आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भटक्या विमुक्तांची कविता: निर्मीती प्रक्रिया आणि भूमिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्कट भावोद्गार हे काव्यभाषेतून अधिक तीव्रतेने अभिव्यक्त होतात. अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे शोधणारी भटक्या विमुक्तांची कविताही असाच तीव्र उत्कट भावोद्गार आहे. या कवितेच्या निमिर्ती प्रक्रियेची मीमांसा डॉ. मनोज मुनेश्वर यांनी प्रस्तुत समीक्षा ग्रंथात काही निवडक कवी आणि त्यांच्या कवितांच्या आधारे केली आहे.

भाषा हे अभिव्यक्तीचे आणि अभिव्यक्ती हे स्वातंत्र्याचे गमक आहे. एखादी व्यक्ती किंवा व्यक्तिसमूह यांना अभिव्यक्तिस्वातंत्र्य असणे म्हणजे त्यांना स्वत:ची भाषा वापरण्याची आणि तिच्या माध्यमातून स्वत:ची संस्कृती घडविण्याची परवानगी असणे होय. ही परवानगी ज्या समाजाला नाकारली जाते, तो समाज इतर बाबींसह भाषिक पारतंत्र्यात जगत असतो. भाषिक स्वातंत्र्य नसल्यामुळे त्याला स्वत:ची संस्कृती घडवता अगर विकसित करता येत नाही. एका अर्थाने तो समुदाय संस्कृतीतूनच बहिष्कृत केलेला असतो. 
 
अंतिमत: तो परतंत्र, गुलाम किंवा बहिष्कृत असतो. लोकशाही अंमलपूर्व काळातील भारतीय परंपरेत संस्कृतीच्या मुख्य धारेतून बाहेर ढकललेल्या समुदायांची (व्यक्तिसमूह जे जन्मजाताधारित आहेत) संख्या फार मोठी आहे. ‘भटका विमुक्त समाज’ही अशाच समुदायांपैकी. लोकशाही व्यवस्थेत या समुदायांना भाषाभिव्यक्तीचे स्वातंत्र्य मिळाले, परंतु त्यांना अभिव्यक्त होण्यासाठी दोन दशकांचा अवधी लागला. आमच्या महान संस्कृतीने त्यांच्यावर पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडून भटकण्याची वेळ आणली आणि स्वातंत्र्यानंतरही गुन्हेगारीचा जन्मजात ठपका पुसण्यासाठी अर्धेअधिक दशक लागले. या जाणिवेने भटक्या-विमुक्तांच्या अभिव्यक्तीला धार दिली. उत्कट भावोद्गार हे काव्यभाषेतून अधिक तीव्रतेने अभिव्यक्त होतात. अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे शोधणारी भटक्या विमुक्तांची कविताही असाच तीव्र उत्कट भावोद्गार आहे. या कवितेच्या निमिर्ती प्रक्रियेची मीमांसा डॉ. मनोज मुनेश्वर यांनी प्रस्तुत समीक्षा ग्रंथात काही निवडक कवी आणि त्यांच्या कवितांच्या आधारे केली आहे.

प्रस्तुत समीक्षाग्रंथात अभ्यासविषय म्हणून निवडलेल्या भटक्या-विमुक्तांच्या कवितेची समीक्षा करणे आव्हानात्मकच आहे. कारण या कवितेची मीमांसा करण्यासाठी पारंपरिक समीक्षेच्या फूटपट्ट्या तोकड्या पडतात. भटक्या-विमुक्तांच्या सामाजिक जाणिवेची ही आशयघन कविता समाजशास्त्रीय दृष्टिकोनाशिवाय अभ्यासणे अशक्य आहे. ही गरज लक्षात घेऊन डॉ. मुनेश्वर यांनी सकारात्मक समाजशास्त्रीय दृष्टिकोनातूनच या कवितेच्या निर्मिती प्रक्रियेची मांडणी केली आहे. या ग्रंथाच्या पहिल्या भागात भटक्या विमुक्त समाजाच्या साहित्य आणि संस्कृतीचा मागोवा घेताना त्यांनी भारतीय परंपरेतील वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था आणि धर्मसत्ता यांची चिकित्सा केली आहे. भटक्या समाजाच्या आर्यपूर्व काळापासून एकविसाव्या शतकापर्यंतच्या सामाजिक-सांस्कृतिक स्थितीगतीचा ऊहापोहही केला आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीवर आर्यांची छाप असली तरी ही संस्कृती स्थानिक आणि आर्य यांच्या संस्कृतीचा संकर आहे, हे मुनेश्वरांचे निरीक्षण महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त जातीजमातींची अभ्यासपूर्ण तपशीलवार माहिती या ग्रंथात आली आहे.

ग्रंथाच्या पुढील भागात डॉ. मुनेश्वर यांनी भटक्या-विमुक्तांच्या कवितेची निर्मिती प्रक्रिया उलगडून दाखवली आहे. या निर्मिती प्रक्रियेचा उलगडा करण्यासाठी त्यांनी नागराज मंजुळे, आत्माराम राठोड, रावजी राठोड, मोहन नाईक, प्रभंजन चव्हाण, जवाहर राठोड, रतन आडे, प्रेमदास राठोड, उत्तम राठोड, राजाराम जाधव, एकबाल पेंटर, तृप्ती अंधारे, पी. विठ्ठल, कैलास दौंड आणि सुदाम राठोड या निवडक कवींच्या कवितांच्या आधारे विवेचन केले आहे. जो समाज शब्दातून व्यक्त व्हायला संकोचत होता, तो अाता मुग्धतेच्या कोशातून कवितारूपाने बाहेर पडत आहे. हा मुग्धतेचा कोश सुरवंटासारखा असला तरी कविता मात्र फुलपाखरांसारखीच निपजेल असे नाही, कारण जगण्याच्या अपवादभूत रीती अनुसरणाऱ्या मानवी मनाचे रहस्य ही कविता उलगडते. या अभिव्यक्तीस असंख्य इंगळ्या डसल्याची वेदना आहे, मात्र भटक्या-विमुक्तांची कविता या वेदनेला स्पष्ट नकार देऊन दलित कवितेइतकी प्रखर विद्रोही मात्र बनली नाही. दलित कवितेची सामाजिक जाणिवेतून विद्रोहाकडे आणि विद्रोहाकडून मानवी मूल्यांकडे होणारी वाटचाल ही भटक्या-विमुक्त कवींपुढील प्रेरणा व्हायला हवी होती, पण तसे घडले नाही, ही खंतही डॉ. मुनेश्वर या निमित्ताने व्यक्त करतात.

भटक्या विमुक्तांची कविता ही कला म्हणून अवतरत नाही, तर ती अभिव्यक्तीची एक गरज म्हणून आकारास येते. त्यामुळे निरपेक्षतेने या कवींची भूमिका स्वीकारणे आणि अर्थपूर्ण करणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन डॉ. मुनेश्वर यांनी नागराज मंजुळे, सुदाम राठोड, मोहन नाईक, इक्बाल पेंटर या कवींच्या लौकिक जीवनाचा त्यांच्या कवितेच्या निर्मिती प्रक्रियेशी असणारा संबंध सोदाहरण विवेचित केला आहे. या कवींचे लौकिक व्यक्तिमत्त्व आणि त्यांची कवी म्हणून असणारी भूमिका यात भेद नाही, असा पवित्रा डॉ. मुनेश्वर यांनी घेतला आहे. काही समीक्षक कवींचे लौकिक व्यक्तिमत्त्व आणि कवी व्यक्तिमत्त्व वेगळे राखण्याचा प्रयत्न करतात. 

परंतु कवींच्या लौकिक व्यक्तिमत्त्वातील धुमसणारा अांतरिक संघर्षच त्यांच्या कवी व्यक्तिमत्त्वाला जन्म देतो, असे डॉ. मुनेश्वर सूचित करतात. त्या दृष्टीने कविता हा आपल्या ‘स्व’शी संपर्क साधून आत्मरत होऊन शब्दाबरोबर गांभीर्याने खेळण्याचा प्रकार आहे, म्हणून स्वत:शी बेइमानी करता येत नाही. तसे झाले तर चेहरा गमावलेली कविता जन्माला येईल, अशी भीतीही ते व्यक्त करतात.

सामाजिक कवितेची निर्मिती प्रक्रिया ही त्या समाजाच्या मूलभूत प्रश्नांशी निगडित असते. दलित आणि भटके विमुक्त हे दोन्ही समाज उपेक्षितच आहेत. परंतु या दोघांच्या जीवनातील मूळ प्रश्न वेगवेगळे आहेत. दलित साहित्याची समीक्षा खूप मोठ्या प्रमाणात झाली, तेवढी भटक्या विमुक्तांच्या साहित्याची झाली नाही आणि जी झाली ती भटक्या विमुक्तांच्या साहित्याला दलित साहित्यात गृहीत धरूनच झाली, ही चिंतेची बाब आहे, अशी खंत व्यक्त करून भटक्या विमुक्तांच्या साहित्याच्या मूल्यमापनाच्या सैद्धातिक मांडणीची गरजही  लेखकाने व्यक्त केली. कवितेच्या निर्मिती प्रक्रियेची ही अभ्यासपूर्ण मीमांसा भटक्या विमुक्तांच्या काव्यसमीक्षेला दिशादर्शकच ठरेल.

- शरद खांडेभराड, औरंगाबाद
बातम्या आणखी आहेत...