आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजरामर शोले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘शोले’ने घडवलेल्या इतिहासाची नव्या पिढीला आज कदाचित कल्पना येणार नाही. आज कदाचित हे खरे वाटणार नाही, पण ‘शोले’ येण्याआधीच त्याचे संवाद लोकप्रिय झाले होते. याला कारण होती, निर्माता-दिग्दर्शकाची अभिनव खेळी. ‘शोले’चे संवाद त्या काळच्या एल. पी. रेकॉर्ड्सवर चित्रपट येण्याआधीच रिलीज करण्यात आले होते. परिणामी गाण्यांबरोबरच डायलॉगही मोठ्या कर्ण्यावरून देशभरातील शहरांमध्ये आणि गावांमध्ये ऐकू येऊ लागले होते. मला आठवतंय, खार-वांद्र्याच्या मधला निर्मलनगरचा परिसर हा टेकड्यांनी भरलेला होता. एक दिवस तिथून येत असताना पहिल्यांदा गब्बरसिंगचे संवाद ऐकू आले. संवाद लाऊडस्पीकरवरून कानावर पडले आणि त्यानंतर आम्ही मुलंही त्या टेकड्यांमध्ये लपून ‘शोले’चा खेळ खेळू लागलो. ‘शोले’ 70 एमएम फिल्मवर रिलीज झाला होता. त्याआधी सिनेमे जास्तीत जास्त 35 एमएमवर बनत. 70 एमएमच्या भव्यतेला न्याय देणारे मुंबईत एकच थिएटर होते, ते म्हणजे ‘मिनर्व्हा’. साहजिकच स्टिरिओ साउंड आणि भव्य आकारातील पात्र पाहून प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फिटू लागले. 1974-75च्या आसपासची ही गोष्ट. ‘शोले’ची कथा सांगण्यात आता तसा काही अर्थ नाही. सेवन सामुराई, फायरमन आर्मी अशा अनेक परदेशी चित्रपटांत त्याचा काही भाग आलेला आहे. गुंडांना हाताशी धरून गावावरील संकटांचा नि:पात करायचा, असे ठाकूर ठरवतो. ते संकट असतं गब्बरसिंग. ‘शोले’ने केलेली किमया म्हणजे व्हिलनही लोकांना आवडू लागला. त्याचा बेबंदपणा, रासवटपणा, त्याच्यातील किंचित वेड्याची लहर या गोष्टी प्रेक्षकांना बेहद आवडल्या. ‘शोले’तून विरू आणि जय काढून टाकले तर कदाचित फार फरक पडणार नाही; पण शोलेतून गब्बर काढून बघा... ‘शोले’ने दाखवलेली आणखी एक गोष्ट म्हणजे, इंग्रजी चित्रपटाप्रमाणे यात नायक मरण पावतो. कितीही झाले तरी जय आणि ठाकूरची विधवा सूनबाई यांच्यातील अस्फुट प्रेमाची परिणती लग्नात झालेली दाखवणं, तेव्हाच्या भारतीय मनाला रुचलं नसतं. त्यामुळे पटकथाकाराने एका दगडात दोन पक्षी मारले. नायकाच्या मृत्यूने त्यागही आला आणि कथेला आधुनिक वळणही लागले. मासिकात पानपुरके असत, तसे ‘शोले’त काही विनोदी प्रसंग टाकलेले आहेत. आज ते पाहून हसू येत नाही. पण ‘‘तेरा नाम क्या है, बसंती?’’ हे विचारतानाचा अमिताभचा चेहरा लाजवाबच! एपिक्स म्हणजे महाकाव्य आणि त्यानंतर मोठ्या कादंब-या. यांना आस असते ती भव्यतेची. सिनेमामध्ये डेव्हिड लिनसारखा दिग्दर्शक अनेकदा वाळवंटात पाच-दहा हजार लोकांना घेऊन शूटिंग करून ते पडद्यावर साकारायचा. पण तरीही एपिक्सचा प्रभाव साधलेले सिनेमे फारच कमी आहेत. लॉरेन्स आॅफ अरेबिया, गॉन विथ द विंड, सेव्हन सामुराई वगैरे. आपल्याकडे राज कपूरला तो ध्यास होता. त्याने साडेचार तासांचा पात्र आणि घटनांचा मोठा पट दाखवणारा ‘मेरा नाम जोकर’ हा चित्रपट काढला. पण तो प्रेक्षकांनी स्वीकारला नाही. ‘शोले’ने भव्य नव्हे पण पात्रांची निर्मिती केली. गब्बरसिंगसारखा खलनायक जन्माला घातला. हिंदी सिनेमासृष्टीला अजरामर डायलॉग दिले. चंबळचा भव्य परिसर मुक्तपणे कॅमे-यातून चितारला. आवाजाचे, रंगाचे, निर्मितीचे आधुनिक तंत्र कसोशीने राबवले. सलीम-जावेद यांचे संवाद आणि पटकथा लेखन अनेक सिनेमांना लाभले. त्यांनी जंजीर, दीवार यांसारखे काही यशस्वी चित्रपट दिले. पण ‘शोले’ हा शिरपेचातला अस्सल तुरा ठरला. अडीच-तीन तास मनोरंजनाची हमी देणारा, हसवणारा, असहायतेची जाणीव करून देणारा असा दुसरा चित्रपट लगेच सांगता येणार नाही. अर्थात, काही चित्रपट आहेत; यात काही गोष्टी येऊन गेल्या आहेत. उदा. मदर इंडिया, मेरा गांव मेरा देश... तरीही ‘शोले’ तो ‘शोले’च! ‘शोले’ नंतर अमिताभ, धर्मेंद्रच्या जोडीने पुन्हा तो चमत्कार साधला नाही. दिग्दर्शक सिप्पीदेखील काही यशस्वी चित्रपट देऊ शकले नाहीत. त्यांनी बनवलेला ‘शान’ हा चित्रपट म्हणजे बाँडपटांची दुय्यम नक्कल होता. ‘शोले’ नंतर सलीम -जावेद यांनीही एकत्रितपणे कुठलाही मोठा चित्रपट दिला नाही. ‘शोले’ तब्बल सहा वर्षे मिनर्व्हाला चालू होता आणि त्यातही तो सहाव्या वर्षीही अनेकदा हाऊसफुल्ल असे. देशभरातून कामासाठी मुंबईत दोन-तीन दिवसांसाठी येणारी मंडळी मिनर्व्हाला जाऊन भक्तिभावाने ‘शोले’ पाहून येत. या थिएटरची जाहिरात ‘महाराष्टÑाचे भूषण’ अशी केली जाते. त्यामुळेच ते नेव्हील टुली या कलासंग्राहकाने विकत घेतले आणि तिथे चित्रपट संग्रहालय बनवायचे ठरवले. थोड्याच दिवसांत त्याचे दिवाळे निघाले. ‘शोले’ने आपल्या मागे अशी एक संकटांची लीगसीही तयार केली. पण आजही ‘शोले’तील कुठलाही सीन पाहताना मोठ्या पडद्यावरच्या आठवणी जागतात...

shashibooks@gmail.com