आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काल्‍पा नावाची कल्‍पना (शेफाली वैद्य)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किन्नौरची स्वतंत्र संस्कृती आहे. इथे बौद्ध आणि हिंदू अशा दोन्ही धर्मांचा प्रभाव आहे. किन्नौरी लोक हिंदू देवतांचंही भजन-पूजन करतात. यज्ञ-याग करतात आणि बौद्धालाही भजतात.
बऱ्याच लोकांची नावेही दोन असतात, एक हिंदू नाव आणि एक तिबेटी भाषेत ठेवलेलं बौद्ध नाव.
रामपूरपासूनचा किन्नौरपर्यंतचा तो अवघड रस्ता संपता संपेना. त्यात दोन वर्षांपूर्वी या रस्त्यावर खूप मोठी दरड कोसळून जवळजवळ महिनाभर रस्ता बंद झाला होता, तेव्हा तात्पुरती सोय म्हणून वर गावातून दुसरा रस्ता बनवला होता. पण हिमालयात दरड कोसळणं हे खूपच धोकादायक. इथली जमीन इतकी अस्थिर की, एकीकडे दरड कोसळायला लागली की, चरचरत जाणाऱ्या जखमेसारखी ती पुढे पुढे जात राहते. दोन वर्षांपूर्वी कोसळायला लागलेली ही दरड अजूनही कोसळतेच आहे. त्यामुळे पर्यायी रस्ताच आता मुख्य रस्ता झालाय. पण त्यामुळे जवळजवळ पंचवीस किलोमीटरने अंतर वाढलंय, रामपूर आणि किन्नौरमधलं. आणि हे पंचवीस किलोमीटर हिमालयातले असल्यामुळे तासांच्या हिशेबात दोन तास वाढलेत!
तो अवघड रस्ता पार करून आम्ही एकदाचे रिकांग पियोला येऊन पोहोचलो. पियो हे किन्नौरचं तालुक्याचं ठिकाण. पेट्रोल पंप इथे, सरकारी कचेऱ्या इथे, बँका, हॉस्पिटल, दुकानं, बाजारपेठ सगळंच पियोला. तसं छोटंसंच गाव, त्यामुळे सगळे एकमेकांना ओळखणारे. थोडीफार खरेदी करायची होती ती पियोला करून पुन्हा वर चढायला लागलो, काल्पाच्या दिशेने. काल्पा हे किन्नौरमधलं छोटंसंच पण अत्यंत सुरेख गाव. सफरचंदाच्या बागा, मधूनच वाहणारा स्वच्छ खळाळत्या पाण्याचा ओहोळ आणि एकमेकाला बिलगून असलेली घरं. गावाच्या मधोमध गावच्या देवतेचं एक सुरेख किन्नौरी पद्धतीने बांधलेलं देऊळ, इथल्या भाषेत त्याला ‘किला मंदर’ म्हणतात. एखाद्या किल्ल्याच्या बुरुजासारखं असतं म्हणून ‘किला मंदर.’ त्याच्या बाजूलाच बौद्ध मंदिर.

किन्नौरची एक स्वतंत्र संस्कृती आहे. इथले लोक स्वतःला स्वर्गस्थ किन्नर लोकांचे वंशज समजतात. इथे बौद्ध आणि हिंदू अशा दोन्ही धर्मांचा प्रभाव आहे. किन्नौरी लोक हिंदू देवतांचंही भजन-पूजन करतात. यज्ञ-याग करतात आणि बौद्धालाही भजतात. बऱ्याच लोकांची नावेही दोन असतात, एक हिंदू नाव आणि एक तिबेटी भाषेत ठेवलेलं बौद्ध नाव. किन्नौरमधले स्त्री-पुरुष दोघेही हिरव्या काठाची गोल, लोकरी किन्नौरी टोपी घालतात. विशेष समारंभ असला तर या टोपीवर पांढऱ्या रंगाचं फर्न खोचतात. किन्नौरमध्ये थंडी खूप असते, त्यामुळे कपडे कायम लोकरीचेच वापरावे लागतात. किन्नौरी बायका एक साडीसदृश कपडा नेसतात, त्याला डोरू म्हणतात. इथे रस्ते डोंगराळ, त्यामुळे पुढे निऱ्या असल्या तर सारख्या पायात येतील म्हणून या डोरूच्या निऱ्या पाठीमागे असतात. हे डोरू प्रकरण फार सुंदर दिसतं, पांढरीशुभ्र लोकर आणि त्याला जोडलेले हातमागावर विणलेले लाल-पिवळ्या रंगातले नक्षीदार काठ. जेवढे काठ मोठे आणि काम जास्त तितकी डोरूची किंमत जास्त.

मला डोरू हा वस्त्रप्रकार इतका आवडला होता की, शक्य असेल तर एक विकत घेऊ, या विचाराने मी पियोमध्ये एका दुकानात डोकावले. दुकानदार जरा वयस्कच होता. मी विचारलं, ‘डोरू आहे का?’ माझ्या प्रश्नाचं सरळ उत्तर न देता त्यांनी विचारलं, ‘कुणाला घ्यायचाय?’ मी म्हटलं, ‘मला.’ ‘कशाला?’ त्यांनी प्रतिप्रश्न केला.

‘कशाला म्हणजे काय, नेसायला,’ किंचित चिडून मी उत्तर दिलं. ‘कुठून आलात?’ त्यांनी विचारलं. ‘पुण्याहून,’ मी म्हणाले. ते काका एकदम जोरजोरात हसायलाच लागले. मला कळेना ते का हसतात ते. तेवढ्यात दुकानात दोन-तीन गिऱ्हाइकं अजून शिरली होती, त्यांना उद्देशून ते काका म्हणाले, ‘देखो, ये सिस्टर पुणे में डोरू पेहनना चाहती हैं.’ तेही लोक माझ्याकडे एक-दोन क्षण अवाक होऊन बघत राहिले आणि नंतर त्यांच्याही चेहेऱ्यावर हसू उमटलं. ‘आप लोग हंस क्यूँ रहे हैं?’ मी थोडं त्रासिक स्वरात विचारलं. ‘गुस्सा मत होना सिस्टर, ये देखो डोरू,’ मागच्या कपाटातून डोरूची घडी काढून माझ्या हातावर ठेवत ते म्हणाले. माझे हात लवलेच त्या भाराने. साडेपाच मीटर लांबीच्या, लोकरीने विणलेल्या त्या डोरूचं वजन पंधरा किलो तरी असेल! पुण्याच्या हवेत हे अवजड धूड अंगावर बाळगण्याच्या कल्पनेनेच मला घाम फुटला. माझ्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव बघून ते काका हसले आणि लहान मुलांना ज्या स्वरात आपण समजावतो त्या स्वरात म्हणाले, ‘जैसा देस वैसा भेस होता है बेटा. यहाँ की सर्दी के लिये बनाया है ये डोरू, ऐसे आप प्लेन्स मी नहीं पेहेन सकते, और आप की सुती साडी यहाँ की औरते नही पेहेन सकती, आप चाहो तो इसी टाइप में एक स्टोल लेके जा सकते हो.’ त्यांनी दाखवलेले स्टोल्स सुंदर होते. एक स्टोल घेऊन त्यांचे आभार मानून बाहेर पडले.

आम्ही काल्पाला पोहोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. काल्पाला माझा मित्र पृथ्वीराज नेगी ग्रँड शांग्री-ला नावाचं एक सुंदर हॉटेल चालवतो. चार-पाच वर्षांपूर्वी मी एकटी भटकायला आले होते तेव्हा पृथ्वीची आणि माझी चांगली मैत्री झाली होती. पृथ्वी, त्याची बायको सावित्री आणि त्याची तरुण टीम मिळून अतिशय जिव्हाळ्याने पाहुण्यांची सरबराई करतात. जवळजवळ प्रत्येक खोलीतून उत्तुंग किन्नर कैलास शिखर अगदी हाकेच्या अंतरावर दिसतं. हॉटेलच्या सगळ्यात वरच्या मजल्यावर एक सुरेख पाइन वूडच्या फळ्यांनी आच्छादलेली लायब्ररी आहे. त्यात हिमालयावरची, बौद्ध धर्मावरची आणि हिंदू तत्त्वज्ञानावरची दुर्मीळ पुस्तके आहेत. त्या लायब्ररीत बसून गरम चहाचे घुटके घेत आरामशीर गादीवर रेलून पुस्तक वाचत पडणे हा एक अत्यंत सुंदर अनुभव. माझी तिन्ही मुलं पुस्तकवेडी आहेत, ती लायब्ररी बघून तिघंही पृथ्वी अंकलच्या हॉटेलच्या प्रेमातच पडली.
आम्ही ट्रिपमध्ये या आधी जिथं जिथं राहिलो होतो त्या खोल्या अत्यंत साध्या होत्या. त्या मानाने पृथ्वीचं हॉटेल मुलांना एकदम फाइव्ह स्टारसारखंच वाटलं. त्यामुळे मुलं अगदी खुशीत होती.

shefv@hotmail.com

बातम्या आणखी आहेत...