आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंदध्वजाच्या चावटिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘आनंदध्वजाच्या कथा’ हा मराठी चावटिकांचा संग्रह. त्याच्या सुरुवातीच्या प्रस्तावनेत आनंद साधले म्हणतात, ‘अशातच (नरहर) कुरुंदकर यांचा एक दीर्घकालीन सहवास मुंबईत लाभला, तेव्हा त्यांच्याशी झालेल्या संवादात या खेळाला रंग, रूप, आकार आले. चतुर्भाणी या वेश्या-जीवनावरील धाडसी दुर्मीळ संस्कृत ग्रंथाचा अनुवाद मी करावा, असा कुरुंदकरांचा आग्रह होता. जे अश्लील असेल वा नसेल, पण ते चावट (RIBALD) आहे, अशा साहित्याला इंग्रजी भाषेत जी प्रतिष्ठा आहे, ती मराठीत नाही; आजचा मराठी वाचक मात्र चावट साहित्याचा रसास्वाद घ्यावयास पात्र, असा प्रौढ वाचक आहे. तेव्हा, ‘आनंदध्वज’ या संकल्पित व्यक्तिरेखेभोवती चावटपणाचा वास येईल, अशा कथांची गुंफण करावी आणि त्यांचे ग्रंथीकरण करताना कुरुंदकरांनी ‘चावटपणा’ या रसाचे विश्लेषण करणारा साहित्यशास्त्रीय मोठाला प्रबंध त्या ग्रंथाला प्रस्तावना म्हणून जोडावा, असे ठरले.’
या संग्रहात १२ कथा आहेत. प्रामुख्याने चिनी, पोलिश, संस्कृत अशा विविध देशांतील आणि संस्कृतीतील कथांवर आधारित या कथा आहेत. एक कथा तर वेताळ पंचविशीतील कथांवर आधारित आहे. या साऱ्यांमध्ये आनंदध्वज हा सामाईक आहे. कथांचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यासाठी वापरलेली खास संस्कृतप्रचुर भाषा.
‘ती अर्थपतीच्या नजरे आली. तेयाचे भान हरपले. तो वेडा जाहला. भूमीस खिळला. ती जलविहार करीत होती. सचैल स्नानविधी रंगला होता. वस्त्रे सर्वांगी चिकटली होती. पी पी रूपलावण्य पीत होती. घे घे म्हणून ते विखुरत होती. तेयांतीलच कुणी एक. तियेला अर्थपती दिसला. एकटक पाहणारा. रूपलावण्य पिऊन घेणारा. जणू भुंगाच कमलवनीचा.’
या कथासंग्रहाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, वसंत सरवटेंची अफलातून चित्रे. सरवट्यांनी प्रत्येक कथेसाठी एक खास चित्र काढले आहे. त्यासाठी भारतीय मिनिएचरसारखा फॉर्म वापरला आहे. वरील शिष्यत्वाच्या त्रिशूळखुणा या कथेत आनंदध्वजाचा अर्थपती नावाचा मित्र या तरुणीला पाहतो, तेव्हा ती कमळ तोडून आपल्या कानावर तीन वेळा ठेवते, नंतर आपले दात घासते. नंतर कानावरचे कमळ काढून डोक्यावर धरते आणि मग हृदयाशी धरते.
तिच्या या खुणांचा अर्थ आनंदध्वजाला कळतो. कानावर फूल म्हणजे कर्णफुला, असे तिचे नाव. दात घासले म्हणजे दंत धावन केले. यावरून ती दंतराय सार्थवाहाची मुलगी आहे. कमळ डोक्यावर धरले म्हणजे, तुझ्या मनातील कमळफूल तिला वंदनीय आहे आणि नंतर हात हृदयावर ठेवला म्हणजे, तुझ्या प्रेमाचा तिने स्वीकार केलेला आहे. तर ही कर्णफुला सौंदर्यासाठी प्रसिद्ध अशी तरुणी असते. देशोदेशींच्या राजांची तिला मागणी असते. त्यामुळे दंतराय अर्थपतीला दारातही उभा करणार नाही, असे आनंदध्वज सांगतो आणि त्याला घेऊन चतुरा नावाच्या एका कुंटणीकडे जातो. तिला विनंती करतो की, दोघांचा संकेत जुळवावा. तसे करण्यासाठी ती एक हजार मुद्रा मागते.
तर ती चतुरा कुंटीण एक दिवस कर्णफुलाला तो निरोप द्यायला जाते. तर कर्णफुलाला सख्या चंदन-कापुराचा लेप लावत असतात. ती त्या लेपात बोटं बुडवून चतुराच्या दोन्ही गालांवर थोबाडावते. ते पाहून अर्थपती नाराज होतो. पण आनंदध्वजाला निरोप कळतो की, नऊ रात्री थांबायचे आणि दहाव्या दिवशी जायचे. दहाव्या दिवशी परत चतुरा कर्णफुलाला भेटायला जाते. ती तिच्या कंचुकीवरती तीन लाल खुणा उमटवते. तेव्हा तीन रात्री तिला शिवायचे नाही, चौथ्या रात्री जायचे, असा अर्थ आनंदध्वज सांगतो. पुढच्या भेटीत चतुराला साडीचोळी देते. आणि वाड्याला सात चौक, सात पहारे अशा अडचणीत का येतेस, असे विचारते. मग तिला पहारा नसलेल्या दिंडीतून पाठवते. अर्थात, आनंदध्वजाला त्याचा अर्थ कळतो. उघड्या दिंडीतून आत जा, असे म्हणत तो त्याला कर्णफुलाकडे पाठवतो. तिच्याबरोबर रात्र काढून तो परत येतो, तेव्हा कर्णफुलाने आनंदध्वजासाठी एक मोदक भेट दिलेला असतो. या मोदकात विष असणार, हा आनंदध्वजाचा अंदाज खरा ठरतो. कारण, तिला कुठल्या तरी मोठ्या राजाशी लग्न करायचे असते आणि तोवर खेळण्यासाठी केवळ अर्थपती हवा असतो. आनंदध्वज तिला अर्थपतीची पत्नी बनवेल, अशी तिला भीती असते. पुन्हा अर्थपती भेटायला जातो. या वेळी अर्थपतीने आनंदध्वजाला दिलेली गंधकुपी तिच्या नाकाला लावतो. मग तिच्या पार्श्वभागावर गरम बिब्याने छोटी त्रिशुळ मुद्रा उमटवतो आणि तिचे दागिने घेऊन अर्थपती निघून जातो. त्यानंतर अर्थपती तिच्याच वडिलांच्या पेढीवर तिचाच कंबरपट्टा विकायला जातो. कर्मचारी त्याला पकडून दंतराय सार्थवाहकडे नेतो. तो अर्थपतीला आपल्याजवळ बसवून घेतो. मुनमजींना सांगतो, रात्री चोरी होते व सकाळी चोर दारात येतो. या योगायोगाचे त्याला आश्चर्य वाटते. तो अर्थपतीला विचारतो, हा अलंकार कुठून आला? तो म्हणतो, ‘माझ्या गुरुकडून मिळाला, तो स्मशानात आहे.’ तिथे कापालिकाचा वेष घेऊन बसलेला असतो. कर्णफुलेचे बाकीचे अलंकारही दाखवतो. ते दे नाहीतर फटके खावे लागतील, असे दंतराय सार्थवाह सांगतो. प्रकरण न्यायसभेत जातो. न्यायालयात आनंदध्वज सांगतो की, मी स्मशानात राहतो, वेताळाची उपासना करतो. काल रात्री आम्ही एका स्त्रीला भूतमंत्राचा उपदेश केला. तिने गुरुदक्षिणा म्हणून कंबरेचा पट्टा दिला व इतर अलंकार आम्हांला दिले. याला पुरावा काय? असे विचारल्यावर तो म्हणतो, ‘तियेच्या कटीभागी आम्ही त्रिशूळाचे निशाण उठविले आहे.’ न्यायसेचे दूत कर्णफुलाला घेऊन येतात आणि तपासणीसाठी वृद्ध स्त्रियांना नेमतात. त्या कर्णफुलाला तपासतात तर त्रिशुळाच्या खुणा दिसतात. कर्णफुला आरोपी ठरते. तिला घेऊन आनंदध्वज स्मशानात येतो. इथे अर्थपतीला ती विचारते, ‘हे कोण?’ तो म्हणतो, ‘मी आनंदध्वज तुझा भावोजी.’
‘हा सारा खटाटोप कशासाठी?’
‘तुम्ही पाठवलेल्या मोदकाचे उतराई होण्यासाठी.’
आणि आनंदध्वजामुळे दोघांचे लग्न लागते.
ही आहे वेताळ पंचविशीतील कथा. पण याच प्रकारे सेनापतीशी संबंध ठेवणाऱ्या सुरंगा नावाच्या स्त्रीला पती धडा शिकवतो, ती कथा किंवा लग्नाच्या पहिल्या रात्री निराश झालेली वरदलक्ष्मी वडिलांसह आनंदध्वजाला भेटते आणि तो तिला तिचा प्रियकर मिळवून देतो, यांसारख्या कथा यात आहेत. प्रामुख्याने स्त्री आणि पुरुषांचे चातुर्य हा त्याचा गाभा आहे. प्रेमिकजनांच्या आशानिराशेत, सुखदु:खात सहभागी होणारा आणि त्यांना सतत मदत करणारा आनंदध्वज हा आधुनिक रहस्य कथांमधील हर्क्युल पायरो, शेरलॉक होम्सची तर्कबुद्धी लाभलेला त्यांच्याच प्रमाणे वेषांतरात कुशल असा डिटेक्टिव्ह आहे. विशेषत: कामक्रीडेची वर्णनं करताना जुन्या संस्कृत साहित्यातील व्यंजना अलंकार साधले वापरतात. त्यामुळेच इरॉटिक साहित्याच्या मराठी, हिंदी, इंग्रजी मालिकेतील हा एक महत्त्वाचा दागिना आहे. त्याची खुमारी स्वत:च वाचून अनुभवावी.
shashibooks@gmail.com
बातम्या आणखी आहेत...