आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहाडी आतिथ्‍य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुल्लूचा आमचा दोन दिवसांचा मुक्काम तसा निवांत होता. आमचा सारथी पवन याचं घरही भुंतरलाच होतं, त्यामुळे दोन्ही दिवस त्याने आम्हाला त्याच्या घरीच जेवणासाठी नेलं. त्याची बायको पुष्पा अत्यंत चांगला स्वयंपाक करते. तिने खास हिमाचली पराठे आणि तिथलं पहाडी रोडू चिकन बनवलं होतं आमच्यासाठी. पवनच्या तिन्ही मुली आणि आदी, अर्जुन, अनन्या काही वेळ एकमेकांचा अंदाज घेत गप्प होते, पण हळूहळू त्यांची मैत्री झाली आणि ते मस्त एकत्र खेळू लागले. आम्ही पवनच्या घरी जेवायला आलोय हे कळताच पवनचे सगळे शेजारी भेटायला आले. पहाडी माणसं नको इतकी आतिथ्यशील, त्यामुळे आम्हाला सगळ्यांच्याच घरी चहाचं निमंत्रण मिळालं.
आमचा पुढचा मुक्काम कुल्लू तालुक्यातच तीर्थन नदीच्या खोऱ्यात होता. तिथे वनखात्याच्या अतिथीगृहात दोन दिवस मुक्कामाला राहायचं होतं. बुकिंगसाठी कुल्लूच्या वन खात्याच्या कचेरीत जाणं भाग होतं. दुपारी पवनकडे जेवून लगेच निघालो. वनखात्याच्या ऑफिसमध्ये पोचलो तेव्हा अडीच वाजले होते. महाराष्ट्रातल्या सरकारी कचेऱ्यांमध्ये सहसा या वेळेला सामसूम असते, पण इथे चक्क लोक आपापल्या टेबलावर बसून काम करत होते. एका कारकुनाच्या डेस्कजवळ गेले तर तो माणूस लगेच हातबीत जोडून म्हणाला, ‘क्या सेवा कर सकते हैं मेडमजी आप की’? सरकारी कचेरीत इतकं अगत्य बघून माझ्या डोळ्यात पाणी यायचंच बाकी होतं. आपल्याकडे महाराष्ट्रात सरकारी कचेऱ्यात काम करणारी माणसं साधं डोकं वर करून तुमच्याकडे बघायलाच दहा मिनिटं लावतात आणि मग अत्यंत तुसड्या आवाजात, कपाळाला दोन-तीन आठ्या घालत प्रश्न येतो, ‘काय काम आहे?’ इथे हिमाचल प्रदेशमध्ये हा बाबा माझ्यासाठी चहा मागवत होता! बुकिंगचं सांगितलं तर म्हणाला, ‘क्यों नहीं? लेकिन आप जरा डेप्युटी कंझरवेटर साब से मिल लिजिये.’ त्याने मला डेप्युटी कंझरवेटरच्या ऑफिसमध्ये पाठवलं. ते आयएएस ऑफिसर होते, खूप अगत्याने बोलले, मी कोण, कुठली, सगळी चौकशी केली आणि मी एकटीच मुलांना घेऊन हिमाचल दाखवायला आलेय म्हटल्यावर तर ते एकदम खुशच झाले. तीर्थनचं बुकिंग त्यांनी लगेच करून दिलं. पुढचा मुक्काम शोजा या गावात करायचं ठरलं होतं, तिथेही वनखात्याचं अतिथीगृह होतं. डेप्युटी कंझरवेटर म्हणाले, ‘तुम्ही तिथे पण राहा. बुकिंग बंजारच्या ऑफिसमध्ये करावं लागेल, पण मी फोनवर त्यांना तसं सांगून ठेवतो.’ त्यांचे आभार मानून बाहेर पडलो. एवढं सरकारी सौजन्य मी आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवत होते.
पवन म्हणाला, ‘चला, तुम्हाला जुनी देवळं बघायला आवडतात ना, तुम्हाला बजौराच्या बिसेशर महादेव मंदिरात नेतो.’ बजौरा हे भुंतरजवळचंच एक छोटं गाव. तिथे नवव्या शतकात बांधलेलं एक अप्रतिम दगडी शिवमंदिर आहे. गावातून एक छोटा रस्ता मंदिराकडे जातो. मंदिर छोटंसंच आहे, फक्त शिखर आणि गर्भगृह. नृत्यमंडप नाही. मंदिराच्या भिंतीवर आणि शिखरावर खूपच सुंदर कोरीव काम आहे. शिखरावर आमलक आहे. मंदिराचं प्रवेशद्वार पूर्वेकडे आहे आणि मुख्य गाभाऱ्यात सुंदर शिवलिंग आहे, पण या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इतर तिन्ही बाजूंना गाभाऱ्यासारख्या खोल खोबणी आहेत आणि त्या तिन्ही ठिकाणी महिषासुरमर्दिनी, श्रीगणेश आणि श्रीविष्णू या देवांच्या पूजेच्या मूर्ती आहेत. कोरीव काम अत्यंत उच्च दर्जाचं आहे. असं म्हटलं जातं की, हे देऊळ कुल्लूचा प्रतिहार राजा भोज याच्या काळात म्हणजे नवव्या शतकात घडलं गेलं. मंदिराच्या अगदी जवळून बियास वाहते आणि पलीकडे उंच डोंगररांगा आहेत. डोंगरांच्या कोंदणात मधोमध हिऱ्यासारखं बसवलेलं हे मंदिर खूपच सुरेख आहे. परिसरही इतका शांत आणि रम्य की, इथे खूप वेळ बसावं असं वाटतं. तिथले पुजारी आम्ही गेलो तेव्हा देवळाच्या प्राकारात असलेल्या एका मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली शांतपणे डोळे मिटून बसले होते. म्हणाले, शिवरात्रीच्या वेळी
इथे हजारो लोक दर्शनाला येतात. तीन तीन तास रांगेत उभं राहावं लागतं!
देऊळ बघून डॉर्मिटरीत परत गेलो तर खोलीबाहेर कठड्यावर रात्री धुऊन वाळत घातलेले कपडेच दिसेनात. ‘हे असं कसं झालं,’ याचा विचार करत कुलूप उघडून खोलीत शिरलो. पाचच मिनिटात दरवाजावर थाप आली. दरवाजा उघडला तर बाहेर एक पोरसवदा, पंधरा-सोळा वर्षांचा भिक्षू विद्यार्थी, आमच्या वाळलेल्या कपड्यांची नीट, व्यवस्थित घडी केलेली चळत घेऊन हसत बाहेर उभा होता. मी त्याचे आभार मानले, तसा तो नुसता हसला आणि आदी, अर्जुनला टाटा करत खाली पळालासुद्धा!
संध्याकाळी मी आणि मुलं तिथल्या बौद्धमंदिरात सायंप्रार्थनेला गेलो. तिथल्या शाळेत शिक्षण घेणारी सगळी मुलं शिस्तीत एका रांगेत बसून एका विशिष्ट लयीत मंत्रपठण करत होती. एक म्हातारा भिक्षू पुढे बसून नगारा वाजवत होता आणि समोरच्या भव्य अशा बुद्धप्रतिमेसमोर शंभरएक तुपाचे दिवे तेवत होते. त्या लयीची, त्या आवाजाची आणि मंद तेवणाऱ्या त्या दिव्यांच्या सौम्य प्रकाशाची मिळून एक सुंदर झळाळी आमच्या मनावर चढत होती. कुल्लूतली ही शेवटची संध्याकाळ खूपच सुंदर होती.
शेफाली वैद्य, पुणे
shefv@hotmail.com