आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खामोश... हम शत्रू बोल रहे है

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता - नेता अशा दोन्ही भूमिका समर्थपणे पेलणारे, शैलीबाज अभिनय आणि बेधडक बोलणे यासाठी प्रसिद्ध असलेले शत्रुघ्न सिन्हा यांचे भारती प्रधान लिखित ‘एनिथिंग बट खामोश’ नावाचे चरित्र नुकतेच प्रकाशित झाले. त्यानिमित्त ही मुलाखत...
ä आपले चरित्र चाहत्यांसमोर आणावे, असे केव्हा आणि का वाटले?
माझे आयुष्य अतिशय मनोरंजक आणि थरारक आहे, असे मानणाऱ्या माझ्या काही चाहत्यांचा हा आग्रह होता. माझ्या सिनेसृष्टीतीलच नव्हे, तर खऱ्या आयुष्यातही मला अनेक संघर्ष करावे लागले. धैर्याने झपाटून कठोर मेहनतीने मी यश मिळवले. ‘एफटीआयआय’मधून पदवीधर होणारा बिहार-झारखंडचा मी पहिला, आणि कदाचित शेवटचा अभिनेता अाहे. या मायानगरीत मी आलो, नाव कमावले, ते स्वत:च्या कर्तृत्वाने, संघर्ष करत. मुंबईत माझे कोणी कुटुंबीय वा नातेवाईकही नव्हते. याशिवाय पाटण्याहून पुण्याला आणि बिहारमधून महाराष्ट्रात येऊन ‘जय महाराष्ट्र’चा असा काही उद‌्घोष केला की, त्याचा जबरदस्त प्रभाव पडला, मी कॅबिनेट मिनिस्टर झालो. स्वत:चे चारित्र्य निष्कलंक ठेवण्याकडेही माझा कटाक्ष असल्यामुळे माझ्यावर इन्कम टॅक्सची वा पोलिसांची कुठलीही केस नाही. त्यामुळे माझे आयुष्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे, अशीही माझ्या चाहत्यांची धारणा आहे. शेवटी, सात वर्षानंतर या पुस्तकाच्या रूपाने मी माझ्या शुभचिंतकांची इच्छा पूर्ण केली आहे.
ä आयुष्यात असा काही खास प्रसंग घडला का, ज्याचा समावेश पुस्तकात करताना मन साशंक झाले?
विश्वास ठेवा, मी माझे कुटुंबीय तसेच अन्य कोणाही बाबत अगदी रोखठोकपणे, प्रामाणिकपणे सांगितले आहे. एवढेच नाही, तर मला जवळचे न वाटणाऱ्या, नेहमी माझ्या विरोधात जाणाऱ्या काही मंडळींचेही विचार पुस्तकात आहेत. मीच जाणीवपूर्वक तसा आग्रह धरला. कारण जीवनात काळ्या आणि पांढऱ्या रंगासोबतच करड्या रंगाचाही (ग्रे शेड) समावेश असतो, यावर माझा ठाम विश्वास आहे.
ä या चरित्राबद्दल कुटुंबीयांच्या काय प्रतिक्रिया आहेत? ते समाधानी आहेत? नाराज आहेत?
हो, काही गोष्टींमुळे ते दुखावले गेले आहेत, पण एकंदर ते खूप खूश आहेत. कारण माझी पत्नी पूनम हिला मी केवळ देवीचा दर्जा देत नाही, तर आज मी जो काही आहे, त्याचे सर्व श्रेय तिचेच आहे.
ä हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर मान्यवरांच्या प्रतिक्रिया मिळाल्या का?
पूनम यांना मी हे पुस्तक भेट दिले होते, पण सोनाक्षीने स्वत:हून येऊन माझी पुस्तकावर सही घेतली होती. राजकारणी मंडळींविषयी सांगायचे तर, यशवंत सिन्हा यांनीदेखील पुस्तकावर सही घेतली. तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते अडवानींनी खूप प्रशंसा केली. माझे मित्र आणि शुभचिंतक काँग्रेस नेते दिग्विजय सिंह आणि अमर सिंह यांनीदेखील सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
ä अमिताभ बच्चन यांच्याशी आपले संबंध थोडे कटू आहेत. पुस्तकातदेखील आपण अमिताभ यांच्यावर आक्रमकपणे लिहिले आहे.
अगदी तसेच नाही, पण एकत्र कुटुंबात भांड्याला भांडे लागतेच. तसेच आम्हा दोघांबाबत घडले आहे. खरं तर तो तारुण्याचा जोश होता. आता मात्र अमिताभच्या ज्येष्ठत्वाची जाणीव होते. मी त्यांचा खूप आदर करतो. ते माणूस म्हणून थोर आहेतच, पण कलाकार म्हणून तर ते अतिशय श्रेष्ठ आहेत. अमिताभदेखील माझ्यावर खूप प्रेम करतात. आम्ही दोघेही एकमेकांचा आदर करतो. मात्र पुस्तकात त्यांच्यासंबंधी कटू भासणाऱ्या काही गोष्टींचा उल्लेख मी केला आहे, जो आवश्यक होता. असे असूनही अमिताभ यांनी तर टीव्हीवर पुस्तकाची खूप प्रशंसासुद्धा केली आहे.
ä आपल्या बंडखोर वृत्तीमुळे पक्ष आपल्याला राम राम करेल, हे तुम्ही ओळखले आहे का?
असं तुम्ही कसं म्हणू शकता? किंबहुना, मधल्या काळात पक्षाशी माझे संबंध अधिकच दृढ झाले आहेत. सत्य हे आहे की, बिहारच्या भिंतींवर लिहिलेले जे मी वाचत होतो, ते आरशाप्रमाणे जसेच्या तसे, पक्षाला दाखवत होताे. त्यामुळे आज सर्वांनी हे मान्य केले आहे की, मी जे काही केले, आणि बोललो, ते सर्वार्थाने पक्षहिताचेच होते.
ä काही काळापूर्वी बिहारच्या स्थानिक नेत्यांवर आपला डोळा होता, आता तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे चाणक्य मानले जाणारे अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी टक्कर घेण्याचा आपला पवित्रा दिसतोय!
हा आरोप मला पूर्णपणे अमान्य आहे. कारण, पंतप्रधान मोदी यांचा मी नेहमीच आदर करतो. त्यांचे हेतू आणि धोरण याविषयी मला जराही संदेह नाही. मला तर पुढे जाऊन असे वाटते की, आपण पंतप्रधानांचे हात आणखी मजबूत करायला हवेत. पण दुर्दैवाने तसे घडताना दिसत नाही. आणखी एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते की, अरुण जेटली हे एकमेव मंत्री आहेत, जे पंतप्रधानांची स्वप्नं साकार करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. ते विद्वान आहेत. माझे मित्रही आहेत, पण इथेही मी सांगू इच्छितो की, नेत्यांना कायद्याने नाही, राजकीय अंगानेच आव्हान द्यायला हवे.
ä पुस्तकात तुम्ही गतकाळातल्या अभिनेत्री रिना राय यांच्याविषयी खूप काही सांगितले आहे, पण इतरांविषयी मौन बाळगले आहे. जर रिना आजदेखील मोहसिन खान यांची पत्नी असती, तर आपण रिनाशी असलेल्या खाजगी संबंधाची अशी जाहीर वाच्यता केली असती?
आमचे संबंध जगजाहीर होते. माझ्या जीवनात रिनाचे स्थान महत्त्वपूर्ण होते, याविषयी शंकाच नाही. रिना जेव्हा माझ्या आयुष्यात होती, तेव्हा तिने मला सर्वार्थाने साथ दिली होती, ज्यासाठी मी तिचा आभारी आहे. परंतु लेखिका भारती प्रधान यांनी पुस्तकात माझ्या वतीने जे काही लिहिले आहे, ते अतिशय आदरपूर्वक आणि मर्यादेचे भान ठेवून लिहिले आहे.
ä आपली कन्या सोनाक्षीचा चेहरा रिना राय यांच्याशी मिळताजुळता आहे, असे बोलले जाते. हे ऐकून आपल्याला काय वाटते?
मूर्खपणा आहे हा सगळा! (शत्रुघ्न यांचा स्वर अचानक बदलला) हा मीडियाचा बदनामीचा डाव आहे. एखादी ट्रॅडिशनल चेहऱ्याची अभिनेत्री दिसली की, तिची तुलना, रेखा वा वैजयंतीमालाशी करायची, हे मीडिया आधीपासूनच करत आलाय.
ä शेवटचा प्रश्न, आपण या पुस्तकाचा दुसरा भाग आणण्याविषयी बोलला होतात. मात्र, हिंदीचा कायम पुरस्कार करणाऱ्या व्यक्तीचे चरित्र हिंदीमध्ये का नाही? दुसऱ्या भागाचे शीर्षक ‘एव्हरिथिंग विद ऐलानिया’ असे काही असावे का?
धन्यवाद, तुम्ही मला शीर्षक सुचवलेत. तुमचा प्रश्नही अगदी रास्त आहे. मी इतकंच सांगेन की, या पुस्तकाचा हिंदी अनुवाद व्हावा, अशी बऱ्याच लोकांची इच्छा आहे. त्याचे कामही सुरू आहे. अनुवादाच्या संदर्भात काही पत्रकार मित्रांशी चर्चाही सुरू आहे.

dpsingh@dbcorp.in