आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘शांतारामा’चे पुनरागमन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखादा सिनेमा कसा बनतो? सिनेमाचा कथेपासून शूटिंगपर्यंत आणि शूटिंगपासून पडद्यावर जाईपर्यंत कसा विकास होतो, हे सांगणारी पुस्तकं इंग्रजीत मुबलक आहेत; पण मराठीत त्यांची संख्या मोजकीच, हाताच्या बोटावर मोजता येण्याइतकी. अशा हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या पुस्तकांत फ्रांकवा तृफाँ या फ्रेंच लेखकाने घेतलेल्या आल्फ्रेड हिचकॉकच्या मुलाखतीचे पुस्तक किंवा ‘व्हेन द शूटिंग स्टॉप्स’सारखी किती तरी पुस्तके आहेत, शिवाय दिग्दर्शकाने स्वत:बद्दल बोलून तयार केलेले ‘किल्सोवस्की ऑन किल्सोवस्की’, ‘वास्दा ऑन वास्दा’ अशी ‘फेबर अँड फेबर’ची पुस्तकेही आहेत. मात्र मराठीत या सार्‍यांची वानवाच आहे.

व्ही. शांताराम यांचं मूळ नाव शांताराम वणकुंद्रे. सोलापूरजवळच्या एका गावात त्यांचे बालपण गेले. त्यांचा मोठा भाऊ नाटकात काम करत असे. त्याला मिळणारी दाद पाहून आपणही नाटकात जायला हवे, असे त्यांना वाटू लागले. लहानपणीचे प्रसंग ते सांगतात, आई-वडील फोटो काढणार होते, तेव्हा आपलाही फोटो आला पाहिजे, असा त्यांनी हट्ट धरला. त्यामुळे दोन्ही मुलांना फोटोजवळ उभे करण्यात आले. पण नंतर जेव्हा फोटोचे प्रिंट मिळाले, तेव्हा त्यात आई-वडीलच होते. नाराज झालेल्या शांतारामांना समजावले गेले की, ‘तुम्ही लहान आहात म्हणून तुमचा फोटो निघाला नाही. तुम्ही आमच्याइतके मोठे झालात की तुमचा फोटो येईल.’ त्यानंतर शांताराम सांगतात, माझ्या बालपणीच्या आठवणी त्या काळातील या फोटो काढण्याच्या बाळबोध पद्धतीसारख्याच आहेत. कालांतराने काही पुसट झाल्या आहेत; काही धूसर, ढगाळलेल्या आहेत; तर काही सप्तरंगात नटलेल्या आहेत; काही तर निव्वळ निगेटिव्हसारख्याच आहेत, ज्यांचा ठसा कालांतराने माझ्या मनावर उमटलाय.

किर्लोस्कर नाटकमंडळी गावात आलेली असताना त्यांनी दिलेली भरजरी कापडे घालून शांतारामांचा फोटो काढला जातो; तेव्हा असे भरजरी कपडे एरवी आपण घालत नाही, म्हणजे आपण गरीब आहोत का? असा प्रश्न त्यांना पडतो. आई-वडील, आजोबा यांची सुंदर व्यक्तिचित्रे त्यांनी ‘शांतारामा’मध्ये रेखाटली आहेत. लहानपणी शाळेत असताना छोटा शांताराम एका कवितेला स्वत:ची चाल लावतो आणि मास्तरांची छडी खातो. काही नवीन करू पाहणार्‍याची आपल्याकडे कशी गोची होते, हे शांताराम यांनी या निमित्ताने रेखाटले आहे. नंतर ते नाटक कंपनीत रमतात. वडील किराणा मालाचे दुकान काढतात, ते फारसं चालत नाही. आधी नकला आणि मग नाटकात काम, असा प्रवास करत ते सिनेमापर्यंत पोहोचतात. शांतारामाच्या नकला पाहून, त्यांच्यातला अभिनयगुण ओळखून त्यांना आमच्या नाटक कंपनीत पाठवाल का, अशी विचारणा त्यांच्या वडिलांकडे गंधर्व नाटक मंडळीच्या गोविंदराव टेंबे यांनी केली होती. त्यानंतर लहान वयात आई-वडिलांना सोडून शांताराम गंधर्व नाटक कंपनीत दाखल होतात आणि स्त्री भूमिका करू लागतात.

त्यानंतरचा त्यांचा प्रवास मात्र ‘प्रभात’ आणि भारतातल्या पहिल्या चित्रपटापर्यंत होतो- ‘अयोध्येचा राजा’. त्या चित्रपटाबद्दल ते सांगतात, तो चित्रपट नसून बोलपट होता. त्या काळातील अनेक सर्जनशील कलावंतांबरोबर शांताराम यांना काम करायला मिळाले. महाराष्ट्रातील कंपनीमध्ये बाबूराव पेंटरांसोबत काम केल्यानंतर ते ‘प्रभात’पर्यंत पोहोचतात. पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शन करताना त्यांनी ऐतिहासिक चित्रपटातील लढाईतील चित्र ‘चंद्रज्योती’च्या प्रकाशात न घेता तोफेच्या गोळ्यातून बाहेर येणार्‍या प्रकाशात घेतली. नंतर अर्थातच ‘दो आँखे बारह हाथ’, ‘झनक झनक पायल बाजे’, ‘अमृतमंथन’, ‘संत तुकाराम’, ‘डॉ. कोटणीस की अमर कहानी’ अशा अनेक चित्रपटांच्या अमरकथा आपल्याला कळतात. शांताराम यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू यात दिसतात. दादासाहेब फाळकेंची परिस्थिती खालावल्यावर त्यांनी शांताराम यांना भेटायला बोलावले. औषधोपचार आणि घरखर्चासाठी काही रक्कम दिलीत तर मोठे उपकार होतील, असे सांगितले. ‘तुम्हांला पैसे पाठवण्यात उपकार कसले, आम्ही तुमच्या छायेतच उभे आहोत. हे तुमच्या हक्काचे पैसे आहेत.’ असे म्हणत शांताराम दादासाहेबांना पैसे पाठवतात. पुस्तकात असाही उल्लेख आहे की, नंतर म. गांधीजींच्या जीवनावर चरित्रपट बनवण्यासाठी व्ही. शांताराम यांनी इंदिराजींना पत्र लिहिले होते.

पुस्तकात शांताराम यांच्या आणखी एका वेगळ्या पैलूचा परिचय होतो; तो म्हणजे, तंत्रज्ञानावरील त्यांची पकड. कॅमेरा बिघडला आहे, असं कॅमेरामनने सांगताच ते स्वत: कॅमेरा दुरुस्त करत आणि शूटिंगचा खोळंबा थांबवत. शूटिंगमध्ये येणारी नवनवीन तंत्रे उत्साहाने हस्तगत करण्याच्या स्वभावामुळेच त्यांनी नवा प्रवाह निर्माण करणारे चित्रपट दिले आणि ‘राजकमल’सारखी मोठी संस्था नावारूपाला आणली. चित्रपट बनण्याची प्रकिया नेमकी काय असते, हे समजण्यासाठी तरी हे पुस्तक वाचायलाच हवे.
shashibooks@gmail.com