच त्याची इच्छा पूर्ण केल्यावर तो शांत होतो आणि आप्तांना मदतसुद्धा करतो. दुसऱ्या प्रकारातील समंध हा जिवंतपणी लोभी आणि इच्छापूर्ती न झालेला संन्यासी असतो. समंध झाल्यावर, तो पैसेवाल्यांना संपत्तीचा उपभोग घेऊ देत नाही. कालकायकांची भुतं ही भैरवाच्या अंकित असल्याने, ती जास्त त्रास देत नाहीत. त्यांना तृप्त केल्यावर ती प्रसन्न होतात. त्यांची कृपा लाभलेला माणूस १२ वर्षे आनंदी व आरोग्यदायी जीवन जगतो. त्यानंतर त्याचा नाश होतो. याशिवाय हिरवा, वाघोबा, आसरा, गानगूड, सैतान, चैतनद्य, पीस अशीही काही भुते आहेत. त्यांना भांग, दारू, बाजरीची भाकरी, भात, नारळ, लसणाची चटणी, तेल, फुलं, लाह्या वगैरे देऊन संतुष्ट ठेवता येते.

मुंज झाल्यानंतर सोडमुंज होण्याअगोदर एखादा मुलगा मरण पावल्यावर तो मुंज्या होतो. त्याचा आत्मा पिंपळावर किंवा विहिरीत वास करतो. उपनयन संस्कार त्रैवर्णिकात होत असल्याने ब्राह्मणेतर दोन वर्णांमधील मुंजे असतील काय? वेदविद्यासंपन्न, पण ज्ञानाचा गर्व असलेल्या ब्राह्मणाचा आत्मा भूत होतो. अशा भुतांस ‘ब्रह्मग्रह’ म्हणतात. तर ब्रह्मराक्षस हे पिंपळावर राहणारे सर्व भुतांमध्ये शक्तिशाली भूत असते. याच्या कचाट्यात कुणी सापडला, तर तो सुटणे अशक्य असते. तर वेदपारंगत ब्राह्मणाच्या भुताला ‘महापुरुष भूत’ म्हणतात. ब्राह्मणांचा द्वेष करणारे, त्यांच्या कर्तव्यास हीन लेखणारे, त्यांची चेष्टा करणारे ‘ब्रह्मसमंध’ या भूतयोनीत जातात. मुंजे, समंध हे प्रामुख्याने पिंपळ, वड, उंबर अशा झाडांवर वास करतात. अशी झाडे उपलब्ध नसतील तर गोड, सुगंध देणाऱ्या झाडांवर वास करतात.
स्त्रियांच्या भुतांची वर्गवारी वयनिहाय आहे. जसे अविवाहिता ‘शाखिणी’ होते. विधवा ‘लावसट’ वा ‘अवगत’ होते. आणि या आवळा किंवा नागचाफ्यावर वास करतात. सवाष्ण मेल्यावर ‘जखीण’ होते. बाळंत होताना मृत्यू आल्यास ‘अलवंत’. बाळंत होऊन दहा दिवसांच्या आत मृत्यू आल्यास ‘हडळ’. तिला हेडळी, डाकण, सटवी असेही म्हणत. स्त्री भुते वेतांचे फटके मारल्यावर लगेच वठणीवर येतात. स्त्री भुतं प्रामुख्याने दागिन्याने मढलेल्या, फुलांनी नटलेल्या, फुले माळलेल्या, बाहेर बसलेल्या, तरुण माता आणि त्यांच्या मुलांना झपाटतात. घाटावर चिंद हे भूत महिलेच्या पोटी जन्म घेऊन तिच्या वाट्याचे अन्न खाते, असे म्हणतात. तर मनघाल्या (चकवा) हा अनेक गावांच्या शिवांवर राहतो, आणि रात्रीच्या वेळी वाटसरूंना एका ठिकाणी फिरवतो. विशेष म्हणजे, ‘झोड’ नामक पण एक भूत असते!

बिनलग्नाचे कुणी मृत्यू पावले, तर त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळत नाही. म्हणून हिंदू धर्मियांमध्ये लवकर लग्न करण्याची प्रथा असावी. या मान्यतेप्रमाणे जिवंतपणी ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत, अशांचे आत्म्ये त्यांच्याच लोकांच्या आसपास घुटमळत राहतात. असे आत्मे आपल्या जिवंतपणी आपल्या इच्छा का बरे मारत असावेत? बरं, त्यांच्या इच्छा कोणत्या? तर दारू, गांजा, भांग, अफू, विडी, अंडी, कोंबडी, भजे, भात, नारळ, केळी, बोकड यांसारख्या किरकोळ. बरं जिवंतपणी त्यांनी ज्यांची काळजी घेतली त्यांना ते मेल्यावर का बरं त्रास देत असावेत? जसा एखादा सभ्य माणूस दारू प्याल्यावर बरळतो, तसेच.

भुतांबद्दलच्या संकल्पना काळानुरूप बदलत गेल्या असल्या तरी जनमानसांतील त्यांच्याबद्दलच्या भीतीत कसलाही फरक पडलेला नाही. ज्या काळचा माणूस तशीच भुतेही वागतात. इच्छातृप्तीसाठी आपल्या जवळच्यास वेठीस धरतात. मग माणसांमध्ये आणि भुतांमध्ये फरक दृश्य-अदृश्याइतकाच ना!

शंभर वर्षांपूर्वीचं एक निरीक्षण यापुढे सर्वच भुतांना पळवून लावण्यासाठी जालिम उपाय ठरू शकेल. ‘भुतांना स्वच्छतेची भीती वाटते. त्यामुळे जिथे स्वच्छता असते तिथे साधारणपणे भुतांची भीती कमी असते.’ हे झाले अदृश्य भुतांबद्दलचे. पण ‘मानसोपचारिक’ भुतांना कोणता नरक्या उद जाळायचा?

शाहू पाटोळे
shahupatole@yahoo.com
(संदर्भ - Folklore of Konkan by A M T Jackson या १९७५ मधील पुस्तकाचा डॉ. आसावरी उदय बापट यांनी केलेला अनुवाद. प्रकाशक : अरुण जाखडे, पद्मगंधा प्रकाशन, पुणे)