आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधाराचा हिमालय (शैफाली वैद्य)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काल्पामधलं पृथ्वीराज नेगी या माझ्या मित्राचं शांग्री-ला हे हॉटेल म्हणजे जणू माझं हिमाचल प्रदेशमधलं घरच होतं. तिथल्या वेटरपासून क्लिनिंग स्टाफपर्यंत सगळेच माझी आणि मुलांची अगदी घरच्यासारखी सरबराई करत होते. काल्पाला पोहोचल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठले. मुलं अजून झोपलेलीच होती. झोपलेली लहान मुलं किती निर्मळ दिसतात! त्यांचा चेहरा कुठल्याही तणावापासून मुक्त असतो. जगातलं सगळं जे जे सुंदर, उदात्त, निरागस आहे ते त्या निद्रिस्त चेहऱ्यांवर वसतीला आलेलं असतं. काही क्षण मी झोपलेल्या मुलांकडे एखाद्या महान कलाकाराचं चित्र बघावं त्या तन्मयतेने बघत राहिले, आणि मग हलक्या हाताने त्यांचं पांघरूण नीट करून बाहेर व्हरांड्यात आले.

काल्पा गाव नुकतंच आळोखे-पिळोखे देत उठत होतं. समोरच्या उत्तुंग पर्वतरांगांमागून कोवळा सोनेरी उजेड पसरत होता. शिवलिंगाच्या आकारातल्या किन्नौर कैलास शिखराच्या कडा मागून उजेड पडत असल्यामुळे झळाळत होत्या, त्यामुळे पूर्ण शिखर जणू अग्निज्वालांनी वेढलंय, असाच भास होत होता. मला दक्षिणेत थंजावूरला केलेली नटराजाची ब्रॉन्झची मूर्ती आठवली. शिव नटराज नेहमी अग्निज्वालांच्या वर्तुळात नृत्य करत असतात, अगदी तसाच आभास किन्नौर कैलासचे ते शिखर बघून होत होता. नकळत मी हात जोडले. काल्पातली ती पहिली सकाळ इतकी सुंदर होती की, मला बाहेर पडल्याखेरीज राहवेना. मुलं गाढ झोपलेली होती, पण पृथ्वीच्या हॉटेलमध्ये असल्यामुळे मला त्यांची चिंता नव्हती. शूज वगैरे चढवून मी खाली आले, खालच्या स्टाफला मुलांकडे लक्ष ठेवायला सांगून मी चालायला म्हणून बाहेर पडले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सफरचंदाच्या बागा, मधूनच वाहणारा खळाळत्या पाण्याचा ओहोळ आणि जरासं खाली वसलेलं काल्पा गाव. उन्हाळा होता तरीही जाणवेल न जाणवेल अशी गुलाबी थंडी होती हवेत. चालताना मस्त वाटत होतं. हिमालयात नेहमी असतो तसा एक धिप्पाड कुत्राही कुठून तरी माझ्या सोबतीला आला होता. मी आणि तो सोडल्यास रस्त्यावर दुसरं कुणीच दिसत नव्हतं. मी माझी चालायची गती वाढवली. मध्येच रस्त्याने एक लयदार वळण घेतलं. आता गाव आणि सफरचंदाच्या बागा मागे पडल्या होत्या. रस्त्याच्या दुतर्फा देवदार वृक्षांची दाटी सुरू झाली होती. अचानक मला समोरून चालत येणारी एक परदेशी मुलगी दिसली. मी माझी गती किंचित हळू करून तिला हसून अभिवादन केलं. ती थांबली. मी तिला ‘हाय’ म्हटलं होतं, ती चक्क हात जोडून मला ‘नमस्ते’ म्हणाली. माझ्याच वयाची असावी बहुतेक. आम्ही एकमेकींकडे बघून परत एकवार हसलो आणि आपापल्या वाटेने चालू लागलो.

जवळजवळ आठ किलोमीटर चालून मी दीडेक तासाने हॉटेलमध्ये परतले. मुलं अजून झोपलेलीच होती, त्यामुळे चहा प्यायला म्हणून खाली रेस्टॉरंटमध्ये आले. एका टेबलापाशी मला मघाशी भेटलेली परदेशी मुलगी ग्रीन टी पीत बसली होती. माझी चाहूल लागून तिने वर पाहिलं. ओळखीचं हसली. ‘मी इथे बसू का?’ मी तिला इंग्रजीत विचारलं, ‘हो हो, बस ना,’ ती म्हणाली. मी चहा मागवून तिच्याच टेबलवर बसले. आमच्या गप्पा सुरू झाल्या.
‘मी हेलेन. मी न्यूझीलंडची आहे. गेले पाच महिने इथे काल्पामध्ये आहे. आधी मी इथे शांग्रीलामध्येच राहात होते, पण इथला दर दीर्घकाळ वास्तव्याला खूप महाग पडतो, म्हणून पृथ्वीनेच माझी एका दुसऱ्या गेस्टहाउसमध्ये सोय करून दिली. पण कधी कधी चहा घ्यायला, पृथ्वीच्या लायब्ररीत पुस्तके वाचायला मी येते इकडे,’ हेलेन म्हणाली. मीही स्वतःची ओळख करून दिली. मुलांना घेऊन हिमाचल भटकायला आलेय, हे सांगितलं. ‘खूप चांगलं केलंस. हा हिमालय आहे ना तो सगळ्यांचा आश्रयदाता आहे. तुला माहीत आहे, मला ब्रेस्ट कॅन्सर झालाय. तीन वर्षांपूर्वी निदान झालं. फक्त अडतीस वर्षांची होते मी तेव्हा. सर्जरी झाली, किमोचे सायकल्स झाले. खूप खूप त्रास झाला मला. त्या औषधांच्या दुष्परिणामामुळे आणि ताणामुळे रात्र रात्र झोप येत नव्हती. पुरतं नैराश्य आलं होतं. हे असं जगण्यापेक्षा मरून गेलेलं काय वाईट, असं वाटायचं सारखं,’ हेलेन म्हणाली. तिच्या हिरव्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते.

‘त्या वातावरणापासून सुटका मिळावी म्हणून जरा बरं वाटताच मी फिरायला निघाले. जग बघायची माझी खूप इच्छा होती, पण इतके दिवस नोकरी, करियर, घराचे हप्ते, रिलेशनशिप या सगळ्या चक्रातून ते शक्य झालं नव्हतं. पण कर्करोगाचं निदान झालं आणि या सगळ्या अनावश्यक बेड्या आपोआपच गळून पडल्या. आता नाही भटकणार तर मग कधी, हा विचार करून मी नोकरी सोडली. माझ्या रोगामुळे झालेल्या उलथापालथीत रिलेशनशिपही मागे पडली होती.
माझं घर मी भाड्याने दिलं आणि उरलेसुरले सर्व सेविंग्स काढून जग बघायला बाहेर पडले. युरोप बघितला, अमेरिका बघितली, पण सगळीकडे तीच अस्वस्थता. शेवटी कधीतरी नेपाळला आले, तिथे पहिल्यांदा हिमालय बघितला, मंदिरं बघितली आणि आतून कुठेतरी आश्वस्त वाटलं. नेपाळहून भारतात आले, उत्तराखंड फिरून इथे हिमाचलला. अशीच कधीतरी भटकत भटकत इथे काल्पाला आले आणि का कोण जाणे, एकदम स्वतःच्या घरी आल्यासारखं निवांत वाटलं इथे. म्हणून इथेच राहिले दोन-तीन महिने. मग व्हिसा संपला म्हणून परत घरी जावं लागलं, पण आता न्यूझीलंड इतकं परकं, इतकं अलिप्त वाटायला लागलं होतं की, माझं मन तिथे रमेना. सारखा डोळ्यांसमोर किन्नौर कैलास यायचा. सारखी काल्पाची स्वप्नं पडायची. माझ्या आईला हे बिलकुल पसंत नव्हतं.
‘न्यूझीलंडसारखा इतका सुरेख, इतका संपन्न देश सोडून कशाला त्या दरिद्री देशात जातेस एकटी? तिथे काही झालं तर तुला डॉक्टर पण मिळणार नाही चांगला,’ आई सारखी म्हणायची. पण मला आतून तीव्रतेने परत भारतात जावंसं वाटायचं. शेवटी आईवडिलांशी भांडण करून आलेच परत इथे,’ किंचित हसत हेलेन म्हणाली.
तिची गोष्ट ऐकून मी सुन्नच झाले होते. मी किंचित झुकून तिच्या खांद्यावर थोपटलं. माझा हात तसाच उचलून गालाशी धरत हेलेनने विचारलं, ‘तुझा पुनर्जन्मावर विश्वास आहे का गं? मला भारताबद्दल, काल्पाबद्दल इतकी ओढ का वाटते? ना माझं कुटुंब इथे आहे, ना मित्रमैत्रिणी. एक पृथ्वी आणि एक-दोन इतर मोजके लोक सोडले तर इथे मला कुणी तसं जवळचं नाही, तरीही मी माझ्या आजारासकट इथेच निवांतपणे राहू शकते. अजूनही रात्री मला बराच वेळ झोप लागत नाही. कधी लागलीच तर दचकून जाग येते, मग मी खिडकीतून किन्नौर कैलासचं शिखर बघते आणि शिवाला नमस्कार करते. हळूहळू माझ्या हृदयाचे ठोके नॉर्मल होतात आणि मग शांत झोप लागते.’
हेलेनला कडकडून मिठी मारली मी. सर्वस्वी परक्या देशातल्या काल्पासारख्या छोट्या गावात येऊन अशा असाध्य आजारासकट एकटं राहण्याचं धैर्य या मुलीने कशाच्या बळावर दाखवलं होतं? हिमालयाच्या?

shefv@hotmail.com
बातम्या आणखी आहेत...