आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहाडों में कैसा डर?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शोजाच्या वनखात्याच्या विश्रामगृहातली पहिली रात्र फार छान गेली. एक तर विश्रामगृह गावापासून दूर, उंचीवर देवदार वृक्षांच्या राईत दडलेलं होतं; अख्ख्या विश्रामगृहात फक्त मी आणि मुलंच होतो, आणि केअरटेकर म्हणून म्हातारे काका. आमचा सारथी पवन रात्री त्यांच्या खोलीत मुक्कामाला राहिला. स्वयंपाकी नव्हता, त्यामुळे जेवण आम्हालाच करायचं होतं. स्वयंपाकघर मुख्य विश्रामगृहाच्या कॉटेजमागे वेगळ्या खोलीत होतं. स्वयंपाकाला सुरुवात करणार, एवढ्यात धो-धो पाऊस आला आणि दिवे गेले. लालटेनच्या पिवळ्या सौम्य उजेडात आम्ही स्वयंपाक केला. बेत अगदीच साधा होता, ऊनऊन भात, वरण, बटाट्याची भाजी आणि काकडीची कोशिंबीर. मुलं हौसेने मदत करत होती. काकडी सोलणे, चिरणे, उकडलेल्या बटाट्यांच्या साली काढणे, ताट-वाट्या घेणे ही सगळी कामं तिन्ही मुलांनी आपणहून केली. जेवण तयार झालं तेव्हा सगळ्यांनाच खूप भुका लागल्या होत्या, त्यात स्वतः बनवलेलं गरमागरम जेवण. मेणबत्तीच्या प्रकाशात पोट भरून जेवलो सगळे.

मागचं आवरून मुख्य बंगल्यात झोपायला गेलो. पाऊस अजून सुरूच होता. सरींची अखंड गाज ऐकता ऐकता कधी झोप लागली समजलंच नाही. सकाळी फार लवकर माझे डोळे उघडले. पाऊस आता खूप हळूहळू पडत होता. मला ग्रेसांचे शब्द आठवले, ‘पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने, हलकेच जाग मज आली, दुःखाच्या मंद सुराने.’ फरक फक्त इतकाच होता की, मला जाग आली होती ती सुखाच्या मंद सुराने. लेकीला अगदी कुशीत घेऊन थोडा वेळ तशीच अंथरुणात पडून राहिले. थोड्या वेळाने पाय न वाजवता शेजारच्या दुसऱ्या खोलीत गेले. तिथे आदी-अर्जुन एकमेकांना बिलगून झोपले होते. हळूच त्यांच्या केसांवरून हात फिरवला मी. झोपलेली मुलं किती निरागस दिसतात! जगातला सगळा चांगुलपणा, सगळा आनंद, सगळा ताजेपणा त्यांच्या चेहेऱ्यावर वस्तीला आलेला असतो.

जेमतेम सहा वाजले होते. मुलं तर गाढ झोपलेली. भराभरा कपडे बदलले, शूज घातले आणि पवनला मुलांकडे लक्ष ठेवायला सांगून मी चालायला निघाले. विश्रामगृहाकडे जायचा रस्ता कच्चा होता. रात्रीच्या पावसाने रस्त्यावरची माती एकदम लोण्यासारखी मऊ झाली होती. त्या मातीत पाय रुतवत मुख्य रस्त्यापर्यंत आले. रस्त्याच्या कडेला, दरीच्या अगदी टोकाला दगडावर केअरटेकर काका उकिडवे बसून खालच्या दरीकडे टक लावून बघत होते. त्यांची तंद्री मला मोडवेना. त्यांना डिस्टर्ब न करता हलक्या पावलांनी मी चालत खाली गावाकडे निघाले. जेमतेम पन्नास-साठ उंबऱ्यांचा चिमुकला गाव हळूहळू जागा होत होता. बायका घरापुढचे अंगण झाडत होत्या. थोड्या अंतरावर एक छोटंसं दुमजली घर होतं. त्याचा पहिला मजला रस्त्याच्या पातळीवर होता. त्या घराच्या व्हरांड्यात एक बाई हातमागावर मन लावून काहीतरी विणत होती. तिचे हात आणि पाय लयबद्ध रीतीने हलत होते आणि हातमागाचा खटखट आवाज संगीतासारखा सगळ्याला वेढून टाकत होता. आता पाऊस पूर्णपणे थांबला होता. घरामागे दूर धूसर, निळसर दिसणाऱ्या डोंगररांगा आता सूर्याच्या सोनेरी किरणांनी न्हाऊन निघाल्या होत्या, आणि त्याच सोनेरी रंगात उजळून निघालेली ती वनदेवीसारखी मुलगी तिचे ते महावस्त्र विणत होती. माझे पाय पुढे निघेचनात. मी तशीच तिला बघत तिथेच खिळून उभी राहिले. ती तिच्या कामात इतकी गढलेली होती की, तिला काही काळ समजलंच नाही की मी तिला निरखतेय. शेवटी एक ओळ पूर्ण केल्यावर आळोखे-पिळोखे देत तिने अवघडलेली मान वर केली, तेव्हा तिची-माझी नजरानजर झाली. मी हसले. स्वच्छ, पांढरे दांत दाखवत तीही नितळ हसली. ‘क्या बुन रही हैं आप?’ मी विचारलं.
‘हमारा कुल्लू का पट्टू.’

हसत ती म्हणाली. कुलवी बायका सणा-समारंभाला काळ्या-पांढऱ्या चौकडीचं साडीसारखं एक लोकरी वस्त्र नेसतात, त्याला पट्टू म्हणतात, हे मला माहीत होतं.
‘बहुत मन लगा के बुन रही थीं आप.’ मी म्हटलं. ती नुसती हसली, म्हणाली, ‘आईये, चाय पीजिये हमारे साथ.’ त्या इतक्या सुंदर, सुखद सकाळी चहाचं आमंत्रण मला डावलता येईना. मला बसायला स्टूल देऊन ती आत गेली आणि थोड्या वेळाने दोन पितळी पेल्यांमध्ये वाफाळणारा चहा घेऊन आली. ओल्या, थंड बोटांना तो गरम पितळेचा पेला सुखावून गेला. चवीने आम्ही दोघी चहाचे घुटके घ्यायला लागलो.

‘आप अकेली आई घुमने?’ तिने मला विचारलं.
‘नहीं, बच्चे भी आये हैं. अभी सो रहे है,’ मी म्हणाले.
‘और बच्चों के पापा?’ तिने विचारलं.
‘वो नहीं आये,’ मी म्हणाले. काही क्षण शांतता पसरली. पुढचा प्रश्न विचारावा की विचारू नये, हे तिला समजत नसावं.
‘आप का झगडा हुआ आप के पती से?’ न राहवून तिने मला विचारलंच.
‘नहीं तो. उन को काम से छुट्टी नहीं मिली,’ मी हसून म्हटलं.
‘आप को डर नही लगता ऐसे अकेले बच्चों को लेके घूमने में?’ तिने मला विचारलं. या प्रश्नाची मला सवय होतीच, त्यामुळे मी हसून, पण मनापासून तिला म्हटलं, ‘यहां पहाडों में कैसा डर? आप सब लोग तो इतने अच्छे हो, इतनी मदद करनेवाले हो.’
ती खुदकन हसली, म्हणाली, ‘वो तो है दीदी.’
चहा संपवून, तिचे मनापासून आभार मानून मी परत यायला निघाले. तासभर लोटला होता. रेस्टहाउसला जायच्या वळणावर बघितलं तर ते काका अजूनही तसेच, तिथे दरीच्या टोकाला बसून होते. आता त्यांनी मला बघितलं. नमस्कार करून ते हसले.
‘क्या सोच रहे थे आप?’ मी विचारलं.

‘हम क्या सोचेंगे जी? ये पर्बत है ना उस के सामने तो हमारी सोच कितनी छोटी है,’ एक सुस्कारा सोडून ते काका उत्तरले. खरंच होतं त्यांचं. त्या अफाट, उत्तुंग डोंगररांगांसमोर आमची सोचच काय पण आम्हीच किती छोटे, किती नगण्य होतो...
शेफाली वैद्य, पुणे
shefv@hotmail.com
बातम्या आणखी आहेत...