आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'जागर\' इम्‍पॅक्‍ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवार सकाळचे साडेदहा वाजलेत. कार्यक्रम सुरू होतो - जागर. स्टुडिओत अँकर कार्यक्रमाची सुरुवात करतो. स्टुडिओत त्याच्यासमोर मंत्री बसले आहेत आणि स्टोरी सुरू होते. विषय आहे, राज्यातली पाणीटंचाई.

एक गाव. रात्रीची वेळ. घरातली असतील-नसतील ती भांडी हातात घेऊन तरणेताठे-म्हातारे-कोतारे, बाया-बापडे रस्त्याकडे डोळे लावून बसले आहेत. एवढ्यात गलका होतो. पाण्याचा टँकर दिसू लागतो. टँकरच्या दिशने सगळे धावत निघतात. रात्रीच्या अंधारात कुणी पडतंय, धडपडतंय, आणि कुणी वर चढतंय. कळशीभर पाण्यासाठी सगळे एकमेकांवर तुटून पडतायत. आर्त सुरावटीच्या पार्श्वभूमीवर केलेली ही ५० सेकंदांची क्लिप. राज्यातल्या पाणीटंचाईचं भीषण वास्तव मांडणारी.
मंत्र्यांसमोरच ही न्यूज क्लिप दाखवली जाते. कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण सुरू असते. क्लिप संपते आणि कार्यक्रमात फोन यायला सुरुवात होते. फोनवर एक गृहिणी थेट मंत्र्यांना प्रश्न करते, ‘आम्ही तांब्याभर पाण्यासाठी रात्रभर जागतो आणि तुमच्या दारातल्या गाड्याही दररोज इथे पाण्याने धुतल्या जातात. हा कुठला न्याय?’
खरं तर या थेट प्रश्नाने मंत्री महोदय निरुत्तर झालेले असतात, पण सवयीप्रमाणे ते सारवासारव करतात नि वेळ मारून नेतात. झी मराठीवरच्या ‘जागर’ या कार्यक्रमाची ही झलक. २४ तास न्यूज चॅनल सुरूही झाली नव्हती आणि तीन बातमीपत्रांव्यतिरिक्त infotainment वाहिनीवर न्यूज प्रोग्रॅमसाठी जागा मिळणं कठीण होतं, त्या वेळी सुरू केलेला हा कार्यक्रम - जागर. त्या वेळचे वाहिनीचे प्रमुख नितीन वैद्य यांनी एखादा न्यूज बेस्ड प्रोग्रॅम सुरू करावा, असं मत मांडलं आणि जागरची संकल्पना प्रत्यक्षात आली.
एखादा थेट सर्वसामान्यांच्या आयुष्याशी निगडित असा प्रश्न घ्यायचा. राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून संबंधित स्टोरीज मागवायच्या आणि थेट त्या खात्याच्या मंत्र्यांसमोर ते प्रश्न मांडायचे. दूरध्वनीवरून थेट प्रेक्षकांना प्रश्न विचारायला लावायचे. मंत्र्यांकडून उत्तरं घ्यायची. हा सूर्य आणि हा जयद्रथ. आता बोला. खूप गंभीर विषय या कार्यक्रमातून हाताळले गेले. शिधावाटप यंत्रणेतील भ्रष्टाचार, इंदिरा गांधी आवास योजना, रोहयो, आरोग्य यंत्रणांचा भ्रष्टाचार, प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कारभार, जिल्हा परिषद शाळा आणि बरेच. नेहमीच्या हॅपनिंग स्टोरीज करणाऱ्या आम्हा सगळ्यांसाठीच म्हणजे डेस्कवरच्या आणि ब्यूरोजच्या सगळ्याच पत्रकारांसाठी ही एक मोठी संधी होती काही हट के करण्याची. त्यामुळे सगळ्यांनीच आपापल्या भागातून या प्रोग्रॅमसाठी investigative न्यूज दिल्या. अन्न व औषध प्रशासन विभागातील भ्रष्टाचाराची बातमी करताना सुचिता करमरकर आणि तिच्या कॅमेरामनने गोदामात वाळत घातलेल्या सडलेल्या गव्हाचे शॉट्स आणलेले. हे शॉट्सच सारं काही सांगून जाणारे होते. छोटी छोटी स्टिंग ऑपरेशन्सच होती ती.
रविवारी सकाळी होणारा फोन इन प्रोग्रॅम हा या कार्यक्रमाचा usp होता. पण अनेकदा त्या संबंधित खात्याचा मंत्री मिळणं अशक्य व्हायचं. असंच एकदा रविवारी संबंधित खात्याचा कुणी अधिकारीही मिळेना. शनिवार संध्याकाळ उलटून गेली तरी कुणी ठामपणे होकार देत नव्हतं. उद्या साडेदहा वाजता कुणाला बसवायचं, हा मोठा प्रश्न होता. शेवटी विलासराव देशमुख यांना विचारायचं ठरवलं, तोवर रात्रीचे साडेदहा वाजून गेलेले. मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर विलासरावांवर त्या वेळी कर्नाटकच्या निवडणुकीची जबाबदारी होती. ते पहाटे मुंबईत पोहोचणार होते, पण रविवारी सकाळी ते घरीच असणार आहेत, हे कळलं. त्या वेळी रायगडचे प्रतिनिधी असलेल्या संजयने विलासरावांशी संपर्क केला आणि विलासरावांनी सकाळी यायचं कबूल केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी दहाला ऑफिसला पोहोचायचं, या हिशोबाने घरातून निघाले तर अर्ध्या रस्त्यावर असतानाच ऑफिसमधून सिक्युरिटीचा फोन, गेस्ट आले म्हणून. ऑफिसमध्ये पोहोचले तर विलासराव गेस्ट रूममध्ये पेपर वाचत बसलेले. निवांतपणे. कुठल्याही प्रकारचे आढेवेढे न घेता अगदी शेवटच्या क्षणी विचारूनही ते आले होते. अर्थात, तो फोन इन प्रोग्रॅम त्यांनी त्यांच्या स्टाइलने पार पाडला. आणि प्रेक्षकांनाही एका माजी मुख्यमंत्र्याला थेट प्रश्न विचारता आले.
आजही हा कार्यक्रम लक्षात राहिला याचं कारण म्हणजे, एक तर त्याची आखणी वेगळ्या रीतीने केली जायची. त्यासाठी संशोधन, त्याचं प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन केलेलं शूटिंग, त्यातल्या मुलाखती, त्याचं पोस्ट प्रॉडक्शन हे सगळं इतर बातम्यांपेक्षा वेगळं असायचं. म्हणजे या सगळ्याची ट्रीटमेंट ही न्यूज रिपोर्ट आणि डॉक्युमेंटरी यांचा सुवर्णमध्य काढून केलेली असायची.
जागर लक्षात राहण्याचं दुसरं अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे, या कार्यक्रमातून अनेकांना न्याय मिळवून देता आला. आरोग्य यंत्रणांशी संबंधित स्टोरी करत होतो. रत्नागिरीतल्या एका गरीब लहान मुलीचं ऑपरेशन करायला कोल्हापूरच्या जिल्हा रुग्णालयानं नकार दिला होता. रत्नागिरीचे तेव्हाचे प्रतिनिधी असलेल्या अभिजित हेगशेट्ये यांनी ती स्टोरी केली होती. दिग्विजय खानविलकर तेव्हाचे आरोग्यमंत्री होते. त्यांच्यासमोरच जेव्हा ही बातमी दाखवली, तेव्हा त्यांनी तिथेच त्या मुलीच्या ऑपरेशनचा खर्च उचलण्याचं मान्य केलं आणि त्या गरीब मुलीचं कोल्हापूरला ऑपरेशन झालंही. लातूरमधला इंदिरा आवास योजनांचा भ्रष्टाचार दाखवताना तिथे दोघांना घरं मंजूर झाली. असे बरेच ‘जागर इम्पॅक्ट’ झाले.
हा कार्यक्रम एवढा चालला की, infotainment चॅनलवरचा अशा वेगळ्या विषयांवरचा रविवारचा साडेदहाचा स्लॉटही टीआरपी मिळवू शकतो, हे या कार्यक्रमामुळे सिद्ध झालं. आता 24X7च्या न्यूज चॅनलमध्ये प्रोग्रॅमिंग हा एक अविभाज्य भाग बनला आहे. एखादी बातमी तेवढीच महत्त्वाची असेल किंवा त्या बातमीला कंगोरे तेवढेच असतील तर ती निव्वळ काही मिनिटांत न मांडता तपशीलवार दाखवणं अपेक्षित असतं आणि मुळात ती टाइम बॉन्डेड असल्यानं ती त्याच क्षणी दाखवणं गरजेचं असतं. आता याचे काही ठोकताळे तयार झाले आहेत आणि ब्यूरोजच्या ठिकाणीही स्टुडिओ असल्यानं तिथे तत्सम व्यक्तींना बसवून अधिक माहिती घेतली जाते. न्यूज प्रोग्रॅमिंगची स्टाइलही विषयानुरूप बदलते आहे. फोन इन प्रोग्रॅम तर आता प्रेक्षकांच्याही सरावाचे झाले आहेत. (क्रमश:)

mitali.mathkar@gmail.com