आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shefali Vaidya Article – Travel With Triplets.

ही तर भटकंती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लेखिका मूळ गोव्यातली, देशविदेशी वास्तव्य करून आता पुण्यात स्थायिक झालेली. कोंकणी, मराठी व इंग्रजीवर प्रभुत्व असलेली. तिळ्या मुलांची आई. या तिळ्यांना अत्यंत जाणीवपूर्वक संवेदनशीलतेने वाढवण्याच्या प्रवासात भटकंती हा तिच्या दृष्टीने फार महत्त्वाचा घटक. काही विशिष्ट हेतू मनात ठेवून केलेल्या प्रवासाची गोष्ट ती आजपासून सुरू होणाऱ्या ‘प्रवास तिळ्यांसोबत’ या नव्या पाक्षिक सदराच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. २७ सप्टेंबर रोजी जगभरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या पर्यटन दिनाच्या निमित्ताने.

एक वेडी आई, भारतातली दोन राज्यं, तीन चौकस मुलं, चार पंख लावलेले आठवडे, पाच मुक्कामाच्या जागा, सहा-सहा तासांचा गाडीतून प्रवास, सात सीटर गाडी. दिवसाला किमान आठ मैल चालणं, नऊ वर्षांच्या मुलांचे नाकी नऊ आणणारे प्रश्न आणि आचार्य अत्र्यांच्या भाषेत सांगायचं तर, मनाच्या ओंजळीत जपून ठेवाव्याशा वाटणाऱ्या दहा हजार आठवणी!
आदित, अर्जुन आणि अनन्या या माझ्या नऊ वर्षांच्या तिळ्या मुलांना घेऊन मी जेव्हा महिन्याभराच्या पंजाब आणि हिमाचलच्या प्रवासाची आखणी करायला लागले, तेव्हा माझ्या मनात एकच विचार होता; माझा देश मी जसा बघितला, अनुभवला, तसाच माझ्या मुलांनीही अनुभवावा. जिथे जाऊ तिथल्या लोकांशी, तिथल्या संस्कृतीशी तोंडओळख करून घ्यावी. हॉटेलमध्ये जाऊन पिझ्झा, बर्गर, पाव-भाजी वगैरे पुण्यात खातोच. तिथे हिमाचलला जाऊन तिथलं जेवण चाखावं, तिथल्याच झऱ्यांचं पाणी प्यावं, रानावनात पायी हिंडावं, तिथल्या मुलांबरोबर खेळावं, मिसळावं, नेहमी जे करतो, बघतो त्यापेक्षा वेगळं काहीतरी अनुभवावं, हाती आलेले क्षण अल्लाद झेलून त्यांचं सोनं करावं. माझ्या मुलांनी पर्यटक बनू नये, भटके प्रवासी बनावं. त्यांच्या पायांना रस्त्यावरची धूळ माखलेली असावी, कपड्यांवर प्रवासाचे डाग असावेत आणि त्यांच्या टपोऱ्या डोळ्यांत कायमचा वस्तीला असावा आनंद आणि उत्कंठा!
या भटकंतीला नवरा त्याच्या कामामुळे येणार नव्हता, फक्त मी आणि मुलंच जाणार होतो. एरवी त्यांच्या शाळा, त्यांचे छंदवर्ग, त्यांचे खेळ, गृहपाठ यामधून मोकळा वेळ काढणं कठीणच असतं. आम्ही बरोबर असलो तरी कामं ‘उरकायची’ असल्यामुळे निवांत मुलांबरोबर वेळ घालवणं, त्यांची बडबड ऐकणं, त्यांच्याबरोबर खूप वेळ निरुद्देश गप्पा मारणं मनात असूनदेखील करता येत नाही. दिवस आणि मागोमाग आठवडा, महिना आणि वर्षदेखील हां हां म्हणता निघून जातं. मुलं एका वर्षाने मोठी होतात आणि त्यांचं बालपण मुठीत धरलेल्या वाळूसारखं आपल्या डोळ्यांदेखत बोटांच्या फटीतून निसटून जातं. हा प्रवास म्हणजे त्या मुठीची भरली ओंजळ करण्याचा माझा प्रयत्न होता. खूप काळानंतर आम्ही चौघं माय-लेकरं इतके दिवस सतत बरोबर असणार होतो, तेही माझ्या मागे कामाचा आणि मुलांच्या मागे अभ्यासाचा तगादा नसताना!
पुढील स्लाइड्सवर वाचा, उर्वरित लेख...