आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shailaja Sonpethkars Story Of Mother And Her Daughter

जिंकलस पोरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘अगं, नको करूस सारखा फोन तिला. आणि चांगली शिकवण दे गं मुलीला,’ सुधाकरराव पोटतिडकीने आपल्या बायकोला सांगत होते. पण त्यांच्या बायकोचे तेच. ‘सासरची माणसे आहेत ती. ती काय धड असणार. मी नाही का किती सासुरवास काढला. तुम्हाला काय? मी, माझ्या मुलीला सासरच्या लोकांच्या संपर्कात राहू देणार नाही. ती आणि तिचा नवरा हेच त्यांचं कुटुंब. बरं आहे बाई आपल्या जावयाची नोकरी बाहेर आहे ते, नाही तर सगळं करावं लागलं असतं माझ्या मुलीला. कसं छान राणीसारखं राहत आहे नं आपली मुलगी.’ सुधाकररावांनी कपाळावर हात मारून घेतला. कसं समजवायचं हिला, माणसांनी घर भरलेलं असावं. ती श्रीमंती केव्हाही आपल्या कामाची. तीस वर्षांत त्यांनी आपल्या बायकोला कितीदा तरी सांगितलं, तरी पालथ्या घडावर पाणी. आता तर बाईसाहेबांनी लेकीला तिच्या सासरच्या विरोधात शिकवायला सुरुवात केली.

सुधाकररावांचं मंजिरीशी लग्न झालं, त्याला आता तीस वर्षं झाली. सुधाकररावांना एक भाऊ व तीन बहिणी. भाऊ व बहिणी मोठ्या व सुधाकरराव लहान. त्यामुळे त्यांचे सगळेच खूप लाड करायचे. त्यांची वहिनीसुद्धा त्यांचं प्रेमाने करायची. बहिणी सासरी होत्या. त्या घरी आल्या, की त्यांच्या घराचं गोकुळ व्हायचं. काका, चुलतभाऊ सगळे एकत्र यायचे. पण सुधाकररावांचं लग्न झालं आणि त्या सगळ्या वातवरणाला दृष्ट लागली. मंजिरीला एकत्र कुटुंबपद्धती मान्य नव्हती, म्हणून ती सारखी भांडण करायची. मोठ्यांचा अपमान, आपलं घर वेगळं करू असा तिचा नेहमीच तगादा. तिच्या वागण्यामुळे घरातील लोक परेशान झाले होते. सरतेशेवटी सुधाकररावांच्या मोठ्या भावाने व आईने त्यांना वेगळं राहण्याचा सल्ला दिला. सुधाकरराव त्या रात्री अगदी लहान मुलासारखे रडले. पण स्त्रीहट्ट. काय करणार? शेवटी त्यांनी वेगळं बिऱ्हाड थाटलं. थोडे दिवस बरे गेले. सुधाकररावांचं मन नवीन घरात लागत नव्हतं. पण त्यांच्या दोन्ही मुलींकडे बघून ते शांत राहत. तरी बाईसाहेबांचं चालूच, मी कशी हुशार आहे. मी सगळं घरातलं व बाहेरचं करते. तुम्ही काय नोकरी करता. मोजक्या पगारात घर चालवताना माझी काय तारांबळ उडते ती बघा. सुधाकररावांच्या भावनाप्रधान मनाला या गोष्टी सहन करण्याच्या पलीकडच्या होत्या. त्यांचं खूप वेळेस ऑफिसात कामात लक्ष लागायचं नाही. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. सुधाकररावांवर अफरातफरीचा ठपका ठेवण्यात आला. नोकरीवरून कमी करण्यात आले. सुधाकरराव आणखीनच हतबल झाले. तरी बाईसाहेब अजून तो-यात होत्याच. मी कशी हुशार, माझं कौतुक करा, तुमचा संसार मी कसा करते हे माझं मलाच माहीत, असं गुऱ्हाळ सुरूच. सुधाकररावांची मुलगी लग्नाला आली. दिसायला चांगली असल्यामुळे व सुधाकररावांनी परिस्थिती मुलीच्या सासरच्या लोकांना सांगितल्यामुळे हुंडा न घेता मुलीचं लग्न झालं. सासरची माणसं चांगली होती. पण सासरची माणसं वाईटच असतात, असं त्यांच्या बायकोचं पक्कं मत असल्यामुळे त्यांच्या बायकोने कारण नसताना मुलीच्या मनात तिच्या सासरच्याविषयी वाईट बोलायला सुरुवात केली. सासरी आपल्या मुलीला काम करावं लागतं. त्यामुळे तिने सासरच्या लोकांशी संपर्क ठेवू नये, असं त्या तिला मनोमन सांगत असत. त्यामुळे सुधाकरराव हतबल झाले होते, त्यानं आपला भूतकाळ हा मुलीचा भविष्यकाळ होऊ नये, असे मनापासून वाटत होते.
असेच दिवस चालले होते. त्यांच्या मुलीला मुलगी झाली होती. बाळंतपणाच्या काळात तर तिच्या सासरची माणसं कशी वाईट याबाबत रोज तिच्याजवळ बोलत राहायची, तिच्यामध्ये सतत द्वेष भरवत राहायची. त्यामुळे त्यांच्या मुलीची प्रकृती सुधारली नाहीच. सासरची मंडळी भेटायला गेल्यावर त्यांनी कळत नकळत त्यांचा अपमान केला. सततच्या सांगण्यामुळे मुलीलाही सासरची मंडळी वाईटच असतात असे वाटू लागले.

मंजिरीने मुलीला नेहमीप्रमाणे फोन केला. फोनवर म्हणाल्या, अगं, दिवाळी आली आहे. तू काही सासरी जाऊ नकोस. तिथे जाऊन तुलाच करावं लागेल. आता मात्र त्यांच्या मुलीचा तोल गेला. ती म्हणाली, ‘आई, बस झाला हा मन कलुषित करण्याचा धंदा. बंद कर हे सगळं, आता तुझं वय झालं आहे. अध्यात्माकडे लक्ष दे, त्याचा मन:शांतीसाठी तुला फायदा होईल व तुझी तब्येतही त्यामुळे बरी राहील. मला तू नेहमीच वाईट सांगत आली आहेस, माझं आयुष्य मी माझ्या पद्धतीने जगेन. माझी माणसं जशी आहेत तसा मी त्यांचा स्वीकार करणार आहे. कारण माझ्या माणसांनी मला माझ्या गुणदोषासहित स्वीकारले आहेच ना! अगं, माणसं आणि नाती जोडायची असतात, तोडायची नसतात. पण जाऊ दे म्हणा, तुला हे कधी कळणार? यापुढे मला सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नकोस. दिवाळीच्या तुला आणि बाबांना फोनवरूनच शुभेच्छा देते.’ स्पीकर फोन ऑन असल्यामुळे सुधाकरराव ऐकत होते. त्यांना त्या क्षणाला जग जिंकल्याचा आनंद झाला. ते मनात एवढंच म्हणाले, जिंकलंस पोरी!