आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shashikant Sawant Article On Charlie Chaplin Life And Politics

अजरामर ब्रँड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चार्ली चॅप्लिनची जादू भारतासारख्या देशात कशी पसरली, हे एक कोडेच आहे. सूटबूट घालणारा ट्रॅम्प इथे तसा परकाच होता; पण राज कपूरने तो लोकप्रिय केला. निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात दिवसभर चार्ली चॅप्लिनचे चित्रपट दाखवले जात. ही गोष्ट आहे 77-80च्या काळातली. या काळात टीव्ही कृष्णधवल होता. छायागीत, चित्रहार असे मोजकेच कार्यक्रम दूरदर्शनवर त्या वेळी असत. तबस्सुमचा ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ हाही त्या काळचा एक लोकप्रिय कार्यक्रम. अशा काळात चार्ली चॅप्लिनचे कार्यक्रम मंगळवारी संध्याकाळी टीव्हीवर दाखवले जात. पण चार्लीच्या सिनेमातील थीम्स युनिव्हर्सल होत्या. उदा. ‘द किड’ या चित्रपटाने अनेक सिनेमांना जन्म दिला. ज्यात ‘कुंवारा बाप’ पासून ‘हा माझा मार्ग एकला’पर्यंत अनेक सिनेमे आहेत. पण सतत पराभूत होऊन हसत राहणे, ही एक चार्लीची वेगळी थीम आहे. अर्थात, तो त्याही पुढे जातो. ‘डिक्टेटर’सारख्या चित्रपटाची सोशल कॉमेंट विलक्षण भेदक आहे. पण तरीही मनावर ठसतो तो त्याच्या ट्रॅम्पचा एकटेपणा. सिनेमा संपल्यावर एकाकी चालत जाणारी चार्लीची आकृती केविलवाणी वाटत नाही. त्याचे ते उतरत्या जिन्यावरून चढणे, ‘सर्कस’सारख्या सिनेमातील सिंहाच्या पिंजर्‍यात शिरणे, नंतर हळूहळू धाडसाने वागणे, हे सारे खास आपले वाटते. पण त्याचे पृथ्वीच्या गोलावरील नृत्य किंवा सर्कसच्या हिंदोळ्यावरील विलक्षण कसरत पाहताना लक्षात येते की चार्ली हा काही आपला नव्हे; आवाक्यातील तर अजिबातच नव्हे. ‘द किड’ हा त्याचा अजरामर सिनेमा 1921मध्ये बनवलेला आहे. त्या वेळेस चार्ली 32 वर्षांचा होता आणि जगप्रसिद्धदेखील होता. प्रचंड गरिबीत आयुष्य गेलेले, लहानपणापासून कष्टाची सवय, नाटकात कामे असे त्याचे चरित्र आपल्याला माहीत आहे. चार्ली हा प्रतिभावंत होता, हेही खरे. विनोदी नट किंवा लेखक-दिग्दर्शक कमी नव्हते; पण चार्लीच्या सिनेमातील प्रसंग सांगितल्याने हसू येत नाही, ते प्रत्यक्षच पाहायला हवेत. पुढच्या दहा वर्षांच्या काळात त्याने ‘वुमन ऑफ पॅरिस’, ‘द गोल्ड रश’, ‘द सर्कस’ असे अजरामर सिनेमे दिले. मूकपटांच्या सिनेमांचा तो बादशहा होता आणि तो जमाना संपला, तरी त्याने बोलपट केले नाहीत. ‘सिटी लाइट्स (1931), ‘मॉडर्न टाइम्स’ हे त्याचे सिनेमे मूकपट होते. सिनेमा बोलका झाला, तरीही ‘फन द ग्रेट डिक्टेटर’ हा त्याचा चित्रपट अनेक अर्थाने कारकीर्दीचा कळस होता. एक तर सामाजिक, राजकीय परिस्थितीवर तो भाष्य करणारा होता. हिटलरचा उदय झाला असताना आणि दुसरे महायुद्ध सुरू असताना त्याने तो बनवला. त्यात त्याने जर्मनीचे दृश्य आणि भाषा इंग्रजी वापरली आहे.
विमानातून जाणार्‍या चार्लीचे घड्याळ वर जाऊ लागते, फुटलेले पाणी वर जाऊ लागते, तेव्हा त्याला कळते, की विमान उलटे जाऊ लागले आहे. असे सिक्वेन्स त्याला सहज सुचत. ‘सिटीलाइट’मधील अंध तरुणी प्रत्यक्षात चार्लीच्या मदतीने जेव्हा डोळसते, तेव्हा ती श्रीमंत माणसाचा हात धरून जाते, अशी कारुण्याची झालर लावणे, त्याला जमत असे. आपल्याकडे पु. ल. देशपांडेंपासून अनेकांनी त्याचे अनुकरण केले. आत्मचरित्रात्मक असणारा आणि गांभीर्याकडे झुकणारा त्याचा ‘लाइमलाइट’ हा चित्रपट प्रेक्षकांना फारसा आवडला नाही; पण अनेक ठिकाणच्या पटकथा लेखकांचा हा आवडता सिनेमा आहे. चार्लीच्या सिनेमात सबकुछ चार्ली असे. ‘सिटीलाइट’सारख्या चित्रपटाला संगीतही त्याचेच होते. पण ‘लाइमलाइट’ या चित्रपटात त्याने बस्टर किटन या दुसºया नटाला घेतले.
चार्ली चॅप्लिन परफेक्शनिस्ट होता. ‘सिटीलाइट’मध्ये तो पहिल्यांदा फुलवाल्या तरुणीला भेटतो, हा प्रसंग दोन मिनिटांचाच होता; पण चार्लीने त्याचे 342 रिटेक केले. ‘पिकासो’सारख्या चित्रकाराप्रमाणे त्याच्यामध्ये विलक्षण ऊर्जा होती. स्त्रियांचे त्याला विलक्षण वेड होते. वयाच्या 54व्या वर्षी त्याने 18 वर्षीय तरुणीशी लग्न केले होते. त्याअगोदरचे त्याचे वैवाहिक आयुष्य तितकेसे आनंदी नव्हते. उतारवयात साठीच्या आसपास त्याला मानहानी सहन करावी लागली. कम्युनिझमशी संबंध असल्याच्या आरोपावरून त्याला अमेरिका सोडावी लागली. 1953 ते 77 हा काळ त्याने स्वित्झर्लंडमधल्या एका खेड्यात काढला; पण पूर्वीसारखे चित्रपट त्याला बनवता आले नाहीत. त्याच्या नावावर अनेक दंतकथा आहेत आणि खोटी वाक्येही. ‘मी पावसात चालताना माझे अश्रू कोणाला दिसत नाहीत’, अशी अनेक वाक्ये त्याच्या नावावर खपवण्यात आली. सिनेमा बनवण्याबद्दल तो फारसे बोलत नाही. पण त्याने त्याचे आत्मचरित्र लिहिले आणि त्यात आपल्या घडण्याबद्दलही सांगितले आहे. त्याची आई अभिनेत्री होती. एकदा ती स्टेजवर गायला गेली, तेव्हा तिचा आवाज गेला. त्या वेळी चार्लीने मागून गाणे म्हटले. हा हृदयद्रावक प्रसंग त्यात आहे. तो 88 वर्षे जगला. त्याने अमाप लोकप्रियता मिळवली. सोप्या भाषेत सांगायचे तर चार्ली हा एक जगप्रसिद्ध ब्रँड होता आणि राहील.
shashibooks@gmail.com