आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahu Patole Writes About Dalits From Becoming Buddhists

दलित नको बौद्ध म्‍हणा ? (शाहू पाटोळे)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सव्वाशेव्या जयंतीचे वर्ष आणि बौद्ध धर्मात प्रवेश केल्याचे हीरक महोत्सवी वर्ष; असा सुयोग जुळून आलेल्या वर्षात बाबासाहेबांचे जातानुयायी ‘दलित’ हे संबोधन त्यागून ‘बौद्ध’ संबोधन धारण करताहेत, ही स्पृहणीय बाब आहे. अवघ्या साठ वर्षांत महार, दलित, नवबौद्ध ते बौद्ध हा विकासप्रवास ऐतिहासिक आहे. ५६ सालचे धर्मांतर कुणाला राजकीय वाटले होते, कुणाच्या दृष्टिकोनातून हिंदू धर्मातील घाण निघून गेली होती, कुणाला वाटले होते, ‘धर्मांतरामुळे दारिद्र्य आणि गुलामगिरी संपणार आहे का?’ ‘यामुळे मालकांच्या मनोवृत्तीत वावरणाऱ्यांमध्ये काही बदल झाले का?’ दारिद्र्य पूर्णपणे दूर झालं नसलं तरी, स्वाभिमानाने जगण्याच्या ऊर्मी जाग्या झाल्या; हे काय कमी आहे? प्रा. नरहर कुरूंदकरांनी या धर्मांतराच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता की, ‘दलितांना दलित म्हणून उरावयाचे आहे, की आपले दलितपण संपवायचे आहे?’ आज कुरूंदकर हयात नाहीत; पण त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळायला सुरुवात झाली आहे, असे वाटते.
कोणत्याही घटनेचे, स्थित्यंतराचे परिणाम दिसायला काही काळ जाऊ द्यावा लागतो. या धर्मांतराच्या घटनेचे पण तेच झाले. त्याचे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक पातळ्यांवर तेव्हा उठलेले तरंग आज स्पष्टपणे दिसताहेत. बाबासाहेबांच्या चळवळीमुळे गावगाड्यातील बलुतेदारीचा महत्त्वाचा घटक असलेली महारकीची वतनी कामं नाकारल्याने ग्रामव्यवस्थेला पहिल्यांदा हादरा बसला. त्या वतनाचे हक्क आपल्याला मिळतील, याचा मांगांइतका आनंद आणखी कुण्या जातीला झाला असेल? परंपरेने चालत आलेली गावकी, येसकरकी, सांगवे, हक्काची शिळी-ताजी वाढणं आणि मेलेली ढोरं ओढण्याची कामं तत्कालीन महार समाजानं नाकारली. हा समाज बाबासाहेबांच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात सहभागी झाला. पण याच जातीच्या समकक्ष मांग, ढोर आणि चांभार या जाती (जातींमधील काही सन्माननीय व्यक्तींचे अपवाद वगळता) बाबासाहेबांच्या चळवळीत सहभागी झाल्या नाहीत. त्याची कारणे इथल्या धार्मिक आणि सामाजिक व्यवस्थेत दडलेली आहेत. शतकानुशतके अहिंसक दहशतीखाली, पण अशा धार्मिक प्रभावाखाली चाकोरीबद्धपणे जगणाऱ्या या जाती तत्कालीन सामाजिक परिस्थितीत आपल्या समकक्ष जातीचे नेतृत्व स्वीकारण्याच्या मानसिकतेत नव्हत्या. त्यात या चारही प्रमुख दलित जातींच्या हाती कसलीही अर्थसत्ता नव्हती. बाबासाहेबांच्या चळवळीचे दीर्घकालीन सामाजिक परिणामांचे आकलन असण्याची कुवत इतर जातींमध्ये नव्हती. त्यामुळे पारंपरिक व्यवस्थेविरुद्ध लढण्याचे धाडस इतर जातींनी दाखवले नाही. म्हणूनच बाबासाहेबांनी ‘महार-मांग वतनदार परिषदा’ आयोजित केल्या. पण, दुर्दैवाने बाबासाहेबांच्या अनुयायांनी त्यांच्यानंतर मांग, ढोर, चांभारांना मुख्य चळवळीत आणण्याचे प्रयत्न केले गेले नाहीत; की त्यांची चळवळीत सामील न होण्यामागची सामाजिक, मानसिक कारणे शोधली नाहीत. बाबासाहेबांच्या हयातीतच कुणी ‘हरिजन’ तर कुणी ‘भारतमातेचे’ झेंडे खांद्यावर घेते झाले.
बाबासाहेबांच्या लढ्याची फलश्रुती म्हणून सर्वच दलित, आदिवासी, मागासांना मूलभूत नागरी हक्कांसोबत शिक्षणात आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळाले. बाबासाहेबांचे कडवे अनुयायी समाजातील सर्वच क्षेत्रांमध्ये आक्रमक, आग्रही होते. साक्षरता आणि जोडीला सामाजिक
वास्तवाचे भान यांमुळे यांचा शिक्षण व नोकऱ्यांतला टक्का वाढता असणे नैसर्गिक होते. इथवर सर्व ठीक होते...
खेड्यापाड्यांतून शहरात शिकायला आलेल्या मांग, ढोर, चांभार युवकांना ‘आमच्या बाबासाहेबांमुळे सवलती मिळाल्या तरी जयभीम घालत नाही, चळवळीत येत नाही’ असे टोमणे हमखास ऐकावे लागत. ६०-७० रुपये भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळे; त्यातून पाच-दहा रुपये ‘वर्गणी’ वसूल केली जात असे. अशा किरकोळ पण मनावर चरे उमटवणाऱ्या घटना पदोपदी घडत. त्यामुळे इतर जातीतील बहुसंख्य युवक नाइलाजास्तव बाबासाहेबांनंतरच्या आंबेडकरी चळवळीपासून दुरावला गेला. तशात बाबासाहेबांच्या जातीअनुयायांचे अनेक पक्ष आणि गट-तट पडत गेले. त्यात इतर जातीच्यांना नाममात्र स्थान होते. हे गट आपापल्या सोयीप्रमाणे राजकीय तडजोडी करीत. त्यामुळे इतर दलित जातीतील राजकीय इच्छा बाळगणारे इतर पक्षांकडे ढकलले गेले. जे दलित राजकारणाचे तेच दलित साहित्याचेपण! नवबौद्धतेतर दलित साहित्यिकांना नवबौद्ध साहित्यिकांनी नेहमीच उपेक्षेची वागणूक दिली. नवबौद्धतेतर साहित्यिकांनी बऱ्याच ठिकाणी आपली ही व्यथा व्यक्त केलेली आहे. त्यामुळे भीमराव गस्ती, उत्तम बंडू तुपे, नामदेव चं. कांबळे, माधव कोंडविलकर, नामदेव व्हटकर, अशोक व्हटकर, इब्राहिम खान यांसारख्या अनेक साहित्यिकांनी वेगळ्या विचारप्रवाहाला जवळ केले, किंवा अलिप्त राहणे पसंत केले.
‘जयभीम म्हणणारा तो आंबेडकरवादी’ इतक्या छोट्या व्याख्येनंतर गेल्या काही वर्षांत ‘बौद्ध धम्म स्वीकारील तो खरा आंबेडकरवादी’ ही व्याख्या झाली. कारण मंडल आयोगानंतर बहुजन चळवळीतील सर्व जातिधर्माचे कार्यकर्ते (विशेष म्हणजे, आंबेडकरवाद्यांच्या परोक्ष) एकमेकांना ‘जयभीम’ घालू लागले. म्हणूनच आंबेडकरवादी होण्यासाठी धम्म स्वीकारण्याची व्याख्या प्रसृत झाली असावी? मंडलनंतर फुले-शाहू-आंबेडकर अपरिहार्यपणे समजून घेतल्याशिवाय चळवळीचा वैचारिकपणा आपल्या सजातीयांना समजून सांगता येत नाही, याची जाणीव सर्व जातींच्या कार्यकर्त्यांना झाली. शिवाय, मांग, ढोर, चांभार या जातींनी आपापल्या जातीत कुणी बाबासाहेब जन्म घेईल, अशी खूप अगोदरपासून आस लावून वाट बघितली. चांभारांची जातीय ओळख देशपातळीवर एकसमान असल्याने, त्यांना जगजीवन राम आणि संत रोहिदास मिळाले. ढोरांना दक्षिणेकडून संत कक्कया मिळाले. मांगांना कुणी संत मिळणे शक्यच नव्हते. लहूजी साळवे, अण्णाभाऊ साठे हे जातीपुरते ‘सिम्बॉलिक लिजंड’ होते, पण बाबासाहेबांच्या कुठल्याच लेवलला बसवता येत नव्हते. मग, त्यांना पण एक डॉक्टर सापडला होता. बापूंचे त्यांनी बाबासाहेब केले खरे, पण नकलेलाही शेवटी अक्कल लागते. वैचारिक मांडणी लागते. ती मुळात असावी लागते, ती उसनी मिळत नाही.
बाबासाहेबांनी एका राजकीय पक्षाला ‘जळतं घर’ म्हटलं होतं. बाबासाहेबांचे कट्टर अनुयायी म्हणवून घेणाऱ्यांनी त्या घराशी घरोबा केला. अशात तर बाबासाहेबांनी ज्या कारणांसाठी जुना धर्म नाकारला, त्यांच्याशी संग करण्यापर्यंत राजकीय लंबक हिंदोळला. हरिजन दलित आणि भारतमातेच्या दलित लेकरा-कोकरांना बाबासाहेबांचे अनुयायी ‘असंगाशी संग’ म्हणून उठता-बसता हिणवायचे. तर तिथंही ‘जयभीम’चे सूर घुमू लागलेत. कदाचित मुख्य प्रवाहातल्या राजकारणात राखीव जागांवर राजकीय चेहरा नसलेले इतरेजन, दलित केवळ ‘जयभीम पाहिजे की रामराम पाहिजे?’ या एका ‘प्रचारसूत्रावर’ निवडून येत असत. मंडलनंतर एका वेगळ्या पातळीवरचं सामाजिक, जातीय आणि राजकीय भान अनेक जातींना आलं. आता बाबासाहेबांचे नाव घेतल्याशिवाय त्यांचेही पान हलत नाही. म्हणून त्यांना बाबासाहेबांचे वैचारिक अनुयायी
ठरविण्याची घाई करू नये. त्यातील काहींनी
आपल्या जातींच्या प्रतीकासोबत बाबासाहेबांच्या प्रतिमेचेही योजन केलंय. काहींनी बौद्ध धम्म स्वीकारून आपल्या निष्ठा वाहिल्यात. पण बौद्ध होणे किंवा असणे म्हणजे परिवर्तनवादी असणे, हे आजच्या जागतिकीकरणाच्या धबडग्यात कसे काय बसू शकते? जे इतर दलित, अदिवासी, भटके, विमुक्त धम्म स्वीकारीत आहेत, ते शुभेच्छांना पात्र आहेत.
महाराष्ट्रातील एका अस्पृश्य जातीला बाबासाहेबांनी स्वतंत्र ओळख दिली. त्यांचे सच्चे अनुयायी आता ‘दलित’ ही ओळख टाकून यापुढे ‘बौद्ध’ म्हणून ओळखले जातील. आता इतर दलितांची खरी कसोटी सुरू होईल. आमचे हक्क आणि सवलती आम्हाला मिळू दिल्या नाहीत, ही हाकाटी आणि ओरड यापुढे चालणार नाही. इतर दलित जातींनी आपले सामूहिक सहअस्तित्व दाखवून फुले-शाहू-आंबेडकरांचा वैचारिक वारसा स्वतंत्रपणे पुढे न्यायला हवा. त्यासाठी धर्म बदलण्याची गरज असेल-नसेल; हे काळ ठरवेल. आता फुले-शाहू-आंबेडकरांचा वैचारिक वारसा हा एका जातीचा राहिलेला नाही. यापुढे बौद्ध असलेल्यांशिवाय वेगळ्या आणखी दलित जाती होत्या, आहेत, हे सध्या या निमित्ताने माध्यमे, अभ्यासक, विचारवंतांना कळले तरी पुरे! आता ते बौद्धांसारखे वागतील, दलितांनी दलितांसारखे वागावे, या अपेक्षांसह!
shahupatole@yahoo.com