आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'संस्‍कारी सिस्टिम\'चे सार्वजनिक स्खलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या आठवड्यात लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या मुंबईकर तरुणीपुढे अनास्था प्रसंग ओढवला. एका सरफिऱ्या तरुणाने तिच्यादेखत हस्तमैथुन केले. काही महिन्यांपूर्वी कॉलेज फेस्टिवलमधला रॉक कॉन्सर्टचा कार्यक्रम संपवून घरी परतलेल्या दिल्ली विद्यापीठाच्या एका तरुणीला तिच्या जीन्स पँटवर मागील बाजूस वीर्याचे डाग आढळले. लोकलमध्ये घडलेल्या प्रकाराची दखल घेण्यास हेल्पलाइनने नकार दिल्यानंतर खुद्द रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंना चौकशीचे आदेश द्यावे लागले. दिल्लीच्या घटनेत चर्चेपलीकडे काहीही घडले नाही. पण सार्वजनिक ठिकाणी आढळून येणारी लैंगिक विकृती हा केवळ कायद्याचा प्रश्न आहे? 'संस्‍कारी सिस्टिम'चे याच्याशी काहीही देणेघेणे नाही?
 
 
मुंबई लोकलमध्ये प्रवास करणारी पूजा नायर. दिल्ली मेट्रोत प्रवास करणारी ग्रेस सिरील. दोघींना आलेला एकसारखाच अनुभव. त्यांच्याकडे रोखून पाहात एक व्यक्ती हस्तमैथुन करते. त्या धास्तावून न जाता रेल्वे पोलिसांच्या हेल्पलाइनला रीतसर फोन करतात. मात्र तिकडून प्रतिसाद म्हणून मिळते ती बेफिकिरी, खिल्ली आणि अविश्वास. दोघीही याबाबत समाजमाध्यमांवर सविस्तर लिहितात. मेघना सिंग, दिल्ली विद्यापीठात शिकणारी एक सुजाण तरुणी. एका कॉन्सर्टला गेली. तिथून घरी परतल्यावर तिला आपल्या जीन्स पँटच्या मागील भागावर वीर्याचे डाग दिसले. तिनं फेसबुकवर त्या जीन्सचा फोटो टाकत उपरोधिक पोस्ट लिहिली, ‘मर्द हो गया आज तो ये बंदा. थँक्स मर्दो, थँक्स!' 
 
या तिघींच्याही पोस्ट ‘व्हायरल’ होत त्यावर एक चर्चेची घुसळण सुरू झालीय. पण प्रश्न हा आहे, की ‘व्हर्च्युअल’ जगात अशा घटनांवर घमासान करणारा समाज ‘रिअल’ संदर्भात योग्य हस्तक्षेप करत विकृतींवर विधायक जरब बसवायच्या वेळी कुठं असतो? जिथं प्रत्येक जण दुसऱ्याच्या जगण्यात नको इतकं नाक खुपसतो ती गावं बाईला क्षणोक्षणी टोचण्या-काढण्या लावतात, पण मग जिथं प्रत्येक जण आपापल्या जगण्याचा तोल सांभाळण्यात मश्गुल असतो ती महानगरं तरी बाईसाठी कुठं सुरक्षित आहेत? आणि हा प्रश्न केवळ सुरक्षिततेशी जोडला तर कायदा सुव्यवस्थेला दोष देत हात झटकण्याची सोपी कृती करता येते. पण माणसांच्या ओसंडून वाहणाऱ्या गर्दीचं सार्वजनिक ठिकाण असो, किंवा खासगी एकांत; स्त्रियांना सुरक्षित वाटेल असा भवताल इथल्या नागरी व्यवस्थेत मिळत नाही.
 
लैंगिकतेचा योग्य निचरा न झाल्याने म्हणा, वा मानसिक विकृती म्हणा, मुलीसमोर हस्तमैथुन करणारा पुरुष आणि या कृतीमागचे अदृश्य, धोकादायक अर्थ न उमगल्याने तिने फोनवर केलेल्या तक्रारीला प्रतिसाद म्हणून खिल्ली उडवणारा पोलिस, आणि अजून कोण कोण असंख्य... असे सगळे पुरुष इथल्याच स्वदेशी समाजव्यवस्थेचे ‘प्रॉडक्ट’ आहेत, हे आधी आपण स्वत:शी कबूल करू या. ‘तेरे को मां-बहन नही है क्या?’ हा अगदी घासून गुळगुळीत झालेला सवाल टाकायचा तर उत्तर होकारार्थी येण्याचीच शक्यता जास्त. मात्र स्वत:च्या आई-मुली-बहिणीबाबत ‘रक्षणकर्ता नायक’ मोडमध्ये असणारा कुणी बाप-मुलगा-भाऊ उरलेल्या स्त्रियांबाबत असा ‘खलनायक’ मोडवर जात असेल, तर एकूण ‘संस्‍कारी सिस्टम’मध्येच काहीतरी गडबड आहे, हे नक्की!
 
औरंगाबादच्या पोलिस उपायुक्त दीपाली घाटगे यांचं निरीक्षण विचारल्यावर त्या सांगतात, ‘गेली दहाएक वर्षं झाली, मी अशा गुन्ह्यांमध्ये सापडलेल्या मुलांची मनोवृत्ती समजून घेण्याचा प्रयत्न करते आहे. बोलते तेव्हा मुलींची छेडछाड करणं हा मुळात गुन्हा आहे, हेच त्यांना उमगलेलं नसतं. ‘पोलिस प्रतिबंध करू शकतात. कायद्यांच्या मदतीने एक विधायक दहशत बसवू शकतात. पण ही अशी कृती करण्याची मूळ प्रेरणा जिथून येते, तिथपर्यंत तर आम्ही पोहोचू शकत नाही. तिथपर्यंत फक्त त्यांचं कुटुंबच पोहोचू शकतं. पण कुटुंबं याबाबत अगदीच चुकीची हाताळणी करतात. मुलं आणि मुलींचे ‘रोल्स’ त्यांच्या जन्मापासूनच इतक्या रिजीड पद्धतीने ठरवले जातात, की ती मोठी होईपर्यंत अगदीच घट्ट बनून जातात.’ 
 
हस्तमैथुन, त्यातून होणारे वीर्यस्खलन, मिळणारा आनंद, येणारे नैराश्य या खरं तर खूप खासगी क्रिया आहेत. याची जाहीर वाच्यता न करणे, ही सामाजिक सभ्यता आहे. पण तरीही हा विषय धर्माचे, रूढी-परंपरांचे, व्यवस्थेचे कडक निर्बंध असलेल्या समाजातच बहुतकरून विकृत स्वरूपात पुढे येत जातो. शाळा-कॉलेजात मुला-मुलींच्या कानावर पडणारी लैंगिक क्रियांची अतिरंजित वर्णनं, या वर्णनांना तितक्याच अतिरंजित रूपात पेश करणाऱ्या पोर्नोग्राफिक फिल्म्स आणि त्यातून पोर्नोग्राफी वास्तवात जगण्याची उफाळून येणारी इच्छा हे सारे घटक वैयक्तिक पातळीवर विकृत मानसिकतेला खतपाणी घालत राहतात. 
 
यात जसे घरा-दारापासून तुटलेले, कुटुंब-नातेवाईक-मित्र-मैत्रिणींपासून दुरावलेले तरुण-तरुणी असतात, तसेच सुरक्षित पण कमालीच्या दबलेल्या वातावरणात वाढलेलेही असतात. स्त्री देहाबद्दल असलेले अनिवार आकर्षण, स्त्री देहाबाबतची अप्राप्यता या गोष्टी दोन्ही वर्गांत नैराश्य आणत राहतात. नैराश्याच्या वाढत्या प्रभावातून मन विकृतीकडे झेपावू लागते. अशा प्रसंगी एखाद्याला सार्वजनिक सभ्यतेचे भान राहात नाही, की कायद्याची भीतीही वाटत नाही.
 
माझा अनुभव, औरंगाबादसारख्या स्वत:ला ‘शहर’ म्हणवणाऱ्या ठिकाणीही पुरुषांच्या नजरा अगदी कथित ‘सभ्य’ वेषभूषा करून घराबाहेर वावरणाऱ्या स्त्रीकडे पाहायला सरावलेल्या नसतात. बहुतांश पुरुष अगदीच ‘ऑड’, टोचेल असं, निरखून-निरखून पाहात असतात. मुलींनी त्यांच्या शरीराला हीन, झाकून-लपवून ठेवण्याची गोष्ट मानायचीय, हे मुलींच्याच नाही तर मुलांच्याही मनावर खोलवर गोंदवून टाकतो आपण. मग जिथं गूढ-गहन असं काहीतरी पेरल्यावर तिथं कुतूहल, संशय उगवणारच! त्याची देहबोली मोकळीढाकळी, सराईत आणि वावर आत्मविश्वासाने, कधीकधी अतिआत्मविश्वासाने भरलेला. यापुढे दबून जाऊन म्हणून की काय, बाईची देहबोली सतत आक्रसलेली, घुसमटलेली बनून जाते. ती खांदे पाडून, नजर जमिनीत गाडून चालते. बचावाच्या पवित्र्यात. पितृसत्ता एकीकडे स्त्रीशरीराभोवती अस्पृश्यतेचे धागे विणते. दुसरीकडे जर बाई करायलाच लागली ‘बॉडी पॉझिटिव्हिटी’ची गोष्ट, तर तिला उथळ, स्वैराचारी, शहरी फेमिनिस्टचा किताब देते. आदिम काळापासून एकमेकांसोबत, एकमेकांसाठी असणारे हे अ‍ॅडम आणि इव्ह. एकमेकांच्या शारीर अस्तित्वाचा सहज स्वीकार करायला अजून किती अडथळे ओलांडावे लागतील यांना?  
 
‘एआयबी’ या ग्रुपचा ‘हरॅसमेंट थ्रू द एजेस’ हा लोकप्रिय व्हिडिओ युट्यूबवर उपलब्ध आहे. त्यात सिनेमातल्या गाण्यांनी ‘मुलीच्या नकारात होकार असतो’, ‘अनोळखी मुलीची छेड काढणं हा गुन्हा नसून ती आगामी रोमान्सची सुरुवात आहे.’ अशा अंधश्रद्धा तरुणांच्या मेंदूत कशा रुजवल्या, हे उपरोधिक गाण्यांतून नेमकेपणाने आले आहे. भारतीय समाजपुरुषाच्या स्वप्नाळू ‘रोमान्स’ची कल्पना बहुतेक वेळा छेडछाडीतून सुरू होतेय का? मग त्याचं एक टोक म्हणजे औरंगाबादेत रस्त्यावर चालणाऱ्या मुलींना सुसाट गाडीवर पाठीमागून येत त्यांच्या पार्श्वभागावर चापट्या मारून पळ काढण्याच्या सततच्या घटना असतील, किंवा दुसरं टोक म्हणजे, लोकलमध्ये अनोळखी मुलीसमोर बिनदिक्कतपणे केलेलं हस्तमैथुन असेल. या दोन टोकांच्या मध्येही अजून खूप काय काय घडत राहतंय. थोडीबहुत कही, खूप सारी अनकही.   
आपल्याकडे ‘लैंगिकता’ हा शब्दच लगोलग अश्लीलतेशी जोडला जातो. खजुराहोत मैथुनशिल्पं कोरलेल्या अनामिक कलावंतांनी खूप काही थेटच सांगू पाहिलंय. ते तर आपल्यापर्यंत पोहोचलंच नाही, पण पुढंही शतकानुशतके संवादाचा खूप अनुशेष बाकी राहिलाय. साचलेल्या कुतूहलाचं आता कुजलेल्या विकृतीत रूपांतर होतंय. तेव्हा, आता जरा या कृत्रिम शांततेचा भंग करू या. शाळांमध्ये लैंगिक शिक्षण देण्याच्या प्रस्तावावरचा भोंदू गहजबही थांबवू या. 
 
दिल्लीच्या निर्भया प्रकरणातला आरोपी ड्रायव्हर मुकेश ‘इंडियाज डॉटर’ या डॉक्युमेंटरीत त्याचं मत स्पष्ट सांगतो, ‘मुलं आणि मुली समान नसतात. मुलींनी घरकाम आणि संसार करावा. बाहेर फिरणं, वाटेल तसे कपडे घालून मौजमजा करणं यातून त्या अत्याचाराला बळी पडतात. आजच्या जगात जेमतेम २०% मुलीच ‘चांगल्या’ आहेत.’ न्यायव्यवस्थेनं मुकेशला मरेपर्यंत फाशी सुनावली. पण, त्याचं हे मत घडवणारी व्यवस्था माझ्या आजूबाजूला खुलेआम वावरताना दिसत राहते.
 
स्त्री, पुरुष आणि बहुलिंगी व्यक्ती अशा आपापल्या ओळखी घेऊन अपरिहार्यपणे एकमेकांसोबत जगताना आता जरा नीटच आपापल्या शरीराकडे बघायला हवंय. त्याला चिकटलेले पूर्वग्रह, धारणा, पावित्र्य असं सगळं स्वच्छ धुऊन काढत काही अवघड प्रश्न एकमेकांना विचारायला हवेत. ‘लोकलमध्ये, मेट्रोत आणि थेट तुमच्या-माझ्या शेजारी ही अश्लीलता कुठून येते?’ याचं उत्तरही कदाचित त्यातूनच सापडेल.  
 
sharmishtha.2011@gmail.com
लेखिकेचा संपर्क - ८३८००९७४९१
 
(जळगाव आवृत्तीसोबतच्या 'रसिक' पुर‌वणीत या लेखाचे शीर्षक अनवधानाने 'सरकारी सिस्टिमचे सार्वजनिक स्खलन' असे प्रकाशित झाले आहे.)
बातम्या आणखी आहेत...