आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shashikant Sawant Article About Alexander Frater

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शोध पाऊसखुणांचा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलेक्झांडर फ्रेटर हा ब्रिटिश लेखक. त्याचे वडील स्कॉटिश मिशनरी होते. दक्षिण पॅसिफिकमधल्या छोट्या बेटांवर अलेक्झांडरचे बालपण गेले. मिशनरी वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेले त्याचे वडील चेरापुंजीबद्दल बोलत ते अलेक्झांडर लहानपणापासून ऐकत होता. त्याच्या घरातल्या चित्राच्या खाली लिहिले होते, चेरापुंजी आसाम ‘द वेटेस्ट प्लेस ऑन अर्थ’- जगातील सर्वात भिजरे गाव. एका दिवसात 35 इंच पाऊस पडणार्‍या या गावाचे हे वर्णन वेबशॉट नावाच्या मित्राने केले होते. तेव्हापासून मान्सून आणि चेरापुंजी अशा दोन गोष्टी पाहायच्या आणि अनुभवायच्या, असा ध्यास अलेक्झांडर फ्रेटरला लागला. 1986मध्ये चीनमध्ये प्रवास करताना त्याला विचित्र आजाराची लक्षणे जाणवू लागली. हा मज्जातंतूचा आजार होता, ज्यावर उपाय नव्हता. निराश झालेल्या फ्रेटरला तसाच आजार असलेल्या माणसाची बायको भेटली. तिचा नवरा लेखक होता. त्याचं नाव मिस्टर बाप्टिस्टा. ते गोव्याचं कुटुंब होतं.

दोघं मान्सूनबद्दल बोलायला लागले आणि बाप्टिस्टाने त्याला कालिदासांच्या मेघदूतातील वर्णन ऐकवले. बाप्टिस्टाचे मूळ गाव केरळात होते. यानंतर लेखकाने भारतात जायचे ठरवले. त्यातून आकाराला आले ‘चेसिंग द मान्सून’ हे पुस्तक. पाऊस पाहता पाहता भेटलेली माणसे, ठिकाणे, भारतीयांचे वागणे आणि जगणे या पुस्तकात विलक्षण रंजक पद्धतीने सांगितलेले आहे. शिवाय अलेक्झांडरच्या काळापासून ते इब्न बतुतापर्यंत प्राचीन प्रवासी आणि 17व्या, 18व्या शतकातील ब्रिटिश लेखक असा इतिहासही या पुस्तकातून वाचकासमोर ठेवण्यात आला आहे. मुंबईत पोहोचल्यावर फ्रेटर लिहितो की, तो भारतात आला होता त्या वेळी या देशातील सात राज्यांना पाण्याचा तुटवडा जाणवत होता. अनेक ठिकाणी चार वर्षांत पाऊस पडला नव्हता. ज्या केरळमध्ये तो दुसर्‍या दिवशी जाणार होता, तिथे टँकर्स साडेबारा हजार ठिकाणी पाणी पोहोचवत होते. इंजिनिअर्सनी 11 हजार 216 ठिकाणी हायड्रंट्स बसवले होते. 500पेक्षा ट्यूबवेल्स आणि 400 बोअरवेल्स राज्यभरात खोदल्या होत्या. आंध्रमध्ये लोकांना एक दिवसाआड पाणी मिळत होते, तर चेन्नईमध्ये एक लाख 80 हजार लोकांना बादल्या दिल्या गेल्या, पण पाणीच नव्हते. पालघाटमध्ये दूषित पाण्याने गॅस्ट्रोने 22 जण मरण पावले. मुंबईमध्ये फ्रेटर हा आफ्टरनून वर्तमानपत्रातला बी टू बी कॉलम वाचतो. त्रिवेंद्रमच्या दिशेने निघतो. तिकडे 39 अंश सेल्सिअस तापमान असते. तेथे लोक पावसाची वाट पाहत होते, असे निरीक्षण फ्रेटरने नोंदविले आहे.

मान्सून हे एक निसर्गाचं वेगळंच संयंत्र आहे. समृद्ध आणि जमिनीवरच्या तापमानातील फरकाने मान्सून विस्तारतो, वर चढतो. समुद्राच्या थंड हवेत विषुववृत्ताच्या दक्षिणेला भारतीय समुद्रावर त्याचा प्रचंड वेग असलेला प्रवाह वाहू लागतो. समुद्राची वाफ गोळा करत मान्सूनचे ढग भारताच्या दिशेने कूच करतात. ही वाफ थंड होत असताना ऊर्जा तयार होते, त्यामुळे हवा व्यापून ढगाला ढकलते. समुद्राहून अधिक आर्द्र हवा सामावली जाते. हा मान्सून अरबी समुद्र, मग पश्चिम घाटावरून येतो. तसाच बंगालच्या उपसागरावरूनही येतो. तोच चेरापुंजीच्या दिशेने जातो. हिमालय पर्वतामुळे गंगेच्या पठारावर जातो. पाऊसरूपाने पडतो. कोलकात्याचा मान्सून मुंबईपेक्षा तीन दिवस आधी येतो.

हवामानाचा अभ्यास करण्यासाठी हवेत हायड्रोजन भरलेले फुगे सोडले जातात. त्यात ट्रान्समीटर, तापमानमापक, थर्मिस्टर व हायड्रोमीटर ही उपकरणं ठेवली जातात. यामुळे 75 हजार फुटावरील हवेचा दाब, तापमान, आर्द्रता व वार्‍याचा वेग मोजला जातो. ज्या काळात असे फुगे नव्हते, त्या काळात पतंगांच्या साहाय्याने हा अभ्यास केला जाई. 31 मे ते 15 जून अशा 16 दिवसांचा डायरीवजा वृत्तांत लेखक सादर करतो. अर्थातच इंग्रजी भाषेत लेखक जेव्हा लिहीत असतो, तेव्हा त्याने प्रामुख्याने इंग्लंड, अमेरिकेचा वाचक आणि ढोबळमानाने जगभरातील वाचक समोर ठेवलेला असतो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट तपशिलाने समजावण्याची जबाबदारी लेखकावर पडते. उदाहरणार्थ, रिक्षा, यज्ञ म्हणजे काय? इत्यादी. तो भारतातील विविध धर्माची माणसं, त्यांचं वागणं-बोलणं, ब्रिटिशांचे राज्य, इथले रस्ते, भ्रष्टाचार, आयुर्वेदीय दवाखान्यासारख्या विविध संस्था, परकीयांकडे संशयाने व आपुलकीने बघण्याची वृत्ती, विविध लेखक, कलावंत अशा विविध गोष्टींचे दर्शन आपल्या लेखनातून घडवतो.

मुंबई, त्रिवेंद्रम, गोवा असं करत अलेक्झांडर फ्रेटर चेरापुंजीला पोहोचतो. तेव्हा गावकरी संशयाने पाहतात. अगदी छत्री विकणारादेखील इतक्या पावसात त्याला छत्री देत नाही, पण चटकन दोस्ती करायच्या स्वभावामुळे तो छोटासा मुक्काम लेखक मजेत घालवतो.