आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नूरनपूरच्‍या किल्‍ल्‍यातील मीरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंजाबमधला मुक्काम आता संपला होता. इथलं चंबूगबाळं आवरून आता हिमाचल प्रदेशच्या दिशेने जायचं होतं. पुढचे अडीच आठवडे हिमाचलमध्येच घालवणार होतो आम्ही. अमृतसर-पालमपूर-मशरूर-रीवालसर-कुल्लू-तिर्थन व्हेली-शोजा-जलोर पास- सराहन-काल्पा-नारकंडा असा भरगच्च रूट होता. हिमाचल प्रदेशमध्ये बारा जिल्हे आहेत, त्यातल्या पाच जिल्ह्यांमधून आम्ही प्रवास करणार होतो. हॉटेल्सची बुकिंग्स कुठेही केलेली नव्हती आणि जायचा रस्ता साधारण मनात आखून ठेवला होता, तरी अधे-मधे बदल करायला खूप वाव होता. फक्त गाडी ठरवली होती, बाकीचं सगळं तसंच मुद्दामहून अधांतरी ठेवलं होतं. कुठे राहणार, काय खाणार, काय बघणार हे सगळंच वाटेत ठरवायचं, असं ठरवून चालले होते. अर्थात, मुलांनाही तशी कल्पना देऊन ठेवलीच होती.

गाडी माझ्या मित्राचीच होती. पवन सोनी त्याचं नाव. २०११मध्ये मी एकटीच हिमाचल भटकायला गेले होते, तेव्हा पवनची ओळख झाली. त्याच्याच गाडीत बसून मी काकडणाऱ्या डिसेंबरच्या थंडीत लाहौल-स्पितीला गेले होते. त्या तसल्या निर्मनुष्य, खूप उंचीवरच्या, जीवघेणी वळणं असलेल्या रस्त्यांवर गाडी चालवणं म्हणजे अमाप कौशल्याचं काम. काही अघटित घडलं, गाडी बंद पडली तर मदतीची शक्यता जवळजवळ नाहीच. अशा ठिकाणी प्रवास करताना तुमच्या सारथ्याच्या कौशल्यावर तुमचा पूर्ण विश्वास नसेल तर तुम्ही पुढे जाऊच शकणार नाही. मला पवनने लाहौल-स्पितीला नेऊन सुखरूप परत आणलं होतं. त्या प्रवासात आमची चांगली मैत्रीही झाली होती. त्यामुळे या खेपेला मुलांना बरोबर घेऊन जाताना साहजिकच माझ्या डोळ्यांपुढे पवनचीच गाडी होती.

सकाळी अमृतसरवरून नऊच्या सुमारास निघालो. दोनेक तासांनी पठाणकोट आलं. पठाणकोट हे पंजाबमधलं शेवटचं शहर. इथून दूर क्षितिजावर हिमाचलच्या डोंगर-रांगा दिसायला लागतात. पंजाबचा सपाट प्रदेश रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पसरलेला, गव्हाची शेते, मधूनच दिसणारी गावे, पांढरी, मातकट बसकी घरे तर कुठे अालिशान बंगले... पण एकूण सगळं दृश्य काहीसं एकसुरी, कंटाळवाणं. पठाणकोट आलं आणि हिमाचलचे डोंगर खुणावायला लागले. एका मागोमाग एक अशा धूसर, निळसर होत गेलेल्या डोंगरांच्या रांगा, आकाशात मेंढरांचे कळप चरताना दिसावेत तसे पुंजक्या-पुंजक्याने एकवटलेले काळे-सावळे ढग आणि हळूहळू कमी होत जाणारं तापमान.
पठाणकोट एकेकाळी नूरपूर संस्थानाचा भाग होतं. राणा भेट नावाच्या राजाने सोळाव्या शतकात हे राज्य स्थापन केलं. त्याचा नातू राजा बसू देव याने नूरपूर येथे एक भव्य किल्ला बांधला. या गावाचं मूळ नाव होतं धामेरी, पण मुघल राणी नूरजहान इथे काही दिवस हवापालटासाठी येऊन राहिली होती म्हणून गावाचं नाव पडलं नूरपूर. असं म्हणतात की, नूरजहानला निसर्गसौंदर्याने बहरलेलं नूरपूर इतकं आवडलं की, तिने जहांगीर राजाकडे हट्ट धरला की त्याने नूरपूर जिंकून घ्यावं. नूरपूरच्या राजाला माहीत होतं की, त्याचं चिमुकलं राज्य भल्यामोठ्या मुघल साम्राज्याशी कधीच टक्कर घेऊ शकणार नाही. राजा विचारात पडला की, आता काय करावं. त्याच्या प्रधानाने त्याला एक शक्कल सुचवली. राज्यात अशी अफवा उठवली गेली की, देवीची साथ राज्यात जोराने पसरतेय. नूरजहानला आपल्या सौंदर्याचा फार अभिमान होता. जेव्हा तिने देवीची साथ पसरतेय, ही अफवा ऐकली तेव्हा आपला चेहरा खराब होईल, या भीतीने एका रात्रीत नूरपूरच्या किल्ल्यामधला आपला मुक्काम आवरता घेतला आणि ती पंजाबला परत गेली. असं हे नूरपूर संस्थान.

नूरपूरचा किल्ला वाटेतच आहे, म्हणून आम्ही बघायला गेलो. किल्ल्याच्या महाद्वारापर्यंत रस्ता जातो. महाद्वार सुंदर आहे, पूर्ण दगडी बांधणीचं. दोन्ही बाजूला खोबणीत श्री गणेशाची मूर्ती कोरलेली आहे. किल्ल्याचं आवार खूप मोठं, आतमध्ये राजमहालाचे अवशेष आहेत आणि एक सरकारी शाळाही भरते. किल्ल्याच्या उत्तर टोकाला सोळाव्या शतकात बांधलेलं ब्रिजराज स्वामी मंदिर आहे. इथलं वैशिष्ट्य म्हणजे, हे भारतातलं एकमेव असं मंदिर आहे जिथे कृष्णासोबत मीरेच्या मूर्तीची पूजा होते. मंदिर अत्यंत शांत आणि रमणीय असे आहे. मंदिराच्या समोरच एक महाकाय मौलसेरीचा वृक्ष आहे. आम्ही गेलो तेव्हा मंदिरात कोणीही नव्हतं. म्हातारे पुजारीबुवा निवांतपणे मौलसेरीच्या झाडाखाली सावलीत विसावले होते. आम्हाला बघून ते लगबगीने उठले. आम्ही मंदिरात गेलो. कृष्णरंगात रंगलेल्या मीरेचं आणि तिच्या लाडक्या गिरीधर गोपाळाचं दर्शन घेतलं. पुजारी म्हणाले की, इथली श्रीकृष्णाची मूर्ती ही मीरेची स्वतःची पूजेची मूर्ती होती. ती चित्तोडगढच्या राजाने भेट म्हणून नूरपूरच्या राजाला दिली. त्या मूर्तीकडे बघताना माझ्या डोळ्यांत पाणीच उभं राहिलं. देव दिसलाच नाही, दिसली ती ‘मेरे तो गिरिधर गोपाल, दुसरो ना कोई’ म्हणत हसत हसत नवऱ्याने दिलेला विषाचा प्याला पिणारी कृष्णवेडी मीरा !
देवळाच्या दर्शनी भागात कांगडा शैलीत काढलेली अप्रतिम भित्तिचित्रे आहेत, ती बघितली आणि बाहेर पडलो. पावसाचे दिवस असल्यामुळे किल्ल्याच्या पठारावर हिरवंगार गवत उगवलं होतं. मुलं कानात वारा गेलेल्या वासरासारखी इथे-तिथे उन्मुक्त उंडारत होती. किल्ल्याच्या तटबंदीवरून खालची खोल दरी आणि दरीमधून वळणे घेत, लाजत-मुरकत वाहणारी जब्बर नदी! त्या सुंदर ठिकाणाहून पाय निघता निघत नव्हता, पण रात्रीचा मुक्काम पालमपूरला करायचा होता, त्यामुळे निघणं भागच होतं. जाता-जाता मुलं म्हणाली, ‘आपल्या पुरंदर किंवा सिंहगडपेक्षा हा किल्ला खूपच सोपा आहे नाही चढायला?’ मनात आलं, किल्ला सुंदर होता खरा, पण आपल्या सह्याद्रीच्या किल्ल्यांवर चढण्याची मजा काही औरच !

shefv@hotmail.com
बातम्या आणखी आहेत...