आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुरूष नसबंदीचे कीर्तन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संततिनियमन म्हटलं की, सगळ्यात शेवटी लक्षात येणारा मुद्दा म्हणजे पुरुषांची बिनटाका शस्त्रक्रिया. बऱ्याचदा तो विचारातही घेतला जात नाही. म्हणूनच आज आपल्या अभ्यंकरबुवांनी याच विषयावर कीर्तन करायला घेतलंय, त्याचा आनंद लुटूया.

एनएसव्ही म्हणजे नॉन स्काल्पेल व्हॅसेक्टॉमी, पुरुषांची बिनटाका शस्त्रक्रिया. स्त्रियांच्या शस्त्रक्रियेशी तुलना करता ही कितीतरी चांगली आहे. पण अजिबातच लोकप्रिय नाही. उलट जरा बदनामच आहे. 
कीर्तन हे लोकशिक्षणाचं पूर्वापार माध्यम. एनएसव्हीची माहिती देणारं आणि महती गाणारं हे कीर्तन. 
काही अभंग, आर्या, गाणी यांच्यातल्या शब्दांची मोडतोड करून ते इथे वापरले आहेत; कीर्तनाचा ‘कीर्तन’पणा शाबूत राहावा म्हणून. तेवढा गुन्हा पोटात घालावा ही नम्र विनंती.
तर...
पेटी, तबला, टाळ, चिपळ्या असा मेळ जमला आहे. पेटीतबल्याच्या एखाद्या झोकदार सुरावटीनंतर भजन सुरू होते. 
राम, राम, राम, राम, सीताराम सीताराम
राम, राम, राम, राम, सीताराम सीताराम
बोला पुंडलिक वरदा, हाsssरी विठ्ठल
श्री ज्ञानदेsssव तुकाsssराम, पंढरीनाथ महाराज की जय
नाही गायनाचा गळा, नाही अभिनयाच्या कळा,
परी उभा कीर्तना, अभ्यंकरांचा शंतनू
तेव्हा मंडळी हे असं आहे, आम्हाला ना गाता येतं ना अभिनय करता येतो, पण... 
‘परी उभा कीर्तना, अभ्यंकरांचा शंतनू’
अहो कीर्तन करणं म्हणजे महाकर्मकठीण काम. एक वेळ चित्र काढणं सोपं. रंगाचे चारदोन फटकारे इकडून तिकडे ओढले की काम झाल. 
एक वेळ नृत्य करणं सोप, तबल्याच्या ठेक्यावर जरा हात, पाय,  मान, कंबर हलवली की काम झालं. 
नाटक करणंही सोपं आहे बरं, अहो दुसऱ्यांनी लिहिलेली वाक्यं घडाघडा पाठ म्हणून दाखवली की काम झालं. 
आणि चित्रपट काढणं तर सर्वात सोपं. तिथे कपडे सांभाळायला वेगळा माणूस आहे, तोंड रंगवायला वेगळा माणूस आहे, गाणारा भलताच आहे, फोटो काढणारा आणखी वेगळा आहे, तुमच्याऐवजी साहसे साकारणारा वेगळा आहे, दिग्दर्शक आहे, कला दिग्दर्शक आहे, संगीत दिग्दर्शक आहे, नृत्य दिग्दर्शक आहे, इतकंच काय, मारामारीसाठीही वेगळा दिग्दर्शक आहे.
पण कीर्तनाचं तसं नाही. अहो कीर्तन करायचं म्हणजे...
वाणी शुद्ध हवी, विचार उत्तम हवेत, शब्दोच्चार स्पष्ट हवेत, भाषा ओघवती हवी आणि वक्तृत्व अमोघ हवं, अवांतर वाचन हवं आणि पाठांतर दांडगं हवं. तुम्हाला गाता यायला हवं, तुम्हाला बजावता यायला हवं, थोडं नृत्यही आलं तरी चालेल. (बुवा नाचूनही दाखवतात.)
नामदेवांनी म्हटलेलंच आहे, 
‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी
सर्व सांडुनी माघारी, वाटे विठ्ठल रखुमाई,  
परेहून परते घर, तेथे राहू निरंतर’
पण आम्ही तर सुरुवातीलाच सांगून टाकलंय...
नाही गायनाचा गळा, नाही अभिनयाच्या कळा,
परी उभा कीर्तना, अभ्यंकरांचा शंतनू
मग आता तुम्ही असं विचाराल मंडळी, की हे भलतं धाडस आम्ही केलंच कसं? याचं कारण आजच्या आख्यानाचा विषय. अहो मोरोपंतांनी म्हटलेलं आहे,
‘सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो 
कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो.’
पण आम्ही म्हणतो,
एनएसव्ही सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो
कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा आवडो।
तुम्ही म्हणाल, ही एनएसव्ही काय भानगड आहे? आणि ‘विषय सर्वथा नावडो’चा आम्ही ‘आवडो’ कसा काय केला? कोणत्या अधिकारात केला? मायबाप हो, एवढा अपराध पोटात घालावा. हे आम्ही का केलं ते सविस्तरपणे उत्तररंगात सांगणारच आहे, पण उत्तररंगात चंचुप्रवेश करण्यापूर्वी, पूर्वरंगाची अखेर नामस्मरणाने व्हायला हवी, अहो परंपराच आहे तशी. 
तेव्हा म्हणा...
राम, राम, राम, राम, सीताराम सीताराम
बोला पुंडलिक वरदा, हारी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय
(बुवा हार घालून घेतात, बुक्का लावला जातो, तबक फिरवलं जातं)
उत्तररंगात परंपरा मोडण्याबद्दल मी बरंच काही सांगणार आहे. तेव्हा नामस्मरणापेक्षा थोड्या वेगळ्याच ढंगात उत्तररंगाचे सुरवात करू या. म्हणा...
राम राम सीताराम म्हणता म्हणताच बुवा मधूनच पुढील ओळी गातात.
नको नको नको नको, ट्युबेक्टॉमी नको नको
नको नको नको नको ट्युबेक्टॉमी नको नको
ट्युबेक्टॉमी म्हणजे बायकांचे नसबंदीचे ऑपरेशन. जसं मघाशी मी सांगितलं की, एनएसव्ही हे पुरुषांचे तसे हे बायकांचे. तर माझं म्हणणं असं की....
नको नको नको नको, ट्युबेक्टॉमी नको नको
... आणि आता पुंडलिक वरदाच्या चालीत...
बोला... एनएसव्ही ऑपरेशsssन  कराsssरे मित्रांनो
साधे-सोपेsss आराsssमात - बिनटाका शस्त्रक्रिया की जय - पुरुषनसबंदी की जय.
आलं का लक्षात मित्रांनो, आज आख्यान लावलंय ते पुरुष नसबंदीचं आणि या आख्यानासाठी कथा निवडली आहे भारतमातेची.
फारफार वर्षांपासून, नव्हे शतकानुशतकं भारतमाता नामेकरून एक मोठी देवता या भूतलावर वास करून आहे. कशी आहे ही? 
वंदे मातरम् गाऊन त्यातील वर्णन विशद करून सांगतात. मोठी जगन्मान्य देवता आहे ही. अहो हजारो वर्षांच्या हिच्या इतिहासात हजारो दैत्यांनी हिच्यावर घाला घातला, पण ही बधली नाही. उलट यातल्या बऱ्याचशा हल्लेखोरांना हिनी आपलंसं केलं. इक्बालनी म्हणूनच ठेवलंय,
कुछ बात है के हस्ती, मिटती नहीं हमारी 
सदियों रहा है दुश्मन, दौर-ए-जमाँ हमारा
सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्तां हमारा
तर अशी ही भारतमाता, हिच्यावर एकदा लोकसंख्यासुर नावाच्या राक्षसाने जोरदार हल्ला केला. आधी व्हायचं काय की, भरपूर संतती जन्मायची आणि त्यातली भरपूर मरायची. पण पुढेपुढे अन्नपाणी सुधारलं, साथी कमी झाल्या, आणि माणसं चांगली म्हातारी होईपर्यंत जगू लागली. पण इथेच अडचण आली. या लोकसंख्यासुराची भूक भयंकर, इतक्या सगळ्या प्रजेच्या पोटाला काय घालायचं हा प्रश्न पडला, इतक्या सगळ्यांनी खायचं काय, ल्यायचं काय, इतक्या सगळ्या हातांना काम काय, इतक्या सगळ्या डोक्यांना शिक्षण कसं द्यायचं, एक ना अनेक प्रश्न. हा लोकसंख्यासुर आता भारतमातेचेच लचके तोडायला लागला. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणतात ना ते हे असं.
भारतमातेच्या पोटी, लेकरे कोटी कोटी... अशी अवस्था झाली आणि 
समर्थांनी म्हटलेलंच आहे,
लेकुरे उदंड झाली, ते तो लक्ष्मी निघोनी गेली;
बापुडी भिकेस लागली, काही खाया मिळेना.
लेकुरे खेळती धाकुटी, येके रांगती येके पोटी, 
ऐसी घरभरी झाली दाटी, कन्यापुत्रांची.
पण भारतमाता हरली नाही, ती डरली नाही, ती लढायला सिद्ध झाली. रघुनाथ धोंडो कर्वे, म्हणजे आपल्या भारतरत्न धोंडो केशव कर्व्यांचे चिरंजीव बरं, हे तिचं लेकरू, तिच्या मदतीला धावलं. इतरही अनेक होते. मग भारतमातेची लेकरं, लोकसंख्या नियंत्रणाच्या मागे लागली. पण तिथेही तऱ्हेतऱ्हेच्या लोकांचे तऱ्हेतऱ्हेचे सल्ले...
संत म्हणाले, संयम पाळा, 
महंत म्हणाले, मोजके दिवस टाळा
सज्जन म्हणाले, बाहेरच गाळा, 
धर्ममार्तंड म्हणाले, चूप, अहो बोलता काय, तुमच्या जिभेला काही हाड? जाऊ दे, हा विषयच टाळा
सामान्यजन सगळ्यात हुशार, ते म्हणाले, तुमचं ठरलं की सांगा तोवर, आमचा चालू दे कामुक चाळा
मग डॉक्टर आले, संशोधक आले, समाजसेवक आले, मायबाप सरकारही मदतीला धावले.
कुणी म्हणाले निरोध वापरा, कुणी म्हणाले तांबी बसवा, कुणी म्हणाले गोळ्या खा किंवा इंजेक्शने घ्या, आणि कुणी म्हणाले,
आधी प्रपंच करावा नेटका,
व्हावी इप्सित संतती बरंका
पण मग साधता आकडा नेमका
मार्ग आप्रेशनचा धरावा
पण हे करायचं कुणी??
यातला निरोध वापरायचा... बाप्यांनी
पण...
तांबी??? बायांनी वापरायची
गोळ्या??? बायांनी खायच्या
इंजेक्शने??? बायांना टोचायची...
आणि आप्रेशने???... तीही बायांचीच करायची.
का म्हणून? सांगा ना, का म्हणून??? अहो निसर्गानी मूल होऊ द्यायची जबाबदारी स्त्रियांवर टाकलेलीच आहे, त्यात आपण काही बदल करू शकत नाही मग मूल न होण्याची तरी जबाबदारी पुरुषांनी घ्यायला नको का? 
(पूर्वार्ध)
 
- डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई shantanusabhyankar@hotmail.com
बातम्या आणखी आहेत...