आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जल आले, जीव गेले !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपत्तीचं रूपांतर इष्टापत्तीत झाल्याची इतिहासात असंख्य उदाहरणे आहेत. बऱ्याचदा त्यातून मानवाने धडेही घेतलेले आहेत. अशात मराठवाड्यातील सरलेल्या दुष्काळातून आणि पाणीटंचाईतून आपण नेमका कोणता धडा घेतला, आणि भविष्यात त्यातून कोणती निर्मिती झाली, हे दिसेलच. किंवा त्यावर पुढच्या पिढ्या भाष्य करतील. काही जाणती मंडळी वारंवार सावध करत असताना आणि बहात्तरच्या दुष्काळातील पिढ्यांचे अनुभव जिवंत असताना, काही नगदी पिकांसाठी लाखो वर्षांपासूनचे भूगर्भातील जलसाठे शोधून शोधून खोलवर जाऊन उपसले. पण त्या जलसाठ्यांच्या पुनर्भरणासाठीचे उपाय योजले नाहीत. जामिनीवर पडणारं पावसाचं पाणी ज्या नदी-नाल्यांमधून वाहायचं, त्यातील पाणी साठवून ठेवणारे वाळूचे साठे विकासासाठी खरवडून काढले. नुसती वाळूच खरवडून गेली नाही; तर नदी-नाल्यांच्या पात्रातील धर व पाणी तगवून ठेवणाऱ्या वनस्पतींची बेटंही उद्ध्वस्त झाली. जेव्हा माणसांसाठी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली; तेव्हा गावोगावच्या लहानमोठ्या नद्या, ओढे, नाले, ओहोळ जास्तीत-जास्त पाणी साठविण्यासाठी व जमिनीत जिरविण्यासाठी खोलीकरणाची टूम निघाली. अशात आशादायक पाऊस झाल्याने हे खोलीकरण केलेले आद्यप्रवाह पाण्याने डबडबून गेलेत. पण त्यात फक्त पाणीच दिसते. पाणी हे सर्व वनस्पती, प्राणीमात्रांसाठी ‘जीवन’ असते. मात्र या पाण्यामध्ये ते नैसर्गिक ‘जीवन’ आढळत नाही.

पावसाचं पाणी शेताच्या बांधांजवळ जमा व्हावं, यासाठी साठच्या दशकात महाराष्ट्रात ‘नाला-बंडिंग’ची कामं सरकारी पातळीवर हाती घेण्यात आली. या कामांमुळे पावसाच्या पाण्यामुळे वाहून जाणारी शेतातील माती थांबली. शेताच्या उताराच्या दिशेने ताली अवतरल्या. महाराष्ट्रातील नाला-बंडिंगचे यशस्वी काम बघण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू पानगावला (ता. बार्शी, जि. सोलापूर) भेट द्यायला आले होते. या बरासींमुळे शेताचे वा निसर्गाचे नुकसान झाल्याचे कुणी म्हणाले नाही. बहात्तरच्या दुष्काळात लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी ‘पाझरतलाव’ आणि ‘साठवण तलाव’ या पाणी अडविण्याच्या संकल्पना अवतरल्या. गावोगावी लहानसहान उताराच्या जागेवर, माळरानांवरील डगरींच्या बेचक्यात असंख्य पाझरतलाव निर्माण करण्यात आले. शिवाय, खडी केंद्रांसाठी दगड काढल्याने दगडांच्या खदानी निर्माण झाल्या. तेव्हा लोक या पाझरतलावांना हसायचे. दुष्काळ सरला आणि लोक पाझरतलावांना विसरून गेले. पण काही दिवसांनी पाझरतलावांमुळे विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते, हा चमत्कार लोकांच्या लक्षात आला. खदानी पण पाण्याने भरून वाहू लागल्या. माळरानावर, खडकाळ भागात चरायला जाणाऱ्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या खदानींनी सोडविला.

दुष्काळानंतरच्या पावसाळ्यानंतर लोकांना आपल्या परिसरात अचानक नवख्या वनस्पती दिसू लागल्या. त्यात बेशरम, येडी बाभळ, गाजरगवत (हे गवत पहिल्यांदा उगवले तेव्हा लोकांना वाटलं, ही गाजरंच आहेत. पण जेव्हा लोक हे गाजराच्या आशेने उपटायचे तेव्हा गाजरं काय नाही; पण हात कडू मात्र व्हायचे. हल्ली कोथिंबिरीच्या जुडीत याची भेसळ करतात.) या वनस्पती प्रामुख्याने होत्या. परदेशातून जी गहू, मिलो, मका, सातू ही धान्ये आली होती, त्यात या अशा प्रकारच्या वनस्पतींच्या बिया आल्या होत्या.

दुष्काळापर्यंत गावोगावचे ओढे, नद्या पाण्याअभावी कोरड्या पडल्या होत्या, पण त्यांचे वर्षानुवर्षांचे रूप तसेच होते. दुष्काळोत्तर पावसाने त्या परत मूळ रूपात आल्या. दुष्काळामुळे नद्यांमधील कोणत्या वनस्पती आणि जीवजंतू कायमचे नष्ट झाले, याच्या नोंदी कुणी केल्यात की नाही, हे माहीत नाही; पण दुष्काळापूर्वी आणि नंतर नद्यांमध्ये असलेली विविध लव्हाळी, मोळ अर्थात नागरमोथा, पाणकणसं, शिंगाड्याच्या वेली, कमळं, माक्यासारख्या वनस्पती परत जिवंत झाल्या. नदीच्या काठावर सावली धरणारे करंज, कटुरी जांभळं, निळुंब्या, चिलारी, गजगे, निरगुडी, कोरफडी, कन्हेरी, घाणेरी, दुधाणी, बिट्ट्या यांसारख्या वनस्पतींच्या जाळ्या परत जिवंत झाल्या.

नद्या जिवंत झाल्याने डोह जिवंत झाले. पूर येऊन गेल्याने नदीकाठच्या या जाळ्या आणि उंबरं, बाभळी, जांभळीसारख्या झाडांना परत पुरसनाने अर्थात पुरात वाहून आलेल्या पुष्टपोषक कचऱ्याने वेढून टाकले. डोह जिवंत झाल्याने वाळूत चिरनिद्रा घेणारे बेडूक आणि मंडोदऱ्या, चिखलात राहणारे मिशाळू कटारणे मासे, जोरात दाबून धरल्यावर पोटाखालचा काटा मारणाऱ्या वांबी अर्थात वाबटी, पाण्यात उघडणाऱ्या बिळात राहणाऱ्या मरळी आणि त्यांची पिल्लं अर्थात डोक, खडकावर, दगडांखाली सापडणारे चांभारी मासे, मळगे, टेपल्या, चिंगल्या अर्थात असंख्य माशांची एकसारखी दिसणारी पिले, झिंगे, शिंपले, शंख, पाननिवल्या, पाण्याच्या वर उघडणाऱ्या बिळात राहणारे खेकडे, खळाळणाऱ्या पाण्यात आढळणारे असंख्य मासे नदीत आढळू लागले. इरूळे अर्थात नदीत राहणारे हिरवे बिनविषारी साप, पिंगळे, घुबडं, पाणकोंबड्या, टिटव्या, खेकडे खाणारी खोकडं आणि कोल्हे, रानमांजरं, उदमांजरं, खंड्या, असंख्य कीटक नदीच्या आश्रयाला परत आले. दुष्काळानंतर नद्यांना पूर येऊ लागले तेव्हा पहिल्या-दुसऱ्या पुराच्या पाण्यात प्रवाहाच्या उलट्या दिशेनं जाणारे मासे आढळू लागले. निसर्गाने सगळं काही हिरावून घेतलं नव्हतं. अगदी खांडवे पडलेल्या नद्यांमध्ये पहिल्यासारखेच वाळूत पडलेल्या हिऱ्यांना अर्थात झऱ्यांना पाणी यायचं!

साठोत्तरीत साखर कारखान्यांच्या उभारणीनंतर या कारखान्यांच्या बॉयलरसाठी कारखान्याच्या परिसरातील गावांमधून लाकडं गोळा करण्याच्या सपाट्यात कित्येक गावांची बाभळबने आणि आंबराया खर्ची पडल्या. नद्या-नाल्यांकाठच्या बाभळबनांच्या विकासासाठी झालेल्या या कत्तलीबद्दल कुणाला ना खंत वाटली ना खेद. पण निसर्गाने त्याची नोंद घेतली असावी. साखर कारखाने आले आणि उसाचे क्षेत्र कितीतरी पटीने वाढले. विहिरीवर चालणाऱ्या मोटांची वडवणं स्थिरावली. क्रूड ऑईलवर चालणारी पाणी उपसणारी इंजिनं आली. पाणी आणखी खोल-खोल गेलं. वाढत्या नागरीकरणाबरोबर आर.सी.सी.चा बोलबाला झाला. त्यासाठी वाळूची गरज होती. त्यामुळे हजारो वर्षांपासून वाळूने भरलेले जीवनसमृद्ध डोह रिक्त होऊ लागले. इकडं पाण्याचं मुरणं थांबलं आणि दुसरीकडे उपसा वाढला. ऐंशीच्या दशकात पाण्याच्या उपशाबद्दल व वापराबद्दल थोडीबहुत चर्चा होऊ लागली. बहात्तरच्या दुष्काळात पैसा पाहिलेल्या पिढीला आणि लोकांना आणखी पैसा हवा होता. त्यात गावोगाव कार्यकर्ते आणि पुढारी व या संकरातून ‘गुत्तेदार’ नामक प्राणी जन्माला आला. मग काय छोटा ओहोळ असो, ओढा असो, की मध्यम नदी; पाणी अडविण्याच्या नावाखाली वाट्टेल तिथे के. टी. वेअर्स निर्माण होऊ लागले. झाले. जिवंत झालेल्या शाश्वत नद्यांचा अशा रीतीने जागोजागी गळा दाबण्यात आला. पुढचा इतिहास सर्वज्ञ जाणतातच.

मग हा दुष्काळ आला. नद्यांच्या पुनरुज्जीवनाचे हाकारे सर्वत्र ऐकायला येत होते. आहेत. त्यातून ओढे, नद्या यांच्या खोलीकरणाचे ‘लोक आंदोलन’ उभे राहिले. बहात्तरच्या दुष्काळासारखी लोकांना आता रोजगाराची गरज नव्हती. त्यामुळे जेसीबीसारखी अद्ययावत यंत्रे लावून ओढे, नद्या खोल करण्यात आल्या. या खोलीकरणाबरोबर या नैसर्गिक जलमार्गांच्या पोटात सुप्तावस्थेत असलेले जीव, त्यांची बीजं, पात्रांमध्ये वाढणाऱ्या वनस्पतींचे अधिवास, काठांवरील वनस्पतींचे अधिवास याची चिंता कुणी वाहिल्याचे दिसले नाही. नद्या-नाल्यांचे हे भले लांब व खोल चर पाण्याने लबलबलेले बघून माणसांना हर्ष झाला असेल. माणूस स्वत:चा जीव वाचविण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. वरून त्याचे सोयीस्कररीत्या शास्त्रीयदृष्ट्या समर्थनही करू शकतो. पाण्याने डबडबलेल्या चरांमुळे आर्थिक समृद्धी येईल. पण शतकानुशतके निसर्गाने निर्माण केलेल्या जैव साखळीला मुद्दाम होऊन तोडणे हे माणसांना भविष्यात आणखी कोणती चमत्कृती दाखवेल, हे एक निसर्गच जाणतो! शाळेत एक वाक्प्रचार असायचा, ‘महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळी वाचती!’ आता हा वाक्प्रचार बदलून ‘जेसीबी खोदीत जाती, तेथे निसर्ग वाकविती!’ म्हणावे लागेल!

(ता.क. :- जे नष्ट झालेय ते परत येणार नाही, याची प्रस्तुत लेखकास जाणीव आहे; तो विकासाचा विरोधक नाही. आणि महत्त्वाचे म्हणजे परंपरा व संस्कृती नष्ट होताहेत, म्हणून ऊर बडविणाऱ्यांच्या भाबड्या पंथातला पण नाही! आमेन!!!)

शाहू पाटोळे
shahupatole@yahoo.com
बातम्या आणखी आहेत...