आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रांगडा कांगडा किल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मसरूरची देवळे बघून परत पालमपूरला येत होतो. वाटेत कांगडा शहर लागतं. उत्तर भारतातल्या बहुतेक छोटेखानी शहरांसारखं गबाळं, अव्यवस्थित. बाजारपेठेत निरुंद रस्त्यात छोटी छोटी, दाटीवाटीने बसलेली दुकानं, कशाही, कुठेही बांधलेल्या इमारती आणि इथे-तिथे साठून राहिलेले कचऱ्याचे ढीग! हिमाचल प्रदेशातली गावं अतिशय सुंदर, स्वच्छ आहेत; पण शहरं मात्र तशी नाहीत. कांगडा शहराचा एकूण कळाहीनपणा आणि रूपरंग पाहून मला तिथे थांबायचं नव्हतं, पण कांगड्याचा किल्ला साद घालत होता.

आजचं कांगडा शहर बघून विश्वास बसत नाही, पण एकेकाळी हेच कांगडा शहर एका खूप मोठ्या पहाडी साम्राज्याची राजधानी होतं. अगदी सिकंदरच्या सैन्यालादेखील कांगड्याचा किल्ला माहीत होता, असे इतिहासात उल्लेख आहेत. महाभारतात उल्लेख झालेला त्रिगर्त देश म्हणजेच आजचं कांगडा आणि आजूबाजूचा परिसर! कांगड्याचा सध्या उभा असलेला किल्ला तिथल्या कटोच राजघराण्याने बांधलेला आहे. मुघल काळात या किल्ल्यावर अनेकदा हल्ले झाले. सम्राट अकबराचा १६१५मध्ये झालेला हल्ला या किल्ल्यातल्या शूर सैनिकांनी यशस्वीपणे परतवून लावला; पण अकबराचा मुलगा जहांगीर १६२०मध्ये विराट सैन्य घेऊन परत या किल्ल्यावर चाल करून आला. कटोच सैनिकांनी शर्थीने किल्ला लढवला, पण हिंदू राजांची नेहमीची रडकथा आडवी आली. फितुरी! मुघलांनी गडाच्या आतली माणसं पैसे देऊन फितवली आणि गड घेतला. अतिशय हालहाल करून कांगड्याच्या राजाला मारण्यात आले. गडावरच्या लोकांची अमाप कत्तल झाली. फक्त राजाचा मुलगा मोहिमेवर असल्यामुळे वाचला. पुढची शंभर-दीडशे वर्षे गड मुघलांच्या ताब्यात राहिला.

१७८९मध्ये कटोच राजघराण्याचा वंशज राजा संसारचंद दुसरा याने खिळखिळ्या झालेल्या मुघल सत्तेला हरवून किल्ला परत आपल्या ताब्यात घेतला. हा संसारचंद दुसरा म्हणजे हिमाचल प्रदेशचा शिवाजी! शिवाजी महाराजांसारखंच यानेही गनिमी कावा वापरून मुघलांना जेरीला आणलं. त्याचं आयुष्यही शिवाजी महाराजांसारखंच अनेक प्रबळ शत्रूंशी अनेक आघाड्यांवर लढण्यात गेलं. एकीकडे मुघल, एकीकडे नेपाळचे गुरखा आणि एकीकडे शिखांचा राजा रणजीतसिंघ हे तिघेही शत्रू कांगडा राज्यावर हल्ला करत होते. शेवटी शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, हा न्याय लावून राजा संसारचंदने राजा रणजीतसिंघबरोबर तह केला आणि दोघांनी मिळून मुघलांचा आणि गुरखांचा पाडाव केला. संसारचंदाच्या मृत्यूनंतर गड रणजीतसिंघाने घेतला आणि शेवटी १८४६मध्ये अँग्लो-सिख युद्धानंतर हा उत्तुंग गड ब्रिटिशांच्या हाती पडला.

आता गडाची मालकी जरी एएसआयकडे असली तरी कटोच राजघराण्याच्या वंशजांनी त्यांच्या पूर्वजांची स्मृती जागृत ठेवण्यासाठी गडसंवर्धनाचे बरेच प्रयत्न केलेत. गडाची हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये माहिती देणारं सुंदर ऑडियो गाइड कटोच राजघराण्याच्या वंशजांनी गडाबाहेर उपलब्ध करून दिलंय. शेजारीच महाराजा संसारचंद कटोच म्युझियम आहे, तिथे तुम्हाला कांगड्याची नाणी, जुने पोशाख, किल्ल्यात वापरात आलेल्या वस्तू, जुनी शस्त्रे वगैरे बघायला मिळतात. कटोच राजघराण्याचे लोक अजूनही किल्ल्याबद्दल जिव्हाळा बाळगून आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये त्यांची काही हेरिटेज हॉटेल्सदेखील आहेत.

आम्ही किल्ल्यात शिरलो तेव्हा दुपारचे तीन वाजले होते. किल्ल्याच्या बाहेरच पार्किंग आहे; तिथे गाड्या, कुत्री, गाई, गाढवं, मांजरं आणि माणसं अशी वैविध्यपूर्ण गर्दी होती! ऑडियो गाइड घेऊन आम्ही किल्ल्यात शिरलो. त्या सुंदर परिसरात मुलं नुसती धावत सुटली होती. किल्ल्याचा परिसर खूपच विस्तीर्ण आहे. किल्ला बाणगंगा आणि माझी या नद्यांच्या संगमावर एक मोठा पहाड आहे, त्यावर बांधलेला आहे. बालेकिल्ल्यातून दोन्ही नद्यांचा संगम फारच सुंदर दिसतो. पूर्ण कांगडा शहर आपल्याला किल्ल्याच्या तटबंदीवरून बघायला मिळतं. गडावर एक मजार, एक जैन मंदिर आणि एक हिंदू मंदिर असा सर्वधर्मसमभावी प्रकार बघायला मिळतो. किल्ल्याची तटबंदी आजही सुस्थितीत आहे, फक्त आतल्या इमारती बऱ्यापैकी पडझड झालेल्या आहेत. १९०५मध्ये या परिसरात फार मोठा भूकंप झाला होता, त्यामध्ये किल्ल्याचं बरंच नुकसान झालं, ही माहिती ऑडियो गाइडमधून मिळाली.
ऑडियो गाइड कटोच राजघराण्याच्या वंशजांनी बनवल्यामुळे त्यांच्यावर ‘सरकारी’ इतिहास सांगायचं बंधन नव्हतं. त्यामुळे नको इतका खरा इतिहास आपल्याला ऐकावा लागतो. जहांगीर बादशहाने कटोच राजाची अंगावरची कातडी सोलून त्याला कसं हाल हाल करून मारलं, इथपासून ते कटोच राजस्त्रियांनी आपली अब्रू वाचवण्यासाठी गडावरच्या विहिरीत उडी मारून जोहार कसा केला, तिथपर्यंत. ती विहीर आपल्याला आजही गडावर जशीच्या तशी दिसते!
ऑडियो गाइड ऐकून ती विहीर पाहताना विदीर्ण चेहऱ्याने मला अनन्याने विचारलं, ‘पण त्यांनी आत्महत्या का केली? व्हाय डिड दे नॉट फाइट? त्या बायकांनी प्रतिकार का नाही केला मम्मा?’ काय सांगणार मी तिला? कांगडा किल्ला बघून आम्ही हॉटेलवर परतलो, तेव्हा सगळ्यांचेच चेहरे झाकोळून आलेले होते!
shefv@hotmail.com
पुढील स्‍लाइडवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो..