आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हवंहवंसं नाको

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाको गाव जिथे संपतं तिथे एक सुंदर, छोटा तलाव आहे. हिवाळ्यात हा पूर्ण तलाव गोठलेला असतो. गुरू पदमसंभव एकदा नाको गावच्या मागच्या डोंगरावर तप करायला आले होते. त्यांना प्यायला पाणी नव्हतं म्हणून त्यांनी त्यांच्या हातातली पूजेची कट्यार जमिनीत खुपसून हे तळं निर्माण केलं, अशी आख्यायिका आहे.
विशेष म्हणजे, वर्षानुवर्षं पाऊस न पडूनही हे तळं आजतागायत कधीच सुकलेलं नाही.

काल्पाहून नाकोला पोहोचायला आम्हाला जवळजवळ साडेतीन तास लागले. शेवटी एकदाचं नाको गाव आणि गावातलं बौद्धमंदिर दिसू लागलं. गावाच्या जवळजवळ एक किलोमीटर खाली एक छोटंसं हॉटेल लागलं. तीन-साडेतीन तास कुठेही न थांबता आम्ही तो खडतर प्रवास केला होता, त्यामुळे चहाची आस लागली होतीच. मुलांना मॅगी खायची होती. हिमालयातल्या छोट्या गावांमध्ये खूप दमून-भागून विसावल्यानंतर गरमगरम मॅगी खाणं हा खरोखरच एक आनंदसोहळा असतो. आम्ही त्या हॉटेलमध्ये थांबलो, फ्रेश झालो आणि चहाची ऑर्डर दिली.
तेवढ्यात धडाडधड आवाज करत वीसेक हार्ली-डेव्हिडसन मोटारसायकली हॉटेलपाशी येऊन थांबल्या. या बायकर्स ग्रुपला मागे टाकूनच आम्ही पुढे आलो होतो. हिमालयातले हे अवघड रस्ते मोटरसायकलवरून पार करायचे, असे स्वप्न घेऊन दरवर्षी शेकडो बायकर्स ग्रुप परदेशातून भारतात येतात. हा ग्रुप ब्रिटनचा होता, हे त्यांच्या इंग्रजी उच्चारांवरून कळत होते. हॉटेलबाहेर त्यांची ती घोडी बांधून ते सगळे बायकर्स हॉटेलमध्ये शिरले. चहाची ऑर्डर त्यांनीही दिली आणि आमच्या शेजारच्याच टेबल्सवर येऊन ते बसले. हे बायकर्स खूप बोलघेवडे असतात, हे मला माझ्या आधीच्या अनुभवावरून माहिती होतंच. मी त्यांना बघून हसले आणि अभिवादन केलं. तेही हसले. त्यातला एक डेव्हिड नावाचा माणूस खूपच बोलका निघाला. तो म्हणाला की, ते चंडीगढपासून बाइक्स घेऊन आलेत आणि पूर्ण स्पिती खोरं आणि लाहौल फिरून रोहतांग पास मार्गे ते मनालीला जातील आणि तिथून मग पुढे परत चंडीगढला. एकवीस दिवसांची ट्रिप होती त्यांची एकूण. भारतीय हिमालयात तो चौथ्यांदा येत होता. ‘आय हॅव बाइक्ड ऑल ओव्हर बट नथिंग लाइक हिमालयाज,’ असं परतपरत म्हणाला तो. व्यवसायाने मानसोपचारतज्ज्ञ होता डेव्हिड, पण व्यसन मात्र बाइकिंगचं.
मुलं त्याचं बोलणं कुतूहलाने ऐकत होती, मधूनमधून त्याला प्रश्नही विचारत होती. मला डेव्हिडने विचारलं, ‘तू एकटीच फिरते आहेस मुलांना घेऊन?’ मी हसून होकार दिला. ‘भारतात हे नॉर्मल आहे का, शाळेच्या सुट्टीत आईने मुलांना घेऊन एकटं भटकणं?’ डेव्हिडने विचारलं. ‘अगदी. खूप भारतीय आया असं करतात,’ मी हसून म्हटलं. ‘वाॅव, हे मला माहीत नव्हतं,’ डेव्हिड म्हणाला. आमचं एव्हाना खाऊन झालं होतं. डेव्हिड आणि त्याच्या ग्रुपचा निरोप घेऊन आम्ही परत गाडीत बसायला निघालो. हॉटेलच्या बाहेर एका बाकड्यावर एक बाई बसली होती, चेहऱ्यावरून आणि पेहरावावरून स्थानिकच वाटत होती. आम्हाला गाडीत बसताना पाहून ती जवळ आली आणि म्हणाली. ‘मला वर गावात सोडाल का?’ मी अर्थातच हो म्हटलं आणि तिला गाडीत घेतलं. तिचं घर मुख्य गावापासून थोडं खाली होतं. तिने सांगितलं की, वर गावात एक धार्मिक प्रवचनाचा कार्यक्रम होता. गावजेवण होतं. धर्मशालाहून कुणीतरी मोठे लामा आले होते गावात आणि त्यांचं प्रवचन होतं. ‘गावजेवण’ हा शब्द ऐकलं आणि माझे कान टवकारले. प्रवास करताना मला असे कुठल्याही गावातले सण साजरे करायला, तिथल्या लोकांबरोबर जेवायला, प्रसंगी नाचायलादेखील फार आवडतं. हिमाचलमध्ये अशी संधी बरेचदा येते आणि अशा वेळी कुठलाही विधिनिषेध न बाळगता मी सरळ तिथल्या लोकांना विचारते की, ‘मी यात सहभागी होऊ का?’ आजपर्यंत तरी मला कुणीच नाही म्हटलेलं नाही.
एवढं बोलणं होईपर्यंत गाडी नाको गावात पोहोचलेली होती. गावाच्या सुरुवातीलाच हल्लीच बांधलेलं नवं-कोरं भव्य बुद्धमंदिर होतं. तिथेच समोर एका छोट्या पटांगणात मोठा मांडव घातलेला होता. लामाजींचं प्रवचन चालू होतं आणि ते ऐकायला अख्खा गाव लोटला होता. बाजूच्या एका दुसऱ्या तंबूत स्वयंपाकाची गडबड चालू होती. नवीन मंदिराच्या बाजूलाच जुनं मंदिर होतं, अकराव्या शतकात बांधलेलं. आम्ही ते बघायला म्हणून आत शिरलो. तिबेटी बौद्ध धर्मात आपल्या पंचायतन मंदिरांसारखी मुख्य गोम्पाव्यतिरिक्त दोन-तीन छोटी मंदिरंही असतात. मुख्य मंदिराला दुखांग म्हणतात. दुखांग म्हणजे भिक्षू जिथे जमून बुद्धाची सामायिक आराधना करतात असं मोठं मंदिर. या मंदिराच्या गाभाऱ्यात मध्यभागी शाक्यमुनी बुद्धाची मोठी मूर्ती असते आणि तिच्या दोन्ही बाजूंना तारा, म्हणजे तिबेटन सरस्वती आणि क्रुद्ध चेहऱ्याचे गुरू रिम्पोचे म्हणजे पदमसंभव, यांची मूर्ती असते. दुखांगच्या आजूबाजूला लाखांग नावाची छोटी देवळे असतात. त्या देवळांमध्ये अवलोकितेश्वराची मूर्ती असते किंवा त्या गावाच्या स्थानिक देवतेची. नाकोचं हे जुनं मंदिर अत्यंत देखणं आहे. दुखांगच्या भिंतीवर हजार बुद्धांची जवळजवळ हजार वर्षे जुनी चित्रे आहेत. मंदिरात दर्शन घेऊन आम्ही गावात शिरलो. अगदी लहान मुलांच्या गोष्टींच्या पुस्तकात असतं तसं चित्रातलं गाव आहे नाको म्हणजे. मातीच्या भिंतीची पांढराशुभ्र चुना काढलेली इवलीइवली घरे.
घरांमधून जाणारा टीचभर रस्ता आणि घरामागेच छोट्या गोठ्यांमधून बांधलेली टपोऱ्या डोळ्यांची वासरं. आम्ही गावातून नाकोच्या तळ्याकडे जायला लागलो. गावातली सगळी गोबऱ्या गालांची मुलं आमच्या मागे यायला लागली. त्यातला एक सात-आठ वर्षांचा चिमुकला धीटपणे विचारू लागला, ‘कहाँ से आये?’ म्हटलं, ‘महाराष्ट्र से.’ ते काही त्याला कळलं नाही. शेवटी मी म्हटलं, ‘मुंबई से,’ तर त्याचे डोळे एकदम लकाकले. ‘आमिर खान को देखा?’ त्याने पटकन विचारलं. मी हसून नाही म्हटलं. ‘फिर शाहरुख, सलमान, अक्षय, ऐश्वर्या, प्रियांका चोप्रा?’ त्याने भराभर नावे घेतली. यांपैकी कुणालाच मी बघितलेलं नाही, हे कळल्यानंतर ‘मग राहता कशाला मुंबईत’ अशा अर्थाचा चेहरा करून आमच्याकडे अतीव करुणेने बघत ती सगळी पोरं आपापल्या घरी परत गेली. हिंदी सिनेमा हे प्रकरण कुठपर्यंत पोचलंय, हे मला परत एकदा नव्याने कळलं!
नाको गांव जिथे संपतं तिथे एक सुंदर, छोटा तलाव आहे. एकदम गोल, द्रोणासारखा खोलगट तलाव. हिवाळ्यात हा पूर्ण तलाव गोठून गेलेला असतो. आम्ही तलावापाशी आलो. तिथे एक म्हातारा गावकरी ऊन खात एका दगडावर निवांत बसलेला होता. बाजूलाच त्याची गाय चरायला सोडलेली होती. ‘जूले,’ मी त्याला तिथल्या भाषेत अभिवादन केलं. ‘जूले जी जूले,’ एकदम खुशीत येऊन तो म्हणाला. त्याने आम्हाला सांगितलं की, गुरू पदमसंभव एकदा नाको गावच्या मागच्या डोंगरावर तप करायला आले होते. त्यांना प्यायला पाणी नव्हतं म्हणून त्यांनी त्यांच्या हातातली पूजेची कट्यार जमिनीत खुपसून हे तळं निर्माण केलं. ‘आमच्या इथे वर्षानुवर्षं पाऊस पडत नाही, पण हे तळं आजतागायत कधीच सुकलेलं नाही की त्यातलं पाणीही कमी झालेलं नाही,’ ते काका म्हणाले. शेजारीच एक छोटं देऊळ आहे, तिथे एका दगडात पावलाच्या आकाराचा खोलगट खड्डा आहे. तो खड्डा म्हणजे गुरू पदमसंभवांची पाऊलखूण आहे, अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे.
नाकोचं ते तळं बघून आम्ही परत मंदिराकडे आलो. परतीचा रस्ता जरा चढाचा होता, त्यामुळे मला दर पाच पावलांवर धाप लागत होती. छातीचा नुसता भाता झाला होता. पण आदित आणि अर्जुन मात्र तिथे १२ हजार फुटांवरदेखील वासरासारखे उंडारत होते. हेवा वाटला मला त्यांचा. मंदिरापाशी आलो. आता गावाचे लोक जेवायला बसले होते. भूक आम्हालाही लागली होतीच. मी तिथल्या एका माणसाला विचारलं, ‘आम्ही पण प्रसादाला येऊ का?’ त्याने हसून लगेच आम्हाला एका पंक्तीत बसवलं आणि ताटवाटी घेतलीसुद्धा. जेवण साधं, पण अत्यंत रुचकर होतं. मक्याच्या पिठाची भाकरी, भात, अख्ख्या उडदाची डाळ आणि बटाट्याची भाजी. ‘हे बटाटे आमच्या शेतातलेच आहेत बरं का? सगळ्या भारतात तुम्हाला इतके रुचकर बटाटे सापडणार नाहीत,’ आम्हाला वाढणारा माणूस अभिमानाने म्हणाला. आम्ही पोट भरून जेवलो. प्यायला खास तिथली बटर टी होती. तिथल्या लोकांच्या त्यांच्या भाषेतल्या गप्पा ऐकत ऐकत एका पंक्तीला बसून जेवताना खूप मजा आली. गावातले लोक आग्रह करकरून वाढत होते. जेवण संपवून, तिथल्या लोकांचे आभार मानून आम्ही परत निघालो. गावाचं नाव नाको असलं तरी गाव मात्र हवंहवंसंच वाटत होतं!
shefv@hotmail.com
बातम्या आणखी आहेत...