आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'वपूं'ची जादू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या लेखकाच्या लेखनातील वाक्यांचा संग्रह कधी निघतो; तर तो लेखक फार मोठा व लोकप्रिय असेल तेव्हा. चर्चिल, मार्क ट्वेन आणि ऑस्कर वाइल्ड अशांचे संग्रह इंग्रजीत प्रसिद्ध आहेत. मराठीत हा मान मिळालेला लेखक एकच आहे, व. पु. काळे! वपुंच्या लोकप्रियतेची आज कदाचित कल्पना येणार नाही, कारण आजचा मध्यमवर्ग बदलला आहे. पण हाऊसफुल सभागृहात वपुंचे कथाकथन मी ऐकलेले आहे. अर्थातच मिळेल ते वाचायच्या वयात वपु वाचले. आज त्यांचे लेखन तसे भिडत नाही. पण वपुंच्या अनेक कथा आठवतात. मला वाटतं, मी वाचलेले पहिले पुस्तक ‘भूलभुलय्या’ आहे. त्यातील कथा फॅन्टसी स्वरूपाच्या होत्या. एका कथेत छोटी-छोटी भुतं घरात राहत असतात आणि मालकाला त्रास देणार्‍या माणसाचा ती सूड घेतात.
‘पार्टनर’ ही वपुंची सर्वाधिक लोकप्रिय कादंबरी. त्यातील ‘श्री’ नाटक, सिनेमातूनही आला आणि लोकप्रिय झाला. पण मला वाटतं ‘पार्टनर’मधील आईचे पात्र हे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण, श्यामच्या आईला अगदीच छेद देणारं. वपुंची दखल समीक्षकांनी फारशी घेतली नाही. पण मराठी मध्यमवर्गाने मात्र त्यांना केव्हाच डोक्यावर घेतले. आजही वाचनालयातून वपुंची पुस्तकं मोठ्या प्रमाणावर वाचली जातात. टेकाडे भावोजींना धरून त्यांनी लिहिलेल्या श्रुतिका रेडिओच्या काळात अत्यंत लोकप्रिय होत्या. वपुंनी लिहिलेलं ‘मोदी आणि मोदी’ नावाचं नाटक पार पडलं. पण माधव मनोहरांनी त्याची समीक्षा करताना लिहिलं होतं, ‘एक क्षण भाळण्याचा, बाकी सगळे सांभाळण्याचे.’
चुरचुरीत छोटी वाक्यं, भावनिक आंदोलन टिपणारे प्रसंग, थोडासा रोमँटिसिझम आणि मध्यमवर्गाला गुदगुल्या करणारा विनोद, ही त्यांच्या कथांची वैशिष्ट्ये होत. ‘करंजी’सारखी कथा वपुंच्या कथाकथनातच ऐकावी. वपुंनी नॉनफिक्शनही उत्तम लिहिलं आहे. विशेषत: ‘रंगपंचमी’सारखे पुस्तक. ‘सोबत’मधले त्यांचे सदर मी नियमित वाचत असे. महानगरपालिकेत भ्रष्टाचार कसा होतो, याबद्दल त्यांनी सांगितले होते. एक कर्मचारी कामासाठी आलेल्या माणसाबरोबर चहा प्यायला जात असे.
दोघांच्या चहाचे बिल 3 रु. होईल, ते देण्यासाठी त्या माणसाने 100ची नोट ठेवायची आणि वेटरने 97 रु. आणून दिल्याबरोबर ते त्या कर्मचार्‍याने उचलायचे. याप्रमाणे सर्वांसमोर ती लाच घेत असे. ‘रंगपंचमी’मध्ये तर पुन:पुन्हा वाचावे असे बरेच प्रसंग आहेत. वपु महानगरपालिकेत आर्किटेक्ट होते. अनेक इस्पितळांचे डिझाइन त्यांनी केले होते. रुग्णालयात येणारा पेशंट गांजलेला असतो म्हणून रुग्णालयात कारंजं ठेवावं, ही दृष्टी त्यांचीच. वपुंना जीवनातील व्यामिश्रता कधी भावली नाही. त्यांच्या दृष्टीने जीवन साधे, सरळ, सोपे होते. त्याचमुळे पत्नीच्या निधनानंतर ते उन्मळून गेले. वाट पाहणारी ‘दार’ नावाची एक मोठी कविता त्यांनी लिहिली. हे पुस्तक ‘आयडियल’मध्ये उपलब्ध होते, त्यावर किंमत नव्हती. तुम्हाला वाट्टेल तितके पैसे द्यायचे, असे त्यांनी जाहीर केले होते. मी 15 रु. दिले आणि त्यांना फोन केला. पहिल्यांदाच वपुंशी बोललो.
वपुंचे अक्षर फार सुंदर होते. त्यामुळे त्यांची पत्रे ही ग्रीटिंग कार्डसारखी वाटत. वपु, शशी मेहता इत्यादी मित्रांचा एक गट होता. त्याबद्दल जयवंत दळवींची कॉमेंट होती, ‘हे पुरुषांचे महिला मंडळ आहे.’ वपुंचा एक किस्सा मला आठवतो; त्यांच्या मुलीने शाळेत असताना पोपटावर एक निबंध लिहिला. त्यात आमचा पोपट गाडी चालवतो, असे काही लिहिले होते. बाई वैतागल्या आणि त्यांनी म्हटले, ‘वडील लेखक असले तरी इतकी कल्पनाशक्ती बरी नव्हे.’ तेव्हा वपुंनी घरातल्या पोपटाचे घरातील छोटी लाकडी गाडी चालवतानाचे फोटो काढले आणि बार्इंना पाठवले!
उत्तर आधुनिक साहित्यात लोकप्रिय लेखक, लोकप्रिय चित्रपट यांची दखल इंग्रजीत आवर्जून घेतली जाते. त्यामुळेच बॉलीवूडच्या चित्रपटांबद्दल 90 नंतर अधिक लिहिलं जाऊ लागलं. अनेक विद्यापीठांत बॉलीवूडचाच काय हॉलीवूडचादेखील अभ्यास होतो. अगदी शोभा डेंच्या कादंबरीचाही. मग वपुंसारख्या लेखकाला गावकुसाबाहेर का ठेवण्यात यावे? याचे उत्तर समीक्षक देतील काय?

shashibooks@gmail.com