आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पाटीलकीत' असे आहे तरी काय ?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘आडनाव’ ही मराठी माणसाची एवंविशिष्ट ओळख आहे. त्यातील काही आडनावे सर्व जाती-वर्णात आढळतात. तर काही आडनावे ही कामांवरून, पदांवरून बेतलेली आहेत. तत्कालीन सामाजिक, राजकीय व्यवस्थांनी आपापल्या सोयींसाठी काही शाश्वत पदं निर्माण केली होती, तर काही पदं ही तात्पुरती (सरकारी) होती. बऱ्याचशा कुटुंबांनी आपली मूळ आडनावे टाकून पदाधारित आडनावे धारण केली. कालौघात पदं नामशेष झाली, वतनं बरखास्त झाली; पण त्या आडनावांआडून स्वत:च्या वर्णाचा, जातीचा, सामाजिक स्तराचा वृथाभिमान, गंड कुरवाळण्याची आणि इतिहासजमा झालेला अहंकार बाळगण्याची अहमहमिका वाढत गेली. त्याचं उदाहरण म्हणजे, ‘पाटील’ हे आडनाव धारण करणे.

मराठी लोकांमध्ये पदं आणि कार्यनिहाय काही आडनावे आजही जिवंत आहेत. त्यातील काही येणेप्रमाणे : पाटील (आद्य संबोधन- ग्रामणी, ग्रामप, ग्रामगोपक, पुढारी, मोकदम, मुकादम, मोकदम-पाटील), चौगुला (चौगुले), कुलकर्णी (आद्य संबोधन- ग्रामलेखी, गावकुलकर्णी, पटवारी), देशमुख, देसाई, सरदेशमुख, सरदेसाई, देसाई-देशमुख, पांडे, देशपांडे, सरदेशपांडे, चौधरी, घाटपांडे, पत्की, डांगी (डांगे), मोडवी, मेटकरी (मिटकरी), इटेकरी, गुजर, थळकरी, उपरी (उपरे), हेजीब, हरकारे, जमेनीस, खोत, शेटे, महाजन, मिरासदार, बिडवई, पानसरे, सावकार, खिस्ती, टांकसाळे, सराफ, पारखे, पारखी, पोतदार, संगवई, रत्नपारखी, नाईकवाडी, नायकवाडी, कोतवाल, राऊत, पाईक, पाईकराव, नाईक, नायक, सरनाईक, सरनोबत, तोपखाने, गडकरी, किल्लेदार, गोलंदाज, बारगीर, दारूवाले, फडणीस, फडणवीस, सबनीस, हसबनीस, चिटणीस, वाकनीस, पागनीस, कर्णिक, डबीर, प्रतिनिधी, दुभाषी, वकील, न्यायाधीय, देशाधिकारी (यातील देशा गळून पडला असावा), जमादार, हवालदार, मुतालिक, मुजुमदार, सरदार, इनामदार, जहागीरदार, मोकासे (मोकासा, मोकाशी), प्रधान, अमात्य, पेशवे, राजे, वैद्य, जोशी, उपाध्ये, ग्रामोपाध्ये, राजोपाध्ये, पुरोहित, राजपुरोहित, संगवई वगैरे वगैरे. हे इतके पर्याय आजही उपलब्ध असताना, गेल्या काही वर्षांपासून एवंविशिष्ट अशा जातीचे लोक सरसकट ‘पाटील’ हे पदाभिधान आपल्या मूळ आडनावाला जोडताहेत. त्यामधून ते समाजातील इतर घटकांना काय दर्शवू इच्छिताहेत? त्यांच्यासाठी ‘पाटील’ या बिरुदापेक्षा आणखी वरच्या पातळीवरचा ‘देशमुख’ हा पर्याय उपलब्ध असताना!

ज्ञात पुराव्यांनुसार, सम्राट अशोकाच्या काळात पाटीलकीचे संदर्भ सापडतात. तत्कालीन समाजात शेती हा व्यवसाय रूढ झालेला होता. शेतीयोग्य जमिनीच्या नोंदी ठेवल्या जात असत. नवीन जमीन वहितीखाली आणली जात असे. अशा जमिनींच्या आणि कसणाऱ्यांच्या नोंदी कापसापासून विणलेल्या कापडाच्या पट्टीवर केल्या जात. कापडाची ही गुंडाळी एका गोल नळीत सुरक्षित ठेवली जायची. त्या एकूण प्रावरण-आवरणास ‘पट्टकीलक’ असे संबोधले जाई. ती गुंडाळी त्या गावातील ज्याच्याकडे ठेवली जात असे; तो ‘पट्टकील’ समजला जात असे. त्या पट्टकीलचे यथावकाश पाटैलू, पाटेल, पाटील असे होत गेले. त्यातही पाटलांच्या पाटलांचे शिरस्क पट्टकीलचे सरपाटील आणि सिरस्क देशमुखांचे सरदेशमुख झाले. काळानुरूप पाटलांच्या अधिकारांमध्ये, जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होत गेली. पाटील हा त्या त्या गावाचा ‘राजा’ असे. गावाचे संरक्षण करणे, न्यायनिवाडा, नव्या जमिनी वहितीत आणणे, नवीन वस्ती निर्माण करणे, गावाची व्यवस्था लावणे, कर व सारा गोळा करून जे सरकार असेल तिकडे भरणा करणे, यांसारखी महत्त्वाची कामे त्याला पार पाडावी लागत. ग्रामव्यवस्थेत पाटील हे पद सर्वोच्च होते. त्याचे वतनदार सहकारी म्हणजे कुलकर्णी, चौगुला आणि महार ही शाश्वत पदं होती. काही प्रसंगी पाटलांस युद्धावरसुद्धा जावे लागत असे.

पाटीलकी ही काही एवंविशिष्ट जातीपुरती मर्यादित नव्हती. पाटील हे पदाभिधान प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण या प्रांती आढळते. त्यातही एवंविशिष्ट जातीचं प्राबल्य असलं, तरी जैन, लिंगायत, ब्राह्मण, पूर्वाश्रमीचे महार, आगरी, सोमवंशी क्षत्रिय, मुसलमान यांच्याकडेही पाटीलक्या होत्या. शिवाय, उत्तर महाराष्ट्रात पाटीदार समाजात पाटीलक्या होत्या. मुघलांसोबत आलेल्या राजस्थानी लोकांकडेही पाटीलक्या होत्या. बरं जे वतनदार मूळ पाटील होते, ते आजही फक्त शुद्ध ‘पाटील’ हेच उपनाम धारण करतात. काही मुसलमान पाटलांनी नंतर ‘पटेल’ म्हणवून घेतल्याचे दिसते. शिवाय, काही गावांची पाटीलकी देशमुखांकडे असायची, तेसुद्धा पाटील हे त्यांच्यापेक्षा कनिष्ठ असलेले पदाभिधान लावायला लाजत नाहीत.

विशेष म्हणजे, एका गावाला एकच पाटील असायचा. समजा गाव मोठा असेल, तर आणखी एक मुकादम पाटील नेमला जायचा. वंशपरंपरेने पाटीलकी थोरल्या मुलाकडे जायची. पाटीलकीची लेखी वतनपत्रं दिली जात. पाटीलकी विकत घेता येत असे, तसेच विकता येत असे. आदरणीय शिवाजी महाराजांनी पाटीलकीचा गैरवापर करणाऱ्यांच्या वतनदाऱ्या जप्त केल्या होत्या. सुधारले नाहीत, त्यांना शिक्षा ठोठावल्या होत्या. काही गावांचे पाटील गावातील घराघरांतील माणूस उपाशी राहणार नाही, याची काळजी घेत असत. मराठी-फार्सी इतिहासाच्या साधनांमध्ये महादजी शिंद्यांना आदराने ‘पाटीलबोवा, पाटील बुवा, माधवराव बहादूर शिंदे उर्फ पटेल’ संबोधल्याचे आढळते.

महाराष्ट्रावर शताकानुशतके कितीतरी परचक्र, राज्यव्यवस्था आल्या-गेल्या; पण कोणत्याही शासकाने ग्रामव्यवस्थेला तोडण्याचा प्रयत्न केला नाही. ब्रिटिशांचा संपूर्ण देशावर एकछत्री अंमल आल्यावर त्यांनीसुद्धा प्रशासकीय सुधारणा एकदम न राबविता, गावांच्या कलाने निर्णय घेतल्याचे दिसते. त्यांनी सर्वांसाठी समान कायदे आणताना पारंपरिक वतनदारांचे प्रशासकीय आणि कायदेशीर अधिकार काढून घेतले, काहींचे कमी केले. पण त्या पदांच्या सामाजिक बडेजावाला हात लावला नाही. त्यामुळे कालौघात ही वतनाची पदं राहिली नामधारी, त्यातून मात्र ती मिरवणाऱ्यांचा (पोकळ) बडेजाव तेवढाच शिल्लक राहिला. गढ्यांच्या बुरुजांची पांढरी माती भेंडे पाडण्याच्या आणि सारवण्याच्या कामासाठी विकली जाऊ लागली. त्यात (अपवादात्मक) कुप्रसिद्धी पावलेल्या पाटलांच्या प्रतिमा मराठी साहित्यात, नाटका-सिनेमात आणखी काळ्याकुट्ट आणि नकारात्मक रंगविल्या. (“बाई वाड्यावर या” हा डायलॉग अजूनही कुणाला सुखावतो, तर कुणाच्या अंगावर काटा आणतो.) स्वातंत्र्योत्तर काळातील राजकारणातील पहिल्या दोन-तीन पिढ्या याच वर्गातील वाड्यांवरून आल्या. कारण हाच वर्ग, शतकानुशतके ग्रामीण समाजाचं भलं-बुरं पुढारपण करीत होता. मूळ वतनदारांशिवाय इतर सामाजिक वर्गातही शिक्षणाचं वारं शिरलं. त्याच एवंविशिष्ट जातींमधील इतरांना आपले पूर्वज जे नव्हते, ते दाखविण्याचा सोस होताच. तो बदलत्या अर्थकारणाने पूर्ण करण्याची संधी मिळाली. पण त्यामागची भूमिका ही सर्वसमावेशक नसून, ती जातीचा आणि आपल्या वर्गाचा अहंगंड कुरवाळणारी आहे. जी भूमिका आजच्या परिप्रेक्ष्यात सकळ समाजासाठी सकारात्मक आणि अनुकरणीय निश्चितच नाही.

संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात :
आता काय खावें कोणीकडे जावे।
गावांत रहावे कोण्या बळे॥
कोपला पाटील ये गावींच्या लोकां।
आतां मज भिक कोण घाली॥
आतां येणे चवी सांडिली म्हणती।
निवाडा करिती दिवाणांत॥
भल्या लोकियांसी सांगितली मात।
केला घात माझा दुर्बळाचा॥
तुका म्हणे, यांचा संग नव्हे भला।
शोधीत विठ्ठला जाऊ आतां॥

शाहू पाटोळे
shahupatole@yahoo.com