आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑल टाइम फीस्ट !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्नेस्ट हेमिंग्वेच्या प्रतिमेबद्दल बोलायचं म्हणजे, ‘द ओल्ड मॅन अँड सी’सारख्या कादंब-याबद्दल बोलायला हवे, किंवा त्याच्या छोट्या पण सशक्त कथांबद्दल बोलायला हवे. हेमिंग्वेचे फारसे प्रसिद्ध नसलेले पॅरिसवरचे पुस्तक हे माझे आवडते पुस्तक आहे. पॅरिसला तो ‘मुव्हेबल फीस्ट’ म्हणजे चालताबोलता आनंदसोहळा म्हणतो.
1960च्या सुमारास हेमिंग्वेने ‘ए मुव्हेबल फीस्ट’ हे पुस्तक लिहिले. त्या काळात हेमिंग्वे प्रसिद्धीच्या शिखरावर होता. उलट त्याच्या पॅरिसमधल्या आठवणी या गरिबीच्या आणि कष्टाने जगण्याच्या आहेत; तितकेच ते ऐन बहरातल्या पॅरिसचे डॉक्युमेंटेशनही आहे. त्या काळात टी. एस. एलियटसारखा कवी, पिकासोसारखा चित्रकार, अपोलोनियरसारखा कवी, गर्ट्रड स्टाइनसारखी लेखिका आणि चित्रसंग्राहक, दिएघलेवसारखा ऑपेरा दिग्दर्शक आणि स्ट्राविन्स्कीसारखा संगीतकार हे सारे पॅरिसमध्ये वावरत होते. इलिएट बँकेत कारकुनी करत असे, आणि पैसे नसलेले सारे हेमिंग्वेचे मित्र म्हणत की आपण पैसे जमवू, त्याला त्या कारकुनीतून मुक्त करू. त्या काळात हेमिंग्वे केवळ लेखनाच्या मानधनावर जगत असे. साहजिकच आर्थिक विवंचना होतीच.
पुस्तके घ्यायला पैसे नसले, तरी पॅरिसमध्ये शेक्सपियर अँड कंपनीसारखे अफलातून दुकान होते, ज्यामुळे त्याची पुस्तके वाचायची सोय झाली. इझरा पाउंडसारखा कवी पॅरिसमध्ये होता. त्याने इलियटचे ‘वेस्ट लँड’ हे गाजलेले दीर्घकाव्य संपादित केले होते, आणि त्यातील अनावश्यक भाग काढून टाकले. हे घडतानाचे पॅरिस आपल्याला मुव्हेबल फीस्टमधून दिसते.
पुस्तकाच्या सुरुवातीलाच हेमिंग्वे एका कॅफेमध्ये बसला आहे. नेहमीप्रमाणेच पेन्सिलीने तो कागदावर कथा लिहीत बसला आहे. त्याच्यासमोर एक सुंदर तरुणी येऊन बसली आहे. त्याला त्या क्षणी वाटतं, हिला कथेत कुठेतरी सुंदर स्थान द्यायला हवं. तो कथा पुढे लिहीत राहतो. रम मागवतो. ‘हे सुंदरी, मी तुला पाहिले आहे, अन् तू कोणाची तरी वाट पाहत असलीस तरी माझी तुझ्यावर मालकी आहे. माझे तुझ्याशी नाते आहे, तसेच पॅरिसशीही नाते आहे. त्याचप्रमाणे वही आणि पेन्सिल यांची माझ्यावर मालकी आहे’, असे हेमिंग्वे लिहून जातो. लेखकाचे सगळ्यात मोठे नाते असते, ते म्हणजे कागद आणि पेन्सिलीशी. त्याबद्दल लिहीत असताना हेमिंग्वे पॅरिसबद्दलचे आपले बंध उलगडून दाखवतो. त्याचे कवी-लेखक-मित्र यांच्या विश्वात आपल्याला घेऊन जातो.
गर्ट्रड स्टाइनच्या घरी त्यातले कवी-लेखक येत. सुरुवातीला लेखनात हेमिंग्वेला गर्ट्रड स्टाइनचे मार्गदर्शन लाभले. ती म्हणत असे, ‘तुझ्या लेखनात एक तरी सत्य वाक्य लिहीत जा. तुला ज्यातील सत्य भिडले, त्यातील एक वाक्य लिहीत जा.’ रिकाम्या पोटी हेमिंग्वे सेझान आणि मानेची चित्र पाहत फिरत असे. स्वस्त वाइन तो विकत घेई आणि त्यात पाणी टाकून पीत असे. तो हेन्री जेम्सच्या कादंब-या वाचत असे.
यातील एका प्रकरणाचे नाव आहे, ‘हंगर वॉझ अ गुड डिसिप्लिन.’ त्यात तो सांगतो की, पॅरिसमध्ये कायम भूक लागते, कारण कायमच बेकरीमध्ये खिडकीत अनेक पदार्थ सजवून ठेवलेले असतात आणि रस्त्यांवर टेबलाशेजारी बसून माणसं खात-पीत असतात. अर्धपोटी असताना सेझानची चित्रं अधिक शार्प वाटत, असे तो सांगतो.
स्कॉट फिट्झजेराल्डसारख्या नामवंत कादंबरीकाराबद्दल खूप तपशिलात त्याने लिहिले आहे. तो सांगतो, ‘स्कॉट हा नेहमीच मुलासारखा दिसत असे. भु-या रंगाचे चमकदार केस, उंच कपाळ, उत्सुक आणि मैत्रीचा भाव असलेले डोळे, मोठे ओठ असलेला नाजूक चेहरा अगदी मुलीसारखा... त्याचा चेहरा पाहून नेहमी काळजी वाटायची, आणि मैत्री झाल्यावर ती काळजी अधिक वाढायची.’ हेमिंग्वे आणि त्याची पत्नी, स्कॉट फिट्झजेराल्ड दांपत्याच्या सहवासात रमत. त्या वेळेस स्कॉटचे ‘द ग्रेट गॅट्स्बी’ हे पुस्तक गाजत होते. त्यामुळे वयाने तो प्रौढ असणार, अशी अटकळ हेमिंग्वेने बांधली होती; पण प्रत्यक्षात स्कॉट बराच तरुण निघाला. एकूणच जगाची सांस्कृतिक राजधानी असलेले पॅरिस आपल्याला भेटते. कधी आत्मचरित्र न लिहिलेल्या हेमिंग्वेचे आतले व्यक्तिमत्त्व आतून प्रकट होते. सर्वात गंमत म्हणजे, हे लेखन ते सारे दिवस मागे पडल्यानंतर त्याने केले आहे. पॅरिसला जागतिक क्षितिजावर महत्त्व का प्राप्त झाले, ते पुस्तक वाचताना लक्षात येते.