आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुटिलीय अर्थ-शस्त्रास्त्र !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नैतिकतेची कुठलीही शिकवण ‘कौशल्याचे अर्थशास्त्र’ हा ग्रंथ देत नाही, की सामाजिक, व्यक्तिगत मूल्ये रुजवत नाही. अशा ग्रंथाचा ‘महान सांस्कृतिक संचित’ म्हणून अभिमान बाळगणाऱ्यांनी हा ग्रंथ नीट वाचला असेल, याबद्दल शंका वाटते. मध्ययुगीन मानसिकतेत वावरणारी ही मंडळी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक साधने हाताळणे जाणतात, याउपर यांना आधुनिक विचारांचे तरी कसे म्हणावे?

आपल्या समाजातील काही सामाजिक घटकांना विष्णुगुप्त अर्थात चाणक्य किंवा कौटिल्याबद्दल अत्यंत आकर्षण वाटण्याबरोबरच, त्याचा गर्वाभिमानही वाटतो. जे लोक आज मनुस्मृतीचे उघडपणे समर्थन करू शकत नाहीत, ते लोक मनुस्मृतीच्या तोडीच्या ‘कौटिल्याचे अर्थशास्त्रा’स मात्र उघडपणे पाठिंबा देतात. मुळात, कौटिल्याने जे सांगितलंय ते मूळ किती आणि प्रक्षिप्त किती, याचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. आणि या पुस्तकाला ‘अर्थशास्त्र’ या व्याख्येत का बसवतात, हे कळत नाही. बरं ही जी मंडळी आज चाणक्याचं इतकं कौतुक करतात, ती मंडळी इ.स. १९०४ पूर्वी कोणत्या ग्रंथांच्या प्रेमात होती? कौटिल्याचा हा जो काही ग्रंथ आहे, तो इ.स.पूर्व चौथ्या शतकातला, मूळ संस्कृतमधला. तो इ.स.नंतर दोनकशे वर्षं प्रचलित होता. त्यानंतर तो जो लुप्त झाला, तो सुमारे दोन हजार वर्षांनंतर इ.स. १९०४मध्ये सापडला. म्हणजे, मधल्या काळातील विद्वानांना हा ग्रंथ माहीत नव्हता. हा ग्रंथ इ.स. १९२८मध्ये मराठीत अनुवादित झाला. अवघे ८८ वर्षांचे आयुर्मान असलेल्या या ग्रंथाचे ऊठसूठ दाखले देणाऱ्या, स्वयंघोषित विद्वजनांचे काय करायचे? नैतिकतेची कुठलीही शिकवण ‘कौशल्याचे अर्थशास्त्र’ हा ग्रंथ देत नाही, की सामाजिक, व्यक्तिगत मूल्ये रुजवत नाही. अशा ग्रंथाचा ‘महान सांस्कृतिक संचित’ म्हणून अभिमान बाळगणाऱ्यांनी हा ग्रंथ नीट वाचला असेल, याबद्दल शंका वाटते. मध्ययुगीन मानसिकतेत वावरणारी ही मंडळी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक साधने हाताळणे जाणतात, याउपर यांना आधुनिक विचारांचे तरी कसे म्हणावे? कदाचित या ग्रंथातील ‘विचारांचे’ समर्थन किंवा पाठराखण करताना संस्कृतीरक्षक म्हणतील की, ‘या ग्रंथातून समाजाच्या हितासाठी आवश्यक तेवढेच विचार घ्यावेत!’ वगैरे वगैरे. पण हे संस्कृतीरक्षक त्या ग्रंथातील काळाशी विसंगत, अनावश्यक, गैरलागू विचारांचे खंडन मात्र करणार नाहीत, की आपल्या मुलांची नावे ‘कौटिल्य’ ठेवणार नाहीत.

ज्याची बुद्धी ‘कुटिल’ तो ‘कौटिल्य’! म्हणजेच, आपले राज्य टिकविण्यासाठी राजाने कोणकोणत्या युक्त्या-प्रयुक्त्या कराव्यात, त्यासाठी कोणकोणते (अ)नैतिक मार्ग योजावेत, नागरिकांशी अर्थात प्रजेशी, अंतर्गत शत्रूशी अर्थात विरोधकांशी कसे वागावे, बाह्य शत्रू आणि शत्रूच्या प्रदेशातील प्रजेशी कसे वागावे, आहे तीच व्यवस्था कशी बळकट करत न्यावी, अर्थकारण कसे असावे, यांसारख्या अत्यंत बारीकसारीक गोष्टी या ग्रंथात सविस्तर सांगितलेल्या आहेत. प्रजा ही जन्मत:च चोर, कामचुकार असते, ती राजाला कधीही धोका देऊ शकते. अगदी पोटचा मुलगासुद्धा राज्य बळकावण्यासाठी बापाचा खून करू शकतो. अशा संततींचा कसा ‘बंदोबस्त’ करावा, हेसुद्धा सांगणारा हा ‘ग्रंथ’ सामान्य प्रजेबद्दल कोणती मतं आणि विचार मांडत असेल, हे विश्लेषण करून सांगण्याची (सुज्ञांना) आवश्यकता नाही.
या ग्रंथात दारू कुठल्या प्रकारची असावी, ग्राहकांना कशा प्रकारे सेवा द्यावी, इथपासून ते बलात्कार, शारीरिक संबंध (भलेही ते संमतीने ठेवलेले असोत) कुठे करावेत आणि करू नयेत, यावर कुठे दंड आकारावेत, कुंटणखाणे आणि त्यांचे व्यवस्थापन, आर्थिक व्यवहार याबद्दलही ‘मार्गदर्शन’ केलेले आहे. राज्यात जे जे व्यवसाय, व्यापार, इतकेच नव्हे तर शक्य त्या व्यवहारांवर कर आणि दंड लावण्याचे सांगितलेले आहे. स्त्रियांच्या चारित्र्याची काळजी न वाहता पुरुषांची पाठराखण या ग्रंथात केलेली आहे. या ग्रंथात कोणती किंवा कोणत्या गोष्टी आजच्या काळात ‘नैतिक’ ठरतात, हे कौटिल्याच्या पुरस्कर्त्यांनी सांगावे!

‘गाडी हाकणारा अज्ञानी असेल, तर गाडी मालकास दंड ठोठावण्यात यावा किंवा गाडी जप्त करावी, हे तेव्हाही म्हटले आहे. तेव्हापण खोटी नाणी पाडली जात होती. तेव्हासुद्धा अॅट्रॉसिटीचा कायदा होता. (पण तो उलट्या क्रमाने) जसे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र आणि हीन व्यक्तींनी स्वभावसंबंधाने अपशब्द उच्चारल्यास दंड केला जात असे, तसेच विद्येवर उपजीविका करणारे, मायदेशाच्या संबंधाने किंवा गावाबद्दल अपशब्द वापरल्यास, जाती, देव आणि देवालयाबद्दल प्रतिकूल बोलल्यास दंड किंवा शिक्षा केली जात असे. तसेच राज्याबद्दल वाईट बोलणाऱ्या व अधार्मिकांच्या कुटुंबीयांना छळण्याचे प्रकार पण यात सांगितलेले आहेत. राजाच्या कलाने वागणारी माणसे अनर्थकारक असली, तरी ती राजाला प्रिय वाटतात, म्हणून राजाकडे काम करणाऱ्यांनी अशा माणसांबद्दल ‘स्तब्ध’ बसावे, असा सल्लापण हा ग्रंथ देतो. शिवाय, पगार थोडा असताना जो अधिकारी खर्च जास्त करतो तो लाच खात असतो, असे म्हटले आहे. तसेच जो अधिकारी प्रशंसा मिळविण्यासाठी प्रजेकडून दुप्पट वसुली करतो, अशा अधिकाऱ्यास राजाने ताकीद दिली पाहिजे, असे म्हटलेय. राजद्रोही व्यक्तींचा नि:पात करण्याकरिता, शत्रू राजांचा पाडाव करण्याकरिता प्रसंगी नीतिमार्गाचे उल्लंघन करायला हरकत नाही, असे हा ग्रंथ म्हणतो.

शत्रूशी कपटाने वागून आपले ध्येय कसे साध्य करावे, अंतर्गत आणि बाह्य शत्रूंचा विश्वास संपादन करून घात कसा करावा, शत्रू राजाचे दुर्गुण स्वत:च्या सद‌्गुणांनी झाकून शत्रू एकपट सद््गुणी असेल तर आपण दुप्पट सद‌्गुणी व्हावे. शत्रूचा पक्ष सोडून आलेल्यांना कबूल केलेल्या देणग्या, इनामे देऊन त्यांना खूश करावे. जिंकलेल्या लोकांचा स्वभाव, वेष, भाषा, आचार पूर्णपणे ओळखून त्यानुसार वागावे. जिंकलेल्या प्रदेशातील देवतांचे किंवा समाजाचे जे उत्सव, समारंभ प्रचलित असतील, त्यांच्याबद्दल भक्तिभाव दाखवावा. पूर्वीच्या राजाचे दुर्वर्तनाचे चित्र निरंतर दाखवावे आणि आपला नवा राजा किती वैभवशाली आहे, त्यास लोकांविषयी किती प्रेम व आदर वाटत आहे, हे लोकांच्या निदर्शनास आणत जावे, असा सल्ला देऊन या ग्रंथात म्हटलंय की, ‘पृथ्वी जिंकल्यावर तीत वर्णव्यवस्था व आश्रमव्यवस्था लावावी, आणि धर्मास अनुसरून पृथ्वीचा उपभोग घ्यावा.’ तसेच जेथे धर्मशास्त्र आणि धर्मनीती यात विरोध येईल, तेथे नीतीलाच प्रमाण मानावे आणि जेव्हा रूढीला धर्मशास्त्राचा व धर्मशास्त्राला व्यवहाराचा विरोध येतो, त्या वेळी धर्मास अनुसरून निर्णय घ्यावा, असे हा ग्रंथ राजाला सांगतो.

या ग्रंथातच ‘अर्थशास्त्र’ असल्याने राज्याच्या खजिन्यात द्रव्याचा तुटवडा भासू लागल्यास द्रव्यपूर्तीसाठी करावयाच्या युक्त्यांपैकी ‘कोशाभिसंहरणम्’साठी मार्ग सांगितलेला आहे. त्यात ‘दु:खनिवारण ठेव’ म्हणून देवालयांचे किंवा संघाचे गणद्रव्य कसे वळवावे, हे सांगून या कोशात जास्त वर्गणी देणाऱ्यास पदवी देऊन भूषवावे, असा सल्ला दिलेला आहे. प्रजेच्या हितासाठी ‘मात्स्यन्याय’ टाळावा. तसेच, खेडेगावातील प्रजेचे शेतीच्या कामातून लक्ष विचलित होऊ नये, यासाठी नट, नर्तक, गायक, वादक, भाट, गोंधळी यासारख्यांना खेडेगावात राहू देऊ नये; नसता द्रव्यात घट होईल, असे या ग्रंथात म्हटले आहे.

या ग्रंथात उत्तम नागरिक किंवा चांगली प्रजा वा नागरिक घडविण्याबद्दल काहीही भाष्य केलेले नसून, यात राजा, राज्य आणि त्या अनुषंगाने अर्थकारण कसे वाढवता येईल, यावर सगळा भर दिलेला आहे. स्वतंत्र विचार, आचाराचा ‘माणूस’, ‘नागरिक’ घडावा, याबद्दल हा ग्रंथ काहीही सांगत नाही. राजा, राज्य आणि धर्मासाठी माणूस असून जन्माने ज्या वर्णात असेल त्याच धर्मात, व्यवस्थेत त्याने प्राक्तन म्हणून आपली भूमिका पार पाडून इहलोकी पुण्य पदरात पाडून परलोकी जावे, असे या ग्रंथाचे सार आहे. ‘संकटकाळी (कोणत्या संकटकाळी, हे ग्रंथकर्ता सांगत नाही) राजाने प्रजेचा पिता झाले पाहिजे’ असे सांगणारा हा ग्रंथ फक्त अर्थकारणावरच भर देताना वारंवार जाणवत राहते! मानवी जीवनात ‘व्यवहार’ हेच सर्वस्व नसते, याची ग्रंथकर्त्यास जाणीव असेल, याबद्दलही शंका वाटत राहते.

या लेखातील काही अवतरणांचे साधर्म्य वर्तमानातील परिस्थितीतील जगत व प्रसंगांशी असल्याचे वाटल्यास, तो योगायोग समजावा आणि उत्सुकांनी मूळ ग्रंथ तटस्थपणे वाचावा.

शाहू पाटोळे
shahupatole@yahoo.com
बातम्या आणखी आहेत...