आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजस्त्र रारंग ढांग आणि घनगंभीर सतलज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेकडो फूट खाली दरीतून सतलज उसळून वाहात होती. तिच्या प्रवाहाची घनगंभीर, वेद घोषासारखी गाज पार रस्त्यापर्यंत ऐकू येत होती. या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालक अत्यंत कुशल असावा लागतो कारण इथे चुकांना वाव नाही. गाडी जरा रस्त्यावरून हटली तर एका बाजूने सरळ सतलजमध्ये जलसमाधी ठरलेली तर दुसऱ्या बाजूने काळाकभिन्न डोंगरकडा तुमचा घास घ्यायला आ वासून उभा!

आमचा सराहानचा मुक्काम फक्त एकच रात्रीचा होता. सकाळी उठून परत एकदा भीमाकाली देवीचं दर्शन घेतलं आणि किन्नौरला निघालो. किन्नौर हा हिमाचल प्रदेशच्या १२ जिल्ह्यांपैकी एक. लाहौल आणि स्पिती या थंड वाळवंटी प्रदेशाला लागून असलेला. किन्नौरचे भौगोलिकदृष्ट्या दोन भाग पडतात, देवदार वृक्षांच्या जंगलांनी आणि सफरचंदाच्या बागांनी नटलेला खालचा किन्नौर आणि वृक्षरेषेच्या वरचा, उजाड, खडकाळ, भव्य डोंगरांनी सजलेला वरचा किन्नौर. अप्पर किन्नौरच्या पर्वतरांगा इतक्या उंच आहेत की, मॉन्सूनचे ढग ते पर्वत ओलांडून पलीकडे जाऊ शकत नाहीत, त्यामुळे या प्रदेशात पावसाचं प्रमाण नगण्य आहे. इथे जी मोजकी गावं आहेत त्यांना पाणी मिळतं ते उन्हाळ्यात वरच्या हिमनद्या वितळल्यावरच. वर्षातले सहा महिने इथे हाडं गोठवणारी थंडी असते, रस्त्यावर कधी कधी सहा-सहा फुटापर्यंत बर्फ साठून राहतो. रस्ते बंद होतात, तरीही इथल्या गावांमधून लोक राहातात. त्या तशा परिस्थितीत जमेल तशी शेती करतात. उन्हाळ्याच्या तीन महिन्यात बटाटे, वाटाणे, मका अशी दीर्घकाळ टिकणारी पिकं घेतात.
आम्ही सराहान सोडून परत रामपूरला खाली उतरलो आणि किन्नौरकडे जाणाऱ्या हमरस्त्याला लागलो. रामपूरहून पुढे किन्नौरला जाणारा रस्ता खरोखरच छातीत धडकी भरवणारा आहे. सध्या हा रस्ता राष्ट्रीय हमरस्ता २२ म्हणून ओळखला जातो. पूर्वी याच रस्त्याला हिंदुस्थान-तिबेट रस्ता म्हणायचे. १८५०मध्ये तेव्हाचे भारताचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांनी या रस्त्याचे काम सर्वप्रथम सुरू केले. तेव्हा हा रस्ता किन्नौरहून शिबकी-ला पासमार्गे तिबेटपर्यंत जायचा.
सध्याचा रस्ता बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन या भारतीय सैन्याच्या रस्ते बांधणी विभागाने बनवलेला आहे. आजही या रस्त्यावरून प्रवास करताना श्वास रोखला जातोच. एका बाजूला खाली खोल दरीत रौद्र आवाज करत वाहणारी सतलज आणि दुसऱ्या बाजूला छाती दडपून टाकणारे उंचचउंच पर्वत. त्या पर्वताचा काळाकभिन्न कातळ कापून त्यामधून रस्ता बनवलेला. बऱ्याच ठिकाणी कातळ अर्धवट बोगद्यासारखा कापलेला, म्हणजे नदीच्या बाजूने भिंत नाही, पण डोक्यावर कातळाचा ओव्हरहँग. जगातल्या सगळ्यात धोकादायक हमरस्त्यांमध्ये या रस्त्याचं नाव घेतलं जातं.
किन्नौरला जाणाऱ्या या रस्त्यावरून प्रवास करताना मला सतत प्रभाकर पेंढारकरांच्या “रारंग ढांग’ या कादंबरीची आठवण येत होती. डोंगर कापून हा रस्ता बनवताना किती कामगारांच्या रक्ताचं पाणी झालं असेल, याचा विचार करत मी गाडीत गप्पच बसून होते. शेकडो फूट खाली दरीतून सतलज उसळून वाहात होती. तिच्या प्रवाहाची घनगंभीर, वेदघोषासारखी गाज पार रस्त्यापर्यंत ऐकू येत होती. या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालक अत्यंत कुशल असावा लागतो कारण इथे चुकांना वाव नाही. गाडी जरा रस्त्यावरून हटली तर एका बाजूने सरळ सतलजमध्ये जलसमाधी ठरलेली तर दुसऱ्या बाजूने काळाकभिन्न डोंगरकडा तुमचा घास घ्यायला आ वासून उभा! इथल्या रस्त्यापुढे महाराष्ट्रातले अवघडातले अवघड घाटरस्तेसुद्धा अगदीच किरकोळ वाटणारे.
पहाडी भाषेत उत्तुंग डोंगरांना ढांग म्हणतात. रारंग ढांग हा किन्नौरमधला खूप उंच डोंगर. शतकानुशतके तसाच त्याच्या जागी ठाम, अचल उभा असलेला, डोक्यावर हिमाचा शुभ्र मुकुट घालून, विचारमग्न, शांत; आणि त्याला अगदी बिलगून शतकानुशतके वाहणारी सतलज, क्षणभरही एका जागी न थांबू शकणारी, प्रवाही, अस्वस्थ, चंचल, अवखळ. एका बाजूने सतलजचा प्रवाह आणि दुसऱ्या बाजूने उभ्या असलेल्या ढांगाची अजस्त्र छाया निरखत मी विचारात गढून गेले होते. मुलंही आज गप्प गप्पच होती, गाडीच्या काचांना चेहेरा टेकवून डोळे विस्फारून पुढ्यातला अवघड रस्ता निरखत होती.
‘मम्मा, हा डोंगर माणूस असता तर तू त्याला सोडून गेलीच नसतीस नं?’ अचानक अनन्याने मला प्रश्न विचारला. तिच्या डोक्यात असंच काहीतरी विचारांचं भिरभिरं सतत फिरत असतं. तिचा प्रश्न ऐकून मी माझ्या तंद्रीतून बाहेर आले. ‘सांग नं,’ माझा खांदा हलवत तिने परत तोच प्रश्न विचारला. मी हसले. ‘अगं, मी डोंगराशीच लग्न केलंय,’ मी म्हणाले. ‘म्हणजे?’ ‘म्हणजे डोंगर जर माणूस असता तर तुझ्या अप्पांसारखाच असता ना? उंच, शांत, अचल, आपल्या विचारांवर ठाम?’ मी विचारलं. अनन्या विचारात पडली. ‘पण अप्पा जर डोंगर असेल तर तू कोण आहेस? ही सतलज नदी का? सतत कुठेतरी प्रवास करू पहाणारी?’ अनन्याने मला विचारलं. मला काय उत्तर द्यावं कळेना. या नखाएवढ्या चिमुरडीने तिच्या बाबाच्या आणि माझ्या नात्यातलं नेमकं सार किती मोजक्या शब्दात उकललं होतं!

shefv@hotmail.com
बातम्या आणखी आहेत...