आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ही'लोकप्रियता कशामुळे?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत्युंजय, स्वामी, श्रीमान योगी, छावा यांसारख्या पुस्तकांची लोकप्रियता नेमकी कशात आहे? वाचनालयात कधीही या पुस्तकांच्या प्रती पाहिल्या तर शेकडो वाचकांनी वाचून त्या खिळखिळ्या केलेल्या असतात. जे वाचक सहसा इतर पुस्तक वाचत नाहीत, तेही ही पुस्तके वाचतात; अनेकदा तर विकत घेऊन. त्यामुळेच अलीकडे ही पुस्तके पायरेटेड स्वरूपात रस्त्यावर आली आणि खळबळ माजली. प्रकाशकांना या पुस्तकांमुळे खूप लाभ होतो; पण ते कागद आणि छपाईत सुधारणा करताना दिसत नाहीत. मात्र मेहता प्रकाशनने उत्तम कागद, छपाई आणि सोनेरी रंगाचे मुखपृष्ठ या स्वरूपात मृत्युंजयची आवृत्ती काढली आहे.
मृत्युंजय प्रसिद्ध झाली तेव्हा शिवाजी सावंत हे नाव कुणाला माहीत नव्हते. ही त्यांची पहिलीच कादंबरी. कर्णासारखा कौरवांच्या बाजूने लढणारा म्हणजे एका अर्थाने खलनायक; त्याला त्यांनी नायक केले. हा बदल 1940-50च्या दशकात वाचकांना रुचला नसेल; पण 1960च्या दशकात मराठी साहित्यात अनेक नव्या घटना घडल्या. पांडुरंग सांगवीकरसारखा न-नायक ‘कोसला’चा नायक बनला.
पु.लं.नी घाबरट आणि साध्या नायकाला घेऊन आपले साहित्य बेतायला सुरुवात केली आणि सूतपुत्र म्हणून हिणवल्या गेलेल्या कर्णाला शिवाजी सावंत यांनी नायक केले. साहित्य, चित्रपट आणि नाटकांमध्ये एक ऑब्वियस म्हणजे आपल्या मनाप्रमाणे घडणारे काहीतरी असते. ते तसेच घडले तर नाट्य उभे राहत नाही. यामुळे जगभरच्या महाकाव्यात विराट ताकदीची जी पात्रे निर्माण झाली, त्यांना ती ताकद गमावणारे तत्त्वही लाभले. उदाहरणार्थ, अचीलीस या ग्रीक महाकाव्यातील शक्तिशाली नायकाच्या टाचेचा भाग नाजूक असतो आणि तोच भेदून त्याला मरण येते. आपल्याकडेही कृष्णाला तळव्याला बाण लागून मृत्यू येतो आणि कर्ण तर कवचकुंडलं यामुळे अभेद्य; पण त्याला मृत्यू येतो तो श्रीकृष्णाच्या कुटिल नीतीमुळे. ब्राह्मण भिक्षुकाचा वेष घेऊन कृष्ण त्याची कवचकुंडलं दानात मागतो.
जन्म एक प्रकारे सूतपुत्र म्हणून हिणवण्यात गेलेला आणि मृत्यू अशा लबाडीने आलेला. समोर आई असून तिला आई म्हणून हाक न मारता येणारा कर्ण हा ख-या अर्थाने एका शोकांतिकेचा नायक आहे. आणि जगभर मानवी समाजात शोकांतिका आवडतात. भव्य नायकाचे उंचावरून होणारे पतन हा विषय सर्वसामान्यांना भावतो. पण त्याच वेळेस असा नायक दूरस्थ वाटता कामा नये. तो आपल्यातला वाटायला हवा. मानवी सुखदु:खाने पोळलेला नायक हवा. हॅम्लेट हा असा नायक आहे आणि इडीपस हादेखील. या मालिकेत शिवाजी सावंतांनी कर्णाला नेऊन बसवले. अशा व्यक्तिरेखा प्राचीन महाकाव्यात का दिसतात आणि विसाव्या शतकात शोकांतिका का निर्माण होत नाहीत, याची चर्चा जॉर्ज स्टायनर या प्रसिद्ध समीक्षकाने ‘डेथ ऑफ अ ट्रॅजिडी’ या ग्रंथात केली आहे. त्याचे म्हणणे असे की वर्तमानपत्रे, बातम्या यामुळे भोवतालच्या रंजक अशा कथनाचा सोपा मार्ग वाचकांना उपलब्ध झाला. दुसरीकडे उत्तुंग अशा व्यक्तिरेखा, राजेरजवाडे आणि जुना काळ यात सहज मिळणे शक्य होतं. हॅम्लेट नाटकाचे नाव ‘ट्रॅजिडी ऑफ किंग ऑफ डेन्मार्क’ असे आहे. कारण राजपुत्रासारख्या व्यक्तिमत्त्वाभोवती सर्वसामान्यांच्या अपेक्षा गोळा होतात आणि त्याचे पतन हा उत्तुंग आविष्कार ठरतो. हे सारे विसाव्या शतकात शक्य नाही. म्हणून विसाव्या शतकातील पूर्ण महाभारत न वाचलेल्या नव्या वाचकाला सुटसुटीत महाभारत, उदात्त कथानक, जबरदस्त प्लॉट आणि भरजरी भाषा ही सारी पॉप्युलर कल्चरमधली आवश्यक मूल्ये एका पॅकेजमध्ये मिळण्याची सोय शिवाजी सावंत यांनी करून देताच वाचक त्यावर तुटून पडले. मृत्युंजय मराठीतच काय, हिंदी आणि इतर भाषांतही लोकप्रिय आहे, ते उगाच नव्हे. ‘मृत्युंजय’चे यश सावंतांच्या ‘छावा’ सारख्या पुस्तकाला लाभले नाही; पण अलीकडे ते थोडे लोकप्रिय झालेले आहे. मृत्युंजयच्या यशाची तुलना फार कमी पुस्तकांशी करता येते. प्रश्न एवढाच उरतो की जी माणसे वाचनालयातून किंवा विकत घेऊन मृत्युंजयसारखे आकाराने मोठे पुस्तक वाचतात, ते इतर मराठी साहित्याकडे
वळत कसे नाहीत? स्वामी, मृत्युंजय, ऐतिहासिक कादंब-या यातच त्यांची रुची अडकून का पडते?