आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एके टु पीके

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
"धूम-३' सारखा व्यवसायाची गणितं मांडून तयार झालेला चित्रपट असो वा "पीके'चं लक्षवेधी पोस्टर असो; कोणतीही कृती करण्यापूर्वी आमिर खान खूप विचार करतो. अगदी नको तेवढा चिकित्सकपणा दाखवतो, प्रत्येक गोष्टीत नको तितकी मानसिक-भावनिक गुंतवणूक करतो, स्वत:च्या प्रतिमेला प्राणापलीकडे जपतो, आणि मुख्य म्हणजे स्वत:च्या बुद्धिवादी प्रतिमेचा चाणाक्षपणे वापर करतो, हे त्याचे चित्रपटसृष्टीतले प्रशंसकही मान्य करतात...

शाहरुख खान आणि सलमान खान हे आमिर खानचे समवयस्क कलावंत. पैकी शाहरुखची प्रतमिा पूर्ण धंदेवाईक, तर सलमानची ओळख धंदेवाईक पण दिलदार स्टार, अशी. आमिरच्या तुलनेत दोघांचा समाजाशी असलेला कनेक्ट भिन्न पातळीवरचा. त्यात शाहरुख सुपरस्टार म्हणून व्यावसायिक पातळीवर अधिक जोडला गेलेला, तर सलमान भावनिक पातळीवर प्रेक्षकांशी एकरूप झालेला. पण आमिरचे समाजाशी जोडले जाणे, हे भावना आणि व्यवसायापेक्षा वैचारिक पातळीवरचे अधिक. गंमत म्हणजे, शाहरुख, सलमान आणि आमिर या तिघांचीही कारकीर्दीची सुरुवात ज्याला आपण टिपिकल बॉलीवूडपट म्हणतो, तशा चित्रपटांनी झाली. कयामत से कयामत तक, मैंने प्यार किया आणि दीवाना हे तिन्ही चित्रपट मुख्यत: नाट्यमय प्रेमकथा होत्या. तिघांचाही फ्रेश अपियरन्स हाच त्या चित्रपटांचा युनिक सेलिंग पॉइंट होता. या तिघांच्याही आगमनाने चित्रपटसृष्टीत नव्या पिढीची रुजुवात झाली होती, हे खरे. पैकी शाहरुख-सलमानची आवड-निवड, त्यांचे चित्रपट यात प्रारंभापासूनच सामाजिक भान वा सामाजिक संदेश जाणीवपूर्वक झळकत नसल्याने कदाचित; पण व्यावसायिक यश मिळूनही विचारी माणसाचं वलय दोघांच्याही वाट्याला कधी आलं नाही. आमिरची मात्र प्रारंभापासूनच ‘इंटलेक्चुअल अॅक्टर’ अशी प्रतिमा तयार झाली. अर्थात, ही प्रतिमा तयार होण्यात प्रारंभापासूनच त्याला मदत झाली, ती ग्रंथवाचनाच्या छंदाची, सुस्पष्ट विचारांची आणि सामाजिक प्रश्नांबाबत अंगी असलेल्या सजगतेची. हिंदी चित्रपटसृष्टीतल्या नट-नट्यांमध्ये ग्रंथवाचनाची फारशी परंपरा नसल्यामुळे, बहुतांशी नट-नट्या समाजाशी फटकून वागत असल्याने आणि त्यांच्यात विचारांच्या पातळीवर प्रगल्भता नसल्यामुळे इतरांच्या तुलनेत आमिर चारचौघांत उठून दिसला. बुद्धिवाद्यांच्या वर्तुळात त्याला मानाचे स्थान मिळत गेले.

चित्रपट असो, सहकलाकार असो, वा माध्यम प्रतिनिधी; निवडीच्या बाबतीत आमिर प्रारंभापासूनच खूप सावध राहिला. एखादा चित्रपट स्वीकारण्यापूर्वी बांधीव पटकथेची मागणी त्याने केलीच; पण स्वत:च्या व्यक्तिरेखेची आधी नट म्हणून, मग प्रेक्षक म्हणून आणि शेवटी टीकाकार म्हणून चिकित्सा करण्याचा तसंच निर्मात्याकडे असलेले आर्थिक स्रोत तपासूनच चित्रपट साइन करण्याचा नियम त्याने प्रारंभापासूनच काटेकोरपणे पाळला. जसे एका टप्प्यानंतर ऊठसूट त्याने कुणाचेही चित्रपट साइन केले नाहीत, तसे तो येणाऱ्या प्रत्येक पत्रकाराला मुलाखत द्यायलाही राजी झाला नाही. पण ज्यांच्याशी त्याचे सूर जुळले, त्या बहुतेकांना त्याच्या ग्रंथप्रेमाने विशेषकरून आकर्षित करून घेतले. त्यातूनच आमिर रोज रात्री झोपण्यापूर्वी पुस्तकाची कमिनन दहा पाने वाचतो... आमिरला दोन शॉटच्या दरम्यान इतरांप्रमाणे थिल्लरपणा करण्याऐवजी पुस्तकाचे वाचन करणे आवडते... हॉवर्ड फास्ट, सांता अन्तोनी हे लेखक त्याचे आवडते आहेत, अशा प्रकारच्या गोष्टी प्रसृत होऊ लागल्या. पुस्तके वाचतो, अत्यंत गंभीरपणे बुद्धिबळ खेळतो म्हणजे आमिर खान नावाचा हा नट विचारी आहे, असा संदेशही सर्वदूर पसरत गेला.

हा संदेश आमिरच्या वाचनसवयीचा सन्मान करणारा होता, यात शंका नाही. पण या तुलनेत, सलमान खान किंवा शाहरुख खान पुस्तके वाचतात का, वाचत असतील तर कोणत्या प्रकारची पुस्तके वाचतात, त्यांचा आवडता लेखक वा लेखिका कोण, बुद्धिबळाशी त्यांचा कधी संबंध आला की नाही, याची कधीही प्रसारमाध्यमांतून चर्चा झाली नाही. किंवा चित्रपट साइन करण्यापूर्वी सलमान, शाहरुख आमिर खानप्रमाणेच संपूर्ण पटकथेची मागणी करतात वा नाही, किंवा दिग्दर्शक वा पटकथाकार यांच्याशी गांभीर्यपूर्वक चर्चा करतात वा नाही, अशा कथाही कधी माध्यमांतून चर्चिल्या गेल्या नाहीत. अपवाद वगळता सामाजिक-राजकीय प्रश्नांवर सलमान-शाहरुखने ठोस भूमिका कधी मांडली नाही. न पेक्षा कायद्याला आव्हान देणाऱ्या दखलपात्र गुन्हेगारी घटनांशीच दोघांची नावे जोडली गेली. एकूणच, दिग्दर्शक वा पटकथेबाबत आमिर खूप सावध आणि सजग असतो, सामाजिक प्रश्नांबाबत संवेदनशील असतो आणि महत्त्वाचे म्हणजे कायद्याचा सन्मान करतो, हे कृतीतून झळकत गेल्याने काळागणिक त्याची बुद्धिवादी ही प्रतमिा अधिक लखलखीत होत गेली. याच प्रतिमेचा खुबीने वापर करत त्याने वेळोवेळी इतरांना न जमणारे व्यावसायिक पातळीवरचे धाडसी निर्णयही (लगान, तारे ज़मीन पर, पीपली लाइव्ह, सत्यमेव जयते, पीकेचे बहुचर्चित पोस्टर आदींची निर्मिती) घेतले. पडद्याबाहेरच्या आयुष्यात अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला जाहीर समर्थन देण्याची आणि विस्थापितांवर अन्याय होत आहे हे बघून नर्मदा बचाओ आंदोलनाची बाजू घेत ताकदवान मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींच्या विरोधात जाण्याची हिंमतही त्याने दाखवली. आमिरच्या या भूमिकेमुळे त्या वेळी प्रदर्शित होऊ पाहणाऱ्या ‘फना’ चित्रपटावर गुजरातमध्ये अघोषित बंदी घातली गेली, पण आमिर बधला नाही. निर्मात्याला त्याने पडते घेऊ दिले नाही. बंदीचे आव्हान स्वीकारत ‘फना’ यशस्वी झाला, तेव्हा गुजरातने बंदी घालूनही फना सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरल्याची जाहिरात वर्तमानपत्रांतून दणक्यात झळकली. मध्यंतरी विक्रम सेठ, हिलरी क्लिंटन यांसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त व्यक्तींसोबत स्टेज शेअर करण्याचा मानही त्याने मिळवला. त्यामुळे त्याच्या बुद्धिवादी असण्याला आगळेवेगळे वलय प्राप्त झाले.
हे खरे की, कौटुंबिक पार्श्वभूमी सुस्थापित असल्यामुळे निवडीच्या बाबतीत स्वातंत्र्य घेण्याचे सुख त्याच्या वाट्याला कारकीर्दीच्या प्रारंभापासूनच आले होते. परंतु असे स्वातंत्र्य घेताना वेगवेगळ्या टप्प्यावर इतरांप्रमाणे तोही अनेकदा मोहजालात अडकला होता. त्याचमुळे अनेकदा त्याच्या विचारी प्रतिमेला तडेही गेल्याचे दिसले होते. आज खरं तर कुणी याची चर्चा करत नाही, परंतु प्रत्येक गोष्ट तोलून मापून घेणाऱ्या आमिरने एकेकाळी लव्ह लव्ह लव्ह, तुम मेरे हो, अव्वल नंबर यांसारखे अत्यंत टुकार चित्रपट केले होते. प्रत्येक वेळी बाउंड स्क्रिप्टची मागणी करणाऱ्या, कथा-पटकथेबाबत काटेकोर असणाऱ्या आमिरने त्याही वेळी इंद्रकुमार, धर्मेश दर्शनसारख्या गल्लाभरू सामान्य दर्जाचे चित्रपट देणाऱ्यांसोबत कामही केलं होतं. पण, तरीही असे चित्रपट करण्यामागे माझा निश्चित असा विचार असतो, कधी तो फसतो कधी यशस्वी ठरतो, हेही तो वेळोवेळी एक प्रकारची पोझ घेत सूचित करत आला होता. परंतु टुकार चित्रपट करण्यामागे कसला आलाय विचार, अशी टीकाही त्याच्यावर झाली होती. पीकेच्या पोस्टरच्या निमित्ताने नेमके तेच घडले. पण ‘सत्यमेव जयते’ची निर्मिती असो, ‘धूम-३’सारखा व्यवसायाची गणितं मांडून तयार झालेला चित्रपट असो, वा ‘पीके’चं लक्षवेधी पोस्टर असो, कोणतीही कृती करण्यापूर्वी आमिर खूप विचार करतो. अगदी नको तेवढा चिकित्सकपणा दाखवतो, प्रत्येक गोष्टीत नको तितकी मानसिक-भावनिक गुंतवणूक करतो, स्वत:च्या प्रतिमेला प्राणापलीकडे जपतो, आणि मुख्य म्हणजे स्वत:च्या बुद्धिवादी प्रतिमेचा चाणाक्षपणे वापर करतो, हे त्याचे चित्रपटसृष्टीतले प्रशंसकही मान्य करतात. धक्कातंत्राचा यशस्वी वापर असलेल्या पीकेच्या पोस्टरसंदर्भात वेगळे घडले नसणार. पोस्टरची थीम ठरवताना, स्वरूप निश्चित करताना त्याने इतरांसोबत हजारदा अनेक अंगांनी विचार केला असणार, किंवा संबंधितांना तशा प्रकारचे विचार करायला भाग पाडले असणार. लहान मुलांपासून वयाने ज्येष्ठ असलेल्या चाहत्यांची प्रतिक्रिया काय असू शकते, हे त्याने प्रथम खासगी पातळीवर आजमावले असणार आणि मगच निर्मात्याला असे पोस्टर तयार करण्यासाठी आणि ते प्रसिद्ध करण्यासाठी ग्रीन सिग्नल त्याने दिला असणार, अशीही खात्री या प्रशंसकांना आहे.