आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिस डिफेन्‍स मिनिस्‍टर!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निर्मला सीतारामन यांची देशाच्या संरक्षणपदी झालेली निवड, हा गेल्या रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ फेरबदलातील सर्वात चर्चेचा विषय ठरला. ​या निर्णयावर उलटसुलट प्रतिक्रियाही नोंदवल्या गेल्या. निर्मला सीतारामन यांची निवड, या निवडीचा अर्थ आणि त्यांच्यासमोरची आव्हाने, याचा हा वेध...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. अर्थातच सुरेश प्रभू यांच्यासारख्या विश्वासू सहकाऱ्याचे खाते बदलणे असो, काही नव्या चेहऱ्यांना संधी असो की ज्येष्ठ मुरब्बी राजकारणी असलेल्या कलराज मिश्रा यांच्यासारख्या नेत्याला दिलेला डच्चू असो, विस्ताराचा हा सारा खटाटोप मंत्रिमंडळाची कामगिरी सुधारणे, वयोवृद्ध वा अपेक्षेपेक्षा कमी कार्यक्षमता असलेल्यांना रजा देणे, कार्यक्षम असलेल्यांना अधिक संधी देणे, यासाठी तर आहेच, पण त्याबरोबरच २०१९च्या निवडणुकांचा विचारही त्यामागे आहे, हे विसरून चालणार नाही.

या विस्ताराच्या वेळी राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमधून बाहेर पडलेल्या पत्रकारांमध्ये आणि एकूणच उपस्थितांमधे सर्वाधिक चर्चा झाली, ती निर्मला सीतारामन यांच्या निवडीची. अर्थात, अशी चर्चा होण्याला कारणही तसेच होते. देशाच्या इतिहासात निर्मला सीतारामन या आजवर संरक्षणमंत्रिपद भूषवलेल्या केवळ दुसऱ्या महिला आहेत. याआधी इंदिरा गांधी यांनी दोन वेळा संरक्षण खात्याचा अतिरिक्त कार्यभार (१९७५ मध्ये आणि १९८०) सांभाळला होता. त्या अर्थाने, सीतारामन पूर्णवेळ संरक्षणमंत्री असलेल्या पहिल्या महिला आहेत, असे म्हटले तर वावगे होणार नाही.
एखाद्याला सामाजिक न्यायमंत्री वा महिला बालकल्याणमंत्री केले की, त्याची जात विचारात घेणे वा महिला बालकल्याण क्षेत्रात केलेले काम काय, अशी विचारणा करणे, हे जितके स्वाभाविक तितकेच संरक्षणमंत्री असलेल्या व्यक्तीच्या नियुक्तीनंतर त्याबद्दलही उलटसुलट प्रतिक्रिया वा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.  असे प्रश्न उपस्थित करताना निर्मला सीतारामन यांच्या अर्हतेबद्दल वा क्षमतेबद्दल हे प्रश्न उपस्थित केले जातात का आणि मुळात असे प्रश्न उपस्थित करताना पुरेशा बुद्धिप्रामाण्यवादी पद्धतीने  केले जातात का, हा खरा प्रश्न आहे.

निर्मला सीतारामन वास्तविक मूलतः राजकारणी नाहीत. तिरुचेरापल्लीसारख्या गावात बालपण आणि शालेय शिक्षण घेतलेल्या सीतारामन यांनी तिरुचेरापल्लीतूनच अर्थशास्त्र विषयाची पजवी संपादन केली आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी त्या गेल्या, नवी दिल्लीच्या प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठात. अर्थात, निर्मला सीतारामन एमए अर्थशास्त्र करून एमफिलपर्यंत शिकल्या आणि थेट लंडनला गेल्या. तेथे अॅग्रीकल्चरल इंजिनिअर्स असोसिएशनमध्ये त्यांनी काही काळ काम केले आणि मग त्या नावाजलेलल्या ‘प्राइसवॉटर कूपर’ कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम केले. ते करताना त्यांची जबाबदारी संशोधन आणि विश्लेषणाची होती. लंडनच्या वास्तव्यात त्यांनी काही काळ बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसमधेही काम केले. 

लंडनमधून परतल्यावर त्यांनी हैदराबादमधे पब्लिक पॉलिसी स्टडीजमधे उपसंचालक म्हणून काम केले. दरम्यान, त्यांनी एक शाळाही सुरू केली होती. २००३ ते २००५ या काळात त्यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या म्हणूनही निवड झाली होती. त्यानंतर २००८ मध्ये त्यांची भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. त्या कामाची पावती म्हणून २०१४ च्या निवडणुकीनंतर त्यांना केंद्रात मंत्रिपद देण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनी मंत्रिमंडळ विस्तार करताना आपल्या सर्व मंत्र्यांचे काम, काम करण्याची पद्धत जवळून बघितली आहे. त्यामुळे विस्तार करताना संरक्षण खाते हे विश्वासू आणि त्याबरोबरच क्षमता असलेल्या व्यक्तीकडे सोपवले जाईल, असाच अंदाज व्यक्त केला जात होता. त्यामुळेच सुरेश प्रभू यांच्या नावाची चर्चा केली जात होती. सीतारामन यांची या पदावर नेमणूक करून मोदी यांनी दोन संदेश दिले आहेत. एक तर सीतारामन यांच्या क्षमतेवर मोदी यांचा विश्वास आहे, हे या निवडीने सिद्ध झालेय आणि दुसरे म्हणजे, जीवनाच्या सर्व क्षेत्रांत महिला धडाडीने काम करू शकतात, यावरही या सरकारचा विश्वास आहे, हा दुसरा संदेश आहे. 

अर्थात, एक सीतारामन संरक्षणमंत्री झाल्या म्हणून देशातल्या सर्व महिला सक्षम झाल्या, असे समजणे भाबडेपणाचेच ठरेल. मात्र, सीतारामन यांच्या निवडीमुळे एक प्रकारचा महिला सक्षमीकरणाचा संदेश जातोच, हेही विसरून चालणार नाही. 

संरक्षणमंत्री म्हणून आज सीतारामन यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. एकीकडे सीमाभागावर तणाव आहे. पाकिस्तान छुप्या युद्धातून माघार घ्यायला तयार नाही, तर दुसरीकडे चीनने उघडउघड संघर्ष सुरू केलाय. सिक्कीम सीमेवर डोकलाम भागातला तणाव शस्त्रसंधीमुळे तात्पुरता निवळलाय, असेच आत्ता तरी दिसतेय. तो संघर्ष पुन्हा डोके वर काढणार नाही, याची खात्री नाही.

भारताच्या सीमांबरोबरच संरक्षण विभागांचे म्हणून काही प्रश्न आहेत.  त्यामधे संरक्षण दलांचे आधुनिकीकरण, संरक्षण संशोधन आणि विकास संघटना वा डीआरडीओची पुनर्रचना, संरक्षण दलांमधे महिलांचा सहभाग वाढवण्यास झालेली सुरुवात लक्षात घेता, ती आणखी गतीने वाढवणे, पारंपरिक युद्धाबरोबरच आणि एनबीसी वा आण्विक-जैविक आणि रासायनिक युद्धाबरोबरच २१ व्या शतकातल्या युद्धासाठी म्हणजेच सायबर आणि आयटी म्हणजेच माहिती-तंत्रज्ञानाधारित युद्धासाठी देशाला संरक्षणसिद्ध बनवणे, ही सारी आव्हानेही सीतारामन यांच्यापुढे आहेत.

सीतारामन अर्थशास्त्राच्या अभ्यासक आहेत. त्याबरोबरच प्रवक्ता म्हणून काम करताना अतिशय शांतपणे पण मुद्देसूद, ठामपणे आपले म्हणणे मांडणे, या गुणांचा प्रत्यय त्यांनी दिला आहे. व्यापारमंत्री म्हणून त्यांची कामगिरी निश्चितच लक्षणीय आहे. गेल्या तीन वर्षांत पाच देश वगळता संपूर्ण जगभर ‘निगेटिव्ह इन्व्हेस्टमेंट’ असताना देशात थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ कायम ठेवणे, ही कामगिरी सीतारामन यांनी करून दाखवलीय. ‘मेक इन इंडिया’ त्यासाठी कारणीभूत आहेच आणि पंतप्रधान मोदी यांच्या ज्या जगभरच्या दौऱ्यांची खूप टीका केली गेली, त्याचाही वाटा या थेट विदेशी गुंतवणुकीत आहेच, पण निर्मला सीतारामन यांनी वाणिज्य वा व्यापार मंत्रालयाला दिलेले नेतृत्व, हेही महत्त्वाचे कारण आहे. 
संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणामधे वेस्टलँड सी-किंग आणि फ्रेंच बनावटीची चेतक हेलिकॉप्टर्स बदलून त्याऐवजी नवीन दोन-अडीचशे हेलिकॉप्टर्स घेण्याचा विषय असो की लढाऊ विमान बांधणी असो, महिलांना संधी देण्याचा विषय असो की दारूगोळा कारखान्यांच्या संपूर्ण फेररचनेचा सुधारणेचा विषय असो, सीतारामन त्यांच्या अंगभूत गुणांनिशी, आजवरच्या कारकीर्दीत कमावलेल्या अनुभवाच्या आधारे संरक्षण खात्याला न्याय देऊ शकतील, असे तुर्तास वाटते. 

अर्थात, केवळ मोदींनी निवड केलीय म्हणून त्या यशस्वी होतील, असे म्हणणे योग्य नाही, कारण मनोहर पर्रीकर यांनी स्वतःच मंत्रिपद सोडण्याची इच्छा व्यक्त करून गोव्याला जाणे पसंत केले होते. त्यामुळे सीतारामन यांच्याबद्दल अपेक्षा ठेवणे योग्य आहेच, पण त्यांची थेट इंदिरा गांधी यांच्याशी तुलना करणेही तितकेसे योग्य ठरणार नाही. मात्र, आजमितीस जवळपास १६ राष्ट्रांमध्ये संरक्षण खात्याचा कार्यभार सांभाळत असलेल्या महिलांमधे सीतारामन स्वतःचे असे स्थान निर्माण करतात का, देशाच्या त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करतात का आणि खंडप्राय म्हणूनच चारी बाजूंनी आव्हानांना सामोऱ्या जाणाऱ्या भारताचे संरक्षणमंत्रिपद भूषवणाऱ्या दुसऱ्या महिला मंत्री होतानाच, पूर्णवेळ असलेली आणि देशाला गौरव वाटेल, अशी कामगिरी करून आपला ठसा उमटवण्यात सीतारामन यशस्वी होतात का, हे येणारी दोन वर्षेच ठरवतील.

- शैलेंद्र परांजपे
shailendra.paranjpe@gmail.com
बातम्या आणखी आहेत...