आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेफ्ट राइट लेफ्ट (प्रवास तिळ्यांसोबतचा)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अटारी हे भारतातलं शेवटचं गाव आणि वाघा हे पाकिस्तानातलं पहिलं गाव. दोन्ही देशांमधली उघडी असलेली ही एकमेव सीमा. या सीमेवर दररोज संघ्याकाळी दोन्ही देशांचे सैनिक आपापल्या देशाचे झेंडे सन्मानपूर्वक खाली उतरवतात. हीच बीटिंग द रिट्रीट सेरेमोनी.
अमृतसरचं सुवर्णमंदिर तर बघून झालं होतं. दुर्ग्याना मंदिर, जालियानवाला बाग वगैरे इतरही ठिकाणं झाली होती. आता राहिली होती फक्त अटारी-वाघा बॉर्डर आणि तिथली बीटिंग द रिट्रीट सेरेमोनी. अमृतसरपासून लाहोर फक्त ५० किलोमीटरवर आहे. भारताची विभागणी झाली त्या रेडक्लीफ्फ रेखेनुसार अटारी हे भारतातलं शेवटचं गाव आणि वाघा हे पाकिस्तानातलं पहिलं गाव. दोन्ही देशांमधली उघडी असलेली ही एकमेव सीमा. लाहोर अमृतसर बस इथूनच जाते. या सीमेवर दररोज संघ्याकाळी एका छोट्याशा समारंभात दोन्ही देशांचे सीमा सुरक्षा सैनिक आपापल्या देशाचे झेंडे सन्मानपूर्वक खाली उतरवतात. त्या आधी छोटासा मार्चपास्ट असतो. या समारंभाला तिकीट नसतं, पण प्रचंड गर्दी असते. पण सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना आधी विनंती केली, तर व्हीआयपी पासेस मिळू शकतात. मुलं बरोबर होती म्हणून मी हा सगळा सरंजाम आधीच केलेला होता. सीमेवरचा कार्यक्रम बरोबर साडेपाच वाजता सुरू होणार होता, पण मला हॉटेलवाल्यांनी साडेतीनलाच निघायला सांगितलं होतं. कारण आधी सीमा सुरक्षा दलाच्या चौकीत थांबून पासेस घ्यायचे होते आणि गर्दी खूप असल्यामुळे सिक्युरिटी चेकला पण खूप वेळ लागतो. त्याप्रमाणे आम्ही साडेतीनलाच निघालो. पंजाबचा सरळ रस्ता, आजूबाजूला गव्हाची शेतं आणि मधूनच दिसणारी छोटी-छोटी गावं. आमची गाडी भरधाव चालली होती. बसेस भरभरून लोक अटारीच्या दिशेने जात होते. अमृतसरमध्ये येणारे पर्यटक जितके सुवर्णमंदिर बघायला म्हणून येतात, तितकेच अटारी सीमा बघायला येतात. वाटेत रस्त्यावरची पाटी दिसली. ठळक अक्षरात वर लिहिलं होतं, ‘लाहोर -५४ किलोमीटर'.

तासाभरात आम्ही अटारीला पोहोचलो. सीमा सुरक्षा दलाची चौकी आहे तिथून ७००-८०० मीटरवर पार्किंग आहे. तिथे उतरून पायी जावं लागतं. सुरक्षा तपासण्या इथूनच सुरू होतात. आधी मेटल डिटेक्टर आणि शिकाऊ कुत्री गाड्यांची कसून तपासणी करतात. फक्त छोटी पर्स बरोबर घेऊ शकतो. मोठ्या पिशव्या गाडीतच ठेवाव्या लागतात. २०१४ सालच्या नोव्हेंबर महिन्यात पाकिस्तानी बाजूला आत्मघातकी बॉम्बहल्ला झाला, तेव्हापासून सुरक्षा व्यवस्था खूपच कडक केलेली आहे. ड्रायव्हर म्हणाला, ‘आता तुम्ही इथून पुढे चालत जा, मी इथेच आहे.' ‘तुम्ही येणार नाही का परेड बघायला?' आदितने त्यांना विचारलं. ‘मी गेल्या दहा वर्षांत सहाशे वेळा तरी इथे आलो असेन, पर्यटकांना घेऊन, पण एकदाही परेड बघितलेली नाही. आम्हाला गाडीतच राहावं लागतं,' ड्रायव्हर किंचित खिन्न हसून म्हणाला.

आम्ही चालायला लागलो. लोकांची प्रचंड गर्दी होती. तीन वेळेला सुरक्षा तपासणी झाली. आता ध्वनिक्षेपकाचा आवाज कानावर पडायला लागला होता. राष्ट्रभक्तीपर गाणी लावली होती, ‘मेरे देश की धरती, सोना उगले, उगले हीरे मोती...' घोळक्या-घोळक्याने लोक चालले होते. दुतर्फा चहा-कॉफीची, पाव-भाजी, परोठ्याची छोटी छोटी दुकानं होती. पॉप-कॉर्न, पाण्याच्या बाटल्या विकणारे फिरते विक्रेते होते. एकूण माहोल जत्रेचा होता. पुढे आलो. भारताच्या बाजूचं मोठं प्रवेशद्वार दिसायला लागलं. वर फडफडणारा तिरंगा आणि गांधीजींचा भला-मोठा फोटो. तिथून पुढे अर्ध्या-एक किलोमीटरवर पाकिस्तानच्या बाजूचं तसंच प्रवेशद्वार आणि वर जीन्नांचा फोटो. दोघेही गुजराती! या मधल्या जागेत स्टेडियम सिटिंग केलं होतं आणि लोकांची खचाखच गर्दी होती. पाकिस्तानच्या बाजूलाही तसेच सीट्स होते, पण गर्दी एकदमच तुरळक. आमचे पासेस असल्यामुळे आम्हाला अगदी दोन्ही देशांमधल्या गेटसमोर जागा मिळाली होती. दोन मोठ्ठी लोखंडी गेट्स, समोरासमोर उभ्या ठाकलेल्या आणि कलत्या सोनेरी उन्हात डौलाने फडकणारे दोन्ही देशांचे झेंडे, आपला तिरंगा आणि त्यांचा चाँद-तारा. भारताच्या बाजूने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह होता. जी देशभक्तीपर गाणी लागली होती, त्यांच्यावर लोक रस्त्यात उतरून जोशात नृत्य करत होते. पाकिस्तानच्या बाजूने मात्र सामसूमच होती.
पुढील स्लाइड्सवर वाचा, उर्वरित लेख