आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sheetal Metkar Story About Pournima Savai – Pournima Biotech

प्रकाशमयी पौर्णिमा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘बायोटेक’ हा शब्द उच्चारला की तांत्रिक संशोधन, रासायनिक प्रयोग असेच चित्र डोळ्यासमोर येणारे. परंतु ‘पौर्णिमा बायोटेक’ म्हटलं की नजरेपुढे छबी उभी राहते ती पौर्णिमा विजयराव सवई यांची. हसरा चेहरा, कणखर आवाज, कपाळावर भरदार कुंकू, डोक्यावर पदर आणि मुखी ग्रामगीतेच्या ओव्या.
उत्कृष्ट वक्त्या व सुश्राव्य कीर्तनकार असणा-या, आधुनिक विचारांच्या पण संस्कृती जोपासणा-या पौर्णिमाताईंच्या यशाचं गूढ मात्र दडलंय ते त्यांच्या संघटनकौशल्यात. मुद्देसूद पण लाघवी बोलणं आणि कष्टाळू स्वभाव यामुळे विविध क्षेत्रांतील वेगवेगळ्या स्तरांवरील लोक त्यांच्याशी जुळतात. केवळ गप्पांचा फापटपसारा न वाढवता प्रत्येकाशी ज्याच्या-त्याच्या आवडी व क्षमतेनुसार कल्पक बाबींबद्दल बोलून समोरच्याला प्रोत्साहित करतात. कल्पकता व संघटनकौशल्याच्या संतुलित समायोजनाचाच परिणाम असावा, ही सरपंच माता व शेतकरी पित्याची कन्या 18 वर्षांच्या कोवळ्या वयात टाकरखेडा शंभू या अमरावतीजवळच्या गावातील सून होऊन सासरची पुरोगामी शिस्त सांभाळत पुरुषी मक्तेदारी समजली जाणारी शेती सांभाळण्यास पुढे सरसावली. सासू-सासरे, नणंदा, भाचरे असा भरपूर परिवार, 30-35 गायींनी संपन्न गोठा, विस्तृत शेती, तेथील मजुरांची कुटुंबं हा सर्व व्याप नोकरांशिवाय सांभाळताना त्यांची स्वत:ची जीवनशैली अधिकच शिस्तबद्ध झाली. पहाटे चारला उठून घरची कामं, सणवार, मानपान, दूधदुभते सावरून उरलेला वेळ त्यांनी महिलांना संघटित करण्याच्या सत्कर्मी लावला. त्यातून एक एक करत चार बचत गट स्थापन झालेत. आज पन्नासएक महिला वेगवेगळ्या व्यवसायांतून आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यात.
2006 मध्ये स्थापन झाली ‘पौर्णिमा बायोटेक-सिल्क मिल्क’ या प्रकल्पाची शेती शाळा. रेशीम संचालन विभाग, म्हैसूर येथील कार्यशाळेत याविषयीचे प्रशिक्षण घेऊन अष्टपैलू उद्योगांना सुरुवात झाली. आज प्रकल्पांतर्गत काम करणा-या गावातील लोकांना साडेतीन ते पाच हजारांपर्यंत मासिक उत्पन्न गावातच उपलब्ध झाले. उत्पादन व विक्री यातून पौर्णिमाताईंनी स्वत: व इतरांचं अर्थार्जन तर साधलंच; परंतु सोबतच धार्मिक, कौटुंबिक व सामाजिक जबाबदारीशी बांधील राहिल्या. या अतिशय व्यग्र आईचा मुलगा ऋजेश वकील झाला, परंतु कोर्टाचा रस्ता सोडून तोही शेतीकडे वळला. मुलगी इंजिनिअर आहे. विशेष म्हणजे बीएस्सी अ‍ॅग्री झालेली त्यांची लाडकी सूनबाई कल्याणीसुद्धा डिग्री केवळ भिंतीवर न टांगता सासूच्या पावलावर पाऊल टाकत रेशीम उद्योग सांभाळण्यास सरसावली. शहरी वास्तव्याशिवाय वैयक्तिक प्रगती अशक्य समजणा-या आधुनिक पिढीतलं हे नवदांपत्य खेड्यात राहूनच प्रगती गाठण्याची कटिबद्धता दाखवते, हेही कौतुकाचंच. उंबरठ्याबाहेरचं पौर्णिमाताईंचं काम वाखाणण्याजोगंच. कुटुंबांतील व गावातील लेकीसुनांना एकत्र करून त्यांना काटकसर व अर्थार्जनाची दिशा दाखविली.
आणखी उल्लेखनीय असे की, संक्रांतीच्या सणाला आपण आपल्या लहानग्यांची लूट करतो, तशी पौर्णिमाताई आपल्या सासू-सास-यांची लूट करायच्या. सासरची मंडळी पुरोगामी संस्कारांची असूनही त्यांच्या विचारांची आधुनिकता दिसून येते, ती सास-यांच्या ऐच्छिक देहदानातून. सास-यांचे देहावसान झाल्यानंतर परंपरागत रीती-रिवाजांना जातीय ऐक्याची जोड देत ताईंनी तेरवीपर्यंतचे 13 गावांतील वेगवेगळ्या जातीतील गरिबांना पितरांचा मान देऊन अन्नदान-वस्त्रदान केले. सोबतच 25 महिलांद्वारा 13 दिवस ज्ञानेश्वरीचे सामूहिक वाचन करवून घेतले.
गावातील व्यसनांपायी व्यथित महिलांना सोबत घेऊन गावात काही वर्षांपूर्वी दारूबंदी केली. विविध सामाजिक विषयांवर महिलांची पथनाट्ये बसवून त्यांच्या सादरीकरणातून सामाजिक परिवर्तन घडवण्याचासुद्धा त्यांनी चंग बांधला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगेबाबा, सावित्रीबाईंसारख्या सामाजिक संतांवरील असीम श्रद्धेपायी संपूर्ण ग्रामगीता, उत्कृष्ट कीर्तनकला, तळागाळातील लोकांना भावणारी वक्तृत्वशैली पौर्णिमाताईंना अवगत झाली. त्यांच्या या कलेमुळे त्यांना विविध महिला मेळाव्यांना, कृषी संमेलनांना सतत आमंत्रित केले जाते. आजवर त्यांनी 1000पेक्षा जास्त कार्यक्रमांमधून उपस्थितांना संबोधित केले आहे.
एवढी प्रचंड ऊर्जा त्यांना कुठून मिळते या प्रश्नाचे उत्तर सापडते त्यांच्या दिनचर्येमध्ये. ब्राह्ममुहूर्तावर घडणारे ध्यान व प्रार्थना हेच त्यांचे ऊर्जास्रोत असावेत, आणि तेदेखील सामूहिक. आजही त्यांच्याकडे पहाटे 4.45 वाजता कुटुंब व गावकरी यांच्यासह सामूहिक ध्यान व सायंकाळी सामूहिक प्रार्थना होते. दर उन्हाळ्यात लहान मुलांसाठी शिबिर आयोजित करून मुलांना ग्रामगीता, श्लोक, पहाटेचे ध्यान, योगा यांचे वळण लावण्याचा त्या प्रयत्न करतात.
पौर्णिमा बायोटेकअंतर्गत एकमेकास पूरक असलेले रेशीम उद्योग, डेअरी मिल्क प्रॉडक्ट्स, गांडूळ खतनिर्मिती, गौपालन, तलाव व्यवस्थापन या प्रकल्पांना भेटी देणा-यांची सतत वर्दळ असते. महाविद्यालयीन अभ्यास सहली, बचत गट, ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध प्रशिक्षणार्थी गट यासह जिज्ञासू शेतक-यांचासुद्धा त्यामध्ये समावेश असतो. ज्ञान, सुख व आनंद वाटल्याने वाढतो, या भावनेतून प्रत्येक येणा-याला त्या शक्य तेवढी जास्त माहिती देतात.
पौर्णिमाताईंच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला आजतोवर महाराष्ट्र शासन जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार, महिला शेतकरी पुरस्कार, लक्षाधीश रेशीम शेतकरी पुरस्कार, दूरदर्शनचा सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आणि सोबतच प्रेमाच्या पदव्यासुद्धा मिळाल्या आहेत. शेतीची मास्तरीण, प्रार्थनावाली आजी, कृषी सौदामिनी अशा वेगवेगळ्या उपाधींनी त्यांना संबोधित केले जाते.
पुढील काही वर्षांत रेशीम कोषातून स्वत: रेशमी धागा काढून विक्री करण्याचे माझे स्वप्न
कदाचित माझी सून कल्याणीच्या हातून पूर्ण होईल, असे सांगताना पौर्णिमाताईंच्या डोळ्यात कौतुक दाटून येते.
अनेक चांदण्यांचे जीवन स्वयंपूर्णतेच्या प्रकाशाने उजळून टाकणा-या या पौर्णिमेच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत...