आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shashikat Sawant Article About Destram Adificago

डेस्ट्रम एडिफिकागो!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार्ल मार्क्सचा अवतार तसा थोडासा गबाळाच असे. त्याचे वक्तृत्वही काही खास नव्हते. त्याने काही जाहीर सभांमध्ये केलेली भाषणे मजकुराने ठोस भरलेली, एकसुरी आणि खडबडीतपणा यांचे मिश्रण असलेली अशी होती, असे वर्णन बर्लिन करतो. तो पुढे म्हणतो, मार्क्सच्या भाषणांमुळे लोकांना आदर वाटे; पण भाषण काही लोकांना फार रसाळ वाटत नसे. कारण मार्क्स हा सिद्धांत तयार करणारा माणूस होता आणि बुद्धिवंत होता. अशी माणसं साहजिकच मोठ्या समूहाला टाळतात. याचे कारण जे अभ्यासू आयुष्य त्यांना जगायचं असतं, त्याच्या आड लोकसंग्रह येऊ शकतो. मार्क्सचे वर्णन एका वाक्प्रचारात सांगायचे झाले तर, ‘डेस्ट्रम एडिफिकागो’ म्हणजे ‘मीच नष्ट करीन आणि मीच पुन्हा बांधणी करीन’ असे होते. त्यामुळे त्याचे लेखन प्रस्थापितांना तडाखे देणारे होते. जर्मनीतून त्याने संपादित केलेल्या नियतकालिकात रशियावर इतकी टीका केली होती की, रशियन सरकारने जर्मनीला म्हणजे तेव्हाच्या प्रशियाला जाब विचारला आणि मार्क्सला संपादकपद सोडावे लागले. 1845मध्ये तो पॅरिसला आला. नंतर मार्क्स इंग्लंडला 1849मध्ये आला आणि तिथल्या ब्रिटिश लायब्ररीत खर्‍या अर्थाने ‘दास कॅपिटल’ची मुहूर्तमेढ रोवली गेली. ‘दास कॅपिटल’ जेव्हा प्रसिद्ध झाले, तेव्हा म्हणजे 1867मध्ये भांडवलशाही ऐन भरात होती. इंग्लडचे साम्राज्य जगभर तळपत होते आणि भांडवलशाहीला सुरुंग लावणार्‍या या ग्रंथाची उभारणी इंग्लंडच्या वाचनालयात झाली. कॅपिटल प्रसिद्ध झाले त्या वर्षीच्या बजेटच्या भाषणात पंतप्रधान ग्लॅडस्टोनने आपल्या देशवासीयांचे अफाट सत्ता आणि ताकद मिळवल्याबद्दल अभिनंदन केले होते. मार्क्सच्या या जडणघडणीमध्ये जसा शिक्षकाचा वाटा होता, तसाच फे्रडरिक एंगल्सचा. एंगल्सची व त्याची मैत्री मरेपर्यंत कायम राहिली. आणि एंगल्सने अनेकदा त्याला आर्थिक आणि मानसिक पाठबळ दिले. 1847पासून खर्‍या अर्थाने मार्क्सचे वैचारिक लेखन सुरू झाले, असे बर्लिन सांगतो. त्यानंतर 20 वर्षे मार्क्सने केलेल्या कामानंतर 1867मध्ये कॅपिटल प्रसिद्ध झाले. त्याचा दुसरा भाग मात्र मृत्यूनंतरच प्रसिद्ध झाला. कार्ल मार्क्सने वकिली सोडून दिल्याने त्याच्याकडे अर्थार्जनाचे कोणतेही साधन नव्हते. मात्र अमेरिकेतील दैनिकासाठी त्याने अनेक वार्तापत्रे पाठवली. त्या वार्तापत्रांमध्ये अनेक विषय मार्क्सला न आवडणारे होते. अशा विषयांमध्ये एंगल्स मदत करत असे.
मार्क्सच्या वैचारिक जगण्यातील पहिला टप्पा हेगेलवादाने व्यापलेला होता. पण त्याने संपादित केलेल्या ग्रंथात त्याच्यावरचा हेगेलचा पगडा दिसतो. त्या मुक्तीच्या खुणा 1846मध्ये एंगल्सबरोबर संपादित केलेल्या ‘जर्मन आयडियॉलॉजी’ या ग्रंथात प्रगटल्या. हिस्टॉरिक मटेरिअलिजम या नावाने मार्क्सने हळूहळू एक सिद्धांत विकसित केला. इतिहासाच्या गतीचा शोध घेण्यासाठी माणसाने वैज्ञानिक म्हणजेच एम्पिरिकल पुराव्यांना सामोरे गेले पाहिजे आणि शोधायचे कायदे सामाजिक आयुष्याविषयी असल्याने ते सामाजिक पर्यावरणातच शोधले पाहिजे. म्हणजेच, सामाजिक आणि खासगी नात्यांमध्येच. जर्मन आयडियॉलॉजी या ग्रंथाने काही काळ वैचारिक चर्चेला गती दिली आणि मार्क्सचा पुढचा प्रवास सुरू झाला. फॉरबॉक, पृधो, स्टर्नर यांसारख्या विचारवंतांना त्याने बौद्धिक आव्हान दिले. असे असले तरी सामाजिक, राजकीय, आर्थिक अशा सर्वव्यापी अंतिम सिद्धांताच्या शोधात कार्ल मार्क्स होता. त्याच प्रवासात मानवजातीच्या या वेदनांना हाक देणारा एक अप्रतिम छोटेखानी ग्रंथ त्याने सिद्ध केला. त्याचे नाव होते ‘द मॅनिफेस्टो आॅफ द कम्युनिस्ट पार्टी’. खरं तर कम्युनिस्ट लीगच्या लंडन केंद्राने त्याला त्यांच्या विचारांचे डॉक्युमेंटेशन करायला सांगितले होते. म्हणजेच, एकप्रकारे हे कमिशन्ड काम होते. त्याचा पहिला खर्डा एगंल्सने प्रश्नोत्तराच्या स्वरूपात लिहिला. मार्क्सने पूर्णपणे नव्याने लिहून काढला. आणि एंगल्सच्या शब्दांत सांगायचे तर त्यातून एक वेगळीच कलाकृती निर्माण झाली. बर्लिनने पुस्तकात त्याच्यासाठी म्हणजे मॅनिफेस्टोसाठी ‘अलौकिक प्रतिभेचे काम’ असा शब्दप्रयोग केला. ‘सार्‍या युरोपला अलौकिक वादळाने घेरले आहे. ते वादळ आहे कम्युनिझमचे आणि युरोपमधील पोप, झार, उजवे, फ्रेंच आणि जर्मन पोलिस हे सारे हे वादळ गिळायला सिद्ध झाले आहेत.’ या वाक्याने मॅनिफेस्टोची सुरुवात होते. मॅनिफेस्टोमधील आणखी एका वाक्यात मार्क्सच्या ऐतिहासिक द्रष्टेपणाचे दर्शन होते. ते वाक्य आहे, ‘मानवजातीचा इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे.’ वर्गसंघर्ष हा महत्त्वाचा शब्दप्रयोग मार्क्सने केला. तर एकूण मानवी समाजाचे वर्गीकरण राज्यकर्ता वर्ग आणि कामगार वर्ग या प्रकारे करता येते आणि राज्य करणारा म्हणजे हा बुर्झ्वा वर्ग कायमच समाजात प्रबळ असतो आणि समाजावर अधिकार गाजवत असतो. त्या वर्गाने व्यक्तिगत आकांक्षेचे परिवर्तन देवाणघेवाणीच्या वस्तूत केलेले असते आणि हाच वर्ग पूर्वी महत्त्वाच्या समजल्या गेलेल्या व्यवसायांना समाजाला सेवा देणारा वर्ग म्हणजेच मजुरांमध्ये रुपांतरित करतो. या बुर्झ्वा वर्गाने विविध स्वरूपाच्या आयुष्याला मातीमोल करून टाकले आहे. आयुष्यातील विविध सन्माननीय विषयांना कवडीमोल करून टाकले आहे.’ थोडक्यात, कार्ल मार्क्सची बुद्धिमत्ता, भाषा, त्याने घेतलेला इतर विचारवंतांचा वारसा, त्यांच्याशी केलेले झगडे आणि त्यातून निर्माण केलेल्या ‘दास कॅपिटल’सारख्या उत्तुंग कलाकृतींचा मार्क्सचा प्रवास याविषयी इसाया बर्लिनने आपल्या ‘कार्ल मार्क्स : हिज लाइफ अँड एन्व्हॉयर्नमेंट’ या पुस्तकात विस्तृत माहिती दिली आहे. म्हणून इसाया बर्लिनचे हे पुस्तक वाचनीय ठरले आहे.
(shashibooks@gmail.com)