आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेदरकार, टोकदार आणि निखारेदार (शर्मिष्‍ठा भोसले)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘सोबतचे पुरुष कवी अनेकदा मंचावरच्या कवयित्री आणि समोरच्या रसिक स्त्रियांनाही अवमान वाटेल असे ‘विनोद’ कवितांच्या अधेमधे पेरत असतात. मंचावरून खाली उतरल्यावर तर सहकारी कवींचं वर्तन त्यांच्या कवितेतून आईसारख्या स्त्रीरूपाविषयी झळकणाऱ्या प्रासंगिक स्त्रीवादाच्या पूर्ण विरुद्ध असतं. त्यांची विद्रोही अभिव्यक्ती तर कार्यक्रमोत्तर मदिरापान सेशनमध्ये पुरती वाहून जाते.’

एका लोकप्रिय कवी-गँगमध्ये असणारी आणि गावोगावच्या कविसंमेलनांमध्ये (प्रत्येक वेळी तीच एक) कविता सादर करणारी कवयित्री मला एकदा खासगीत तिचे अनुभव शेअर करत होती. आता असं असूनही अशा मंचावर कविता सादर करत राहण्यात तिचा काय नाइलाज असतो, मला माहीत नाही; पण काही सन्माननीय अपवाद वगळता सध्या मंचीय कविता हा कवितेसह कवींचीही अप्रतिष्ठा करणारा प्रकार झालाय. लहान गावांमध्ये होणाऱ्या लोकप्रिय कविसंमेलनांमध्ये बहुसंख्य वेळा अशा मंचावरच्या कवयित्रीही ‘श्रवणीय’ कमी अन् ‘प्रेक्षणीय’च जास्त असतात. कवितेसोबतच स्वत:लाही ‘सादर’ करण्याचा त्यांचा अट्टाहास अनेक चुकीचे पायंडे पाडतो. हे तर झालंच; पण काही ठरावीक वर्ग-जाती-प्रदेशांतून येणाऱ्या कवी-कवयित्रींनाच हा मंच जास्त सहजपणे ‘अॅक्सेसिबल’ असतो, हेही जाणवतं. साहित्यव्यवहारानंच काय, साहित्यानंही हे दलितवाले, हे आदिवासीवाले, अशी वेगळी चूल ज्यांना मांडून दिली त्यांचं काय? ते ‘मेनस्ट्रीम’मध्ये कधी येणार? हेही प्रश्न शिल्लक असतातच.
याचं उत्तर शोधायला फेसबुकवर ‘लॉग इन’ व्हा. इथं वेदिका कुमारस्वामी लिहिते,
‘आज्जी हासती निसती म्हणतेली
कोणत्या भाषेला गिऱ्हाईक आहे जास्ती?
चांगलं शिरीमंत गिऱ्हाईकाच्या भाषेत शिकीव वेधीकाला
लताम्याडम मला इंग्लिश शिकवतेला
वाटेनं जाताना कन्नड पाट्या
थोडं इंग्लिश थोडं मराठी
लहान असताना खूप भाषा येताल्यात म्हणतेल्या लताम्याडम
मोठेपणी भाषा दोनच
एक देहाची दुसरी पैशांची’

इथल्या मंचावर कवयित्रींच्या या नव्याकोऱ्या शैलीत व्यक्त होण्याविषयी जाणत्या लेखिका कविता महाजन म्हणतात, ‘पूर्वीच्या तुलनेत आता साहित्यसंस्थांचे मूळ हेतू प्रदूषित झालेत. सध्या सुरू असलेली अनियतकालिकं वेगवेगळ्या गटांची आहेत. त्यात नव्या पिढीला नीटसपणे स्थान मिळतंच असं नाही. एखाद-दुसरी स्त्री अगदी यादी सर्वसमावेशक वाटायला हवी म्हणूनच बहुतेकदा अनुक्रमणिकेत असते. मग याला पर्याय शोधायला लोक नवी माध्यमं वापरतात. दुसरी गोष्ट आहे, बोलीभाषांबद्दलची. फेसबुकवरच्या दिशा केने, वेदिका कुमारस्वामी या दोघी फिरस्त्या आहेत. त्यांची भाषा मिश्र आहे. त्या-त्या प्रदेशांचे प्रभाव तिच्यावर आहेत. ही मराठवाडी, ही वैदर्भीय, ही अहिराणी असं लेबल लावायचा आपला अट्टाहास कशासाठी? लिटल मॅगझीनवाल्यांनीही भाषेची मोडतोड केलीच की! नवी मंडळी हे जे काही लिहितात, प्रयोग करतात, त्यासंबंधी स्वागतशील असावं. आणि प्रस्थापितांनीही केले असे काही प्रयोग तर आक्षेप का घ्यायचा? अनेकदा सिनिअर्सचा ज्युनिअर्सवर प्रभाव असतो, तसा ज्युनिअर्सचाही सिनिअर्सवर असतोच, असावाच! जुन्या पिढीतल्या लेखकांनीही काळाच्या सोबत असावं. ते असण्यासाठी आम्हीही प्रयोग करायला हवेत. त्यातून आम्ही वाढतो तशी भाषेच्या समृद्धीतही भर पडते. पुस्तक असू देत की सोशल मीडियावरचं लिखाण, सामान्य वाचक हाच खरा महत्त्वाचा आहे. ते मनापासून रिअॅक्ट होतात. या सामान्य लोकांच्या कमेंट्समधून काही चुकीचे मुद्दे आले तेव्हा त्याचा प्रतिवाद वेळोवेळी होतोच. सगळं सतत छान-छान चाललंय, त्याला धक्के देणारे प्रयोग लौकिक जगातल्या साहित्यात आणि सोशल मीडियावरही व्हायलाच हवेत. अशा प्रयोगांच्या स्वीकाराची मानसिकता मात्र अजून वाढली नाही. भाषेतले प्रयोग, मग ते कुठल्याही माध्यमातून केलेले असोत, त्याकडं स्वागतशीलपणे पाहिलं गेलं पाहिजे. वेदिका, तोताबाला आणि दोपदी यांच्या प्रोफाइलवर ते फेक असल्याचे, त्यांच्या नावाने कुणी दुसरी व्यक्तीच कविता लिहीत असल्याचे, स्वत:च्या आगामी लिखाणाचा हा प्रमोशनल फंडा अवलंबत असल्याचे आक्रस्ताळे आरोपही होत आहेत. मला म्हणायचंय, की हे असे प्रयोग करण्याचं स्वातंत्र्य लेखकाला आहे. अशा प्रयोगांचं स्वागतच केलं पाहिजे. येत्या काळात अजूनही चांगली ई-बुक्स येतील. चांगले अॅप्स येतील. हा अनेकार्थानं घुसळणीचा काळ आहे. त्याचे शिंतोडे उडणार, काही जण कौतुकही करणार. दोन्ही तितक्याच संयतपणे स्वीकारता आलं पाहिजे.’
कवितेच्या प्रांतातलं अजून एक समर्थ नाव म्हणजे, प्रज्ञा दया पवार. प्रज्ञाताईसुद्धा फेसबुकवर सक्रिय असतात. त्या म्हणतात, ‘सोशल मीडियामुळे एके काळी केवळ प्रकाशकाच्याच अधीन असलेली व्यवस्था आता खुली झालीय. अभिव्यक्तीचं लोकशाहीकरण झालंय. मी लेखनाला सुरुवात केली त्याला आता पंचवीस वर्षं होऊन गेली. मला नव्या काळात फारसं झगडावं लागलं नाही. पण लेखन पुस्तकरूपात येण्यासाठी आमच्या पिढीला प्रकाशकाची गरज असायचीच. आज फेसबुकवर कवितेला लगेचच प्रतिक्रिया मिळतात. व्यक्ती तिथं एकमेकांच्या थेट समोर नसतात. त्यामुळे संवादातही एक मोकळेपणा येतो. एरवी प्रकाशन संस्थांचाही एक स्वत:चा वाचकवर्ग ठरलेलाच असतो. मात्र फेसबुकमुळे तुमचा अंतराळ अमर्याद वाढतो आहे. पण एका अर्थानं हे धोकादायकही आहेच. कारण लेखनाचा रियाज म्हणतात तो संपण्याच्या शक्यता वाढतात. इतक्या कमी काळात लोकांसाठी चर्चाविषय होणं, हे पचवताही आलं पाहिजे. इथं स्त्रीला मिळणारं स्वातंत्र्य हा एक सापळाही असू शकतो. हे स्वातंत्र्य आहे की त्याचा आभास, हे इथं वावरताना स्वत:ला विचारत राहायला हवं.
वेदिकाच्या आयडेन्टीटीबाबत बोलायचं तर आपण थोडं संयमी असायला हवं, असं वाटतं. हा एक मार्केटिंगचा प्रकार असला तरी असू देत की! वेदिकाला वाचकांच्या प्रतिक्रिया भरभरून आहेत. ते लिखाण अगदी ‘रॉ’ आहे वगैरे आक्षेपही अनेक जण घेत आहेत. ते सगळं मला औचित्याचं वाटत नाही. अनेक जण मात्र खूप घाई करतात स्तुती करायला. इथं माणसं स्वीकारशील झालीतच असं आणखी वाटत नाही.’
आजवर असं होतं की, प्रत्येकाच्या लौकिक जगण्यातला भवताल व्यक्त होण्यासाठी अनुकूल असेलच असं नाही. अशा वेळी लेखन करणाऱ्या एका विशिष्ट ‘कम्युनिटी’शिवाय इतर बहुसंख्य कम्युनिटीचा ‘से’ अव्यक्तच राहिला असेल. एका लक्ष्मी त्रिपाठीचं पुस्तक तृतीयपंथीयांच्या वतीनं काही सांगू पाहतं. पण ते आणि तेच एक सुखद अपवाद म्हणून किती काळ समोर येत राहावं? मग फेसबुकवरची दिशा केने आपल्या वॉलवर लिहिते,
‘त्याला फोन लावणार इतक्यात
त्याची आई म्हणाली
पुरणपोळी छान करतेस तू
आणि संसारही
पण एवढ्याने जोडीदार होऊ शकतेस तू
सून नाही
त्यासाठी बाईच असावं लागतं
निघून गेली त्याची आई
प्रश्नांची पुस्तिका पुढ्यात टाकून
तिने संसाराला कुलूप लावलं आणि निघाली
स्वत:सारख्या लोकांमध्ये मिसळायला
टाळी वाजवायची
विसरले होते हात तिचे
आज तिला ते परत आठवले...’

प्रत्यक्ष आयुष्यात तुम्हाला-मला भेटलेही असतील तृतीयपंथी. ट्रेन-लोकलमध्ये किंवा भर बाजारात. आपण बाई असलो तर भीतियुक्त कुतूहलानं पाहात राहिलो असू. पुरुष असलो तर एकतर त्यांच्या हातावर नाइलाजानं पैसे टेकवत सुटका करून घेतली असेल किंवा विकृत हसत एक-दोन मिनिट शाब्दिक मैथुन केलं असेल त्यांच्यासोबत तिथंच चारचौघात. पण ही अशी कविता लिहिणारी तृतीयपंथी व्यक्ती कधी सामोरी आलीय आजवर कुणाच्या? जन्मलेल्या प्रत्येकावर त्याच्या भवतालानं केवढ्या तरी पूर्वग्रहांचे वर्ख चढवलेत. त्यामुळं इथला माणूस नितळपणे पाहूच शकत नाही जगण्यातल्या जैवपणाकडे. दिशाला वाचताना या माणसांचे अनेक पूर्वग्रह कळत-नकळत गळून पडत असल्याचं कवितेखालच्या प्रतिक्रियांतून जाणवतं. ‘नजरिया’ बदलाची अगदीच क्रांती होतेय असं नाही; पण तिकडं जाणारी एक वाट सापडायली अनेकांना हे नक्की!
दिशाची कविता वाचताना पुन्हा पुन्हा ऐकू येतं मला, ‘डू नॉट जस्ट एक्सेप्ट बट सेलिब्रेट अँड रिलेट विथ द डिफ्रन्सेस!’
फेसबुकच्या अवकाशातून ओळखीचे होत अनेकांच्या मना-मेंदूला व्यापून उरलेले कवी बालाजी सुतार यांच्या मते, ‘दिशा आणि वेदिकाच्या निमित्ताने त्यांच्या पार्श्वभूमीतून कविता लिहू पाहणारं कुणीतरी पहिल्यांदाच समोर येतं आहे. त्यातही दिशाची कविता मला अधिक महत्त्वाची वाटते. तृतीयपंथी कवितेतून बोलतोय आणि वाचकही ते रिसिव्ह करायला शिकतोय. त्यातही दिशा महानगरातली, जिथं तृतीयपंथीयांचं काहीएक पुनर्वसन होतं तिथली नाही. ती मराठवाड्यातल्या परभणीची आहे. अशा प्रदेशातली, की जिथं या व्यक्तींना अजिबातच काही प्रतिष्ठा नाही. वेदिकाचा चेहरा अजून वाचकाला माहीत नाही. पण तिच्या कवितेचा घाट, कवितेत शेवटी असणारा ‘पंच’ मात्र ती वाटते तितकी नवखी, नवोदित नाही, हे सांगत राहतो.’
पश्चिम बंगालच्या धुपगढी गावात जन्मलेल्या तोताबाला ठाकूरच्या वॉलवर जा. ती लिहिते,
‘कितने पुरुषो में मै कितनी बार समाहित हुई
कितने पुरुषो ने मुझे ग्रहण किया
जैसे दुर्गा का प्रसाद हो कालीघाट पार प्राप्त
यदी मै चरित्रहीन हूं बंधू
तो है चंद्रमा की पत्नीयां भी चरित्रहीन
नौ के नौ ग्रहों को धारण करती है
बारी बारी से यह नक्षत्र की देवीयां’

आदिवासी असण्याची ओळख जन्मानं मिळालेली दोपदी सिंघार तिच्या फेसबुकपेजवरच्या कवितेतून अनेक अवघड सवाल करते. तिचं फेसबुकवर येणं, व्यक्त होणं दोन दिवसांतच प्रचंड खळबळ माजवतं. ती लिहिते,
‘कविता अब नारा बना ली जाएगी
कविता अब झगडा बना ली जाएगी
कविता को नाव बना लुँगी
और पार करूंगी पदुमा
जिसके उपर पुल नही बनाया
इस कविता से मॅजिस्ट्रेट के दफ्तर आग लगाउँगी मै’

तुमच्या-माझ्या जगात अप्राप्य, अस्पर्श असलेलं एक जग थेट या कवितांतून समोर उभं राहिलंय. आणि ही केवळ ‘फेमिनाइन’ अभिव्यक्ती नाही. सततच्या दबून जाण्यानं, एकच एक आयडेन्टीटी लादली गेल्यानं उसळून आलेला हा उत्स्फूर्त स्वर अनेक वंचित समूहांचा आवाज बनण्याची क्षमता ठेवून आहे. ती ‘पर्सनल इज पॉलिटीकल’ असं बजावणारी आहे. या कवितांची भाषा स्वतंत्र आहे. तिला तिची स्वत:ची ठाम ओळख आहे. ती ठळक विधान करते. तिचा जन्म आणि वाढच मुळात नागरी आणि पांढरपेशी समाजाच्या बाहेर झाल्यानं ती बेदरकार, टोकदार आणि निखारेदार आहे. तसं असणंही शोभून दिसतं तिलाच. तसं असणं ही गरजही असावी तिची कदाचित. नसता ज्या ‘आउट ऑफ कव्हरेज’वाल्या एरियातून ती तुमच्या-माझ्यापर्यंत येते तशी ती येऊ, पोचू शकली नसती. मध्येच हरवून-विझून गेली असती कुठेतरी.

सोशल मीडियात थेट लेखक-वाचक असा व्यवहार असतो. लिहिणारा त्याच्या व्यक्त होण्यावर उमटणाऱ्या प्रतिक्रिया ‘लाइव्ह’ अनुभवू शकतो. आता अनेकांचा आक्षेप आहे, की तंत्रज्ञान सहज उपलब्ध असल्यानं बहुसंख्यांच्या सुमार अभिव्यक्तीलाही सहज उठाव मिळतोय. तर मला वाटतं, इतक्या तऱ्हेतऱ्हेच्या या लिखाणाला सामोरं जाताना वाचकही एका टप्प्यावर तुलना करू लागेल. त्याचीही वाचक म्हणूनची इयत्ता वाढत जाईल. साहजिकच, जे उंचीचं, ताकदीचं आणि प्रामाणिक आहे तेच शेवटी उरेल. हा उरण्यापर्यंतचा प्रवास मात्र लिहिणारा आणि वाचणारा दोघांनाही जोखणारा, समृद्ध करणारा असेल. परदेशात इंटरनेटवरच्या साहित्यासाठी २००५ सालापासून ‘लुलु ब्लुकर प्राइज’ सारखे स्वतंत्र पुरस्कारही सुरू झालेत. दुसरं महत्त्वाचं म्हणजे, या कवयित्रींच्या कवितांवर प्रतिक्रिया देताना अनेक पुरुष आणि स्त्रियाही ‘कन्फेशनल’ पातळीवर आलेत. काहींचे मुखवटे गळून पडलेत. या व्यक्तींच्या थेट प्रतिक्रियांतून सोशल मीडियावरच्या ‘समाजपुरुषाची’ मानसिकता जाणून घेणं केवढं तरी रंजक आणि उद‌्बोधक आहे.
फेसबुकच्या हिंदी अवकाशात ‘फलक’ (फेसबुक लघुकथा), लप्रेक (लघु प्रेमकथा) असे अनेक प्रयोग कधीचेच सर्वमान्य झालेत. पत्रकार रविश कुमार यांनी फेसबुकवर लिहिलेल्या लप्रेकचं पुस्तक ‘इश्क में शहर होना’ हातातून सोडवतच नाही. स्वत:च्या या प्रयोगांबद्दल ‘लप्रेक’चा एक लेखक म्हणतो, ‘आमचं लेखन अकादमिक निकषांवर कदाचित खरं उतरणारही नाही. अनेक लोक याला साहित्यच मानणार नाहीत. आम्हीही असा दावा कुठं करतो? आम्ही तर फक्त लिहीत राहतोय. काळ आणि वेळेचं भान ठेवत लिखाणाची पद्धत मात्र आम्ही बदलली. या कथा रेल्वेच्या गर्दीत, बस-ऑटोमध्ये, बातमीदारीच्या धावपळीत लिहिल्या गेल्यात. साहित्यातले जाणते मान्यवर यांच्याकडे दुर्लक्ष करतील तर करोत, पण माझा वाचक मात्र मी शोधलाय.’
पत्रकार मुकेश माचकर फेसबुकवर लिहीत असलेल्या लघुकथांना वाचकांनी डोक्यावर घेतलंय. त्यांच्या काही लघुकथांचं ई-बुकही बाजारात आलंय.
शायर अमीर मीनाई यांनी कधीचंच लिहून ठेवलंय,
‘कौन सी जा है जहां जल्वा-ए-माशूक नही
शौके दीदार अगर है तो नजर पैदा कर’

समकालीन अंदाज घेऊन तुमच्या स्क्रीनवर अवतरलेली ही पोएटिक लिपी नजरअंदाज करण्याजोगी नाहीच. मात्र ती समजून घ्यायची असतील, तर आधी जात-धर्माचीच नव्हे तर लिंग-भाषा-प्रादेशिकतेचीही झापडं काढावी लागतील. नवी ‘नजर’ पैदा करावी लागेल, इतकंच!
बातम्या आणखी आहेत...