आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॉरी शब्‍दात जादू आणि ताकदही (शर्वरी जमेनीस)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मला नृत्याची लहानपणापासूनच आवड. पं. रोहिणी भाटे या माझ्या गुरू. त्यांच्यामुळेच मला पहिल्यांदा परदेशात म्हणजे व्हिएतनामला नृत्याचं सादरीकरण करण्याची संधी मिळाली. हा प्रसंग आहे, १९९६ दरम्यानचा. मी खूपच उत्साही होते. तिथं काय काय मिळतं, याचीही माहिती मी काढली होती. तिथं चित्रकलेसाठीचे ब्रश चांगले मिळतात, असं मी ऐकलेलं. माझी बहीण शीतल ही चित्रकार. तिचं आणि माझं नातं फारच जवळचं. व्हिएतनामचे ते ब्रश देऊन तिला सरप्राइज द्यावं, असं माझ्या मनात होतं. त्यामुळं तिथं पोचल्या पोचल्या, मी ते ब्रश कुठं मिळतात, याची चौकशी करायला सुरुवात केली. आमच्यासोबत एक व्हिएतनामची मुलगी होती. तिला विचारल्यावर ती म्हणाली, इथून जवळच आहे ते ठिकाण. मी तुला घेऊन जाते. मी जातेय, याची कल्पना मी माझ्या गुरुंना दिलीच नाही. आम्ही दोघी निघालो. पण प्रत्यक्षात ते ठिकाण खूपच लांब होतं. शेवटी मला जसे हवे होते ते ब्रश मिळाले. मी खूप खूश होते. पण इकडे मी कुठं गेले, हे कुणालाच माहीत नव्हतं. सगळे जण माझी वाट पाहात होते. आम्हाला पुढे निघायचं होतं. सगळे जण बसमध्ये बसलेले. त्यात फक्त मी एकटी नव्हते. मी परत आले. बस उभी होती म्हणून बसमध्ये चढले. कुणीही माझ्याशी एक शब्दही बोललं नाही. मला पाहिल्यावर माझ्या गुरू खूप चिडल्या. चिडल्या म्हणजे, काळजीनं चिडल्या. कारण वेगळा देश. तिथलं सगळंच नवीन. माझी सगळीच जबाबदारी माझ्या गुरुंवर होती, त्यात काही चुकून घडलं असतं विचित्र तर... त्यांनी माझ्या पालकांना काय उत्तर दिलं असतं.

हा प्रसंग माझ्या अगदी डोळ्यांसमोर आहे... की सगळे बसमध्ये बसलेले. कुणीही माझ्याशी बोलत नाहीय. माझी चूक लक्षात आल्या आल्या मी “सॉरी, मी माझ्याच पॅशनमध्ये होते. मला ते फक्त ब्रश घ्यायचे होते. माझ्याकडून चूक झाली. मी असं एकटीनं जायला नको होतं. जायचं होतं तर मी आपल्यापैकी कुणाला तरी सोबत घेऊन जायला हवं होतं. किंवा सांगायला हवं होतं. इथून पुढं मी असं न सांगता कुठंही जाणार नाही आणि असं बेजबाबदारपणेही वागणार नाही”, असं म्हणत मी बसमध्येच सगळ्यांची जाहीर माफी मागितली.
कुणीही मला रागवायच्या आत मीच ‘सॉरी’ म्हटल्यामुळं, ते सगळ्यांना आवडलंही. माझ्याकडून कुणी दुखावलं गेलं आहे, हे माझ्या लक्षात आलं तर आपलं चूक आहे की बरोबर, याचा जराही विचार न करता मी ‘सॉरी’ म्हणते. कारण एखाद्या गोष्टीचा नात्यावर परिणाम होऊन जुळलेलं नातं मोडायला नको, असं मला वाटतं. माझ्याबद्दल कुणाच्या मनात राग आहे, ही गोष्टही मी सहन करू शकत नाही. त्या वेळी ‘माझी त्यात काय चूक आहे...’ असा विचार मी करत नाही. सॉरी म्हणण्यानं आपलं नातं चांगलं राहात असेल, तर मला त्यात काहीही कमीपणाचं वाटत नाही. हे माझं पहिल्यापासूनच धोरण आहे.
माझ्यातलं हे ‘सॉरी’ माझ्या वडिलांकडून आलं असावं. माझ्या वडिलांनी त्यांच्या लहानपणीचा प्रसंग मी लहान असताना सांगितला होता. त्यांचं बालपण अाफ्रिकेत गेलं. एकदा क्रिकेट खेळून ते घरी आले आणि आईनं त्यांना विचारलं, की आज किती रन्स काढल्या. खरं तर त्या दिवशी ते शून्यावर आऊट झाले होते; पण आईला सांगताना त्यांनी २० रन्स काढल्या, असं खोटंच सांगितलं. आईनं त्याबद्दल त्यांचं कौतुकही केलं. नेमक्या त्याच संध्याकाळी ते क्रिकेट खेळणारे मित्र त्यांच्या घरी आले आणि आईनं त्यांच्यासमोर ‘यानं २० रन्स केल्या ना.. छान खेळला ना...’ असं म्हटलं. तर मित्र म्हणाले, छे तो तर आज शून्यावर आऊट झालाय. हे कळल्यावर आईनं मात्र ‘तुला का माझ्याशी खोटं बोलावसं वाटलं. शून्यावर आऊट झालाय, तर तेही सांगता आलं पाहिजे.’ असं विचारलं. त्यांनी आईला सॉरीही म्हटलं; पण त्या एका चुकीमुळं आई त्यांच्याशी चार दिवस बोलली नाही. ही गोष्ट वडिलांच्या मनाला खूप लागली आणि त्यांनी आयुष्यात कधीही खोटं बोलायचं नाही, हे ठरवलं आणि पाळलंही. या प्रसंगातून जसे वडील शिकले, तशीच मीही!
काही झालं की लगेच बोलून, कबूल करून, माफी मागून मोकळं व्हायचं, हा माझा स्वभाव झाला. त्यामुळंच मी माझ्या मनात काहीही साचवून ठेवत नाही. माझा चांगला मित्र म्हणजे माझा नवरा आणि माझी आई यांच्याशी तर मी सगळं शेअर करते. नात्यांच्या बाबतीत आपल्या बाजूनं आपण स्वच्छ असणं, राहणं, यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असते. त्यासाठी ‘सॉरी’ हा शब्द मला वेळोवेळी मदत करतो. सॉरी या शब्दातच खूप जादू आहे. या शब्दात खूप ताकदही आहे. हा शब्द जितका ताकदीचा तितकाच हा शब्द उच्चारायलाही ताकद लागते, याची जाणीव माझ्या तीन वर्षांच्या मुलामुळं झाली. तो लहान असला तरी त्याला या शब्दाचा अर्थ समजतो. तो कधी कधी मला म्हणतो, ‘आई मला सॉरी म्हणता येत नाहीय.’ या वाक्यात तो ‘सॉरी’ शब्द वापरतो. पण तरीही सॉरी त्याला म्हणता येत नाही. मग मी त्याला विचारते, ‘जड जातंय का सॉरी म्हणायला?’ तोही कबूल करतो, ‘हो जड जातंय...’

एक तर आपलं आयुष्य किती आहे, हे कुणाला माहीत नाही. त्या आयुष्यात हजारो माणसं भेटत असतात. भेटणाऱ्या प्रत्येकाशीच शेवटपर्यंत ऋणानुबंध जुळतात, असं नाही. पण जे भेटतात, त्यांच्याशी मतभेद करून जगण्यात काहीच अर्थ नसतो. चांगलं वागून आपल्यामुळं त्यांचं आणि त्यांच्यामुळं आपलं आयुष्य सुंदर होणार असतं. मग चांगलं वागायला काय हरकत आहे?
शर्वरी जमेनीस
शब्दांकन : अभिजित सोनवणे
abhi.pratibimb@gmail.com
बातम्या आणखी आहेत...