Home | Magazine | Madhurima | Shantanus Abhyankar Write about Sterilization

पती सुखे व्‍हावे पाणी

डॉ. शंतनू अभ्यंकर | Update - Oct 10, 2017, 12:01 AM IST

पुरुष नसबंदीच्या आख्यानाचा पूर्वरंग तर चांगलाच रंगला. आज पाहू डाॅ. अभ्यंकरबुवा उत्तररंगात या महत्त्वाच्या पण दुर्लक्षित

 • Shantanus Abhyankar Write about Sterilization
  पुरुष नसबंदीच्या आख्यानाचा पूर्वरंग तर चांगलाच रंगला. आज पाहू डाॅ. अभ्यंकरबुवा उत्तररंगात या महत्त्वाच्या पण दुर्लक्षित मुद्द्याविषयी आणखी काय माहिती देताहेत
  विश्व रागे झाले वन्ही, पुरुष सुखे व्हावे पाणी
  शब्द शस्त्र झाले क्लेश, पुरुषी मानावा उपदेश।।
  या पुरुषप्रधान संस्कृतीने बायकांवर फार फार अत्याचार केले आहेत, काही कळत, काही नकळत. बायकांसाठी हे विश्व वणवा झालं आहे.
  विश्व रागे झाले वन्ही.
  मग अशा वेळी पतींनी काय केलं पाहिजे?
  विश्व रागे झाले वन्ही, पती सुखे व्हावे पाणी.
  या वणव्यात पतीने पाणी व्हायचं आहे. मुलं न होऊ द्यायची जबाबदारी स्वतःवर घ्यायची आहे. लोक म्हणतील, आलाय मोठा बायकोवर प्रेम करणारा! कविवर्य पाडगावकरांना भेटला होता असा एक माणूस, म्हणाला,
  “आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही,
  पाच मुलं झाली तरी प्रेमबीम कधीसुद्धा केलं नाही
  आमचं काही अडलं का? प्रेमाशिवाय नडलं का?”
  तेव्हा पाडगावकर त्याला एवढंच म्हणाले,
  प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
  पण तुमचं आणि आमचं अगदी सेम नसतं!
  तेव्हा कुणीही काहीही म्हणू द्या, जर तुमचं तुमच्या बायकोवर खर्रंखुर्रं प्रेम असेल तर लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा, उलटून बोलू नका. उलट लोकांचे हे शब्द, हे शस्त्र झालेले शब्द, हे बोल ही संधी माना, त्यातून बोध घ्या.
  विश्व रागे झाले वन्ही, पती सुखे व्हावे पाणी
  शब्द शस्त्र झाले क्लेश, पती मानावा उपदेश
  ...आणि हे निव्वळ भावनिक आवाहन नाही बरं. मी म्हणतो त्याला वैद्यकनीतीचा, वैद्यकरीतीचा, वैद्यकशास्त्राचा आणि वैद्यकविवेकाचा भरभक्कम आधार आहे. पुरुषांचं हे ऑपरेशन सोपं आहे. बायकांचं ऑपरेशन, महाकर्मकठीण. बायकांचं एकूणच सगळं अवघडच असतं म्हणा. पुरुषांच्या या ऑपरेशनमध्ये आता बिनटाक्याची पद्धत आली आहे. नॉनस्काल्पेल व्हॅसेक्टॉमी म्हणजेच एनएसव्ही म्हणतात त्याला. म्हणूनच तर मी म्हणालो,
  नको नको नको नको ट्युबेक्टॉमी नको नको
  (... आणि आता पुंडलिक वरदाच्या चालीत)
  बोला... एनएसव्ही ऑपरेशsssन कराsss रे मित्रांनो
  साधे सोपेsss आराsssमात
  बिनटाका शस्त्रक्रिया की जय
  पुरुष नसबंदी की जय.
  एनएसव्ही वरच्या वर करता येतं, ‘ये बाहर की बात है.’ बायकांच्या ऑपरेशनसाठी पोट उघडावं लागतं, ‘ये अंदर की बात है.’ यामुळे पोटात इन्फेक्शन, आतडी, मूत्राशय, वगैरेला इजा असे धोके टळतात. स्त्री नसबंदीच्या प्रत्येक केसमध्ये ती स्त्री हे दोन्ही धोके पत्करत असते. बायकांचं अगदी बिनटाक्याचं ऑपरेशनही, पुरुष नसबंदीपेक्षा किती तरी पटींनी गुंतागुंतीचं आणि धोक्याचं आहे. पण लक्षात कोण घेतो? संसाराच्या रामरगाड्यात वैतागलेल्या बायकोचा विचार कोण करतो? तेव्हा माझं सांगणं एवढंच आहे की,
  अनुदिन अनुतापे तापल्या बायका ह्या
  परमदीनदयाळा निरसी मोह माया
  अचपळ मन तूझे नावरे आवरिता
  एनएसव्हीत शीण नाही, धाव रे धाव आता
  एनएसव्हीत शीण नाही, एनएसव्हीबाबतच्या शंकाकुशंकांनी अचपळ झालेलं तुझं मन आवर आणि एनएसव्ही सेंटरकडे धाव. बायकोला ऑपरेशन करून घ्यायला, ट्युबेक्टॉमी करून घ्यायला भाग पाडू नकोस, ती करते म्हणाली तर तू नको म्हण.
  नको नको नको नको ट्युबेक्टॉमी नको नको
  (... आणि आता ‘पुंडलिक वरदा’च्या चालीत...)
  बोला... एनएसव्ही ऑपरेशsssन कराsss रे मित्रांनो
  साधे सोपेsss आराsssमात
  बिनटाका शस्त्रक्रिया की जय
  पुरुष नसबंदी की जय.
  तर अशी ही बहुगुणी एनएसव्ही लिंगाच्या थोडं खाली अर्ध्या सेंटिमीटर छेदातून करता येते. अहो, हा छेद घ्यायला पातं, म्हणजे ब्लेडसुद्धा लागत नाही. इतका छोटा छेद की हा बंद करायला टाका घ्यायला लागत नाही. थेंबभरसुद्धा रक्त वाहत नाही आणि कोणतीही खूण राहत नाही.
  बूंद ना गिरा एक लहू का, कछु ना रही निसानी,
  नाsss लागी, ‘नस’पे कटार!
  सगळी भूल द्यायची गरज नसते. जागेवर भूल देऊन काम भागतं, हे फारच महत्त्वाचं आहे. भुलीत नाही म्हटलं तरी धोके फार.
  शिवाय हे झटपट किती. तपासणीपासून ऑपरेशनपर्यंत सारा मामला दोनएक तासांची बात. पण तरीही हे कोणी करून घ्यायला पुढे येत नाही. पेशंट विचारत नाहीत, डॉक्टर बोलत नाहीत.
  अहो एखादा नरशार्दुल, एखादा नरपुंगव, एखादा नरसिंह, एखादा नरोत्तम झालाच तयार तर त्याची बायको, त्याची स्त्री, सखी, सचिव, भार्या, सौभाग्यवती, ती सती-सावित्री, पतिव्रता, म्हणते, ‘नको बाई माझंच करा, आमच्या ह्यांना फार काम असतं.’
  कारण काय तर...
  याने म्हणे अशक्तपणा येतो.
  कष्ट करता येत नाहीत.
  सेक्स पॉवर कमी होते.
  या ऑपरेशनमुळे पौरुषाला बाधा येते, तो कष्ट करू शकत नाही, तो माणूस एकदम कंडम बनतो, कंडोम नाही हं, कं ड म. दोन्हीत फरक आहे, असे अनेक गैरसमज आहेत. पण असं ज्या लोकांना वाटतं, त्याबद्दल निव्वळ त्यांना मूर्ख म्हणून आपली जबाबदारी संपत नाही. त्यांच्या या गैरसमजामागे त्यांचाही काही युक्तिवाद असतो. तो समजावून घेणं आणि दुरुस्त करणं महत्त्वाचं आहे. पारंपरिकरीत्या आपल्याकडे पुरुषत्वाचा संबंध शक्तीशी आणि स्त्रीत्वाचा सहनशक्तीशी जोडला आहे.
  शारीरिक कष्ट करणं, मूल होणं आणि संभोगसुख देता-घेता येणं या वास्तविक तीन स्वतंत्र क्रिया आहेत आणि एकमेकांशी फारशा संबंधित नाहीत! शारीरिक कष्टासाठी शरीर सुदृढ हवं, पण पुरुषबीजाची किंवा लिंगाला ताठरता येण्याची अजिबातच आवश्यकता नाही.
  मुलं होण्यासाठी पुरुषबीज तयार होणं आणि शरीरसंबंध जमणं हे आवश्यक आहे, पण यासाठी तुम्ही बॉडी-बिल्डर असायची गरज नाही. अहो इथेच पाहा ना, इथले बरेचसे पुरुष बॉडी-बिल्डर नाहीत आणि बऱ्याचशा पुरुषांना मुलंही आहेत. उलट अगदी धडधाकट असलेल्या, सैन्यात अधिकारीपदी असलेल्या, बॉडीबिल्डिंग किंवा इतर खेळात चॅम्पियन असलेल्या व्यक्तींनाही मूल होण्यात अडचण असू शकते. पुरुषबीज निर्माण करणारी यंत्रणा आणि शारीरिक शक्ती यांचा थेट संबंध नसतो. आणि कामसुखासाठी? लिंगाला ताठरता येण्यासाठी? पुरुषबीज तयार होण्याची गरज नाही. शरीरसंपदाही यथातथा असली तरी चालते. उलट कामसौख्यासाठी, दांपत्यसुखासाठी मन सदा सतेज असावं लागतं. कुस्तीत प्रतिस्पर्ध्याला आस्मान दाखवणारे गडी, पलंगावर सखीला चांदसितारे दाखवतीलच, असं नाही. कारण पलंग म्हणजे आखाडा नाही. कामसौख्य हे शारीरिक शक्तीचं प्रदर्शन नाही.
  म्हणूनच नसबंदी केल्यामुळे पुरुषांची शारीरिक शक्ती, कामेच्छा, कामशक्ती संपतबिंपत नाही. संभोगसुख, वीर्यपतन वगैरे जैसे थे राहतं. वीर्य हे पुरुषबीज आणि इतर अनेक स्रावांचं मिश्रण असतं. ऑपरेशननंतर त्यात पुरुषबीज मिसळत नाही एवढंच. वीर्यातले बाकी घटक तयार होतच असतात. लैंगिक भावना, लिंगाला होणाऱ्या संवेदना वगैरे कशावरच या ऑपरेशनचा दुष्परिणाम होत नाही.
  म्हणून म्हणतो...
  मन घायल पर तन पे छायी मिठी टीस सुहानी...
  ना लागी ‘नस’पे कटार!
  उलट नको असलेल्या गर्भारपणाची भीती दूर झाल्यामुळे आता सुखेनैव संभोगसुखाचा अनुभव घेता आणि देता येतो.
  मन घायल पर तन पे छायी मिठी टीस सुहानी...
  नाsss लागी ‘नस’पे कटार!
  मोरोपंतांच्या काव्यात ढवळाढवळ करण्याची धिटाई मी का केली ते आता तुमच्या लक्षात आलं असेल.
  एनएसव्ही सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो
  कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा आवडो
  तेव्हा म्हणा...
  नको नको नको नको ट्युबेक्टॉमी नको नको
  (... आणि आता पुंडलिक वरदा च्या चालीत...)
  बोला... एनएसव्ही ऑपरेशsssन कराsss रे मित्रांनो
  साधे सोपेsss आराsssमात
  बिनटाका शस्त्रक्रिया की जय
  पुरुषनसबंदी की जय.
  पुनरुत्पादनाच्या प्रत्येक पायरीचा आपल्या समाजाने उत्सव केला आहे. पाळी आली की नहाण विधी आहे, लग्न ठरलं की साखरपुडा आहे. लग्न म्हणजे तर दोन्ही घरचा अगदी प्रतिष्ठेचा प्रश्न, ती चमकदमक, तो माहोल, व्वा, भाई वा! पुढे पहिल्या रात्रीसाठी खास चिडवाचिडवी आहे, धार्मिक विधीही आहे. दिवस राहिल्यावर डोहाळेजेवण आहे, बागेतलं आहे, झोपाळ्यावरचं आहे, अगदी चंद्रावरचंसुद्धा आहे. मूल झाल्यावर पेढे-बर्फीचं उत्साही वाटप आहे आणि ध्वनिक्षेपकांची भिंत उभारून गाव दणाणून टाकणारं बारसंसुद्धा आहे. पण पुनरुत्पादनाची क्षमता संपवणं, म्हणजे नसबंदी करून घेण्याचा काही उत्सव अजून निघाला नाहीये. तेव्हा ज्या दिवशी, ‘नुकतंच आमच्या मोठ्या दिरांचं एनएसव्हीचं ऑपरेशन झालं; उद्या पूजेला या बरं का अशी नसबंदी नारायणाची निमंत्रण येतील तो सुदिन.’
  बोला...
  नको नको नको नको ट्युबेक्टॉमी नको नको
  (... आणि आता पुंडलिक वरदा च्या चालीत...)
  बोला... एनएसव्ही ऑपरेशsssन कराsss रे मित्रांनो
  साधे सोपेsss आराsssमात
  बिनटाका शस्त्रक्रिया की जय
  पुरुषनसबंदी की जय. (उत्तरार्ध)
  - डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई, shantanusabhyankar@hotmail.com

Trending