अलीकडेच बीबीसीची प्रतिष्ठेची रेथ लेक्चर्स ही भारतातली भाषणमालिका गुंफणारा अतुल गवांदे हा मूळचा महाराष्ट्रीय. त्याची ‘बेटर’ आणि ‘चेकलिस्ट मेनिफेस्टो’ ही पुस्तकेदेखील नावाजली आहेत.एक दिवस न्यूयॉर्कर साप्ताहिकाच्या कार्यालयात एक तरुण डॉक्टर आला. तो प्रसिद्ध हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये शिकत होता. तो इंटर्न असताना, एक दिवस इमर्जन्सी आली होती. मद्य प्यायलेल्या एका लठ्ठ बाईला इस्पितळात आणण्यात आले होते. तिचा श्वास बंद पडत होता. तोंडातून नलिका घालण्याचे प्रयत्न थकल्यावर गळ्यातून नाईफने काप घेऊन त्यातून ऑक्सिजन देणे भाग होते. केवळ चार मिनिटांत हे करणे आवश्यक होते. त्याने काप घेतला, तो नेमका चुकीचा. त्यामुळे रक्तवाहिन्या फुटल्या. नळी काढणे अशक्य झाले. तितक्यात त्याचा सीनियर आला. गळ्यात केलेल्या खाचेतून नळी आत नेली. बाई बचावली. दर शनिवारच्या रुग्णालयाच्या बैठकीत, सर्व ज्येष्ठ डॉक्टरांच्या उपस्थितीत आठवडाभरातील कामांचा लेखाजोखा घेतला गेला. त्यात या केसची चर्चा झाली. याच प्रकारे आठवडाभरातल्या घटनांवर रुग्णालयात चर्चा झाली. शिकाऊ डॉक्टर किंवा अनुभवी डॉक्टरांकडून ज्या चुका होतात, त्या कशा टाळल्या जातील, याचा गांभीर्यपूर्वक विचार केला गेला. याच रुग्णालयात नव्हे, तर अमेरिकत सर्वत्र किंबहुना जगभर डॉक्टर काम करत करत शिकतही असतात. त्यांच्याकडून होणाऱ्या चुकांमुळे पेशंट दगावतो किंवा अत्यवस्थ होतो. शेवटी डॉक्टरकी हा प्रॅक्टिस करता करता शिकण्याचा व्यवसाय आहे, ज्याला इंग्रजीत ‘ऑन जॉब’ शिकणे असे म्हणतात. साहजिकच शस्त्रक्रिया करणे, किंवा भूल देणे यांसारख्या गोष्टीत शिकणाऱ्या माणसाची चूक महाग पडते. त्यावर काही जाणीवपूर्वक उपाययोजना केल्या जात होत्या... अतुल गवांदे हे सारे एका तरुण संपादकाला सांगत होते, त्याचे डोळे लकाकले. कुठल्याही संपादकाचे िचत्तवेधक गोष्ट ऐकल्यावर एकच वाक्य असते, ‘लिहून पाठवा.’
अतुल गवांदे हे सारं लिहून घेऊन गेला. त्याला वाटलं, थोडाफार संस्कार करून हे छापलं जाईल. पण संपादकाने लेखात अनेक प्रश्न निर्माण केले, अनेक रिकाम्या जागा दाखवल्या, कुठे कुठे मजकूर वाढवता येईल ते दाखवले. थोडक्यात, सारा लेख पुन्हा नव्याने लिहावा लागणार होता. अतुल गवांदेला याची सवय नव्हती. तरी त्याने कसाबसा लिहून काढला. पण पुन्हा तेच. आणखी नवे प्रश्न, आणखी नव्या सुधारणा, आणखी नवे तपशील. एकंदरीत अतुल गवांदेने सहा वेळा हा ४५ पानी लेख लिहून काढला. लेखाचे शीर्षक होते- ‘व्हेन डॉक्टर मेक मिस्टेक’.
लेख छापण्याबाबत दोन-तीन शंका होत्या. एक तर त्यामुळे अतुल गवांदेची नोकरी जाण्याचा धोका होता, दुसरे म्हणजे लेखात काही चुका करणाऱ्या डॉक्टर्सची नावे होती. लेखात अनेक खळबळ उडवणारी माहितीही होती. जसं की, अमेरिकेसारख्या देशात अॅनास्थेशिया म्हणजे, भूल देताना ८०च्या दशकात हजारो माणसे मरत होती. कारण भूल देताना जर कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढले, तर माणूस मृत्युमुखी पडतो. भूल देताना कार्बन वाढल्यास मीटर ते दाखवते. त्या वेळी देशभरात एकसमान मीटरही नव्हते. काही ठिकाणी कार्बन वाढल्यास मीटर उजवीकडे वळायचे, तर काही ठिकाणी डावीकडे. याबद्दलचे प्रशिक्षण देताना अर्थातच जिवंत माणसाचा वापर व्हायचा. हा प्रश्न सोडविण्यासाठी एका २८ वर्षंाच्या तरुणाची निवड करण्यात आली. त्याने एक मानवी वाटणारे ‘मॅनक्वीन’(मानवी पुतळा)सारखे मॉडेल बनविले, ज्याच्यावर अॅनास्थेशिया देण्याचे प्रशिक्षण देता येईल. या मॉडेलमध्ये कार्बनचे प्रमाण वाढल्यास मीटर ते सूचित करत असे. ही आणि अशी बरीच माहिती लेखात होती. डॉक्टरांच्या चुकांमुळे बरेच नुकसान होत होते, हा लेखाचा गाभा होता. लेख प्रसिद्ध झाल्यावर वैद्यक विश्वात खळबळ तर माजलीच, पण ‘लॅन्सेट’ या वैद्यकविषयक प्रतिष्ठित नियतकालिकानं त्याबद्दल संपादकीय लिहिले. यामुळे हा लेख मोठ्या प्रमाणावर वाचला गेला. नंतर अतुल गवांदे यांच्याकडून वैद्यक विश्वावर न्यूयॉर्करने अनेक लेख लिहून घेतले.
अमावास्येला ऑपरेशन्स कमी होतात वा स्विझर्लंडमध्ये लाजण्यावरही ऑपरेशन होतात. अशा विषयांवरील लेखांचे संकलन असलेले ‘कॉम्प्लिकेशन’ हे पुस्तक २००२ मध्ये प्रसिद्ध झाले व उत्तमरीत्या ते खपले. जाणकारांनी या पुस्तकाला आधुनिक क्लासिकच्या श्रेणीत बसवले आहे. तसेच अतुल गवांदे यांचा समावेश आता जगातील १०० महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये झाला आहे.
shashibooks@gmail.com